जीवनाचे हे अंतिम उद्दिष्ट सदैव आपल्या नजरेसमोर असल्यामुळे आपल्या संपूर्ण इतिहासात असे आढळते की, आपण स्वाभाविकपणेच एखाद्या व्यक्तीपाशी भौतिक संपत्ती किती आहे यापेक्षाही, मानवजातीचे कल्याण करण्याची बुध्दी व भावना किती आहे याच गोष्टींना विशेष महत्त्व दिले. आपल्या दृष्टीने अंत:करणाचा मोठेपणा, विशुध्द मन व उच्च शील हाच श्रेष्ठ जीवनमूल्यांचा निकष आहे. आपण कोणाचेही मोठेपण त्याच्या बाह्य संपदेवरून ठरवती नसून आंतरिक संपदेवरून ठरवितो. बाह्य वस्तू आज आहेत, उद्या नाहीशा होतील, अशा अशाश्वत गोष्टीमागे आपण का धावत सुटावे ? मानवी जीवनाचा जो अनुपमेय संपत्तिकोष आहे आणि जो आपण वृध्दिगंत करू शकतो अशाच संपत्तीच्या मागे आपण लागलो आहोत. श्रेष्ठ सद्गुण, परिपूर्ण ज्ञान आणि आत्म्याचा उदात्त भाव ही ती संपत्ती होय. केवळ हेच काय ते सत्य आहे, शाश्वत आहे. अन्य देशांतील सर्वसामान्य जनता एखाद्या शूर सेनापतीला वा बलाढय सरदाराला प्रतिपरमेश्वर मानते; परंतु आपल्या देशात मात्र असे दिसते की, मोठमोठया वीरपुरूषांनी आणि राजांनीही, अरण्यात वास करणाऱ्या, ज्यांच्यापाशी स्वत:ची म्हणता येईल अशी फाटकी चिंधीदेखील नाही अशा अकिंचन संन्याशांची चरणधूळ शिरोधार्य मानली. असे का ? जीवनाकडे पाहण्याचा आपला विशिष्ट दृष्टिकोन हे त्याचे कारण आहे. आत्मतत्त्व हेच केवळ नित्य आहे आणि परिपूर्ण अशा परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार होईपर्यंत एकामागून एक येणाऱ्या जन्मांमध्ये ते संक्रमित होत राहते. या अनुभूतीमधूनच ही विशिष्ट दृष्टी निर्माण झाली आहे.