मला आठवतंय की, जेव्हा मी अशी दाढी वाढवून संघाच्या कामासाठी भटकू लागलो तेव्हा माझ्या आईच्या मनात स्वाभाविकच माझ्या भविष्याविषयी चिंता उत्पन्न झाली.
ती म्हणू लागली, ''तू काही करत नाहीस, कमावत नाहीस, तुझं कसं व्हायचं? आपलं घर काही श्रीमंताचं नाही, दरिद्री घर आहे.''
ती म्हणाली, ''तुझ्यासाठी इथे काहीच ठेवलेले नाही. दारिद्रयाशिवाय इथे दुसरे आहे काय? मग तू पोट कसा भरशील?''
मी म्हटले, ''ताई! ज्या भगवंताने मला जन्म दिला आहे, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्या पायाशी तर साक्षात् लक्ष्मी बसलेली आहे. त्यामुळे मला काहीही कमी पडणार नाही. अग! ज्या भगवंताच्या पायाशी लक्ष्मी आहे त्या भगवंताच्या चरणी आपली श्रध्दा असेल, तर ती लक्ष्मी माता आपली कधीही उपेक्षा करणार नाही.'' अशा प्रकारे मी तिची समजूत घातली. काही दिवसांनी तिने माझा संघ परिवार पाहिला आणि तिची खात्री पटली की आता मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही.
तिला विश्वास वाटू लागला की, ह्याचे पालनपोषण करणारे अनेक जण आहेत. त्याला इतके मिळेल की, तो ते सर्व घेऊ देखील शकणार नाही. 'अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने' - अशी स्थिती होऊन जाईल.
म्हणून संघकार्यात आल्यामुळे माझा छोटा परिवार तर समाप्त झाला परंतु यामुळे मला फार मोठा विशाल असा भारतव्यापी परिवार मिळाला. जेथे जातो तेथे आत्मीयतेची माणसे आहेत. जणु काही माणसाला कोणत्या गोष्टीची आवश्यकताच नाही. जेवणाची इच्छा झाली, जेवण मिळते. कपडयांची इच्छा झाली, कपडे मिळतात. आणखी दुस¬या कशाची जर इच्छा नसेल, तर मिळण्याची आवश्यकताच नाही. पैशाची तर मुळीच गरज नाही. एवढा मोठा परिवार असल्यानंतर पैशासारख्या क्षुद्र गोष्टीच्या मागे कोण लागेल?