श्रीगुरूजींचा सेवाभाव
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
श्रीगुरूजींच्या मित्रपरिवारात वामनराव वाडेगावकर हे त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र होते. वामनराव हे बालपणीच अंध झाले असले तरीत्त्यांचे वडील रावबहादूर नारायण दाजीबा वाडेगावकर यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची योग्य व्यवस्था केली होती. बी.ए. पर्यंतचे अध्ययन झाल्यावर त्यांना विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी त्या काळात केवळ अंध म्हणून नाकारण्यात आल्याने पुढे कायद्याचा अभ्यास करून वकील होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा ढासळून पडली. त्याच मन:स्थितीत अंधविद्यालय स्थापन करण्याचा निश्चय करून ते कामास लागले. ही संस्था उभारण्याच्या कामात ज्या अनेक सहृदय मित्रांचे सहकार्य त्यांना लाभले, त्यामध्ये श्रीगुरूजी हे प्रमुख होते. वाडेगावकरांनी हा उद्योग आरंभला, तेव्हा श्रीगुरूजी हिस्लॉप कॉलेजात शिकत होते. आपल्या अंध मित्राला सायकलवर बसवून अंधविद्यालयासाठी निधी गोळा करणे, अधिकारीवर्गाशी भेटीगाठी घेणे, यासाठी श्रीगुरूजी नागपुरात हिंडत असत.
वामनराव एकदा म्हणाले, 1934-35 साली माझ्यावर फार मोठी शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग आला. मी आंधळा असल्यामुळे आधीच परावलंबी, त्यात ही एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली म्हणजे आणखी शंभरपट परवलंबी होणार. अशा वेळी माझी सुश्रूषा मनापासून कोण करील, हा प्रश्न मजपुढे उपस्थित झाला. तत्काळ मी माधवरांना माझा निरोप कळविला. तो कळताच ते मुंबईला श्सत्रक्रियेपूर्वीच मजबरोबर राहावयास आले. त्या वेळी ते कदाचित एम.एस्सी. पास झाले असतील. या माझ्या आजारात त्यांनी माझी सारी सेवाशुश्रृषा इतकी हळुवारपणाने केली की ती मी जन्मभर विसरू शकणार नाही. विशेषत: ते मलमूत्राच्या कामी मला साहाय्य करू लागले की मला अगदी मेल्यासारखे होई. प्रत्येक वेळी मी त्यांना काही म्हणून लागलो की त्यांचे ठराविक उत्तर असे, ''त्यात काय झाल? मी नाही का माझ्या देहाची साफसफाई करीत ? तुमचा देह आणि माझा देह यात काय अंतर आहे ?''