शिक्षण आणि संस्कार
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
धनवंत आणि कीर्तिमंत कुटुंबात जन्म झाल्यामुळे कित्येकांना मोठेपणाचे वलय जन्मत:च लाभते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही सरसंघचालकाला घराण्याच्या मोठेपणाची ही पार्श्वभूमी लाभली नाही. श्रीगुरूजींचा जन्म एका अत्यंत सामान्य अवस्थेतील कुटुंबात झाला. मुळात श्रीगुरूजींचे घराणे कोकणातील 'गोळवली' गावच्या पाध्यांचे. देशावर आलेल्या पाध्यांपैकी आधी पैठणला व नंतर नागपूरला आले ते श्रीगुरूजींचे आजोबा श्री. बाळकृष्णपंत. या स्थानांतरात 'पाध्येपण' लोपले व तो व्यवसाय सुटल्यामुळे आडनाव 'गोळवलकर पाध्ये' असे होते, ते केवळ गोळवलकर' असे उरले. श्रीगुरूजींचे वडील श्री. सदाशिवराव यांना लहानपणीच पितृवियोग घडला. शिक्षण अर्धवट सोडून उपजीविकेसाठी नोकरी करणे भाग पडले. दारिद्रयातील कष्ट व प्रपंचायतील यातना यांना अनेक वर्षेपर्यंत तोंड द्यावे लागले. नागपूरजवळच कामठी येथे तार व टपाल खात्यात श्रीगुरूजींच्या वडिलांची नोकरी होती. श्रीगुरूजींचे मातुल घराणे नागपूरच्याच रायकरांचे. आईचे नाव लक्ष्मीबाई. व्यवहारात श्रीगुरूजींच्या वडिलांना भाऊजी व मातोश्रींना ताई म्हणत. ताई-भाऊजी दांपत्याला एकूण चार पुत्ररत्नांचा लाभ झाला.पण पहिले दोन पुत्र एकेक वर्षाचे होताच काळाने त्यांना हिरावून नेले. आधीच कष्टमय असलेल्या प्रपंचात तेही सुख परमेश्वराने ठेवले नाही. तिसर्‍या पुत्राचे नाव ‘अमृत’ ठेवले. हा मुलगा पूर्वीच्या दोन मुलांइतका अल्पायु झाला नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी सन्निपाताच्या दुखण्यात त्याचा मृत्यु झाला.
 
अमृतच्या पाठीवर श्रीगुरूजींचा जन्म माघ कृष्ण एकादशी (विजया एकादशी) शके १८२७ ला (विक्रम संवत् १९६२) झाला. इंग्रजी दिनांक १९ फेब्रुवारी १९०६. वेळ पहाटे साडेचारची. घर नागपुर येथील श्री. रायकरांचे. अमृतच्या या धाकटया भावाचे नाव माधव असे ठेवण्यात आले. पण घरातील मंडळी प्रमाने त्याला 'मधू' म्हणत व श्रीगुरूजी लहान असताना तेच नाव प्रचलित होते. भाऊजी-ताई यांच्या नऊ अपत्यांपैकी मधूच तेवढा शिलक राहिला आणि मातापित्यांच्या भावी आशांचे केंद्र बनला. मधू अगदी लहान म्हणजे दोन वर्षाचा असतांनाच श्री. भाऊजींनी डाक-तार विभागातील नोकरी सोडली व आवडीच्या शिक्षकी पेशात ते शिरले. पण ही नोकरी मध्यप्रदेशच्या महाकोशल विभागात अगदी अंतर्भागामध्ये सरायपली येथील शाळेत होती. सरायपलीपासुन रायपूर व रायगढ ही दोन्ही शहरे दूर. एक ९० मैलांवर, तर दुसरे ६० मैलांवर. जायचे म्हणजे पायवाटेने चालत वा घोडयावर स्वार होऊन. आजच्या परिभाषेत आपण ज्याला अतिशय मागासलेला व आधुनिक सुधारणांपासून तुटलेला भाग म्हणू, अशा भागात लहानगा मधू येऊन पडला. पण एखादे जीवन उत्तम घडवायचेच असेल तर प्रतिकूलतेवर मात करणार्‍या काही अनुकूलता परमेश्वर देतो. त्याचा लाभ घेण्याची धारणा मात्र हवी. ही धारणा शैशवावस्थेतही मधूच्या ठायी दिसली हे विशेष. मातापित्यांनी जे जे चांगले दिले, ते त्याने तत्परतेने ग्रहण केले. भाऊजी हे ताठ कण्याचे, ज्ञानदानाची आस्था असलेले, सच्चरित्र शिक्षक होते, तर ताई या अत्यंत धर्मपरायण सुगृहिणी आणि सुमाता होत्या. मधू दोन वर्षांचा असतानाच त्याचे पाठांतर सुरू झाले. भाऊजींनी शिकवावे आणि मधूने ते सहज कंठस्थ करावे. ताईंचे शालेय शिक्षण झालेले नव्हते. पण संस्कारक्षम कथांचे भांडार त्यांच्याजवळ विपुल होते. ते सारे भांडार उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेल्या मधूला लाभले. लहानपणी आपल्यावर कशा प्रकारे संस्कार झाले, याचा उलेख उत्तरायुष्यात श्रीगुरूजींनीच पुणे येथील एका भाषणात केला होता. ते म्हणाले होते, ''माझे बालपण डोळयांपुढे आले म्हणजे हळुवार आणि मधुर स्मृतींनी माझे मन भरून येते. पहाटे मला झोपेतून उठविण्यात येई. त्यावेळी माझी आई एकीकडे हाताने घरातील कामकाज करता करता तोंडाने एखादे स्त्रोत्र म्हणत असे वा देवाचे नाव घेत असे. ते मंजुळ स्वर माझ्या कानांवर पडत. सकाळच्या शांत, प्रसन्न वेळी कानांवर येणार्‍या त्या मधुर स्वरांनी माझ्या बालमनावर किती खोल आणि पवित्र ठसा उमटविला असेल ?''
