मनुष्य हा विचारशील प्राणी असल्यामुळे त्याने त्याच्या सुखासाठी अनेक शास्त्रे निर्माण केली. वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, गणितशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी शास्त्रांप्रमाणेच अर्थशास्त्राचाही विकास त्याने केला. या शास्त्रांना प्रत्यक्षात व्यवहारात आणण्यासाठी माणसाने काही व्यवस्थाही उत्पन्न केली. ती सामाजिक स्तरावर अथवा प्रशासकीय स्तरावर अस्तित्वात आली. उदाहरणार्थ लोकशाही, राजेशाही इत्यादी. थोडक्यात एखाद्या शास्त्राचा विकास व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एखाद्या व्यवस्थेचा विकास या दोनही गोष्टी अंततोगत्वा मनुष्याच्या सुखासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहेत. अर्थशास्त्र ही त्याला अपवाद नाही. म्हणून ‘आर्थिक विचार ’ आणि ‘आर्थिक व्यवस्था ’ या बाबतही जगभरात अनेक विचारप्रवाह अस्तित्वात आले, विकसित झाले. त्यांचा वापर करुन त्यातील काही त्याज्य ठरले व कालमानानुसार शास्त्रात आणि व्यवस्थेत मोठे बदल झाले या पार्श्वभूमीवर गेली काही शतके अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था म्हणून जो विचार अस्तित्वात आहे त्यासंबंधी विवेचन प्रथम करावे लागेल.
सुख हा अर्थशास्त्राचा हेतू
स्थूलमानाने बघितले तर सुख हे मनुष्याचे लक्ष अथवा ध्येय आहे. कोणतेही शास्त्र यासाठीच विकसित झाले आहे. त्यामुळे सुखी होणे हे माणसाचे ध्येय आहे याबाबतीत सर्वांचेच एकमत आहे. सुख कमी झाले तर ते दुःखाला कारण होते. म्हणूनच स्वाभाविक पणे ते चिरंतन असावे अशी माणसाला इच्छा असते. सुख एकदोन दिवसांचे नव्हे तर ते स्थायी असावे. ज्याचा कधीही क्षय होत नाही अशा सुखाची म्हणजेच अमर सुखाची इच्छा प्रत्येक जीवाला असतेच. त्यामुळे नुसते यावत्-चंद्र दिवाकरौच नव्हे तर तिन्ही काळाला ओलांडून मी सुखी असावे ही मनुष्याची इच्छा असते. ही इच्छाच त्याला पुढे ओढत असते. सुखी जीवन अमर असावे. ते कधीही न संपणारे असावे यासाठी तो प्रयत्नशील असतो. आणि मानवी जीवनाचेही हेच उद्दिष्ट मानले गेले आहे.
हे सुख कसे मिळेल?
अर्थशास्त्रात असे मानले गेले आहे की, सुख हे माणसाच्या गरजपूर्तीमुळे मिळते. माणसाच्या गरजा अमर्याद आहेत. गरजांची पूर्तता झालीतर त्याचे दुःख कमी होउन सुख प्राप्त होते. उदा. भुकेल्या माणसाला अन्न मिळाले तर तो सुखावतो, पोटभर मिळाले तर आणखी सुखावतो, उत्तम सुग्रास मिळाले तर सुख आणखीनच वाढते. आणि असे उत्तम, सुग्रास, पोटभर अन्न सतत मिळाले तर त्याच्या सुखाला पारावार रहात नाही. थोडक्यात उत्तम भोजन, उंची कपडे, चांगले घर, दळणवळणाची साधने, मनोरंजनासाठी भिन्न भिन्न उपकरणे यांची उपलब्धता माणसाच्या इच्छा पूर्ण करतात व त्यामुळे त्यास सुख प्राप्त होते. अनेक इच्छा म्हणजेच इंद्रियजन्य वासना तृप्त करू शकतील अशा वस्तूंचा संग्रह करुन त्याचा उपभोग घेतल्याने सुख मिळते असे आजचे अर्थशास्त्र मानते. या वस्तूंचा विपुल प्रमाणात संचय करण्याची अवस्था उत्पन्न करण्यासाठी विपुल संपत्तीची पण गरज असते. म्हणून असे मानतात की या सर्व आवश्यक वस्तू प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक ती संपत्ती निर्माण करणे व टिकवणे म्हणजेच जीवनाचा दर्जा वाढविणे होय.
