विशुध्द ज्ञान, सूक्ष्म दृष्टी, प्रखर स्मृती
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
अलौकिक स्मरण शक्ती
मी काशीत शिकत होतो. माझे एक मित्र श्री. विनायक लक्ष्मण कुलकर्णींच्या आग्रहाने मी कधी कधी शाखेत जाऊ लागलो. त्या वेळी अधिक स्वयंसेवक महाराष्ट्रीयच होते. प्रार्थनादेखील थोडी मराठी-संस्कृत आणि हिंदीत होती. शाखेत मराठी स्वयंसेवकांची संख्या अधिक असल्याने ते अनेकवेळा परस्परांशी मराठीत गप्पागोष्टी करत असत. स्थानिक स्वयंसेवक थोडे असल्याने ते एकटे पडत. शाखेत नवीनच असल्यामुळे मला असा अनुभव येऊ लागला की, हे कार्य जणू केवळ मराठी लोकांचेच आहे, त्यामुळे शाखेबद्दल थोडी नावड निर्माण झाली आणि माझे शाखेत जाणे जवळजवळ बंद झाले. याच सुमारास पू. डॉक्टर काशीला आले. ते वसतिगृहाचे प्रमुख श्री. कुलकर्णीकडे उतरले होते.
आपला मित्र कुलकर्णीबरोबर मीही डॉक्टरांच्या भेटीस गेलो, तेथेच श्रीगुरुजीही होते. एकदा केव्हातरी त्यांना शाखेवर पाहिले होते. त्या काळी ते काशी विश्वविद्यालयात प्राध्यापकही होते.
 
परिचय दिल्यानंतर सांगू का नको असे वाटत असताना डॉक्टरांसमोर मी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. मी म्हणालो, ''असे वाटते की हे कार्य केवळ मराठी लोकांचे आहे. आम्ही तेथे वेगळेच पडतो जणू द्वितीय श्रेणीचे स्वयंसेवक!'' जेव्हा मी आपले मनोगत सांगत होतो, श्रीगुरुजी मोठया गंभीरतेने ते ऐकत होते. त्यांनी म्हटले की, काही स्वयंसेवकांजवळ व्यावहारिक कुशलता नसल्याने असे होत असावे, अन्य कोणत्या कारणाने नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मोठया प्रेमाने आम्हाला समजावले. मी प्रसन्नतेने परतलो. दुस¬या दिवसापासूनच मी शाखेत जाऊ लागलो आणि पुन्हा तसे काही जाणवले नाही. पण श्रीगुरुजींची पुन्हा कधी शाखेवर भेट झाली नाही. बहुतेक ते काशी सोडून गेले असावेत.
 
हा प्रसंग मी विसरलो होतो. १९४१ मध्ये मी काशीहून घरी परत आलो. देशाच्या फाळणीच्या दिवसात श्रीगुरुजी कालका मेलने दिल्लीला चालले होते. मैनपुरीचे आम्ही काही स्वयंसेवक श्रीगुरुजींच्या भेटीसाठी शिकोहाबाद स्टेशनवर गेलो. गाडी फक्त पाच मिनिटे थांबली. परिचय सांगताना माझी पाळी येताच श्रीगुरुजींनी स्वत:च म्हटले, ''डॉक्टर! कुशल आहात ना! आता शाखेवर सगळीकडे हिंदीच चालते ना!'' पंधरा वर्षांपूर्वी एकदाच झालेली ओळख एवढेच नव्हे, तर त्यावेळची माझी शंका अजूनही त्यांच्या आठवणीत आहे हे समजल्याने मी आश्चर्य चकित झालो.
- डॉ. पुरंग
 
छोटया गोष्टीही स्मरणात रहात
अलीगड जिल्ह्यात एक स्थान पोरा आहे आणि एक अन्य स्थान कचौरा आहे. श्रीगुरुजी थट्टेने त्याला कचौडी म्हणत असत. एकदा सिकन्दराराऊ तालुक्याचे मा. संघचालक श्री. लालाराम चंचल, नागपुरात श्रीगुरुजींच्या घरी त्यांना भेटण्यास गेले. त्यांनी ओळख देताना सांगितले की, मी कचौराहून आलो आहे. श्रीगुरुजींनी लगेच म्हटले की, होय! अलीगडच्या पुडी कचौडीहून आला आहात. किती विलक्षण होती श्रीगुरुजींची स्मरणशक्ती! आणि किती छोटया छोटया गोष्टीही ते ध्यानात ठेवत.
- कृष्णसहाय
 
खोलीतील बदलाचेही स्मरण
१९५३ मध्ये श्रीगुरुजी पहिल्यांदाच हरदोई गावी आले होते. ते त्यावेळी माझ्या घरी उतरले होते. मी जिल्ह्याचा संघचालक होतो. त्यानंतर 14 वर्षांनंतर श्रीगुरुजी हरदोईत आले. त्यावेळीही ते माझ्याकडेच उतरले. दुस¬यावेळी मुक्काम असताना ते मला म्हणाले की, पंडितजी तुम्ही ज्या खोलीत माझी उतरण्याची व्यवस्था केली आहे, त्या खोलीत काही बदल झालेला दिसतो. 14 वर्षानंतर अशा प्रकारचा बदल लक्षात येण्यासाठी तीव्र स्मरणशक्तीचीच गरज असते.
- सिध्दगोपाल अग्निहोत्री
 
नेता असावा तर असा...
श्रीगुरुजींचा कारने प्रवास होता. एका नगराहून दुस¬या नगराकडे जाताना मार्गाचा घोटाळा होऊ नये म्हणून चौकात एका किशोर स्वयंसेवकाची व्यवस्था केली होती. त्याने कार थांबवून त्या कारला योग्य मार्ग दाखवावा अशी योजना होती. कार आली. स्वयंसेवकाने कार थांबवली. गाडीत किती पेट्रोल आहे, किती दूर जायचे आहे याची चौकशी झाली. ध्यानात आले की कारच्या एका भागातून थेंब थेंब पेट्रोल गळत आहे. आता काय करावे असा प्रश्न उभा राहिला. पेट्रोल भरता येईल पण गाडीची दुरुस्ती केली नाही तर वेळेवर कसे पोचता येईल? दुस¬या गाडीची व्यवस्था करण्याइतका अवधीही नव्हता. त्या किशोर स्वयंसेवकाने थोडया वेळात एक साबणाचा तुकडा आणला आणि जेथून पेट्रोल गळत होते तेथे तो लावून दिला. पेट्रोल गळणे बंद झाले होते. कार पुढे गेली, नियोजित ठिकाणी वेळेवर पोचली.
 
