श्रीगुरूजी ज्या शाखेवर प्रार्थनेसाठी जात, तेथे शाखा संपल्यावर अनोळखी लहानमोठया स्वयंसेवकांचा परिचय हा ठरलेलाच ! एकदा ते नागपुरातल्या गोरक्षण शाखेवर आले असता बालस्वयंसेवकांचा परिचय सुरू झाला. ''माझे नाव अमुक अमुक दाते,'' एकाने परिचय दिला. त्यावर ''माझे नाव..... दातार''ा असा दुसऱ्याने परिचय देताच त्याच्या शेजारच्या बाल स्वयंसेवकाच्या डोक्यावर हळूच चापट मारून श्रीगुरूजी म्हणतात, ''आता या बेटयाचे नाव दातीर असले पाहिजे'' आणि आश्चर्य हे की, त्याने तेच आपले आडनाव सांगितले आणि हास्याचे कारंजे उडाले. त्यावर श्रीगुरूजी म्हणाले, ''दाते, दातार, दातीर एकत्र मिळाल्यावर तुम्हा सर्वांना दात दाखवायला हरकत नाही.'' पुन्हा हास्याचे कारंजे.