इंग्रजीत ज्याला ‘स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग’ म्हटले जाते ते वाढविण्याचा प्रयत्न करणे हेच व्यक्तीचे, समाजाचे व देशाचे लक्ष आहे. या ‘स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची’ व्याख्या निरनिराळ्या देशात निरनिराळी आहे. तरीही सामान्यतः दरडोई उत्पन्न, दरडोई अन्नधान्याची उपलब्धता, दरडोई विजेचा वापर इत्यादी बाबी त्यासाठी विचारात घेतल्या जातात. थोडक्यात ऐष आरामात जीवन घालविणे व सुखोपभोगाची असंख्य साधने संग्रहित करणे यालाच जीवनमान उंचावणे असे मानले जाते.
या विचारातून आणखी काही गोष्टी स्वाभाविकपणे निर्माण होतात. जसे सुखासाठी अमर्याद गरजांची पूर्ती, त्यासाठी संपत्ती आणि आर्थिक संपन्नतेसाठी शक्ती म्हणजेच सत्ता पाहिजे. थोडक्यात विषयोपभोग पूर्तीसाठी साधने, साधनांसाठी संपत्ती, अधिक संपत्तीसाठी मत्ता आणि तिच्या रक्षणासाठी आणखी सत्ता व अधिकार यांचा विस्तार, हे सर्व केले म्हणजे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावेल असे मानले जाते. जीवनमान उंचावणे याचा हाच अर्थ आजच्या अर्थशास्त्रात अनुस्यूत आहे.
ह्या सिद्धांताचे व्यावहारिक स्वरुप दोन खांबांवर आधारित आहे. –स्पर्धा आणि परमिसिव्ह सोसायटी. निरोगी स्पर्धेमुळे माणसाची प्रगती होते. गरजापूर्तीची अनेक साधने स्पर्धेमुळे आवश्यक त्या प्रमाणात, योग्य त्या दर्जाची, वाजवी उत्पादन खर्चात उपलब्ध होऊ शकतात. म्हणून माणसाला सुखी करण्यासाठी स्पर्धा आवश्यकच मानली गेली आहे. माणसाचे सुख समाजातील इतर माणसांच्या गरजा व त्यांच्या पूर्ततेच्या आवश्यकतेमुळे मर्यादित होते. त्याच्या सुखाचा असा संकोच होऊ नये म्हणून आजच्या परिभाषेत परमिसिव्हनेसचा विचार केला जातो. ज्यात मनुष्याला सर्व गोष्टींची मोकळीक असते. कोणावरच कोणतेही बंधन नसते. थोडक्यात मनास येईल तसे वागणे असा परमिसिव्हनेसचा अर्थ करतात. यामुळे एक काँट्रॅक्ट सिद्धांत समाजात आलेला दिसतो.
भारतीय विचार
भारतात या संदर्भात थोडा भिन्न विचार केलेला दिसतो. जेव्हा मनुष्य शरीरधारी म्हणून विचरण करीत असतो तेव्हा शरीराच्या सर्व गरजांची पूर्तता त्याला करावीच लागते. या गरजांमध्येच अनेक प्रकारचे उपभोगही समाविष्ट आहेत. त्यांचा निषेध करुन, त्यांची मुळीच गरज नाही असे म्हणून जगात चालायचे नाही. उपभोग नाकारले तर त्यांची इच्छा असणारे बंड करुन उठतील. सबब उपभोग नाकारणे हे व्यवहाराला धरुन नाही. म्हणून शरीर आणि मन यांच्या उपभोग प्रवृत्ती अमान्य करण्याची भारतीय विचारधारेत आवश्यकता नाही असे म्हटले आहे. या प्रवृत्तींच्या समाधानात माणसाने बुडून जाऊ नये इतकेच.
स्थूलमानाने आधुनिक अर्थशास्त्राचा विचार जडवादावर (मटेरिअलिझम) आधारित आहे. आपल्या विचारसरणीत तसा तो नाही. आपण मानतो मानवाचा विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो. मनुष्य जडवस्तूंशी निगडीत असतोच असतो. खाणेपिणे, ऐशोआराम, वासनातृप्ती यात सामान्य माणूस रममाण झालेला असतो. परंतु जेव्हा त्याचा विकास होऊ लागतो तेव्हा एवढयानेच त्याचे समाधान होत नाही. तो आपल्या अंतःकरणातील भाव तृप्त करण्याकडे लक्ष देतो. आणि मग नृत्य, गायन, कला, क्रीडा आदी कलांचा आविष्कार करण्याचा तो प्रयत्न करतो. यापुढे तो जसा अधिक विकसित होऊ लागतो तसे त्याला या कलातील सूक्ष्म रहस्य जाणून घ्यावे अशा बुद्धीगम्य सुखाची गरज वाटू लागते.
