परिस्थिती निरपेक्ष कार्यक्रम
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
एकदा मी पंजाबच्या प्रवासात होतो. संघस्थानावर स्वयंसेवकांचे एकत्रीकरण, प्रामुख्याने शारीरिक कार्यक्रम व अत्यावश्यक थोडेसे बोलण्याची योजना होती. मी जालंधरला पोहोचलो. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. संघस्थानावर एकत्रीकरणाच्या कार्यक्रमासाठी आवश्यक ती सरकारी अनुमती घेतली गेली होती. संध्याकाळी देखील पाऊस पडतच होता. म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी विचारले की, संघस्थानावरील कार्यक्रमात काही बदल करायचा का? मी सांगितले की, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सांघिक व शारीरिक कार्यक्रम घ्यावेत.
 
संध्याकाळी पाऊस पडतच होता, मात्र स्वयंसेवक शांतपणे शारीरिक कार्यक्रम करत होते. मी तेथे पोहोचल्यानंतरही कार्यक्रम चालूच होते. कुणीतरी माझ्या डोक्यावर छत्री धरली. मी छत्री मिटवायला सांगितले. सर्व स्वयंसेवक पावसात भिजत कार्यक्रम करत होते. प्रार्थनाही झाली.
 
गुप्तचर पोलिसांचा एक वरिष्ठ अधिकारी जरा दुरून हे सर्व कार्यक्रम मोठया आश्चर्याने पहात होता. कार्यक्रम संपल्यावर तो पोलिस अधिकारी संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यास सांगू लागला, ''आपण हे जे कार्यक्रम करत आहात याचीच आम्हाला भीती वाटते. आता या मुसळधार पावसातही आपण शांतपणे ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम करत आहात. आपल्याला याची सवयच झालेली आहे. उद्या बंदुकीच्या गोळयांच्या वर्षावातही आपण संघवाले असेच शांतपणे आपापली नियोजित कामे करत रहाल, असा आम्हाला विश्वास वाटतो. यामुळेच आरडाओरडा, घोषणा, दगडफेक यांच्याशी निगडित असलेल्या मोर्चेवाल्यांपेक्षा आपली भीती अधिक वाटते.''
 
यावरून आपल्या लक्षात येईल की, आपले साधेच कार्यक्रम विपरीत परिस्थितीतही शांतपणे केले, तर ते प्रभावशाली ठरतात.