तीन वर्षानंतर नागपूरमध्ये परिचयाच्या वेळी एक स्वयंसेवक दक्षमध्ये उभा होता. त्या स्वयंसेवकाने परिचय करून दिला मात्र श्रीगुरुजींनी त्याला विचारले की, साबुनवाले इंजिनिअर ठीक आहात ना! हीच तर ती विशेषता. याच विशेषतेने सर्वांना बांधून ठेवले आहे.
- कौशल किशोर
 
श्रीगुरुजी आणि घोष
रात्रीचे दहा वाजले होते. आम्ही काही कार्यकर्ते श्रीगुरुजींच्या भेटीसाठी माननीय बाळासाहेब दीक्षितांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी माननीय मोरोपंत पिंगळे यांनी श्रीगुरुजींच्या हातात एक पुस्तिका (कॉपी) देताना म्हटले की, घोष विभागाने एक भारतीय स्वर रचना निर्माण केली आहे, ती बरोबर आहे की नाही हे आपण पहावे. श्रीगुरुजी म्हणाले, ''पाहतो, परंतु चुका निघाल्या तर?'' ''प्रत्येक चुकीसाठी साष्टांग नमस्कार करीन'' मोरोपंत म्हणाले. श्रीगुरुजी म्हणाले की, ठीक आहे, काही हरकत नाही. श्रीगुरुजींनी ती पुस्तिका एकदाच पाहिली, चार चुका निघाल्या. मोरोपंतांनी साष्टांग नमस्कार घालायला सुरुवात केली. श्रीगुरुजींनी त्यांना थांबवले आणि ते इतक्या जोरात हसले की, काय झाले हे पहायला, घरातील मंडळीही बाहेर आली.
- हरि खाण्डे
 
विलक्षण पारख
१९६८ मध्ये मेरठहून आम्ही दोन कार्यकर्ते संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षासाठी नागपूरला गेलो होतो. श्रीगुरुजी त्या वर्गात एक आठवडा राहणार असल्याची वार्ता सर्वांना हर्षनिर्भर करणारी होती. श्रीगुरुजी प्रचारक म्हणून बाहेर पडणा¬या कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. कार्यकर्त्यांचा परिचय आणि त्यांना मार्गदर्शन असा कार्यक्रम सुरू होता. श्रीगुरुजी परिचय करून देणा¬या प्रत्येकाला काही प्रश्न विचारत; त्या कार्यकर्त्याचे उठणे-बसणे, उभे राहणे, उत्तर देण्याच्या शैलीतून कार्यकर्त्याचा आत्मविश्वास, कार्य करण्याची तीव्र इच्छा, तळमळ, आतुरता, कार्य करण्याची प्रेरणा, कष्ट सहन करण्याची शक्ती, संघविषयक ज्ञान तसेच व्यवहाराची नीट पारख करत. तसेच कार्यक्षेत्रात येणा¬या संभाव्य प्रतिकूलता-अनुकूलता याचे अनुमान काढून घेत. एका कार्यकर्त्याचा परिचय आणि प्रश्नोत्तरे झाल्यानंतर त्यांनी त्याला निग्रहाने, प्रचारक म्हणून न निघण्याचा सल्ला दिला. आमच्यातील अनेक कार्यकर्त्यांना हे विचित्र वाटले. माझी त्या कार्यकर्त्यांशी घनिष्ट मैत्री होती म्हणून मी त्या कार्यकर्त्याची प्रचारक या नात्याने कार्य करण्याची तीव्र इच्छा श्रीगुरुजींच्या कानावर घालण्याचे धाडस केले. पण त्यावेळी श्रीगुरुजी काही बोलले नाहीत. तो कार्यकर्ता नंतर मोठया उत्साहाने एका क्षेत्रात प्रचारक म्हणून गेला. पण तीन महिन्यातच तो घरी परत आला. श्रीगुरुजींनी म्हटलेल्या एकेक शब्दाची, मार्गदर्शनाची आठवण येत होती. खरोखरच त्यांची पारख किती विलक्षण आणि सतर्क होती.
- वासुदेव शर्मा
 
भोलानाथ कोठे आहे?
सन १९४२ ची गोष्ट असेल. श्रीगुरुजी लखनौला आले होते. काही लोकांशी त्यांचा परिचय करून देण्यात आला, सुमारे ७० जण असतील. मी पण त्यातील एक होतो. एक वर्षानंतर श्रीगुरुजी पुन्हा लखनौला आले होते. मी सीतापूरहून लखनौला गेलो होतो. गाडी उशीरा पोचली आणि माझ्या पायालाही जखम झालेली होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी कुर्मी पाठशालेच्या मैदानावर जाईपर्यंत श्रीगुरुजींचे भाषण सुरूही झाले होते.
श्रीगुरुजींनी भाषण करताना दुरूनच मला पाहिले. कार्यक्रमानंतर बैठक होती. त्या बैठकीस मलाही जायचे होते. पायाला जखम असल्याने मला बैठकीस उशीर झाला. बैठक सुरू झालेली होती. स्वयंसेवकांचा श्रीगुरुजींशी परिचय चाललेला होता. सीतापुरच्या इतर स्वयंसेवकांचा परिचय करून घेण्यापूर्वीच त्यांनी विचारले, ''मी भोलानाथला संघस्थानावर पाहिले होते, यावेळी तो कोठे आहे? का उशीरा येण्याची त्याला सवय लागली आहे?'' इतर स्वयंसेवकांनी सांगितले की, त्याच्या पायाला जखम झालेली असल्याने त्याला त्रास होतोय. तो आता येईलच. अशी होती श्रीगुरुजींची तीव्र स्मरणशक्ती!
- ऍड. भोलानाथ गुप्त
 
संघाच्या हातात मुस्लिम समाजाचे भविष्य सुरक्षित
नागपूरमध्ये इतवारी रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सभासदांची मोठी इच्छा होती की श्रीगुरुजींचे रोटरी क्लबमध्ये भाषण व्हावे. त्यानुसार त्यांना निमंत्रण करण्याची जबाबदारी हसन अली अँड कंपनीचे श्री. मूर्तजा कमालांवर सोपवली गेली. ते मलाही आपल्या बरोबर घेऊन गेले. कारण त्यांना स्वत:ला कार्यालयात जाण्यात संकोच वाटत होता. त्या दिवशी ठरलेल्या वेळी संध्याकाळी चार वाजता आम्ही दोघे कार्यालयात गेलो. निरोप मिळताच श्रीगुरुजी बाहेरील मोठया खोलीत आले. आम्ही दोघे श्रीगुरुजींना प्रणाम करून त्यांच्यासमवेत बसलो.
 