ज्ञानप्राप्तीसाठी तो आपल्या बुद्धीचा उपयोग करू लागतो. अशा प्रकारे अनेक आविष्कार, निरनिराळ्या तात्विक विचारांचा शोध, ज्ञानातील प्रगती तो संपादित करू लागतो. आणि याहीपुढे त्याचा विकास होऊ लागतो तेव्हा तो स्वतःचे सत्य स्वरुप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात शारीरिक उपभोगाच्या पुढे मानसिक कला इत्यादींकडे, त्यातून बौद्धिक विजयाकडे आणि त्यातून चिरंतन आध्यात्मिक सुखाकडे असा हा विकास आहे. उदरभरण आणि विषयोपभोग एवढ्यासाठीच संपूर्ण ज्ञान, विज्ञानाचा उपयोग करणे म्हणजे मनुष्याला खाली उतरवून पशुत्वाकडे आणण्यासारखे आहे. हा विचार आज प्रगतिशील व सभ्य म्हणविला जात आहे. या विचारामुळे सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी म्हणजेच संपत्ती व सत्ता विस्तारासाठी कोणत्याही भल्याबुर्या मार्गाचा अवलंब करतांना माणसाला मुळीच संकोच वाटत माही. त्यामुळे अनेक प्रकारची अशांती, अनेक प्रकारचे युद्ध संघर्ष आणि केवळ वासनातृप्तीची एकमेव इच्छा असल्यामुळे सर्वत्र अनीती आणि दुष्कर्मे यांची पैदास होते.
भारतीय विचारधारेत शरीराच्या गरजापूर्तीबरोबरच मन आमि बुद्धी यांच्या गरजांची पूर्ती आणि त्याहीपुढे जाऊन चिरंतन सुखासाठी आत्म्याच्या गरजांची पूर्तीही आवश्यक आहे. त्यामुळे इंद्रियजन्य अशी जितकी सुखे आहेत त्यांची पूर्तता करणार्या वस्तूंमुळे मिळणारे सुख संपूर्ण सुख राहणे शक्य नाही. किंबहुना अशी सुखे खरे तर दुःखान्त आहेत. ज्या बाह्य वस्तूंच्या उपभोगामुळे सुख मिळते असे वाटते त्या वस्तूत वस्तुतः सुख देण्याची शक्ती नसते. त्या वस्तूचे केवळ निमित्त करुन आपण आपल्या आतच असलेल्या सुखाचा अनुभव घेतो. विशिष्ट मानसिक अवस्थेमुळेच आपल्याला त्या वस्तूच्या माध्यमातून सुखाचा आविष्कार मिळतो. जगातील कोणतीही वस्तू ही केवळ निमित्तमात्र आहे. ढोंग आहे. सुख हे मनुष्याच्या अंतःकरणातच आहे. याची अनुभूती नसल्याने आजचे अर्थशास्त्र बाह्य वस्तूंवर अवलंबून राहून सुखाचा अनुभव घेता येईल असे मानते. उदाहरणार्थ कुत्र्याने वाळलेले हाड चघळणे इत्यादी. हे परावलंबित्वच माणसाच्या सुखाचे नव्हे तर दुःखाचे कारण होते. म्हणून त्या परावलंबी अवस्थेतून बाहेर पडून मनुष्याने आपल्या आतील सुखाचा आनंद घ्यावा असे भारतीय विचारधारेत म्हटले आहे. आपल्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी कमीत कमी सत्ता, कमीत कमी संपत्ती आणि कमीत कमी उपयोग याद्वारेच संतुष्ट व सुखी जीवन होऊ शकते. जिथे सत्ता, संपत्ती आणि उपभोग नाममात्र राहतात तिथे परस्पर स्पर्धा निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि जेथे स्पर्धा रहात नाही तेथे संपूर्ण समाज परस्परास पूरक ठरत, एक दुसर्याला सहाय्य करुन सुखाने विकास करु शकतो. स्पर्धा नावाची बाब निरोगी नसते. किंबहुना ती निरोगी असूच शकत नाही. प्रारंभी त्यातून चांगल्या गोष्टी दिसतात. परंतु लवकरच त्यात बिघाड उत्पन्न होतो. निरोगी स्पर्धेच्या बाबतीत आजचे अर्थशास्त्र सांगते की, ती इतरांपेक्षा आपण सर्व प्रकारे चांगले बनावे याची प्रेरणा देते. परंतु स्पर्धा सुरु होताच आपण असे अनुभवतो की, स्वतः चांगले होण्यापेक्षा दुसर्यांना आपल्यापेक्षा अधिक वाईट कसे करु याचीच चिंता स्पर्धक करु लागतात. स्वतः प्रगती करण्याऐवजी दुसर्याला खाली ओढण्याची व अखेर दुसर्याला संपवून टाकण्याचीच स्पर्धा सुरु होते. म्हणून स्पर्धेपेक्षा परस्पर सहाय्य व परस्पर पूरक बनणे हे विकासास आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक तितकाच उपभोग, आवश्यक तितकीच संपत्ती आणि आवश्यक तितकीच सत्ता ही त्रिसूत्री भारतीय अर्थविचाराची आहे.
