श्रीगुरूजी सरसंघचालक झाले. त्याच वर्षी पुण्याला भाऊसाहेब भुस्कुटे यांच्या विवाहानिमित्त नागपूरचे अनेक स्वयंसेवक मित्र श्रीगुरूजींच्या बरोबर पुण्याला गेले. एका मुक्कामाच्या ठिकाणी दिवाणखान्यात विशिष्ट वेळी श्रीगुरूजींना भेटण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवकानीं भेटण्याचे ठरविले. श्रीगुरूजी येण्याच्या बराच वेळ आधी नागपूरचे स्वयंसेवक त्या दिवाणखान्यात जाऊन गप्पा मारीत बसले होते. त्यामध्ये नागपूरचे दाढीवाले स्वयंसेवक नाना भिशीकर हेही बसले होते. नाना हे श्रीगुरूजींचे समवयस्क व त्यांच्यासारखेच सडसडीत बांध्याचे होते. सर्वसामान्य दाढीधारी लोकांच्या चेहरेपट्टीत जे स्वाभाविक साम्य दिसते ते नाना भिशीकर आणि श्रीगुरूजी यांच्याही मुद्रेवर दिसत होते.
श्रीगुरूजींना ज्यांनी तत्पूर्वी कधीच पाहिले नव्हते असे किंवा ज्यांनी क्वचित समारंभप्रसंगी त्यांना दूर व्यासपीठावर पाहिले होते असे काही स्वयंसेवक हळूहळू दिवाणखान्यात येऊ लागले. आत येताच कोणतरी दाढीवाले आत बसलेले पाहताच दचकल्यागत दूर अंतरावर बसू लागले. नाना भिशीकर यांच्या लक्षात त्या स्वयंसेवकांची चूक येताच आपल्या अभिजात विनोदी स्वभावास अनुसरून उसने गांभीर्य धारण करून ते बसून राहिले. स्वयंसेवकही जागच्या जागी आपापसात न बोलता शांतपणे बसून होते. हळूहळू संख्याही वाढत होती.
इतक्यात शांत पावलांनी श्रीगुरूजींनी आत प्रवेश केला. नाना भिशीकरला केंद्रस्थानी कल्पून गंभीरपणे बसलेली स्वयंसेवक मंडळी पाहताच सारा प्रकार चटकन त्यांच्या लक्षात आला. तेही त्याच अदबीने नानांकडे तोंड करून स्वयंसेवकांत जाऊन बसले. नानांची व श्रीगुरूजींची क्षणभर दृष्टादृष्ट होऊन व्हायचे ते नेत्रसंकेत झाले.
स्वयंसेवक मंडळींमध्ये या दोन दाढीवाल्यांपैकी सरसंघचालक कोणते याबद्दल संदेह निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत होते. श्रीगुरूजी आपल्या हावभावावरून नाना भिशीकरच सरसंघचालक आहेत असे भासवीत होते आणि नाना भिशीकर आपल्या परीने मीच खरा आहे हे भासविण्याचा प्रयत्न करीत होते. अर्थात हा प्रकार दोन-चार मिनिटे टिकला. लवकरच गौप्यस्फोट होऊन हास्याचा प्रचंड प्रस्फोट झाला.