 
कुशाग्र बुध्दी, ज्ञानाची भूक, असाधारण स्मरणशक्ती, इतरांची दु:खे व अडचणी दूर करण्यासाठी स्वत: झिजण्याची प्रवृत्ती, पराकाष्ठेचा सोशिकपणा, निरहंकारिता आणि चित्ताची निर्मलता अशा अनेकविध गुणांचा प्रकर्ष 'माधवा' च्या बाल्यकाळातील विविध घटनांवरून प्रत्ययास येतो. कित्येक गुण उपचत असले तरी योग्य दिशेने त्यांचा विकास करण्याची ओढही असावी लागते. अशी ओढ माधवाच्या ठायी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व श्रीगुरूजींवर येऊन पडले, त्यानंतर त्यांच्या गुणसमृध्दतेची ओळख लोकांना मोठया प्रमाणावर झाली. पण या बहुतेक गुणविशेषांचे संवर्धन त्यांच्या विद्यार्थिदशेतच झालेले होते हे त्यांच्या चरित्रावरून दिसते. उदाहरणार्थ, अफाट वाचन, स्तिमित करून सोडणारे पाठांतर आणि हिंदी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व हे कोणाच्याही ध्यानात येणारे गुण घ्या. त्यांच्या वाचनाच्या कक्षा प्राथमिक शाळेत ते शिकत होते, तेव्हापासुनच विस्तारलेल्या होत्या. नाना प्रकारची पुस्तके वाचण्याचा त्यांचा झपाटा दांडगा होता. माध्यमिक शाळेत असतांनाच आंग्ल नाटककार शेक्सपिअर याची सारी नाटके त्यांनी वाचली होती. या नाटकांच्या कथा रोचकपणे ते आपल्या सहाध्यायांना सांगत असते. वर्गात एकीकडे शिक्षक पाठयपुस्तके शिकवीत असता अवांतर पुस्तकांचे त्यांचे वाचन चालू असे. पण वर्गात काय चालले आहे, याकडेही ते त्याच वेळी अवधान ठेवती असत. वर्गात बसल्या बसल्या माधव अवांतर पुस्तकाचे वाचन करतो याचा अर्थ अभ्यासाकडे त्याचे लक्ष नाही, असा त्यांच्या शिक्षकांनी केला. एकदा त्याची कानउघाडणी करण्याची संधी मिळावी म्हणून शिक्षकांनी दुसर्‍या विद्यार्थ्याचे पाठयपुस्तकातील धडयाचे वाचन चालू असतानाच त्याला थांबवून माधवला पुढे वाचण्यास सांगितले. माधवने शांतपणे पुस्तक हाती घेतले व आपल्या वर्गबंधूने जेथे वाचन थांबविले होते त्या नेमक्या वाक्यापासून पुढे वाचावयास प्रारंभ केला. शिक्षक थक्क झाले व आपल्या या शिष्योत्तमाची हजेरी घेण्याची संधी काही त्यांना लाभली नाही ! प्राथमिक शाळेत असतानाच भाऊजींनी माधवला इंग्रजीचे पाठ देण्यास प्रारंभ केला होता. माधवची प्रगती एवढी झाली की प्राथमिक चौथ्या इयत्तेत असताना तो नागपूरला आपल्या मामांना इंग्रजीत पत्रे लिहीत असे. वडिलांची नोकरी हिंदीभाषी प्रदेशात होती व वारंवार बदल्या होत गेल्यामुळे रायपूर, दुर्ग, खांडवा वगैरे अनेक ठिकाणचे पाणी माधवला चाखावयास मिळाले. या अवधीत हिंदी भाषेशी त्याचा चांगला परिचय झाला. मातृभाषा म्हणून मराठीचे ज्ञान होतेच. अनेक ठिकाणी वावरल्याचा आणखी एक परिणाम असा झाला की, भिन्न भिन्न भाषा बोलणार्‍या लोकांच्या