आजच्या अर्थशास्त्राला अभिप्रेत असलेली उपभोगप्रधान आणि सत्ता व संपत्ती लोभमुलक दृष्टी त्यामुळे समस्या निर्माण करणारी आहे. त्याने मनुष्यजीवन हे केवळ अर्थ आणि कामप्रधान केले आहे. अर्थप्राप्तीनंतर त्याचे संरक्षण आणि संवर्धन हे आवश्यक होऊन गेलेले आहे. म्हणूनच माणसाचे समाधान कधीही झालेले नाही. आपल्याकडे असे म्हटले आहे की, ‘न जातुकामः कामानाम् उपभोगेन शाम्यति ’ किंवा ‘तृष्णा न जीर्णाः वयमेव् जीर्णाः’ थोडक्यात कोणती वासना कायमची कधीच तृप्त होत नाही. म्हणूनच या वासनांच्या तृप्तीसाठी अधिकाधिक साधने जुळविणे, त्यांचा अधिकाधिक प्रमाणात संग्रह करीत जाणे, इतरांच्या भूमीवर हल्ला करुन त्यांच्या संपत्तीचे अपहरण करणे हे स्वाभाविकपणेच घडत जाते. जगात आज दिसणारा एक प्रकारचा साम्राज्यवाद याच उपभोगाच्या उद्दाम लालसेचा परिणाम आहे. आणि त्यास आजचे अर्थशास्त्र कारणीभूत आहे.
भारतीय अर्थविचारात सत्ता आणि समृद्धी याला ‘अर्थ’ म्हटले आहे. अर्थाने प्राप्त होणारे विषयोपभोग आणि वासना या संबंधी क्रियांना ‘काम’ म्हटले आहे. आणि ज्यामुळे श्रेष्ठतम चिरंतन सुखाची प्राप्ती होते त्याला मोक्ष म्हटले आहे. सुखाच्या अनुभवासाठी ज्याप्रकारे व्यक्तीला मानसिक शांतता आणि एकाग्रता मिळायला हवी, त्याच प्रकारे व्यक्तीला आपले जीवन सुरक्षितपणे जगावे यासाठी एक स्थिरपद आशा समाजाचीही आवश्यकता असते. अशा समाजाची योग्य व्यवस्था हे धर्माचे एक रुप आहे. समाजातील सर्व लोकांना त्यांच्या कार्याला लावून समग्र समाजाच्या अभ्युदयासाठी, रक्षणासाठी आणि श्रेष्ठतम जीवनासाठी सर्वांकरवी परस्पर पूरकतेने कामे करवून घेण्याची क्षमता ज्यात आहे तो धर्म होय. समाजधारणेत सुस्थिती आणणे हे धर्माचे एक रुप, तर मनुष्याला धर्मानुसार वर्तन करायला लावणे हे धर्माचे दुसरे रुप आहे.थोडक्यात धर्मामुळे स्वार्थाला मर्यादा घातली जाते. तेथे सत्ता अनिर्बंध होवू शकत नाही. उपभोग आणि सत्ता दोन्ही मर्यीदित झाल्यामुळे मनुष्य ज्या स्वार्थामुळे दुसर्या मनुष्याचा नाश करण्यांस सिद्ध होतो त्या दुष्ट प्रक्रियेच्या तडाख्यातून तो वाचू शकेल. म्हणून धर्म नियंत्रित सत्ता व उपभोग (अर्थ आणि काम) हेच मानवाच्या दृष्टीने इष्ट आहे. याच्या विपरीत ( स्पर्धा आणि परमिसिव्ह सोसायटी) जर माणसाने व्यवहार केला तर मनुष्य राक्षस बनेल. व असा अधर्मी माणूस संपूर्ण मानवजातीच्या विनाशाला कारण होईल. म्हणून दोन किनार्यांच्या मधून वाहणार्या नदीसारख्या धर्म आणि मोक्ष याच्यामधून वाहणारी अर्थ आणि कामाची नदी मानवी जीवनात सुखाचा मळा फुलवू शकेल. केवळ अर्थ आणि काम यांची उपासना करणे हे पशुवत जीनवाचे लक्षण आहे. ते असुरी आणि राक्षसी जीवन आहे म्हणूनच ते त्याज्य आहे. परंतु अर्थ आणि काम यापासून पूर्णपणे मूक्त होणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून जीवनात असुरता येणार नाही यासाठी धर्म आणि मोक्षाची योजना आहे.