मी श्री. मूर्तजाभाई कमालांची श्रीगुरुजींशी ओळख करून दिली. दुस¬याच क्षणी श्रीगुरुजींनी हसन अली परिवाराच्या जवळ जवळ सर्व जणांची नावे घेतली. हे पाहून श्री. मूर्तजाभाईंच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. त्यांच्या लक्षात आले की, श्रीगुरुजींचा मुसलमान समाजाशी किती जवळचा संबंध आहे. त्यामुळे नंतर मनमोकळेपणाने गप्पोगोष्टी झाल्या.
श्री मूर्तजाभाईंनी भीड न बाळगता श्रीगुरुजींना एक मार्मिक प्रश्न विचारला की, समजा जर नागपूरमध्ये हिंदू-मुसलमान दंगा झाला, तर काय संघ त्यांच्या समाजाच्या महिलांचे, मुलांचे रक्षण करेल? आवश्यकताच पडली तर काय त्यांना संघाच्या कार्यालयात आश्रय देईल?
 
श्रीगुरुजींनी लगेच उत्तर दिले की, होय, अवश्य. स्त्रियांचे रक्षण करणे ही, संघ आपली प्राथमिक जबाबदारी समजतो. त्यामुळे संघ त्यांचे अवश्य रक्षण करील. या विषयासंबंधी आपण निश्चिंत रहा.
श्रीगुरुजींच्या या आश्वासनामुळे आणि थोडयाशाच पण आकर्षून घेणा¬या त्यांच्या सहवासामुळे श्री. मूर्तजाभाई एवढे भारावून गेले की, सायंशाखेच्या प्रार्थनेनंतर कार्यालयात होणा¬या चहापानातही ते आनंदाने सामील झाले. तेथे भेटलेल्या श्री. दत्तोपंत ठेंगडींशी मोकळेपणाने गप्पा मारण्यात ते इतके तल्लीन झाले की, त्यांना वेळेचेही भान राहिले नाही. रात्री अकरा वाजता ते आपल्या घरी गेले.
 
(एक उल्लेखनीय गोष्ट अशी की, श्रीगुरुजींच्या देहावसानानंतर निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत श्री. मूर्तजाभाई सामील झाले होते आणि श्रीगुरुजींच्या पार्थिवाचे दहन होईपर्यंत ते तेथे होते.)
काही दिवसानंतर अमेरिकेचे प्रख्यात वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाइम्स' आणि इंग्लंडचे प्रतिष्ठित दैनिक 'दी गार्डियन'च्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत श्री. मूर्ताजाभाईंनी सांगितले की, 'The fate of Muslims is safe in the hands of R. S. S.' (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात मुस्लिम समाजाचे भवितव्य सुरक्षित आहे.)
- श्री. कासखेडीकर
 
शंकेचे निरसन झाल्याने समाधान
मुंबईचे प्रसिध्द मराठी दैनिक 'नवा काळ'मध्ये श्रीगुरुजींचे 'वर्णाश्रम' विषयावर काही विचार प्रसिध्द झाले होते. जनतेत त्याची विपरीत प्रतिक्रिया उमटली होती. काही लोक तर त्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यास उद्युक्त झाले होते.
त्याच काळात नागपूरच्या गोपालनगर शाखेत एक दलित पण चांगला शिकलेला तरुण नियमित येऊ लागला होता. तोही या घटनेने संभ्रमित झाला. त्याने आपल्या शाखेच्या कार्यवाहाजवळ आपली शंका व्यक्त केली.
कार्यवाहाने त्याला म्हटले की, आपण संघाच्या कार्यालयात जाऊन स्वत: श्रीगुरुजींना आपली शंका विचारा. संघात कोणीही सरसंघचालकांना भेटू शकतो आणि आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारू शकतो. कोणालाही मनाई नाही.
 
दुस¬याच दिवशी शाखेचा कार्यवाह त्या तरुणाला बरोबर घेऊन संघाच्या कार्यालयात गेला. त्यावेळी दुपारच्या चहापानाचा कार्यक्रम चाललेला होता. चहापानानंतर सर्वजण श्रीगुरुजींच्या खोलीत आले. तेथेही काही स्वयंसेवक आधीपासूनच बसलेले होते. सर्वांशी श्रीगुरुजींच्या मनमोकळया गप्पागोष्टी झाल्या. पण तो दलित तरुण मात्र काही बोलला नाही. कार्यवाहाने त्याला नंतर विचारले की, तू आपल्या शंकेचा उल्लेखही केला नाहीस? तेव्हा तो म्हणाला की, मला आता कसली शंका नाही. पूजनीय श्रीगुरुजींचा सर्वांशी चाललेला मनमोकळा संवाद, त्यांचे मनमोकळे हास्य आणि त्यांचा सर्वांशी असलेला आपुलकीचा व प्रेमाचा व्यवहार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझ्या शंकेचे पूर्ण निरसन झाले. माझे पूर्ण समाधान झाले.
- श्री. कासखेडीकर
 
यथार्थ गोष्टीवर नमता कामा नये
गोष्ट तशी जुनी. संघाच्या शाखेशी माझा काहीही संबंध नव्हता. श्रीगुरुजी नागपूरमध्ये लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यावेळी माझे वडील त्या कॉलेजचे प्राचार्य होते. त्या काळातील श्रीगुरुजींच्या संबंधीची विशेष माहिती मला आपल्या वडिलांकडून समजली.
 