संपर्कात ते आले. मनाचा संकुचितपणा राहिला नाही व सर्व भारतीय भाषा आपल्याच मानण्याची बैठक सिध्द झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून अगणित भाषणे श्रीगुरूजींना आयुष्यभर करावी लागली. त्यांचे वक्तृत्व अत्यंत ओजस्वी, स्फूर्तिप्रद आणि कसदार होते. या वक्तृत्वगुणाची जोपासनाही शालेय जीवनातच झाली. विषयाची परिश्रमपूर्वक तयारी करून वक्तृत्वस्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावण्याचा विक्रम त्यांनी बालवयातच केला होता. खूप खेळावे, घरी आपल्या वाटयाला येणारी सारी कामे आनंदाने करावीत, इतरांच्या सुखदु:खांशी सहजपणे समरस व्हावे, असा हा शालेय जीवनाचा काल त्यांनी सार्थकी लावला. भावी कर्तृत्वसंपन्न जीवनाची पायाभरणी याच काळात झाली.
 
पुढे एकदा श्रीगुरूजींच्या वडिलांनी असे उद्गार काढले की, ''माधव कोणी तरी मोठा व कर्तबगार माणूस होणार हे त्याच्या शालेय जीवनात दिसलेल्या गुणवत्तेवरून वाटत होते. पण तो एवढा मोठा होईल, याची कल्पना मात्र त्यावेळी आली नाही. नऊ अपत्यांपैकी एकटा माधवच उरला याचेही आता दु:ख नाही. कारण संघस्वयंसेवकांच्या रूपाने हजारो मुलेच जणू देशभर आम्हाला लाभली आहेत.'' हे बोलताना श्री. भाऊजींच्या मुखावर आपल्या अलौकिक पुत्रासंबंधीचा अभिमान प्रकटला होता व धन्यतेच्या भावनेचे पाणी त्यांच्या नेत्रांत तरारले होते. पण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, करारीपणा, नि:स्पृहपणा, कर्तव्यनिष्ठा, धर्मनिष्ठा परिश्रमशीलता आणि ज्ञानोपासनेची आवड हे जे गुण श्रीगुरूजींच्या जीवनात प्रकटले, ते मातापित्यांच्या जिवंत आदर्शामुळे. या थोर आदर्शांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख श्रीगुरूजींनी अनेकवार केलेला आहे. श्री. भाऊजींची चिकाटी व निर्धार यांची कल्पना एकाच गोष्टीवरून येऊन जाईल. शिक्षकी पेशा पत्करला तेव्हा भाऊजी केवळ मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. मध्ये बराच काळ गेलेला होता. पण त्यांनी पदवीधर व्हावयाचे ठरविले. मॅट्रिकनंतर वीस वर्षांनी इंटरमीजिएट परीक्षा ते उत्तीर्ण झाले व पदवीधर होण्यास त्यांना आणखी सात वर्षे लागली. नोकरी त्यांनी चोख बजावली, पण अवांतर वेळात ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे केले. मातु:श्री ताईंची जिद्द तर एवढी की १९३४ साली त्यांनी श्रीबाबाजी महाराज नामक सत्पुरूषाबरोबर प्रयाग ते आळंदी अशी हजार मैलांची पदयात्रा केली व संगमाच्या पवित्र गंगाजलाने ज्ञानेश्वरांच्या समाधीला स्नान घातले. या प्रवासात एका अपघातात सारी पाठा भाजून निघाली असताही सारी वेदना शांतपणे पचवून त्या चालत राहिल्या होत्या.
