जुन्यापुराण्या ओळखीच्या मंडळींची माहिती काढून त्यांच्या भेटी घेण्याच्य हौसेमुळे श्रीगुरूजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांना भेटण्यासाठी अनेकदा जात असत. त्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्रीपद हे कारण नसून जुनीपुराणी ओळख हे मुख्य कारण होते. पं. शुक्लजींचा छत्तीसगडातील ज्या सरायपल्ली गावाशी संबंध होता, (त्याच मतदारसंघातून ते निवडणूक लढवीत असत.) त्या गावी श्रीगुरूजींचे वडील नोकरीनिमित्त काही वर्षे राहिले होते. त्या काळात त्यांचे अगदी घरगुती संबंध आले होते. त्यामुळे श्रीगुरूजी पंडित शुक्लजींशी बोलताना 'काकाजी' शब्दाने त्यांना संबोधित असत. संघाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी श्रीगुरूजी काकाजींकडे अगत्याने जात असत. दोघांच्या भेटीत झालेला एक संवाद श्रीगुरूजींनी एका खासगी बैठकीत सांगितला, तो असा -
''अशाच एका भेटीच्या प्रसंगी पं. शुक्लजी श्रीगुरूजींना म्हणाले की, तुमचे हे संघटन व विशिष्ट संस्कारांच्या द्वारे तरूणांमध्ये राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे कार्य ठीकच आहे. त्याबद्दल मला व्यक्तिश: काहीच म्हणावयाचे नाही. पण आमच्या काँग्रेसमधील बरेच लोक म्हणतात की, तुमच्या या बाह्यात्कारी कार्यामागे आणखी काही हेतू आहे.''
त्यावर श्रीगुरूजींनी पंडितजींना उत्तर दिले, ''हमने यह इतनी बडी संघटना केवल बच्चे खिलाने के लिए नहीं खडी की । इसके पीछे हमारा अवश्य विशिष्ट उद्दिष्ट है।''
त्याबरोबर पंडितची म्हणाले, ''वह मैं ठीक समझ गया । आपको मुझे अधिक कोई बताने की आवश्यकता नहीं।''
याच बोलण्यात श्रीगुरूजींनी त्यांना सांगितले की, ''आपल्या राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक अंगोपांगावर संघाच्या राष्ट्रीय तत्त्वज्ञानाचा संपूर्ण प्रभाव पाडणे हे आमचे या संघकार्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे व ते आम्ही कधीही लपवून ठेवलेले नाही !''
श्रीगुरूजींनी एका बौध्दिक वर्गात पंडित शुक्लजींच्या भेटीचा हा प्रसंग सांगितला होता व त्यांना ऐकविलेली वरील वाक्य काही जाहीर कार्यक्रमांतही उच्चारले होते !