परंतु दुर्देवाने आपल्या सभोवती काय दिसते ? असे अनेक लोक आहेत की, जे एक जीवनश्रध्दा म्हणून नव्हे, तर प्रतिक्रिया म्हणुन स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात. गोहत्या-निरोध आंदोलनात स्वाक्षरी-संग्रह करताना आपले काही कार्यकर्ते एका प्रमुख हिंदू पुढाऱ्याकडे गेले. ते पुढारी म्हणाले, ''भाकरण जनावरांची हत्या बंद करण्याचा काय उपयोग? ती मेली म्हणून काय बिघडते ? वस्तुत: सर्वच पशू समान आहेत. परंतु मुसलमानांचा गोहत्येबाबत हट्ट आहे. तेव्हा हा प्रश्न आपण हाती घेणे आवश्यक आहे. म्हणुन मी माझी स्वाक्षरी तुम्हाला अवश्य देतो.'' त्या पुढाऱ्याचे हे विचार काय दर्शवितात ? गाय वर्षानुवर्ष हिंदूंचे श्रध्दास्थान आहे म्हणुन नव्हे तर मुसलमान तिची हत्या करतात म्हणून गाईचे रक्षण केले पाहिजे असे त्यांना वाटते. प्रतिक्रियेतून जन्माला आलेले हे नकारात्मक हिंदुत्व आहे.
ज्यांना स्वत:चे राजकीय हेतू साध्य करण्याचे एक साधन एवढयाच अर्थाने हिंदू शब्दाचे महत्त्व वाटते असेही काही लोक आहेत. काँग्रेस, समाजवादी किंवा अन्य कोणी 'क्ष' संमिश्र संस्कृतीची भाषा बोलू लागताच हे लोक उभे राहून म्हणतात की, आम्हाला शुध्द हिंदू संस्कृती पाहिजे. 'हिंदू साम्यवादाची' घोषणा तर याहूनही विचित्र आहे. कोणीही मनुष्य एक तर हिंदू असू शकेल अथवा साम्यवादी असू शकेल. एकाच वेळी तो हिंदू आणि साम्यवादी दोन्ही असू शकणार नाही. याचा अर्थ असा की जे 'हिंदू साम्यवादाची' घोषणा करतात त्यांना साम्यवाद कळलेला नाही आणि हिंदुत्वही समजलेले नाही. हे केवळ प्रतिक्रियेतून निर्माण झालेले विचार आहेत.
एकदा एका गृहस्थांनी मला विचारले, ''आपण हिंदूंची संघटना करीत आहात ती मुसलमानांच्या विविध चळवळींना प्रतिकार करण्यासाठी काय?'' मी त्यांना एवढेच म्हटले की, ''महम्मद जन्माला आला नसता आणि इस्लाम धर्म अस्तित्वातच आला नसता तरीही जर हिंदू आजच्यासारखेच असंघटित आणि आत्मविस्मृत अवस्थेत आढळले असते तर आम्ही आजच्याप्रमाणेच हिंदू संघटनेचे कार्य काही घेतले असते.'' हे माझे हिंदू राष्ट्र आहे, हा माझा हिंदू धर्म आहे, हे माझे तत्वज्ञान आहे, ते प्रत्यक्ष आचरणात आणून जगातील साऱ्या राष्ट्रांपूढे एक अनुकरणीय आदर्श म्हणून ते उभे करावयाचे आहे. ही विधायक दृढ श्रध्दा हाच हिंदू संघटनेचा भक्कम आधार असला पाहिजे.
म्हणून जर आपणास केवळ 'राजकीय हिंदू' किंवा प्रतिक्रियात्मक हिंदू म्हणून राहावयाचे नसेल तर जाणीवपूर्वक दृढ श्रध्देने हिंदू म्हणून जगले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ती जाणीव आणि श्रध्दा व्यक्त झाली पाहिजे. हिंदुत्वाचा केवळ साहित्यात वा वृत्तपत्रांमध्ये प्रचार करून काहीही कार्यभाग होणार नाही. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व या विषयावर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातील हिंदू राष्ट्रवादाचा विशुध्द सिध्दांत हाच हिंदू महासभेने आपल्या कार्याचा आधार मानला. परंतु आपल्या नाशिक अधिवेशनात हिंदू महासभेने असा ठराव संमत केला की, 'मुस्मील लीगबरोबर बोलणी करून काँग्रेसने आपली 'राष्ट्रीय' भूमिका सोडू नये. ते काम तिने हिंदू महासभेवर सोपवावे.' याचा अर्थ असा की त्यांच्या मते काँग्रेसचा संमिश्र राष्ट्रवाद हा शुध्द राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा ज्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतिनिधित्व करते तो आत्यंतिक जातीयवाद व राष्ट्रविरोधी मुस्लीम लीगची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिलेला राष्ट्रवाद, ही अशी विकृती धारणा का निर्माण झाली? कोणत्याही वेळी, अगदी स्वप्नातदेखील-'होय, हे हिंदू राष्ट्र आहे' असे खणखणीत उत्तर यावे इतकी दृढमूल श्रध्दा त्यांच्या ठिकाणी नव्हती हेच त्याचे कारण आहे.