अर्थव्यवस्था
अर्थविचारानुसार अर्थव्यवस्थेची रचना केली जाते. वास्तविक ही पद्धत कोणत्याही अन्य विषयासाठीही याचप्रकारे अवलंबिली जाते. उदा. समाजास साक्षर करण्याच्या विचारासाठी शिक्षणाची एक व्यवस्था, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, प्रौढ साक्षरता इत्यादी, निर्माण करावी लागते. त्याचप्रमाणे आर्थिक विचारानुसार तो विचार अंमलात आणण्यासाठी एक अर्थव्यवस्था निर्माण करावी लागते. त्यासंबंधी काही विचार मांडलेला आपल्याला दिसतो.
आजकाल भिन्नभिन्न प्रकारचे आर्थिक वाद चोहीकडे सुरु आहेत. त्यात मागास आणि दरिद्रि लोकांच्या कल्याणाची चिंता करीत आगोत असा देखावा उभा करुन आपली सत्तेची अभिलाषा पूर्ण करण्याचाच प्रयत्न दिसून येतो. सत्ताप्राप्तीच्या संघर्षात पीडित लोकांना साधन बनवून ‘कॅनन फॉडर’ सारखा त्यांचा उपयोग केला जात आहे. याचे कारण मुळात इहलोकीच्या सुखातच इतिकर्तव्यता मानली जात आहे.
जगातील देशात सामाजिक जीवनात जे संघर्ष निर्माण झाले ते प्रतिक्रियेच्या रुपाने निर्माण झाले. राजाच्या हाती सत्ता आल्यामुळे सामंतशाही आली. सामंत दुष्ट बनले आणि त्याच काळात यंत्राविष्कारामुळे औद्योगिक क्रांती घडून आली. त्यानंतर ज्यांनी धनसंचय केला होता त्यांनी धनसंचयाच्या जोरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे लोकांनी व्यक्तिस्वातंत्र्य, बंधुत्व आणि समानता अशा गोडगोड नावांचा वापर करुन क्रांती केली. फ्रांसमधली ही क्रांती सर्वज्ञात आहे. ती सामंतशाहीची प्रतिक्रांती होती. त्याचा परिणाम म्हणून पुष्कळशा अधिक बुद्धीमान आमि कर्तृत्ववान लोकांच्या हाती सत्ता व संपत्ती आली. पाश्चात्य देशात संपत्तीमुळे सत्ता आली आणि त्याच्या दुष्परिणामामुळे त्याला विरोध म्हणून विद्रोहाच्या रुपाने अनेक प्रकारच्या प्रणाल्या समोर आल्या. त्यात भांडवलशाही समाजवाद, साम्यवाद या प्रमुख आहेत.
भांडवलशाही
सामान्यपणे मनुष्य इहलोकातील सुखापासून वंचित राहू इच्छित नाही. किंबहुना वस्तू व साधने यांच्या उपभोगाने गरजांची पूर्तता करुनच सुख मिळते हा आर्थिक विचार प्रबळ असल्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था विकसित झाली. उपभोग घेणे, संपत्ती एकत्रित करणे, संपत्ती एकत्र करणे सुलभ व्हावे म्हणून विज्ञानातील शोधांच्या सहाय्याने अनेक प्रकारच्या साधनांची निर्मिती करणे. साधनांच्या संरक्षणासाठी उत्तम सत्ता प्रस्थापित करुन आपल्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे इत्यादी सर्व गोष्टी स्वाभाविक आहेत. काही विशिष्ट लोकांनी मिळून समूह बनवून हे करण्यात दोषास्पद काहीही नाही. भांडवलशाहीत हे सर्व अभिप्रेत आहे. कमीत कमी नियंत्रण व जास्तीत जास्त व्यक्तीच्या बुद्धीला, कर्तृत्वाला वाव देत अधिकाधिक साधनांची निर्मिती त्यात अपेक्षित असल्याने स्पर्धा व संपत्तीची निर्मिती आणि संचय त्याचे अविभाज्य परिणाम आहेत. जगात जे प्रगत देश आहेत तिथे स्पर्धा, ईर्षा, द्वेश,कटुता आणि दुसर्याचे सुख पाहून उत्पन्न होणारे वैर इत्यादी दिसून येते. स्पर्धेमध्ये संघर्ष होणारच. ही स्पर्धा आणि त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान थांबवून सर्व प्रकारचे ऐहिक सुखोपभोग प्राप्त होऊन सुद्धा समाज स्थिर व शांत ठेवण्याची या व्यवस्थेत शक्यता नाही. स्पर्धा द्वेष आणि वैर यामुळे मन शांत न झाल्यास वासनांची भरती ओहोटी चालूच राहणार. मनाला जर शांत आणि प्रसन्न ठेवायचे असेल तर हे स्पर्धेने पूर्ण भरलेले आणि प्रगतीशील म्हटलेले जीवन आहे. त्याचा गांभिर्याने विचार करावा लागेल.