विद्यार्थी असताना नियमितपणे वर्गात उपस्थित राहणे हा श्रीगुरुजींचा स्वभाव होता. त्या काळात आपल्या गावी राहूनही, वर्गात आपली उपस्थिती लागेल अशी व्यवस्था करून परीक्षा द्यायची आणि पास व्हायचे ही लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सामान्य गोष्ट होती. परंतु श्रीगुरुजी मात्र वर्गात पहिल्या रांगेत बसून शांत चित्ताने व्याख्यान ऐकत असत. एक प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून आग्रहाने नोटस् लिहवून घेत असत. श्रीगुरुजींना ही गोष्ट पसंत नव्हती. प्राध्यापक मुसलमान होते. वर्गात नोट्स लिहिता कामा नयेत असे श्रीगुरुजींना वाटत असल्यामुळे ते वर्गात येताना आपल्याबरोबर वही पेन आणत नसत. श्रीगुरुजींचा स्वभाव कडक होता. त्यांच्या मते नोट्स घेण्याची गरज नाही, नोट्स घेणे व्यर्थ आहे, नोट्स घेणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. प्राध्यापकाने हा विषय प्रतिष्ठेचा मानला. आणि नोट्स घ्यायच्या नसतील, तर वर्गाच्या बाहेर व्हायला सांगितले. सर्व विद्यार्थांच्यासमोर हा प्रसंग घडला.
 
पुढे हा विषय प्राचार्यांपर्यंत गेला. प्राध्यापकाने तक्रार केली की, माधव (गुरुजी)ला वर्गात येऊ देता कामा नये, नाहीतर ते शिकविणे सोडून देतील, त्याने सर्वांसमोर माझा अपमान केला आहे.
प्राचार्यांनी गुरुजींना वेगळे बोलावून चौकशी केली. गुरुजींनी सांगितले की, माझी अशी समजूत आहे की, ज्या दिवशी प्राध्यापक शिकविण्याच्या दृष्टीने योग्य तयारी करून येत नाहीत त्यावेळी ते विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायला सांगतात. नोट्स घेण्यात निश्चितच वेळ वाया जातो. त्यांचा अपमान करण्याची माझी इच्छा नाही, परंतु मनाने शिकण्याची इच्छा मात्र जरूर आहे. मला त्यांनी त्या विषयातील कोणताही प्रश्न कोणत्याही वेळी विचारावा, जर मी उत्तर देऊ शकलो नाही, तर मी शिक्षण सोडून देईन. माझीपण अशी अट राहील की, जर मी योग्य उत्तर दिले, तर त्यांना शिकविणे सोडून द्यावे लागेल. सर्व विद्यार्थ्यांसमोर मी हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे.
त्यानंतर प्राचार्यांनी प्राध्यापकास वेगळे बोलावून त्यांना आग्रहाने सांगितले की, तो विद्यार्थी प्रतिभाशाली आहे, त्याला डिवचण्यात अर्थ नाही. आपण त्याची अट स्वीकारली तर उगीच अडचणीत याल. आपल्या समक्ष त्याला बोलावून मी योग्य मार्ग काढीन.
 
प्राचार्यांनी दोघांना एकत्र बोलावून समजावून सांगितले. श्रीगुरुजींनी असे म्हटले की, जे काही मी म्हटले ते प्राध्यापकांचा अपमान करण्यासाठी नाही. त्यांना तसे वाटत असेल, तर मी सर्वांसमोर त्यांची क्षमा मागण्यास तयार आहे. परंतु माझा अजूनही आग्रह आहे की नोट्स लिहून देण्यात वेळ वाया घालवू नये. मोकळया मनाने सर्वजण निघून गेले.
पुढे १९७० मध्ये बिहारमधील मुंगेरच्या संघ शिक्षा वर्गात माझी श्रीगुरुजींशी भेट झाली असता, त्यांच्यापाशी मी या घटनेचा उल्लेख केल्यावर त्यांनी स्मित हास्य केले आणि ते मला म्हणाले की, ही गोष्ट तुला वडिलांनी सांगितलेली दिसते. मी होकार दिला.
 
नंतर या प्रसंगाचा विचार केल्यावर मला वाटले की, या पूर्वी या संबंधीच्या गोष्टीची त्यांनी कुणाबरोबर चर्चा केली नसावी. तशी आवश्यकताही त्यांना वाटली नसावी. ते आपल्यासंबंधी फार थोडे बोलत असत. 'मैं नही तू ही' हे त्यांचे बोधवाक्य होते. म्हणून मुंगेरच्या संघ शिक्षा वर्गातील त्यांच्या भेटीत जेव्हा मी या घटनेचा उल्लेख केला तेव्हा त्यासंबंधी विस्तारपूर्वक काही सांगण्याचे त्यांनी टाळले.
- म. गो. देव
 
संपत्तीच्या विषयासंबंधी संघाची भूमिका
आर्थिक क्षेत्रासंबंधीच्या एका चर्चेत श्री. हीरेन मुखर्जी मला म्हणाले की, जर कधी तुम्हा संघवाल्यांचे सरकार या देशात आले, तर काशीचे पंडे आणि भांडवलदारांचे राज्यच दिल्लीवर होईल. तुम्ही धर्माचे नाव घेता पण तुम्हाला धर्म काय आहे, हे माहीत नाही. माझे हीरेन बाबूंशी खूप चांगले संबंध आहेत. मी त्यांना आपल्या वडील भावासारखा मानतो. हिंदू धर्मशास्त्रासंबंधी त्यांना माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे हे मान्य करण्यात मला संकोच नाही. ते मला म्हणाले की, धर्मात जे सांगितलेले नाही, ते आपण करता.
 
