संस्काराचे महत्व
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
म्हणूनच आपण म्हणतो आपल्याला आपल्या विधायक राष्ट्रीयत्वाचे इतके खोल संस्कार करावयाचे आहेत की, राजकीय वा अन्य कोणत्याही कारणांनी मन विचलित होणार नाही. हिंदू राष्ट्रीयत्व आणि हिंदू जीवनाची महत्ता यांना अनुरूप असा आपला दैनंदिन जीवनव्यवहार नसेल तर या गोष्टीचे कोरडे गुणगान करण्यात काहीच अर्थ नाही.
 
प्रात:काळी सूर्योदयापूर्वी उठावे अशी आपल्याकडची पध्दत आहे. एकदा एका साधूंनी आपली आई आपल्याला लहानपणी प्रात:काळी कशा प्रकारे उठवीत असे ते सांगितले. ते म्हणाले, माझी आई सकाळी लवकर उठे. घरातले नित्याचे काम करीत असताना आपल्या गोड आवाजात दिव्य विश्वजननीचे गुणगान करणारी स्तोत्रे-भूपाळया म्हणजे आणि तिचा आशीर्वाद मागून आपल्याला उठवी. झोपेतून जागे होताक्षणीच कानी येणारे ते पवित्र शब्द अंत:करणात अगदी खोलवर जाउन बसले आहेत. त्यांनीच माझे जीवन पवित्र बनविले व सर्व लौकिक मोहांना दूर सारून त्या जगज्जननीच्या सेवेत स्वत:चे जीवन समर्पित करण्याची श्रध्दा व सामर्थ्य मला दिले. आपण ज्याला हिंदू संस्कार म्हणतो तो हाच. सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण दिवस अशा अनुशासित वृत्तीने राहून आपण आपले जीवन घडवूया. अनुशासन आणि संयम यांचे आयुष्यभर संस्कार करवून घेण्यासाठीच हिंदू मनुष्य जन्म घेतो आणि या नित्य संस्कारातून जीवनातील श्रेष्ठतम लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असलेली विशुध्दता व सामर्थ्य त्याला प्राप्त होते.
 
या सर्व गोष्टी क्षुल्ल्लक आहेत. यासंबंधी चिंता करीत बसण्याचे कारण नाही, असे म्हणून चालणार नाही. अशा प्रकारच्या लहान लहान गोष्टींतूनच जीवनात अनुशासन निर्माण होते आणि आपल्या चारित्र्याला योग्य तो आकार व सामर्थ्य प्राप्त होते; परंतु आज प्रत्यक्षात काय दिसते ? अशा सर्व हितकारक आचार-व्यवहारांची, रीतीरिवाजांची अंधश्रध्दा म्हणून हेटाळणी करण्यात येते. या संदर्भात अलीकडेच घडलेली एक घटना सांगतो.
 
आपल्या देशातील एक विद्यार्थी अमेरिकेला गेला होता. एका सर्वसामान्य कुटुंबात तो 'पेईंग गेस्ट' म्हणून राहिला. पहिल्या दिवशी त्या कुटुंबातील मंडळीसमवेत तो जेवावयास बसला तेव्हा लगेच त्याने पदार्थ वाढून घेण्यास सुरूवात केली हे पाहून मालकीणबाईंनी त्याला क्षणभर थांबण्याची विनंती केली आणि सांगितले की, ''जेवावयास बसण्यापूर्वी परमेश्वराची प्रार्थना करावयाची आमच्या येथे पध्दत आहे.'' आध्यात्मिकतेची भूमी, देवभूमी म्हणून ज्या देशाची ख्याती आहे अशा आपल्या या देशातून तो तरूण आत्यंतिक भौतिकवादी आणि केवळ संपत्तीचे पुजारी असलेल्या देशात गेला होता, हे लक्षात घ्या. ईश्वराविषयी, धर्माविषयी पाश्चात्त्यांच्या मनात ही जी श्रध्दा आहे, बऱ्याच अंशी त्या श्रध्देमुळेच जगात अग्रेसर होण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले आहे.
 