समाजवाद, साम्यवाद
समाजवाद, साम्यवाद हा एक सामुदायिक शब्द एका प्रतिक्रियेच्या रुपाने समोर आला. या समाजवादामुळे सर्व प्रकारची सत्ता समाप्त होऊन समग्र मानव समाज कोणत्याही प्रकारच्या नियंत्रणाखेरीज खूप सुखाने आणि आनंदाने राहील असे म्हटले जाते. ‘अनार्कीझम’, ‘विदरिंग अवे ऑफ द स्टेट’ इत्यादी शब्दांचे प्रयोग केले जातात. रशियाचे सर्वात मोठे उदाहरण आमच्यासमोर आहे. तो फार मोठा देश आहे. त्याच्या विशालतेच्या प्रमाणात लोकसंख्या ही कमी आहे. तिथे शेतीची आधुनिकतम साधने आहेत. नद्याही आहेत. इतके सर्व असूनही तिथे अन्नधान्याची कमतरता आहे. त्यांना परदेशातून अन्नधान्य मागवावे लागते. म्हणून राज्यसत्तेचा संपूर्ण एकाधिकार हितकारक नाही. श्रमीक आणि गैरश्रमीक असा भेदभाव करुन समाजाची रचना दीर्घकाळासाठी टिकणार नाही. संघर्षावर आधारित समाजवाद, साम्यवाद असे मानतो की, हळुहळु अनार्कीझमच्या अवस्थेत समाज पोहोचेल. जिथे सर्व लोक कोणीच कोणाला न खाता, न मारता, जंगलचा न्याय न अनुसरता राहू शकतील. सुरवातीच्या काळात सर्व बाबी राजसत्तेच्या हाती एकवटलेल्या असतील पण कालांतराने राज्याशिवाय, सत्तेशिवाय समाज नियंत्रित केला जाईल. सर्व मनुष्यांच्या समानतेचा विचार करुन प्रत्येक व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार त्याला खाणेपिणे मिळेल, त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम दिले जाईल. हे समाजवादाचे सिद्धांत फार चांगले आहेत. पण या सिद्धांतांचा उच्चार करुन जी काही वाटचाल झाली त्यातून हुकूमशाहीच समोर आली. त्या हुकूमशाहीमुळे विरोधकांची हत्त्या करण्याची अवस्था त्यातून निघाली. अनार्कीझमच्या अवस्थेत लोक समाजातील इतरांवर अन्याय न करता राज्य सत्तेशिवाय कसे राहू शकतील ? त्यासाठी आधार काय ? या प्रश्नांची उत्तरे समाजवादात नाहीत. सोशॅलिझमचा हा सिद्धांत अनेक पैलूंनी युक्त आहे. हे पैलू इतके झाले आहेत की समाजवादाची मूळ व्याख्या समजणेही कठीण झाले आहे. गिल्ड सोशॅलिझम, अनार्कीझम, सिंडीकॅलिझम, कम्युनिझम इत्यादी कितीतरी पैलू दाखविता येतील. थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्याला सोशॅलिझमचा सिद्धांत म्हणतात त्यात मूळ विचार करण्यासारखी गोष्ट इतकीच आहे की ‘संपत्तीचे विकेंद्रीकरण’ व्हावे. त्याच बरोबर त्यात असेही म्हटले आहे की, हे विकेंद्रीकरण न्यायपूर्ण व्हावे. या विचारासंबंधीची भांडणे आणि मतभेद दृष्टीस पडतात ते सर्व या गोष्टीमधून उत्पन्न होतात की हे विकेंद्रीकरण न्याय्य आहे असा ठरविण्याचा अधिकार कोणाच्या हाती सोपवावा. आजकाल असा आग्रह धरला जात आहे की या विकेंद्रीकरणासाठी केंद्रीकरणाची आवश्यकता आहे. अनेक केन्द्रांच्या ऐवजी एका केन्द्राच्या हाती सर्व सत्ता सोपवावी. राजसत्तेलाच एकमेव प्रभावी केन्द्र मानावे. सत्तेद्वारे सर्व संपत्ती आपल्या हातात घ्यायला हवी. संपत्ती निर्माण करण्याची जेवढी साधने आहेत त्यावर सुद्धा राजसत्तेचा एकाधिकार कायम व्हावा. असे जर झाले तर सत्ताच एकमात्र प्रभावी राहील आणि बाकीचा समाज त्या राजसत्तेच्या आश्रयाने नोकर बनून काम करेल. सत्ता जितके, जसे, जेव्हा, जिथे वितरण करील त्याचा स्विकार बाकी सर्व लोकांना करावा लागेल. सत्तेद्वारे जे न्यूनतम वेतन ठरविले जाईल त्यावरच समाजातील सर्व लोकांना भागवावे लागेल.
पर्याय
अनुभवांना अनुसरुन एक संतुलित विचार आम्ही करु शकतो. ज्या आर्थिक रचनेत (भांडवलशाही प्रमाणे) व्यक्तीची प्रेरणाही कायम राहील आणि त्याचबरोबर संपत्तीचे विकेंद्रीकरणही (समाजवादाप्रमाणे) पुरेशा प्रमाणात होत राहील अशी आर्थिक रचनाच देशाला विकासोन्मुख करण्यास सहाय्यभुत होऊ शकेल.
एक गोष्ट तर स्पष्टच आहे. उत्पादनांच्या साधनांच्या क्षेत्रात मनमानी चालू शकत नाही. तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर इच्छेनुसार एखाद्याने हवे तितके कमवावे आणि हवा तसा उपभोग घ्यावा अशी मुभा दिली जाऊ शकत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा इतका संकुचित अर्थ घेणे आणि तसा तो सांगणे याचे दिवस आता राहिले नाहीत. ते दिवस फिरुन येतील अशी शक्यताही नाही. आणि यावयालाही नको कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारातच ही गोष्ट अंगभूत आहे की आपले स्वातंत्र्य आपल्याबरोबर राहणार्या समाजबांधवांमुळे मर्यादित आहे. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ स्वच्छंदी बनणे असा नव्हे. जे सर्वांना मान्य असेल अणि सर्वांना हितकारक असेल त्या मर्यादेत आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग प्रत्येकाला घ्यायला लागेल.
केवळ व्यक्तिगत संपत्ती समाप्त करण्याच्या विचाराने काम होणार नाही. त्याचप्रमाणे दुसरे टोक ज्यात व्यक्ती केवळ आपला आणि आपल्या परिवाराचाच विचार करते तेही उपयोगाचे नाही. सर्वजण केवळ आपल्या स्वार्थाची पूर्ती आणि उपभोगाची लालसा यांनी प्रेरित होऊन कार्य करतील तर तेही चालू शकणार नाही. आज जगात प्रचलित असलेल्या या दोनही टोकाच्या पद्धती सोडून आम्हाला मधला एक नविन आणि मौलिक मार्ग शोधून काढावा लागेल. या दोन अतिरेकांमधे संतुलन प्रस्थापित करावे लागेल. व्यक्तीला मर्यादित स्वरुपात संपत्तीचा अधिकार असणे जरुर आहे. त्याचबरोबर व्यक्तीगत स्वामित्वाची जी सीमा आहे तिचे अतिक्रमण होऊ नये म्हणून व्यक्तीवर काही नियंत्रणही ठेवावे लागेल. ज्यात मर्यादित स्वरुपात व्यक्तीगत संपत्ती, मर्यादित व्यक्तिगत प्राप्ती आणि त्याचबरोबर मनुष्यस्वभाव लक्षात घेऊन मर्यादित स्वरुपात उपभोगाची संधी हे सर्व प्राप्त व्हावे अशी व्यवस्था उभी करण्याचा मार्ग स्विकारावा लागेल.
व्यक्ती अथवा व्यक्ती समुहाने संपत्ती एकत्रित करणे, संपत्ती निर्माण करणार्या साधनांचा शोध लावणे, साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता प्रस्थापित करणे यात (भांडवलशाही) दोषास्पद काहीच नाही. परंतु या प्रवृत्तीला एक लक्ष्मण रेषा अवश्य आहे. कारण सत्ता व उपभोग यावर निर्बंध घातला नाही तर ते सर्व भक्षक होतात. अमर्याद सत्ता आणि अनिर्बंध उपभोग हानीकारक आहे. म्हणून सत्ता व उपभोगावर काही नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. हे नियंत्रण धर्माचे असावे. धर्मामुळे स्वार्थाला मर्यादा घातली जाते. व सत्ता अनिर्बंध होऊ शकत नाही. उपभोग आणि सत्ता मर्यादित झाल्यामुळे मनुष्य ज्या स्वार्थामुळे दुसर्या मनुष्यचा नाश करण्यास सिद्ध होतो त्या दुष्ट प्रक्रियेच्या तडाख्यातून तो वाचू शकेल.