श्रीगुरुजी नेहमी आपल्या भाषणात साम्यवाद आणि समाजवादाला कडाडून विरोध करत असत. त्यामुळे या डाव्या लोकांना असे वाटे की, श्रीगुरुजी भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत. पण वास्तविक ते कधीही भांडवलशाहीचे पुरस्कर्ते नव्हते. कारण समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही या तिघांचाही जन्म भौतिकवादातून झाला आहे, हाच या तिघांचा आधार आहे. जीवनाचा व्यक्तिकेंद्रित विचार करणा¬या आणि दुस¬यांच्या शोषणावर आधारित असलेल्या भांडवलशाहीला, श्रीगुरुजींचा विरोध होता.
एकदा संपत्तीच्या विषयासंबंधी संघाची भूमिका स्पष्ट करताना मी हीरेन बाबूंना पुढील श्लोक ऐकवला -
''यावत् म्रियते जठरं, तावत् स्वत्वं हि देहिनाम्।
अधिकं योऽभिमन्येत, स स्तेनो दण्डमर्हति॥''
''आपल्या शरीराला जेवढे आवश्यक असेल तेवढेच भोजन केले पाहिजे. तेवढीच संपत्ती घेण्याचा व संग्रह करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. अधिकाची इच्छा धरणारा चोर आहे आणि म्हणून शिक्षेस पात्र आहे.'' हे ऐकताच हीरेनबाबूंनी मला विचारले, ''काय, हेच तुमच्या श्रीगुरुजींचे मत आहे?'' मी म्हणालो, ''होय, त्यांनीच आम्हाला हे सांगितले आहे.'' यावर हीरेन बाबू म्हणाले, ''क्षमा करा, माझ्या मनात आपल्या गुरुजींविषयी जी धारणा होती, तिच्याशी हा विचार सुसंगत नाही. त्यांच्या विषयी आमचा जो चुकीचा समज होता तो बदलावा लागेल.''
- दत्तोपंत ठेंगडी
 
झोप कशी कमी होईल?
सन १९५४ मध्ये सिंदीमध्ये प्रचारकांचा एक वर्ग झाला. वर्गाचा समारोप झाल्यावर आम्ही कर्नाटकातील प्रचारक श्रीगुरुजींना भेटावयास गेलो. तेथे एक दुसरे प्रचारक बसले होते. ते सांगत होते की, ते रात्री जेवण करत नाहीत. श्रीगुरुजींनी त्याचे कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की, एक तर ते रात्री वाचन करतात आणि दुसरे म्हणजे रात्रीच्या बैठकीत झोप येऊ नये म्हणून ते जेवण करत नाहीत.
 
यावर श्रीगुरुजींनी म्हटले, ''झोप येते म्हणून जेवण न करण्याची आवश्यकता नाही.''
प्रचारक - ''जेवण केल्यावर लगेचच झोप येते.''
मी श्रीगुरुजींना विचारले, ''किती वाजता झोपले पाहिजे?''
श्री गुरुजी - ''आपल्या कार्यकर्त्यांनी रात्री बारा वाजता झोपले पाहिजे आणि सकाळी चार वाजता उठले पाहिजे.''
माझा पुढचा प्रश्न होता की, ''इतकी झोप कमी नाही का?''
श्रीगुरुजी - ''दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेतली पाहिजे. झोप आली तर झोपायचे नाही तर पडून रहायचे. या रिलॅक्सेशनचा चांगला लाभ होतो. मी नंतर विचारले, ''झोप कमी कशी करता येईल?'' श्रीगुरुजींनी सांगितले की, ''सकाळी उठल्यावर मुखमार्जन करून मांडी घालून बसले पाहिजे आणि 10 मिनिटात 10 - 15 वेळा दीर्घ श्वसन केले पाहिजे. यात पूरक - रेचक करायचे, कुंभकाची आवश्यकता नाही. यामुळे झोप कमी होते.''
 
मी विचारले, ''श्वास आणि झोप यांचा काय संबंध आहे?''
श्रीगुरुजी - ''दिवसभराच्या शारीरिक हालचालींमुळे शरीरात 'टॉक्सिन्स'ची विषबीजे गोळा होतात. यामुळे झोप येते. झोपेत श्वासोच्छवास नियमित झाल्यामुळे ऑक्सिजनची पूर्ती होते आणि 'टॉक्सिन्स' नष्ट होतात. शरीर ताजेतवाने होते. दीर्घ श्वसनामुळे रक्तात 'ऑक्सिजन'चा संग्रह होतो आणि त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात रक्तात निर्माण होणारे 'टॉक्सिन्स' ऑक्सिजनमुळे नष्ट होतात. यामुळे झोप कमी होते. आणि दिवसभर शरीर ताजेतवाने राहते.''
माझा यापुढचा प्रश्न होता की, ''केवळ एवढयाने झोप कमी होते?''
श्रीगुरुजींनी म्हटले, ''दीर्घश्वसन व रिलॅक्सेशन'मुळे झोप नियंत्रणात येते. रिलॅक्सेशनचा अर्थ आहे, न हलता डुलता पडून राहणे, सर्व अवयव ढिले सोडून पडून राहणे..... ''
- बाबूराव देसाई
 
नाडी परीक्षा
सन् १९७० ची घटना आहे. माझी पत्त्नी आजारी होती. तिच्यावर उपचार चालू होते. मला वाटत होते की, डॉक्टरांना आजाराचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.
 
तामिळनाडूच्या प्रवासात श्रीगुरुजी चेन्नई (मद्रास)ला आले. ते माझ्या घरीच उतरले. घरी येताच ते सरळ माझ्या पत्त्नीला पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेले. त्यांनी काळजीपूर्वक नाडी-परीक्षा केली. मग बाहेरच्या खोलीत येऊन ते म्हणाले की, त्यांना रक्त दिले पाहिजे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे.
 
श्रीगुरुजींच्या सूचनेप्रमाणे तिला रक्त दिले गेले. काही महिन्यानंतर विशेष त्रास न होता माझ्या पत्त्नीचा मृत्यू झाला. मला असे वाटले की, श्रीगुरुजींना तिच्या मृत्यूचा संकेत मिळाला असावा.
- एम. नंजप्पा
 
हुडतूतू
कार्यकर्त्यांची बैठक चालली होती. श्रीगुरुजी शाखेवर चालणा¬या कार्यक्रमांसंबंधी विचारपूस करत होते. एका स्वयंसेवकाने म्हटले, 'कबड्डी'. जेव्हा दुस¬याला विचारले तेव्हा त्याने म्हटले की, 'हुडतूतू'. हा अपरिचित शब्द ऐकताच सर्व स्वयंसेवक हसू लागले.
 
