एकदा एक प्रमुख ख्रिश्चन मिशनरी मला भेटण्यासाठी आले. ते मोठे विद्वान होते. ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे, त्या धर्मात हिंदू धर्मापेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी कशा आहेत हे समजावून सांगण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. ते मला म्हणाले की, जीवनाचे जे अंतिम सत्य आहे, ते ख्रिश्चन धर्मातच प्रकट झाले आहे, हिंदू धर्मात अजूनही ते प्रकट झालेले नाही. मी त्यांना म्हणालो की, हे सारे आपण मला नीट समजावून सांगा. ते म्हणाले की, उपनिषदात म्हटलेले आहे की, 'मी ब्रह्म आहे,' मग बाकीचे लोक कोण आहेत? म्हणून उपनिषत्कालीन विद्वानांनी विचार केला की, एवढेच म्हणणे ठीक होणार नाही. म्हणून पुढे त्यांनी म्हटले की, तुम्हीही ब्रह्म आहात. पुढे त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जगात जेवढी म्हणून जड चेतनेची रूपे आहेत त्या सगळयांना ब्रह्म म्हटले. उपनिषदांनी एवढे सगळे म्हटले खरे; पण हे श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी मनुष्य जीवनात कोणत्या प्रकारची गुणसंपन्नता हवी यासंबंधी उपनिषदे काहीच मार्गदर्शन करत नाहीत. तो श्रेष्ठ सिध्दान्त केवळ जीसस ख्राइस्टनेच मांडला आहे.
मी त्यांचे बोलणे मोठया श्रध्देने ऐकत होतो. हे सर्व सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले होते, त्यालाही एक विशेष कारण होते. त्यांनी असे ऐकले होते की, मी बायबल वाचले आहे, तसेच ख्रिश्चन धर्माची अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यांनी असा विचार केला असावा की, ह्याला जर ख्रिश्चन पुस्तकांविषयी एवढे प्रेम आहे आणि हा जर ती पुस्तके मोठया श्रध्देने वाचतो, तर थोडयाशा प्रयत्नाने हा ख्रिश्चन होईल आणि जर का हा ख्रिश्चन झाला, तर ह्याच्याबरोबर जे लाखो लोक आहेत ते सारे ख्रिश्चन धर्मात येतील. अशा प्रकारे ते बराच वेळ आपला श्रेष्ठ सिध्दान्त ऐकवत राहिले. शेवटी मी त्यांना म्हणालो की, प्रेषित येशूचा सर्वोच्च सिध्दान्त मला शिकवा. त्या सद्गृहस्थांनी आश्चर्याने मला विचारले की, प्रेषित येशूने आचरणाचे जे सिध्दान्त सांगून ठेवले आहेत ते आपण वाचले नाहीत? मी म्हणालो की, मी ते वाचले आहेत परंतु त्यात असामान्य काय आहे हे मला तितकेसे कळलेले नाही. म्हणून आपण कृपा करून ते नीट स्पष्ट करून सांगावे. मग त्यांनी मला बायबलमध्ये भगवंताचे जे चांगले आणि शुध्द स्वरूप सांगणारे दहा सिध्दान्त आहेत, इंग्लिशमध्ये ज्याला 'टेन कमांडमेंटस' म्हटले आहे, ते सांगितले. मी त्यांचे आभार मानले आणि मग म्हटले की, माझ्यासमोर एक प्रश्न आहे. मी बालपणापासून असे वाचले आहे की, आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारा कोणताही पंथ असो, त्या सर्वांमध्ये अशा प्रकारचे दहा नियम सांगितलेले आहेत. बालपणीच मला ह्याची माहिती झाली होती. पाच यम आणि पाच नियम अशा एकूण दहाच्या संख्येत हे सांगितले आहेत आणि असे म्हटले आहे की, यांच्या पालनाने आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आमच्याकडे हे नियम, अत्यंत प्राथमिक अवस्थेतील व्यवहारासाठी सांगितले गेले आहेत. याच्यापुढे अनुभूतींच्या एकाहून एक उंच, सरस अशा पाय¬यांचे वर्णन आहे. आमच्याकडील ऋषीमुनी या पाय¬या चढत चढत आकाशापर्यंत जाऊन पोहोचले. माझा प्रश्न हा आहे की, ज्यांना आपण सर्वोच्च सिध्दान्त मानता ते तर आमच्याकडे पहिल्यापासूनच आहेत. तरीही आपण त्या प्राथमिक स्थिती संबंधीच डोकेफोड करून हे कसे सांगता?
त्यांच्याशी माझ्या अशा गप्पागोष्टी झाल्यामुळे त्यांना असे वाटले की, आपले सारे परिश्रम वाया गेले. आणि म्हणून ते निघून गेले. परंतु मी विचार करतो की, प्रचाराचा केवढा मोठा परिणाम सामान्य माणसांवर होत असेल. आपल्या देशाच्या राजदूताचेच उदाहरण माझ्या डोळयासमोर आहे. जेव्हा राजदूताच्या नात्याने ही व्यक्ती युरोपमध्ये गेली तेव्हा ती ख्रिश्चनांचा सर्वात मोठा धर्मगुरू, पोपला भेटली. पोपशी गप्पागोष्टी करताना, पोपची खुशामत करण्याच्या कल्पनेने त्या आपल्या राजदूताने पोपला असे म्हटले, ''जगातील सर्व धार्मिक पुस्तके नष्ट झाली, गीता, उपनिषदादि ग्रंथ समुद्रात बुडवून टाकले, तरी बिघडत नाही, कारण एक बायबलही सा¬या मनुष्यजातीचे कल्याण करण्यास पुरेसे आहे.'' भारताच्या राजदूताचे हे वक्तव्य वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. माझ्या मनात विचार येतो की, आपल्या देशातील विद्वान लोकांवरही खास प्रकारच्या प्रचाराचा केवढा जबरदस्त परिणाम होतो, याचा हा नमुना आहे.