मी काशीच्या संघशाखेचा जेव्हा संघचालक होतो तेव्हाची एक घटना मला आठवते. आपला एक कार्यकर्ता बी. ए. च्या शेवटच्या वर्गाला होता. परीक्षा जवळ आली. तो कार्यकर्ता दोन वर्षे दिवसरात्र तन्मयतेने संघाचे काम करीत होता. त्याचे मित्र त्याला म्हणू लागले, ''तुला आता अभ्यास केला पाहिजे नाहीतर तू नापास होशील, मग लोक म्हणतील की, तुझ्यासारखे कार्यकर्ते परीक्षेत नापास होतात.''
ही गोष्ट माझ्यापर्यंत आली. मला पण वाटले की, तो जर नापास झाला, तर संघाविषयी लोकांची चुकीची धारणा होईल. विद्यापीठातील वाढत्या संघकामाचे नुकसान होईल. मी त्याच्याशी बोललो.
त्याच्याही ध्यानात गोष्ट आली आणि तो अभ्यास करण्यासाठी तयार झाला. परंतु आपली पुस्तके कुठे आहेत याचाच त्याला पत्ता नव्हता. एवढेच नाही, तर तो मला विचारू लागला की, कोणकोणत्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल?
मी त्याच्या विषयांचा शोध घेतला, पुस्तके आणली. पुस्तकांचा ढीग पाहून तो म्हणू लागला की, एवढया सगळयाचा अभ्यास मला नाही जमणार.
मी त्याला म्हटले, ''घाबरू नकोस, मी तुला शिकवीन आणि तू नक्की पास होशील.''
तो कार्यकर्ता कष्टाळू, अभ्यासू आणि बुध्दिमान होता. मला आठवते, जेव्हा मी त्याला शिकवत असे, तेव्हा तो रात्रभर डुलकी घेणे काय पण माझ्यावर लावलेली नजरसुध्दा इकडे तिकडे करत नसे. मी जे जे सांगत असे, ते ते तो पूर्ण एकाग्र चित्ताने ऐकत असे.
त्याला परीक्षेसाठी तीन विषयांची तयारी करायची होती. अर्थशास्त्राचे एक प्राध्यापक माझे मित्र होते. मी त्यांना म्हटले की, ''आपण ह्याला सोप्या भाषेत अर्थशास्त्र समजावून सांगा म्हणजे तो परीक्षेत पास होईल.''
तसेच राज्यशास्त्र घेऊन एम. ए. करणारा एक विद्यार्थी माझा मित्र होता. त्यालाही मी अशीच मदत करायला सांगितले. राज्यशास्त्रात आम्ही दोघांनी प्रकरणांची वाटणी केली. आम्ही ठरवले की, आपण त्याच्यासाठी अभ्यास करून त्याला आवश्यक ती माहिती देऊ.
अभ्यास सुरू झाला. म्हणजे अध्ययन आमचे, अभ्यास त्याचा. मी दिवसभर त्याच्या विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास करी. संध्याकाळी शाखेनंतर रात्री तो माझ्याकडे अभ्यासासाठी बसे. रात्री आठ-नऊ वाजता आम्ही अभ्यासास बसत असू ते सकाळ होईपर्यंत. तो मध्ये दहा-पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन सकाळी साडेपाचपर्यंत अभ्यास करत असे.
अशा प्रकारे दिवसभर मी शिकत असे आणि रात्रभर त्याला शिकवत असे. या सगळयाचा परिणाम स्वरूप तो पास झाला. परीक्षेस आवश्यक असा सर्व विषयांचा अभ्यास त्याने प्रामाणिकपणे केला. तो पास झाला आणि मला खूप समाधान लाभले.
आजकाल दुर्दैवाची गोष्ट आहे की, लोक परीक्षा पास होण्यासाठी वाटेल ते खोटेनाटे प्रकार अवलंबतात. माझा या प्रकारांवर मुळीच विश्वास नाही.
हे सांगण्याचे कारण, आपण आपल्या स्वयंसेवक बंधूंच्या विकासाची अवश्य काळजी घेतली पाहिजे. त्यांनी सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हावे यासाठी जे कष्ट करावे लागतील ते करण्याची आपली तयारी असली पाहिजे.