यावर श्रीगुरुजी म्हणाले की, कबड्डीपेक्षा हुडतूतू अधिक योग्य आहे, हुतूतू नव्हे. इंग्रजी लिखाणाचा परिणाम म्हणून हुतूतू प्रचलित झाला. हुड हा संस्कृत धातु आहे. त्याचा अर्थ आहे पाठलाग करणे, टु चेज, टु हन्ट.
- माधवराव
 
घराची रचना कशी असावी
कर्नाटक प्रांताचे प्रांत कार्यालय 'केशव कृपा' जेव्हा बंगलोरमध्ये उभारले गेले तेव्हा श्रीगुरुजी तेथे आले होते. श्रीगुरुजींनी इमारतीचे अंतर्बाह्य निरीक्षण केल्यावर शिल्पविषयक ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला गृह-निर्माणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटल्या. त्यांनी म्हटले की, घर बांधताना आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे? बाह्य सौंदर्याला, दिखाऊपणाला का उपयुक्ततेला? जेव्हा आपण घराचे नकाशे बनवतो, आणि घरे बांधतो तेव्हा या गोष्टीचा अवश्य विचार केला पाहिजे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या धुंदीत आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. आपल्या या नव्या घरांमध्ये मोठी सुव्यवस्था असते. इतकी की, पादत्राणांसाठीही लंबाचौडा कोनाडा बनविला जातो, पण आत देवघरासाठी जागा नसते. जर श्रध्दाळू गृहिणीला आठवण आलीच, तर तळात एखादा कोपरा देवाच्या मूर्तीला मिळतो. बहुतेक अशा घरात रोज पूजाही होत नाही. केव्हातरी गृहिणी नमस्कार करते. बस एवढीच पूजा!
 
नंतर त्यांनी स्वयंपाकघरासंबंधी आपले विचार प्रकट केले. आजकाल आपले स्वयंपाकघरही पाश्चात्यांच्या स्वयंपाकघरासारखे असते. तेथेही तसेच ओंगळ अनुकरण दिसते. स्वयंपाक घराची रचना करताना भारतीय वेषभूषा, विशेषत: स्त्रियांची वेषभूषा आणि आपल्या जेवणात जे अनेकविध पदार्थ राहतात, त्यांचा बहुधा कोणताही विचार केला जात नाही. एकतर त्यांच्या स्त्रिया फ्रॉक्स घालतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक खाण्याचे तयार पदार्थ बाजारातून घरी आणून खातात. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकघरात बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ गरम करणे एवढेच प्रमुख काम असते. त्यामुळे उभ्या उभ्याने स्वयंपाक करणे त्यांच्यासाठी ठीक आहे. आपल्याप्रमाणे त्या बसूही शकत नाहीत. परंतु आपल्याकडची गोष्ट निराळी आहे. आपल्याकडील स्त्रिया सकाळपासून दुपारपर्यंत अनेक पदार्थ तयार करत असतात, अशा स्थितीत इतका वेळ उभे राहणे त्रासदायक आहे. आज भारतीय माणूस प्रत्येक गोष्टीत दुस¬याचे अनुकरण करतो. परंतु जोपर्यंत त्याच्या जिभेत चव आहे तोपर्यंत त्याच्या जेवणात बदल व्हायचा नाही.
- श्रीनिवास लोखंडे
 
मानवसेवा ही ईश्वरसेवा
'विवेकानंद केंद्र पत्रिके'साठी श्री. एकनाथजी रानडे यांच्या समवेत मी श्रीगुरुजींकडे गेलो होतो. पत्रिकेच्या पहिल्या पानावर लिहिलेले होते 'सर्व्ह मॅन, सर्व्ह गॉड'. श्रीगुरुजींनी इंग्लीश कवी 'हंट'च्या 'अबू बिन आदम' नावाच्या कवितेच्या काही पाठ केलेल्या ओळी आम्हाला म्हणून दाखवल्या. त्या ओळी पत्रिकेचा मथळा असलेल्या वाक्याला अनुरुप होत्या. त्या कवितेचा सारांश अशा प्रकारचा आहे -
 
एका प्रशांत रात्री स्वप्न - सृष्टीतून जागे होताना अबू बेन अदमला दिसले की, चंद्र प्रकाशाच्या उज्ज्वलेहून अधिक चमकणारा एक देवदूत आपल्या सुवर्ण पृष्ठांच्या ग्रंथात काही लिहित आहे. शांत आणि प्रसन्न वातावरणात थोडया धिटाईने अबू बेन अदमने विनम्रतेने विचारले की, आपण काय लिहिता आहात? देवदूताने आपली मान वर करून त्याच्याकडे स्नेहाने पाहिले आणि म्हटले की, ईश्वरावर प्रगाढ प्रेम करणा¬या भक्तांची नावे लिहितोय. अबूने विचारले की, माझे नाव त्यात असेल? देवदूत म्हणाला की, इतक्यात नाही. अबूने अत्यंत नम्रतेने प्रसन्नतापूर्वक प्रार्थना केली की, मनुष्यजातीवर प्रेम करणा¬यांपैकी मी एक आहे असे कृपा करून माझ्या बाबतीत लिहावे.
 
देवदूताने काही लिहिले व तो अंतर्धान पावला. दुस¬या दिवशी रात्री तो पुन्हा प्रकट झाला. त्याने दिव्य प्रकाशात, ईश्वराने ज्यांना आशीर्वाद दिला होता त्या माणसांची ती नावे दाखवली. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यामध्ये सर्वात पहिले नाव होते अबू बेन अदमचे
- प्र. वासवानी
 
शुध्द उच्चारांचा आग्रह
इंदोरमध्ये अरविंद जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीगुरुजींच्या भाषणानंतर मला 'वंदेमातरम्' गीत गायचे होते. ही गोष्ट श्रीगुरुजींना समजल्यावर त्यांनी मला जवळ बोलावून विचारले की, 'वंदेमातरम्' पूर्ण म्हणणार का केवळ त्याची दोन कडवी?' मी म्हणाले की, पूर्ण गीत. तेव्हा त्यांनी गीताच्या काही बंगाली शब्दांच्या नीट उच्चारासाठी ते माझ्याकडून म्हणवून घेतले तसेच बंगाली शब्दांच्या शुध्द उच्चाराकडे नीट लक्ष देण्याची सूचना केली.
- कु. दीपा सुधाकर मुळये
 
