राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनक आणि आद्य सरसंघचालक कै. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सतत पंधरा वर्षे अविश्रांत परिश्रम करून अखिल भारतीय स्वरूपात संघाचे बीजारोपण केले. १९४० साली नागपूरला संघ शिक्षावर्गासाठी आलेल्या कार्यकर्त्यांपुढे अखेरचे भाषण करताना, ''मी येथे हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप पाहत आहे'' असे उद्गार डॉक्टरांनी काढले होते. नंतर २१ जून १९४० रोजी डॉक्टरांनी इहलोकीची यात्रा संपविली, ती श्री. माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरूजी यांच्या खांद्यावर संघाची सारी जबाबदारी टाकून.
श्रीगुरूजी हे संघाचे द्वितीय सरसंघचालक. हे दायित्व त्यांनी १९७३ च्या ५ जूनपर्यंत म्हणजे सुमारे ३३ वर्षे सांभाळले. ही ३३ वर्षे संघाच्या व आपल्या राष्ट्राच्या जीवनातही अत्यंत महत्त्वाची. १९४२ चे 'भारत छोडो' आंदोलन, १९४७ ची फाळणी व खंडित भारताला राजकीय स्वातंत्र्याचा लाभ, फाळणीपूर्वी व फाळणीनंतर झालेला भयानक रक्तपात, हिंदू विस्थापितांचे भारतात आलेले प्रचंड लोंढे, पाकिस्तानचे काश्मीरवरील आक्रमण, १९४८ च्या ३० जानेवारीला झालेली गांधी हत्या, त्यानंतरची वावटळ आणि संघावर आलेली बंदी, भारताच्या राज्यघटनेची सिध्दता, स्वतंत्र भारताच्या शासकीय धोरणाची स्वरूपनिश्चिती, भाषावार प्रांतरचनेचा अंमल, १९६२ मधील चिनी आक्रमण, पं. नेहरूंचा मृत्यु, १९६५ भारत-पाक युध्द, १९७१ मधील दुसरे भारत-पाक युध्द व बांगला देशाचा जन्म, हिंदूंच्या अहिंदूकरणाचा उद्योग व राष्ट्रीय जीवनातील वैचारिक मंथन अशा अनेकविध घटनांनी व्याप्त असा हा कालखंड. या काळात संघाचे पोषण आणि संवर्धन श्रीगुरुजींनी केले. भारतभर अखंड भ्रमण करून त्यांनी सर्वत्र कामाला गती दिली व ठायी ठायी माणसे जोडून संघाला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. डॉक्टरांनी संघाची विचारप्रणाली सूत्ररूपाने सांगितली होती. तिचे समग्र स्वरूप श्रीगुरूजींनी समर्थपणे उलगडून दाखविले. अफाट वाचन व सखोल चिंतन, आध्यात्मिक साधना व गुरूकृपा, मातृभूमीसाठी नि:स्वार्थ समर्पणशीलता, समाजासंबंधीची अथांग आत्मीयता, माणसे जोडण्याचे अनुपम कौशल्य इत्यादी गुणांमुळे संघटना तर यांनी सर्वत्र पुष्ट केलीच, पण सर्व क्षेत्रांत देशाचे परिपक्व वैचारिक मार्गदर्शनही केले. भारताचे राष्ट्रस्वरूप, त्याचे नियत जीवनकार्य आणि आधुनिक काळी त्यांच्या पुनरूत्थानाची वास्तविक दिशा यासंबंधीचे त्यांचे कसदार विचार म्हणजे देशाचे थोर विचारधन ठरले आहे.
असे हे एक अलौकिक आणि ऋषितुल्य जीवन. आध्यात्मिक दृष्टीने योगारूढ पण समष्टिरूप भगवंताच्या पावन अर्चनेसाठी लौकिकात वावरलेले. एकांतप्रिय व मुक्त, पण विहित कर्तव्याच्या वेधाने लोकांतात सक्रिय झालेले. विलक्षण प्रतिभाशाली राष्ट्रजीवनाच्या अंगोपांगांचा आदर्शवादी वेध घेणारे. संघाच्या विशुध्द आणि प्रेरक राष्ट्रविचारांचे लोण राष्ट्रजीवनाच्या अंगोपांगात पोहोचविल्याविना समर्थ, आत्मविश्वाससंपन्न आणि नियत जीवनकार्य पार पाडण्याची क्षमता असलेला भारतवर्ष उभा व्हावयाचा नाही, या तळमळीने त्यांनी कितीतरी कार्यक्षेत्रे प्रेरित केली. विश्व हिंदू परिषद, विवेकानंद शिला स्मारक, अ.भा. विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याणाश्रम, शिशुमंदिरे आणि विविध सेवासंस्था यांमागे प्रेरणा श्रीगुरूजींचीच. राजकीय क्षेत्रातही डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांना पं.दीनदयाळजींसारखे अनमोल रत्न त्यांनी दिले. तात्कालिक आपत्तींच्या निवारणार्थ त्या त्या वेळी निरनिराळया समित्या स्थापून त्यांनी काम करवून घेतले. स्वत:ला कोणत्याही असक्तीचा किंवा ईर्षेचा कधी स्पर्श होऊ दिला नाही. त्यामुळे श्रीगुरूजींच्या वैचारिक मार्गदर्शनाचा एक व्यापक ठसा आपल्या राष्ट्रजीवनावर उमटला आहे. राष्ट्रविचार जीवनदृष्टी आणि जीवननिष्ठा यांचे उपकारक वरदान ज्यांनी श्रीगुरूजींच्या कार्यकालात ग्रहण केले अशी सहस्रावधी माणसे आज देशभर उभी आहेत. अराष्ट्रीय व सदोष विचारपध्दतीच्या गाजावाजाने पूर्वी प्रभावित झालेली माणसेही भ्रमनिरास होऊन संघाच्या विचारधारेकडे वळताना दिसत आहेत. संघाला करण्यात येत असलेले गलिप्रदान व उच्चतम शासकीय पातळीवरून देखील संघाविरूध्द हेतुपुरस्सर करण्यात येणारा अपप्रचार वांघोटा, किंबहुना अशा अपप्रचारकांवरच उलटणारा ठरत आहे. श्रीगुरूजींनी आपले जे अतिप्राचीन सांस्कृतिक राष्ट्रस्वरूप विरोधाची तमा न बाळगता निर्भयपणे व छातीठोकपणे सतत सांगितले, त्याचाच हा परिणाम होय. श्रीगुरूजी केवळ बोलले नाहीत तर विशुध्द राष्ट्रनिष्ठेची माणसे त्यांनी उभी केली, हा त्यांचा विशेष. अपप्रचारामुळे श्रीगुरूजी अनेकदा वादविषय बनले. त्यांच्या अनेक मतांचे विकृतीकरण करून राजकीय भांडवल पैदा करण्याचा हितसंबंधी लोकांनी प्रयत्न केला. पण 'घृष्टं घृष्टं पुनरपि पुन: चंदनं चारूगन्धम्' या न्यायाने त्या विचारांचा सुगंध अधिकाधिक प्रमाणात दरवळत आहे. टीकेमुळे श्रीगुरूजी कधी विचलित वा प्रक्षुब्ध झाले नाहीत. पातळी त्यांनी कधी सोडली नाही. द्वेषभावनेचा उदय त्यांच्या विमल चित्तात कधी झाला नाही. कोणाचे वाईट त्यांनी कधी चिंतले नाही. हिंदू जीवनविचार आणि त्या विचारांचे मूर्त प्रतीक असलेल्या हिंदुराष्ट्राच्या पुनरूत्थानाचे उद्दिष्ट यांपासून ते कधी ढळले नाहीत. व्यवहारात अतिशय स्नेहशील असलेले श्रीगुरूजी तत्वाच्या बाबतीत विलक्षण आग्रही होते. आत्मविस्मृतीकडे व आत्मावमानाकडे नेणारी किंवा राष्ट्रीय श्रेयात बाधा आणणारी तडजोड त्यांना कधीच मान्य झाली नाही.
