वात्सल्यसिंधू
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष
मी 'डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरा'च्या उद़्घाटनासाठी नागपूरला गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर 'रेशीम बागे'हून पायीच मोहिते वाडयाच्या आवाराकडे निघालो. तेथेच आमच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. वाटेतच एका दुकानात दूध घेतले आणि विचार केला की, आता जेवणाची गरज नाही. पण तेथे पोचतो न पोचतो तोच शंभर पावलांवर असलेल्या श्रीगुरुजींनी मला म्हटले, ''पंडितजी आपण अजून जेवण केले नसेल, लगेच जेवण करून घ्या.'' खरे तर माझी जेवणाची इच्छा नव्हती, पण अशा महापुरुषासमोर नाही म्हणण्याची प्राज्ञा नव्हती म्हणून थोडेसे जेवण करणे भाग पडले.
 
श्रीगुरुजी एकेका कार्यकर्त्याकडे किती लक्ष देत असत हे यावरून कळते. त्यामुळेच लाखो स्वयंसेवक त्यांचा कोणताही आदेश पाळण्यासाठी सर्वस्व समर्पण करण्यास नित्यसिध्द होते.
- रामदुलारे मिश्र
 
पित्याप्रमाणे प्रेम
मला जानेवारी १९५१ मध्ये श्रीगुरुजींच्या दर्शनाचा पहिल्यांदाच लाभ झाला होता. आग्र्‍याच्या रामलीला मैदानावर प्रकट कार्यक्रम होता. माझे वडील संघाच्या विरुध्द होते, पण तरीही माझ्या आग्रहामुळे कार्यक्रमाचे स्थान १५ मैल दूर असूनही ते कार्यक्रमास आले होते. कार्यक्रमाची भव्यता तसेच श्रीगुरुजींचे प्रभावी भाषण यामुळे ते भारावून गेले. त्यांचा संघास असलेला विरोध मावळला. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या मित्रांमध्ये या कार्यक्रमाचे गुणगान तसेच श्रीगुरुजींची प्रशंसा केली.
 
त्यानंतर अनेक कार्यक्रमातून श्रीगुरुजींच्या भेटी होत गेल्या. एक आठवण डोळयासमोर सदैव तरळत असते. जून १९६९ च्या सुमारास बरेलीच्या इंटर कॉलेजच्या मैदानावर प्रकट कार्यक्रम होता. मी कार्यक्रमाचा मुख्य शिक्षक होतो. प्रार्थना झाल्यावर सर्वजण आपापल्या स्थानी बसले. मी स्वयंसेवकांचे ठरलेले शारीरिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी आपण 'दक्षिणार्ध वृत' देऊन शारीरिक कार्यक्रम घेतले पाहिजेत हे ध्यानात राहिले नाही. परंतु श्रीगुरुजींच्या दृष्टीतून ही चूक निसटली नाही. त्यांनी व्यासपीठावरूनच मला सांगितले, ''अरे, प्रथम दक्षिणार्ध वृत तर दे'' मी यांत्रिकपणे आज्ञा दिली आणि नंतर कार्यक्रम पार पडला. श्रीगुरुजी श्री. जुगलकिशोरांकडे थांबले होते. मी गुपचुप दरवाजाबाहेर कोप¬यात उभा होतो. श्रीगुरुजींनी माझ्याकडे पाहिले आणि स्वत: 'मुख्य शिक्षकजी' म्हणून मला पुकारले. मी श्रीगुरुजींना हात जोडून अभिवादन केले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि खो खो करून हसले. आणि मग मला म्हणाले, ''बरे झाले! नंतर तरी तुम्ही सांभाळून नेले.'' त्यांनी स्वत: किटलीतून कपात चहा ओतला. आणि तो कप माझ्या पुढे केला. मी संकोचत तो चहा घेतला. चालत जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून ते प्रेमाने म्हणाले, ''आज्ञांचा क्रमही ध्यानात ठेवला पाहिजे.'' चूक सुधारण्यासाठी त्यांनी योजलेला हा स्नेहपूर्ण उपाय आजही आठवला की डोळे भरून येतात. खरोखरच प्रत्येक स्वयंसेवकाविषयी त्यांच्या मनात पित्याप्रमाणे प्रेम होते, हे नि:संशय!
- विजय अग्रवाल
 
अतूट संबंध
तामिळनाडूचे दोन स्वयंसेवक श्रीगुरुजींना भेटण्यासाठी मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले होते. श्रीगुरुजींचे ऑपरेशन होऊन पाच दिवस झाले होते. श्रीगुरुजींनी त्यांच्याशी थोडा वेळ गप्पागोष्टी केल्या आणि त्यांच्यातील एकाला म्हटले, ''समोरच्या खोलीत चेन्नई (मद्रास)चे एक रुग्ण आले होते आणि एक दोन दिवसात ते येथून आपल्या घरी जायचे आहेत. कदाचित ते आपल्या ओळखीचे असू शकतील. म्हणून आपण त्यांची जरूर भेट घ्या.''
 
स्वत: रुग्णावस्थेत असूनही श्रीगुरुजी दुस¬या रुग्णांची एवढया आत्मीयतेने आठवण करताना पाहून त्या स्वयंसेवकांना मोठे आश्चर्य वाटले.
 
तो स्वयंसेवक त्या रुग्णास भेटला. ती व्यक्ती चेन्नई (मद्रास)च्या कोणत्यातरी स्वयंसेवकाची नातेवाईक निघाली. त्यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांबरोबर श्रीगुरुजींच्या प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्ण वागणुकीची पुष्कळ प्रशंसा केली. त्यांना या गोष्टीचे विलक्षण समाधान वाटले की, श्रीगुरुजींनी त्यांच्याशी अतूट संबंध ठेवण्याची गोष्ट स्मरणात ठेवली.
- ए. दक्षिणामूर्ती