तामिळ आणि संस्कृत
सन् १९७२ ची घटना आहे. केरळच्या प्रवासास जाताना श्रीगुरुजी एक दिवस चेन्नई (मद्रास)ला उतरले होते. त्यांचा मुक्काम संघचालकांकडे होता. जेवताना 'द्रविड मुन्नेत्र कळघम्'चा तामिळ भाषेसंबंधी जो प्रचार चालला होता त्यासंबंधी अनौपचारिक चर्चा सुरू झाली. तामिळ स्वयंपूर्ण भाषा आहे, त्यामुळे संस्कृतचा आधार घेण्याची आवश्यकता नाही. अशा प्रचाराचा उल्लेख होताच कोणीतरी म्हटले की, पिण्याच्या पाण्यासाठी संस्कृत 'जलम्' शब्दाचा प्रयोग तर सर्वजण करतात.
श्रीगुरुजी म्हणाले, '''जलम्' संस्कृत शब्द आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती त्याचा अर्थ समजते. त्याचप्रमाणे शिजलेल्या तांदुळासाठी 'अन्नम्' शब्दही तामिळमध्ये आहे. तोही संस्कृतचा आहे.''
कोणीतरी म्हटले, ''अन्नम् शब्दाचा प्रयोग केवळ ब्राह्मण कुटुंबामध्येच होतो. सामान्य तामिळ कुटुंबात तो प्रचलित नाही.''
श्रीगुरुजी - ''मग, ते 'अन्नम्'साठी कोणत्या शब्दाचा उपयोग करतात?''
'श्री. ........... - ''चोरू.''
श्रीगुरुजी - ''आपल्याला असे वाटते का की, 'चोरू' शब्द शुध्द तामिळ आहे आणि त्याचा संस्कृतशी काही संबंध नाही?''
श्री. ........... ''मला असे वाटते की तो शुध्द तामिळ शब्द आहे.''
श्रीगुरुजी - ''आपली माहिती ठीक नाही. तो मूळ संस्कृत शब्द आहे. वैदिक साहित्यात त्याचा उल्लेख आहे. 'चरू' म्हणजे यज्ञात हवन करण्यासाठी शिजवलेले अन्न.'' श्रीगुरुजींचे संस्कृत तसेच वैदिक साहित्य विषयक ज्ञान पाहून आम्ही सर्वजण अवाक् झालो. मी विनोदाने म्हणालो की, तर संस्कृतपेक्षा तामिळ अधिक प्राचीन आहे आणि तामिळचे शब्द वैदिक साहित्यात उधार घेतले गेले आहेत असा 'द्रविड मुन्नेत्र कळघम्'वाले प्रचार करतील.
श्रीगुरुजी आणि अन्य सर्व खळखळून हसले.
- के. कृष्णमूर्ती
 
श्रीगुरुजी - एक शास्त्रज्ञ
मी मध्य भारतात प्रचारक होतो. त्या काळात मी मालवामध्ये एक नवीन परंतु पुराण वस्तु संशोधन शास्त्राच्या (ऑर्किऑलॉजिकली) दृष्टीने अति प्राचीन संस्कृतीचे अवशेष शोधले होते. धार नगराच्याजवळ नेपावलीत मला मातीची अशी भांडी मिळाली, जी हडप्पा, मोहन-जोदडो सारखी होती. मी हा शोध १९४५-४६ मध्ये लावला होता. त्यावेळी मी धार विभागाचा प्रचारक होतो. मला धारहून केसूरला जाण्यासाठी सायकलने किंवा कच्च्या रस्त्याने जाताना नेपावली गावाजवळ एका उंचवटयावरून जावे लागत असे. तेथेच मला ती भांडी मिळाली होती. रतलाम जिल्ह्यात काम करताना नागदा, गंगाधार, जावरा, धडावदामध्ये अशी भांडी मिळाली होती. मी या शोधांवर लेखही लिहित असे आणि कधी कधी श्रीगुरुजींशी चर्चाही करत असे. श्रीगुरुजी मला थट्टेने म्हणत, ''तू तर जी संख्या मनात येईल ती सांगत असतोस. तू म्हणालास ही वस्तू दहा हजार वर्षांची आहे तर आम्ही 'हो' म्हणू. तू जर म्हणशील एक लाख वर्षांची आहे तरी देखील आम्ही 'हो'च म्हणू.'' कधी कधी चर्चा आणि बौध्दिकमध्येही श्रीगुरुजी माझ्या कार्याचा उल्लेख करत असत.
 
जेव्हा मी कायथाची प्राचीनतम संस्कृती शोधली तेव्हा त्यांनी माझ्याशी त्या विषयासंबंधी खूप चर्चा केली. कायथाची संस्कृती मोहेन-जोदडोच्या समकालीन आहे. कार्बन-१४ कालमान पध्दतीने हे निश्चित झाले आहे. १९६१ मध्ये अमेरिकन सरकारने मला उत्तर अमेरिकेच्या कोलंबसपूर्व प्रागैतिहासिक कालाच्या सर्वेक्षणासाठी बोलावले. जाण्यापूर्वी मी श्रीगुरुजींना भेटण्यासाठी नागपूरला आलो. त्यांनी मला सांगितले की, मी कार्बन-१४ कालनिर्णय पध्दतीवर विचार केला आहे आणि मला वाटते की, याच्या मापन पध्दतीत काहीतरी मूलभूत चूक आहे. यामुळेच या पध्दतीने मिळालेला भारतीय अवशेषांचा काळ बराचसा अर्वाचीन येतो. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार तो अधिक प्राचीन यायला हवा.''
 
