आद्य शिशुस्वयंसेवक
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
डॉ. हेडगेवार भवनातल्या सभागृहात स्वयंसेवकापुढे डॉक्टरांच्या आठवणी सांगण्यासाठी मला संघ शाखेतर्फे बोलावण्यात आले. मी निमंत्रण स्वीकारले तेव्हा श्रीगुरूजी दौऱ्यावर होते. माझ्या या कार्यक्रमाच्या दिवशीच ते दुपारी नागपुरात आले होते. मला याची कल्पना नव्हती. ऐन वेळी कार्यक्रमाच्या जागी पोहोचल्यावर पाहतो तर श्रीगुरूजी समोर बसलेले दिसले. आपल्या व्याख्यानाला श्रीगुरूजी उपस्थित असलेले पाहून एरवी मी चपापलो नसतो. कित्येक वर्षांपासून त्यांच्या खासगी बैठकीत असून निरनिराळया विषयासंबंधी गप्पागोष्टी करण्याचा सराव असल्याने, माझी काही भाषणे त्यांना रूचल्याने, सभेतील श्रोतृवर्गात त्यांची उपस्थिती पाहून चपापण्याइतका कातरपणा माझ्या मनात उरला नव्हता. पण आज मात्र विपरित अनुभव आला. याचे कारण प्रत्यक्ष श्रीगुरूजींना ऐकवाव्यात अशा डॉक्टर हेडगेवारांच्या कोणत्या आठवणी सांगाव्यात हा यक्षप्रश्न माझ्यापुढे एकदम उभा झाला. मनातली धडधड तत्काळ सावरून मी बोलण्याच्या विषयाचा विचार करण्याच्या मन:स्थितीत आलो. वैयक्तित गीत चालू होते. तेवढया वेळेत श्रीगुरूजींनाही ठाऊक नसतील अशा आपल्या अगदी वैयक्तिक आठवणी स्मृतीत गोळा केल्या आणि ''परमपूज्य श्रीगुरूजी, अन्य अधिकारी आणि स्वयंसेवक बंधुनो,'' म्हणून पहिले वाक्य मी उच्चारले, ''मी संघाचा आद्य शिशुस्वयंसेवक आहे, ही गोष्ट येथे उपस्थित असलेल्या कोणालाही ठाऊक नसावी असे मी समजतो !'' हे वाक्य उच्चारताना मी श्रीगुरूजींच्या मुद्रेवरील प्रतिक्रिया न्याहाळत होतो. त्यांचे नेत्र किंचित विस्फारले आणि मुखमुद्रा सस्मित दिसली. मग मी स्वत: संघाचा 'आद्य' शिशुस्वयंसेवक कसा झालो व त्या वेळी (माझ्या वयाच्या आठव्या वर्षी इ.स. 1927 च्या हिवाळयात) मी डॉक्टरांशी आयुष्यात पहिल्यांदा काय बोललो इत्यादी माहिती सांगितली.
मोहिते वाडयाच्या खंडारात प्रथमच पाहिलेल्या त्या लाठीकाठीच्या वर्गाने मला फारच आकृष्ट केले. मी रोज त्या मुलांबरोबर मोहिते वाडयाकडे जात असे. तीन वर्षांपूर्वी ''म्युनिसिपालिटीच्या प्रायमरी शाळेत माझे नाव टाकण्यात आले होते. तसे या 'संघ' नावाच्या व्यायामशाळेतही नाव टाकता आले तर बरे, असे वाटून एका आठवडयातच एके दिवशी प्रार्थना आटोपल्यानंतर किशोरांच्या घोळक्यात हास्यविनोद करीत उभे असलेल्या डॉक्टरांच्या जवळ जाऊन ''मला संघात नाव टाकायचं आहे'' हे वाक्य मी वचकून उच्चारले तेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले, ''हे सर्वजण तुझ्यापेक्षा मोठे आहेत ना ? तू अजून लहान आहेस. थोडा मोठा झालास म्हणजे तुझे नाव संघात टाकू!''
डॉक्टरांच्या या वाक्याने मी खट्टू झालो, पण मोहिते वाडयात (त्या काळी 'संघस्थान' हा शब्द परिचित व्हायचा होता) जाणे बंद झाले नव्हते. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांनी पुनश्च ''मला संघात नाव टाकायचं आहे.'' हे वाक्य मी डॉक्टरांपुढे उच्चारले, त्यावर पुन्हा माझ्या डोक्यावर होत ठेवून ते म्हणाले - ''अरे! तू पुन्हा आलास! तुझ्या वयाची दहा मुलं तू येऊन ये. म्हणजे लहान मुलांचा वर्ग सुरू करू !''