अशा व्यक्तिमत्वासंबंधी वाढती जिज्ञासा लोकांत निर्माण व्हावी, हे स्वाभाविकच होय. श्रीगुरूजींनी कर्करोगाने पोखरून टाकलेल्या आपल्या कुडीचा त्याग केला, त्याला आता चोवीस वर्षे उलटली आहेत. समस्त संघस्वयंसेवकांच्या अत:करणात तर श्रीगुरूजींची प्रेरक स्मृती टवटवीत आहेच, पण देशातही अशी परिस्थिती निर्माण होत आहे की श्रीगुरूजींनी त्या त्या वेळी द्रष्टेपणाने केलेल्या मतप्रदर्शनाचे उत्कटतेने स्मरण व्हावे. त्या त्या देशातील राष्ट्रीय समाज व त्याची गुणवत्ता हा राष्ट्रीय गौरवाचा आधार असतो. केवळ शासनसत्तेतील बदलाने ही गुणवत्ता निर्माण होत नाही. सातत्याने चरित्र्यगुणांचे संस्कार करणारी व्यवस्था देशात आवश्यक असते, हा विचार श्रीगुरूजी आग्रहपूर्वक मांडीत असत. त्याचे प्रत्यंतर आणीबाणीनंतरच्या कालखंडात आपण घेतले. सर्व कामे व इष्ट परिवर्तन यांचा केंद्रबिंदू 'माणूस' हा आहे. माणूस धड नसेल तर चांगल्या योजना व व्यवस्था यांचाही तो चुथडा करून टाकतो. भारतीय राज्यघटनेसंबंधी जो वाद सुरू आहे, त्याच्या संदर्भात श्रीगुरूजींचा मानवी गुणवत्तेवरील भर विलक्षण अर्थगर्भ वाटतो. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरूजी या दोन कर्तुत्ववान व ध्येयसमर्पित महापुरूषांचा वारसा घेऊनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांनी विकासाच्या किंवा संपूर्ण समाजाशी एकरूप करण्याच्या नव्या टप्प्यावर नेले आहे. या तिघांत वैचारिक दृष्टया काही अंतर असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अनेकांनी करून पाहिला. या भ्रामक प्रचाराचा निरास खुद्द श्री. बाळासाहेबांनीच अनेकवार केलेला आहे. श्रीगुरूजींची निवड डॉक्टरांनी केली होती व माझी निवड श्रीगुरूजींनी केलेली आहे, यातच सर्व काही आले, असे त्यांनी सांगितलेले आहे.
श्रीगुरूजींचे समग्र चरित्र लिहावयाचे म्हणजे मोठाच ग्रंथ होईल. श्रीगुरूजींच्या जीवनाचा आणि विचारांचा स्थूल आराखडा संक्षेपाने जिज्ञासूंना सादर करावा, एवढयाच मर्यादित उद्देशाने हा अल्पसा प्रयत्न आहे. तसा विचार केला, तर वैयक्तिक वा खासगी असे श्रीगुरूजींच्या संघजीवनात काही नव्हतेच. डॉक्टरांनी जसा व्यक्तिगत प्रपंच किंवा संसार उभा केला नाही, तसाच तो गुरूजींनीही केला नव्हता. संघाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा संसार त्यांनी आपला मानला. विराट समाजपुरूष हाच त्यांच्या ईश्वरनिष्ठ जीवनात भगवंतस्वरूप बनला. त्याचीच निष्काम सेवा त्यांनी जीवनभर भक्तिभावाने केली. गीतेतील कर्मयोग ते जगले. संघविचार व मातृभूमीला गौरव प्राप्त करून देण्यासाठी पौरूष प्रयत्नांची शर्थ याच गोष्टींशी त्यांचे 67 वर्षांचे आयुष्य निगडित आहे. ज्या देहाकडून ही सेवा घडू शकत नाही, त्या देहाचा मोह त्यांच्या चित्ताला कधी स्पर्श करू शकला नाही. ''कर्करोग आपले काम करतो आहे. मला माझे अंगीकृत कार्य केलेच पाहिजे.'' असे ते हसून म्हणत. विरागी पण कर्तव्यप्रवण असे श्रीगुरूजींचे कृतार्थ जीवन. त्याची केवळ धावती ओळख आगामी पृष्ठांत करून द्यावयाची आहे. विस्ताराने त्यांच्यासंबंधी लिहिण्यासाठी एखादी समर्थ लेखणी कधी उचलली जाईल ती जावो.