आपल्या एका स्वयंसेवक मित्राला दुर्दैवाने महारोग झाला होता. औषधोपचार केल्यावर ते बरे झाले; परंतु त्यांचे हात पाय मात्र वाकडेच राहिले. त्यांना एक मुलगी होती. त्यांना रोग होण्यापूर्वी ती जन्मलेली होती. पण वडिलांना महारोग होता म्हणून तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार होत नव्हते. मुलगी चांगली होती. माझ्या घरीही ती येत असे. माझ्या आईचे तिच्यावर खूप प्रेम होते. परंतु तरीही तिच्या लग्नाची गोष्ट कोणी काढली की लोक घाबरून जात.
एका तरुणासमोर तिच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला गेला. तो तरुण माझ्या ओळखीचा होता. तो माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले, ''गुरुजी आपण त्या मुलीला ओळखत असाल. तिच्या कुटुंबालाही आपण ओळखत असाल. तिच्या वडिलांना महारोग झाला होता म्हणून मला एक छोटासा प्रश्न पडला आहे की, ''हे लग्न मी करू का नको?''
मी तत्क्षणी म्हणालो, ''बेलाशक लग्न कर.''
''परंतु तोच रोग माझ्या घरात आला तर!''
''मी तुला आशीर्वाद देतो की, तुला काही होणार नाही.''
त्याच्या आईवडिलांनी जेव्हा थोडी चिंता व्यक्त केली तेव्हा त्याने सांगून टाकले की, गुरुजींनी अनुमती दिलेली आहे. मग त्याचे आईवडील म्हणाले, ''ठीक आहे करून टाक.'' त्याचे यथावकाश लग्न झाले आणि त्या दोघांचा संसार मोठया आनंदाने, समाधानाने चालू आहे. वास्तविक, माझ्या आशीर्वादात काही दम नव्हता. परंतु त्याने त्या तरुणाच्या हृदयात दम उत्पन्न झाला. माझ्या दृष्टीने एवढे पुरेसे होते.
अशा रोगांमुळे किंवा काही अन्य कारणांमुळे जर आपला समाजबांधव बहिष्कृत किंवा पीडित होत असेल, तर मी मनोमन विचार केला की बाबा रे त्यांच्या मुलांना का बरे संस्कारहीन राहू द्यायचे. संततीला चांगले संस्कार आणि आनंद हा मिळालाच पाहिजे.