 
वडिलांच्या जसजशा बदल्या होत तसतशा शाळा बदलत. माधवरावांनी १९२२ साली चांदा (आता चंद्रपूर) येथील ज्युबिली हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. भाऊजींची इच्छा माधवरावांनी मेडिकल कॉलेजात प्रविष्ट होऊन डॉक्टर बनावे अशी होती. म्हणून पराकाष्ठेचा आर्थिक ताण सोसण्याची तयारी ठेवून त्यांनी माधवरावांना पुण्याच्या ख्यातनाम फर्गुसन महाविद्यालयात विज्ञानशाखेत प्रवेश घ्यावयास लावला. इंटर झाल्यानंतर मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळण्यासारखा होता. पण याच सुमारास मुंबई सरकारने एक फतवा काढून केवळ मुंबई राज्यातील स्थायी रहिवाश्यांपुरताच कॉलेज-प्रवेश मर्यादित केला. मध्यप्रांत आणि वर्‍हाड हा त्यावेळी मुंबई राज्यात मोडत नसल्यामुळे केवळ तीन महिन्यांतच माधवरावांना पुणे सोडून नागपूरला परतावे लागले. माधवरावांना डॉक्टर बनविण्याचे श्री. भाऊजींचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. नागपूरला परतल्यावर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालविलेल्या हिस्लॉप कॉलेजात विज्ञानशाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि १९२४ मध्ये इंटरची परीक्षा त्यांनी विशेष प्राविण्य दाखवून उत्तीर्ण केली. विज्ञानाचे विद्यार्थी असूनसुध्दा इंग्रजी या विषयात त्यांनी पारितोषिक पटकाविले. कॉलेज जीवनाच्या या पहिल्या दोन वर्षांत उत्कृष्ट खेळाडू आणि व्यासंगी व बुध्दिमान विद्यार्थी म्हणून लौकिक त्यांनी मिळविला. या काळातील एक घटना अशी की, प्राचार्य गार्डिनर यांनी शिकविण्याच्या ओघात बायबलमधील काही संदर्भ दिला. हे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालविलेले कॉलेज असल्यामुळे बायबलचे अध्ययन तेथे आवश्यक मानले जात असे. त्यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवला जात असे. माधवरावजींनी बायबल मनापासून व लक्षपूर्वक वाचले होते. त्यांची स्मरणशक्ती फार तलख होती. सरसंघचालक झाल्यावरही त्यांच्या भाषणात आणि चर्चेत बायबलमधील अनेक संदर्भ येत. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक घटना व त्यांची अनेक वचने ते उध्दृत करीत आधुनिक ख्रिस्तानुयायी म्हणविणारा समाज ख्रिस्ताच्या मूळ शिकवणुकीपासून किती दूर गेला आहे यावर ते नेमके बोट ठेवीत. येशू ख्रिस्तासंबंधी अनादराचा एक शब्दही त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडला नाही. फसवून वा प्रलोभनाने लोकांना ख्रिस्ती बनविणार्‍या, राष्ट्रधर्मापासून अशा धर्मांतरितांना दूर नेणार्‍या व भारतीयांत नाना कलहबीजे पेरणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर मात्र ते कोरडे ओढीत. असो. प्राचार्य गार्डिनर यांनी दिलेला संदर्भ चुकीचा आहे असे माधवरावजींना वाटले व त्यांनी उभे राहून तसे स्पष्टपणे सांगितले. जो उतारा या संदर्भात अभिप्रेत होता तो घडाघडा म्हणून दाखविला. प्राचार्य महाशय चमकले, पण आपल्यापेक्षा या विद्यार्थ्याचा बायबलचा अभ्यास अधिक चांगला आहे हे त्यांना एकदम कसे मान्य व्हावे त्यांनी लगेचच बायबलची प्रत मागविली व मुळातून सगळा संदर्भ पाहिला. माधवरावांनी घेतलेला आक्षेप बरोबर होता आणि आपलीच गफलत झाली होती, हे त्यांना पटले तेव्हा त्यांनी खिलाडूपणाने माधवरावांना शाबासकी दिली. या दोन वर्षांच्या काळात, प्रसंगी कॉलेजमधील तासांना दांडी मारूनही, माधवरावांनी चौफेर वाचन चालूच ठेवले होते. शाळेत काय, किंवा कॉलेजात काय, केवळ परिक्षेतील यशासाठी अध्ययन करावे, ही त्यांची वृत्तीच नव्हती. ज्ञानार्जनाची तीव्र भूक शमविण्यासाठी ते वाचत असत. वाचनाच्या छंदापायी अभ्यासाची उपेक्षा मात्र त्यांनी कधी होऊ दिली नाही. सुप्रसिध्द अंध बासरीवादक श्री. सावळाराम यांच्याबरोबर जुळलेल्या मैत्रीमुळे बासरीवादनाचा छंदही त्यांना याच काळात जडला.
 
इंटरमीजिएटची परीक्षा झाल्यावर माधवरावजींच्या जीवनातील एका नव्या आणि दूरपरिणामी अध्यायाला प्रारंभ झाला. या अध्यायाचा प्रारंभ होतो, बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी घेतलेल्या प्रवेशापासून.