श्रीगुरुजी पुढे म्हणाले, ''मी यावर विचार केला की असे का? पुराणात राजा संवरणाच्या काळी १२ वर्षे दुष्काळ पडला होता. असे होऊ शकते की, संपूर्ण सूर्य मंडळात कोणत्या तरी भयानक स्थित्यंतरामुळे सूर्यापेक्षा अधिक रेडिओधर्मी ऊर्जेचे प्रेक्षपण झाले असावे आणि त्यामुळे येथील रेडिओधर्मी कार्बनवर परिणाम झाला असावा. तुमची जेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांशी चर्चा होईल तेव्हा त्यांच्याशी या संबंधी अवश्य बोलले पाहिजे.''
 
मी श्रीगुरुजींना आश्वासन देऊन निघून गेलो. १९६१ च्या सप्टेंबर महिन्यात मी फिलाडेल्फिया विद्यापीठात कालनिर्णायक प्रयोगशाळेच्या प्रमुख श्रीमती एलिझाबेथ राल्फ यांना भेटायला गेलो. त्यांची भेट झाली नाही, पण त्यांच्या अन्य सहका¬यांसमवेत भारतीय कालनिर्णयाची चर्चा केली तसेच पौराणिक काळाची प्राचीनता आणि कार्बन-१४ च्या पध्दतीच्या अर्वाचीन कालगणनेचा उल्लेख करून मी म्हटले की, कुठेतरी कार्बन-१४ च्या कालगणनेत मूलभूत चूक आहे. त्यामुळेच ती पध्दती कालनिर्णय अर्वाचीन काळ दाखवते. त्यांनी म्हटले की, आपली ट्रेडिशनल डेटस (परंपरागत कालनिर्णय पध्दती) चूक आहे. आमचे काम वैज्ञानिक आहे, त्यात चूक होणार नाही. मी त्यांना धार्मिक कार्य करण्यापूर्वी जो संकल्प म्हटला जातो त्यात सृष्टी संवत, वैवस्वत मन्वंतर, श्वेत वाराह कल्प, कलियुगाचे प्रथम चरण, विक्रम शकाब्द मास तिथी घटना इ. उल्लेखांचा परिचय करून दिला. आणि म्हटले की, त्याचा उल्लेख आम्ही हजारो वर्षांपासून करत आलो आहोत. आम्ही वैदिक वाङ्मयही आहे तसे सुरक्षित ठेवले आहे. म्हणून आमची गणना चुकीची होऊ शकत नाही. पुरेशी चर्चा होऊनही कोणताही मार्ग निघाला नाही. श्रीगुरुजींनी निर्देशित केलेल्या रेडिओधर्मी शक्तीच्या पृथ्वीवरील फॉल आउटचा उल्लेखही मी केला. परंतु त्यांनी ते मान्य केले नाही आणि आमची चर्चा सहमती न होता संपली.
 
मी काही दिवसांनी एरिझोनामध्ये टयूसान नगरात गेलो. तेथे वृक्षांमध्ये उगवणा¬या वार्षिक वलयांच्या गणनेच्या आधाराने वृक्षांचा कालनिर्णय करण्याची पध्दती; ज्याला डेडोक्रोनॉलॉजी म्हणतात, विकसित केली गेली आहे. त्या पध्दतीने एरिझोनाच्या वाळवंटात होणा¬या स्प्रूसट नावाच्या वृक्षाचा, जो दीर्घकाळ जिवंत राहतो, अभ्यास केलेला आहे. तसेच गेल्या सात हजार वर्षांपर्यंत जलवायुच्या परिवर्तना (पुराजल वायु)चा अभ्यास केला गेला आहे. तेथे तीन हजार वर्षांपूर्वी जन्मलेला आणि आजही जिवंत असलेला एक वृक्ष आहे. आणि असाही एक वृक्ष आहे जो तीन हजार वर्षांपूर्वी नष्ट झाला होता, पण त्याच्या पूर्वी तो चार हजार वर्ष जिवंत होता. या वृक्षांच्या केंद्र - मध्य - बाहेरील वलयातून लाकूड काढून त्याचा कालनिर्णय कार्बन-१४ कालमान पध्दतीने काढला गेला. डेडो क्रोनॉलॉजी कालगणना व कार्बन-१४ ची कालगणना यात आठशे वर्षांचे अंतर पडलेले दिसले. तसेच कार्बन पध्दती अर्वाचीन काळ दर्शवते हे निश्चित झाले. तेथील डायरेक्टरशी जेव्हा मी कार्बन-१४ पध्दतीच्या विषयासंबंधी बोललो तेव्हा त्यांनी म्हटले की, इट इज ऑल हम्बग. (ते सर्व थापा आहेत.) चर्चेत त्यांनी कार्बन-१४ कालगणना पध्दतीच्या चुका सांगितल्या.
 
भारतात परतल्यानंतर सहा महिन्यांनी मला एलिझाबेथ राल्फचा 'फ्लॉ इन द रेडिओ कार्बन डेटस्' नावाचा एक लेख मिळाला. त्यात डेडोक्रोनॉलॉजी, इजिप्तच्या कालगणनेची प्राचीनता व कार्बन-१४ कालगणनेची अर्वाचीनता यांची चर्चा केलेली होती, तसेच खगोलशास्त्राच्या आधाराने एक नवीन कोष्टक पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी दिलेले होते. यामुळे तीन हजार वर्षांमध्ये तीनशे ते चारशे वर्षे पूर्वपर्यंत मिळविणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. फरकाच्या कारणाचा शोध सुरू आहे, तसेच काल सुधार कोष्टके दिलेली आहेत. हे सर्व मिळाल्यावर मी नागपूरला जाऊन श्रीगुरुजींशी चर्चा केली आणि म्हटले की, आपला विचार शास्त्रीय होता तसेच प्रत्यक्ष परिणामाचा उल्लेख भलेही त्या वरील लेखात नसेल पण त्याचा परिणाम म्हणून कालमानात प्राचीनता आणण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. श्रीगुरुजींना फार मोठा आनंद झाला. ते म्हणाले की, अशा प्रसंगांचे पुराणात दोनदा वर्णन केलेले आहे आणि असे होऊ शकते की या दोन महाभयानक दुष्काळांचे कारण व कालनिर्णयही ठीक येतील.
श्रीगुरुजींच्या शास्त्रीय विश्लेषण शक्तीचे हे उदाहरण आणि त्यांची झेप पाहून मी हतबुध्द झालो.
- डॉ. वि. श्री. वाकणकर