आपल्या आध्यात्मिक परंपरेविषयी आपण मोठया अभिमानाने बोलत असतो. परंतु प्रत्यक्ष आपले जीवन कसे असते ? आपले दैनंदिन संस्कार कसे आहेत ? ज्या ठिकाणी बसून ईश्वराचे चिंतन करावे अशी एखादी जागा आपल्या घरात आहे का?
एकदा माझ्या एका ओळखीच्या गृहस्थांनी नवीनच बांधलेले आपले घर पाहण्यासाठी मला बोलावले. सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त, अगदी अद्ययावत म्हणता येईल असे ते घर होते. त्यातील खास वैशिष्टये त्यांनी दाखविल्यानंतर मी त्यांना सहज प्रश्न विचारला, ''तुमचे देवघर कोठे आहे?? तुमचे वाडवडील ज्याची उपासना करीत आणि परंपरेने जे तुमच्या पिढीपर्यंत चालत आले आहे, असे तुमचे एखादे कुलदैवत नाही का ?'' माझा प्रश्न ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी किंचित दिलगिरीपूर्वक मला म्हटले, ''खरेच, ही गोष्ट माझ्या लक्षातच राहिली नाही.'' काही महिन्यांनी मी पुन्हा त्याच गावी गेलो होतो. तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले. ''आपण केलेली सूचना मी अमलात आणली आहे. आता पुन्हा एकदा आपण आमच्या घरी चला.'' मी पुन्हा त्यांचे घर पाहण्यासाठी गेलो. जिन्याखालच्या चिंचोळया त्रिकोणी जागेत एक छोटीशी आलमारी बांधलेली होती. कुटुंबातील सर्व मंडळींच्या चपला व जोडे त्या आलमारीवर नीटपणे लावून ठेवले होते. त्या गृहस्थाने 'जीवनमान खूप उंच' असल्याने पादत्राणांची संख्याही भरपूर होती. मोठया समाधानाच्या जाणिवेने ते मला म्हणाले, ''मी ही आलमारी नवीनच बांधली आणि आमची कुलदेवता तिच्यात ठेवून दिली.'' हे पाहून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी फक्त एवढेच म्हटले, ''त्या देवतेला अशा प्रकारे भ्रष्ट करण्यापेक्षा आपली ही पादत्राणे आत ठेवून त्यांचीच पूजा का करीत नाही?'' आपले आजचे प्रगतीशील हिंदू जीवन हे असे आहे.
 
श्रीराम, शिवाजी किंवा स्वामी विवेकानंद हे अशा प्रकारच्या आधुनिकतेतून निर्माण झाले नाहीत ही गोष्ट आपण विसरता कामा नये. रामायण व महाभारत यात अनुस्यूत असलेल्या आदर्शातूनच शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली होती. हिंदू जीवनपध्दतीवरील आत्यंतिक निष्ठेला अनुपम संघटनाकौशल्याची जोड मिळून, ती निष्ठा सचेतन स्वरूपात शिवाजी महाराजांच्या रूपाने साकार झाली आणि इतिहासाचा प्रवाह संपूर्णपणे बदलून टाकणारी शक्ती म्हणून ते ख्यातनाम झाले. वैदिक काळातील प्राचीन ऋषिमुनींपासून तो रामतीर्थ, रामकृष्ण, विवेकानंद यांसारख्या आधुनिक काळातील थोर पुरूषांपर्यंत सर्वांच्या प्रेरक जीवनाचा ठसा आपल्या समाजावर उमटलेला आहे याचे कारण त्यांचे जीवन शतकानुशतके चालत आलेल्या आपल्या आदर्शांनी ओतप्रोत होते हेच आहे. परिस्थिती सर्व बाजूंनी प्रतिकूल असताही ते ताठ मान करून उभे राहिले आणि साऱ्या जगासमोर आव्हानपूर्वक आपले विचार त्यांनी मांडले. त्यांचेच वारस असलेले आपण आज किती दयनीय अवस्थेला पोचलो आहोत! ज्या ध्येयांनी त्या नरवीरांच्या भाववृत्ती प्रेरित झाल्या आणि त्यांचे आदर्श जीवन घडविले त्यांचा श्रीगणेशासुध्दा आपल्याला माहित नाही!
 
सरकारी शिष्यवृत्ती घेऊन परदेशात गेलेला माझा परिचयाचा एक तरूण गृहस्थ आहे. तेथे त्याला त्याच्या मित्रांनी आणि परिचितांनीही आत्मा, प्राणायम, गीता यासंबंधी, त्याचप्रमाणे हिंदू आदर्श आणि जीवनपध्दती याविषयी अनेक प्रश्न विचारले. त्या तरूण गृहस्थाला यापैकी कशाचीही माहिती नव्हती. त्याने आपली ही अडचण मला पत्राने लिहून कळविली. पण मी काय करणार? योगाभ्यास, प्राणायाम, समाधी आदी गोष्टींचे शिक्षण टपालाने मी त्याला थोडाच देऊ शकणार होतो? या देशातील आपल्या तथाकथित सुशिक्षित तरूणांनी आपले तत्त्वज्ञान स्वत:च्या जीवनात उतरविण्याची गोष्ट तर दूरच राहिली, त्याच्या मूलतत्त्वांचा गंधसुध्दा त्यांना नसावा ही केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे!