विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना काही सैनिकी शिक्षणाच्या अंतर्गत त्या काळी बंदूक चालवणेही शिकवले जात असे. जसे आजकाल एन.सी.सी. मध्ये शिकवतात तसे. पण आजच्यापेक्षा जरा अधिक चांगले. यू.टी.सी. (युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर) च्या नावाने त्या काळी हे शिक्षण दिले जात असे. त्या काळचीच एक गोष्ट आहे. यू.टी.सी. चे विद्यार्थी नेमबाजीचा सराव करत होते. त्यांचा इंग्रज शिक्षक त्यांना लक्ष्यावर (टारगेट) गोळी मारण्याचे शिक्षण देत होता. मी कुतूहलाने तेथे जवळ जाऊन पाहिले. लक्ष्य (टारगेट) बरेच मोठे होते. पण नेम धरणारे देखील चांगलेच चुकत होते. गोळी मुख्य लक्ष्यापासून बरीच इकडे तिकडे जात होती. या तरुणांचा नेम चांगलाच चुकत असल्याचे पाहून मला हसू आले. मला हसताना पाहून त्या इंग्रज अधिका¬याने मला विचारले, ''का हसता?''
मी म्हणालो, ''आपण शिक्षण देणारे यू.टी.सी.चे केवढे मोठे अधिकारी आहात, पण कोणाचीही गोळी लक्ष्यावर लागत नाही. गोळया तर इकडे तिकडे जात आहेत. हे कसल्या प्रकारचे शिक्षण आपण देत आहात?''
तो इंग्रज अधिकारी म्हणाला, ''इट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग.'' (ही मोठी अवघड गोष्ट आहे.)
मी म्हणालो, ''मे बी. (असू शकते) मी आतापर्यंत कधी बंदूक हातात घेतलेली नाही. मला त्यातले काही समजतही नाही. तरीदेखील मला असे वाटते की, अवघड असले, तरी इतके चुकता कामा नये. आपल्या शिकवण्यात निश्चितच काहीतरी गडबड आहे.''
माझ्या या परखड बोलण्यामुळे तो इंग्रज अधिकारी काही काळ स्तब्ध राहिला. तेथील मुले हे सारे ऐकत होती. माझ्या बोलण्याचा त्यांना थोडा रागही आला. ती मुले म्हणाली, ''पहा हा कुठून आलाय बंदुक चालवणारा आणि आमची थट्टा करतोय.'' त्यातील एकजण मला म्हणाला, ''तुम्हाला जर एवढं हसू येतंय, तर तुम्हीच गोळी मारून दाखवा.''
मी म्हणालो, ''बाबांनो, हा तुमचा जो अधिकारी आहे त्याने जर मला परवानगी दिली, तर मी नेम धरायला तयार आहे.''
मुलांना वाटले की, याची चांगली फजिती होईल. म्हणून ते माझ्या हातात बंदूक सोपवू लागले. त्या इंग्रज अधिका¬याला या सगळयाची मजा वाटत होती. तेव्हा मी त्या मुलांची बंदूक घेतली आणि त्या अधिका¬याला म्हटले की, या सगळयांना असे वाटते की मी नेम धरावा. आपली काही हरकत नाही ना?
अधिकारी म्हणाला, ''काही हरकत नाही, आपण नेम धरू शकता.''
मी म्हणालो, ''भाईसाब, यात गोळी भरून द्या. गोळी कुठून भरली जाते हे काही मला माहीत नाही.''
तेव्हा त्याने बंदुकीत गोळी भरून दिली. हा बंदूक चालविणारा नवीन असल्यामुळे त्याला बंदूक चालवताना धक्का लागू नये अशा विचाराने त्याने एका मुलाला ट्रँगल आणावयास सांगितले. ट्रँगल माझ्यासमोर ठेवून तो म्हणाला, ''याच्यावर बंदूक ठेवून नेम धरा.''
मी म्हणालो, ''हे झंझट नको. हलवा हे. नेम कसा धरायचा हे ठाऊक आहे मला. मी नेम धरून बरोबर गोळी मारीन.''
मी बंदूक उचलली, नेम धरला आणि गोळी मारली. माझ्या गोळीने अचूकपणे लक्ष्य भेदले. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. मी ऑफिसरला म्हणालो की, आपला अभ्यास नीट चाललेला नाही. लक्ष्यावर केवळ डोळेच नाहीत, तर मनदेखील केंद्रित केले पाहिजे, ही गोष्ट आपण सांगत नाही त्यामुळे ही मुले लक्ष्य चुकत आहेत.
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, मनाच्या एकाग्रतेमुळे मनुष्य आश्चर्यजनक काम करू शकतो. परंतु मनाची ही एकाग्रता एक-दोन दिवसात येत नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. रोजच्या रोज अभ्यास करण्याला महत्त्व आहे.