म्हणून धर्मनियंत्रित सत्ता व उपभोग हेच मानवाच्या दृष्टीने इष्ट आहे. याच्या विपरीत जर मानवाने व्यवहार केला तर मनुष्य राक्षस बनेल आणि असा अधर्मी माणूस संपूर्ण मानवजातीच्या विनाशाला कारणीभूत होईल. परंतू स्वार्थावर नियंत्रण कसे शक्य आहे ? या साठी मार्ग म्हणजे व्यक्तीसमोर एखादे उच्च ध्येय ठेवणे. ध्येय समोर असले म्हणजे व्यक्ती ते प्राप्त करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करते. आणि त्या उच्च ध्येयासमोर व्यक्ती आपला स्वार्थ कःपदार्थ मानते. ती व्यक्ती आपण होऊन दुर्गुणांचा त्याग करुन व सद्-गुण विकसित करुन सुयोग्य बनण्याचा प्रयत्न करते. असे ध्येय कोणते ? मनुष्य सुखाची आराधना करतो. तेच त्याचे ध्येय असते. परंतु ज्या बाह्य वस्तुंच्या उपभोगामुळे आम्हाला सुख मिळते असे वाटते त्या वस्तूत सुख देण्याची शक्ती नसते. त्या वस्तुचे केवळ निमित्त करुन आपण आपल्या आतील सुखाचा अनुभव घेत असतो. मन आणि बुद्धी यांचा संतुलित विकास करुन त्यागपूर्ण जीवन जगणे यातच जीवनाचे साफल्य आहे असे मानणे म्हणजे मनुष्याचे जीवनमान उंचावणे होय. एकात्मतेच्या अधिष्ठानावर स्वार्थरहित, संग्रहापासून अलिप्त समाजसमर्पित व्यक्तीचा विकास करीत व सर्व मनुष्य समुदाय एकाच ‘ अस्तित्वाने ’ अनुप्रेरित आहे ही भावना सर्व व्यक्तींमध्ये जागृत करुन समाजाची सुखी उत्कर्षमय अवस्था निर्माण होऊ शकते. संग्रह करु नये, पोटाला लागते त्याहून अधिक सामग्री आपल्याजवळ जमा करण्याच्या विचारापासून दूर राहिले पाहिजे. जीवनाच्या न्यूनतम गरजांची पूर्ती करणे असा उदरभरणाचा अर्थ आहे. त्यापेक्षा जास्त गोष्टींवर आपला अधिकार नाही. ते सर्व समाजाचे आहे. आपल्या बुद्धीचा व सामर्थ्याचा उपयोग करुन आवश्यक त्यापेक्षा अधिक मिळविले तर तेही भिन्न भिन्न स्तरातील आपल्या लोकांच्या हितासाठीच आहे हा आपला मूळ सिद्धांत आहे. आम्ही तो विसरुन इकडची तिकडची उचलेगिरी करण्याचा उद्योग केला. त्याचा परिणाम म्हणून चारी बाजूला लाचारी आणि दारिद्र्य पसरलेले दिसते.
सर्वप्रथम आम्हा सर्वांमध्ये एकच तत्व विद्यमान आहे या आधारावर धर्म पुरुषार्थात अंतर्गत असलेली एकात्मता अनुभवावी लागेल. या तत्वाची अनुभुती झाली म्हणजे सहजच भ्रातृभाव निर्माण होईल. आणि आपल्या शक्तीचा व बुद्धीचा पूर्ण उपयोग करुन जे काही मिळेल त्याचे सर्वांना, अधिकाधिक सुख होईल अशा प्रकारे वितरण करणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. अशा वितरणासाठी वस्तू व साधने यांचे अधिकाधिक उत्पादन करणे आवश्यक होते. अधिकाधिक सुखोपयोगी वस्तू व साधने यांची निर्मिती व त्यांचे पूर्ण वितरण केल्यामुळे उपभोगाची प्रवृत्ती अनियंत्रितपणे वाढली तर ती विनाशाला कारणीभूत होते. म्हणूनच धर्माबरोबर चतुर्थपुरुषार्थ असलेल्या मोक्षाचे- जीवनाच्या अंतिम ध्येयाचे – स्मरण ठेवले पाहिजे. जीवनाचे अंतिम लक्ष भोग नाही. त्या भोगांचा मानव गुलाम नाही. मनुष्याने उपभोग निर्माण केले असल्यामुळे तो त्यांचा स्वामी आहे. म्हणूनच तो त्याचा उपभोग जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी करील आणि तेव्हाच मोक्ष पुरुषार्थापासून प्रेरणा घेवून त्याचे सर्व समृद्धीने युक्त असलेले जीवन त्यागमय होईल. या प्रकारे धर्म व मोक्ष यांनी नियंत्रित केलेल्या प्रगतीशील जीवनाची ही कल्पना पूर्णपणे व्यवहाराला धरुनच आहे. म्हणून स्वतः पूर्ण परिश्रम करुन अधिकाधिक वस्तूंची प्राप्ती करणे, त्यांचे सम्यक वितरण करणे, संयमित उपभोग घेणे आणि व्यक्तीगत सुखोपभोगासाठी मात्र त्याचा संग्रह न करणे हीच सूत्री आर्थिक व्यवस्थेत असणे आवश्यक आहे.