श्रीगुरुजी अत्यंत प्रसिध्दी पराङ्मुख होते. १९४८ च्या सत्याग्रहानंतर जेव्हा ते तुरुंगातून सुटून आले तेव्हा त्यांचा सर्व प्रांतांचा प्रवास झाला. जेव्हा ते दिल्लीच्या रामलीला मैदानावरील कार्यक्रमास आले आणि बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा वृत्तपत्रांचे छायाचित्रकार त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी आतुर होते. त्या छायाचित्रकारांनी छायाचित्र काढण्याची तयारी केली मात्र, श्रीगुरुजींनी आपल्या खांद्यावरील पंचाने आपला चेहरा झाकून घेतला. त्यामुळे वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना त्यांचे एकही छायाचित्र घेता आले नाही. दुस¬या दिवशी सकाळी दिल्ली स्टेशनवरून श्रीगुरुजींचा पुढचा प्रवास होता. आम्ही काही जण त्यांना निरोप देण्यासाठी स्टेशनवर गेलो होतो. इतक्यात इंग्लीश साप्ताहिक 'ऑर्गनायझर'चे तत्कालीन संपादक श्री. केवलराम मलकानी श्रीगुरुजींच्या अगदी जवळ जाऊन त्यांना म्हणाले की, आपली परवानगी असेल तर एक प्रश्न विचारतो. श्रीगुरुजींनी म्हटले की, विचारा. मलकानी म्हणाले की, मी काल छायाचित्रकाराला विनंती करून छायाचित्र घेण्यासाठी बोलावले होते, पण आपण चेहरा झाकून घेऊन छायाचित्र घेऊ दिले नाही. श्रीगुरुजी हसले आणि म्हणाले की, मी तुमचा सरसंघचालक आहे ना! फोटो काढल्याने तुमच्या सरसंघचालकाचे आयुष्य एक वर्षाने कमी होते. तरी तुम्हाला फोटा काढायचा असेल तर काढा. एवढे ऐकल्यावर कोणी काहीही बोलू शकले नाही.
- श्री. बापूराव
श्रीगुरुजींचा सिंहगडावर मुक्काम
१९५२ मध्ये पहिल्याच सार्वजनिक निवडणुकीच्या वेळी निवडणूक मोहिमेच्या कोलाहलापासून दूर, एकांतवासात मुक्काम करण्याचे श्रीगुरुजींनी ठरविले. सिंहगडच्या परिसरात लोकमान्य टिळकांच्या बंगल्यावर व्यवस्था झाली. श्रीगुरुजींच्या या मुक्कामाची फार थोडयांना माहिती असल्याने तेथे त्यांना निवांतपणे राहणे शक्य होते.
श्रीगुरुजींचा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला असे. पहाटे उठायचे. प्रातर्विधी आटोपून चहापान. थोडासा जवळपास फेरफटका. त्यानंतर सूर्य नमस्कार व योगासनांचा अभ्यास. श्रीगुरुजी प्रत्येक योगासन शास्त्रशुध्द रीतीने करत असत. पहिल्या संघबंदीच्या वेळी तुरुंगात त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते, त्यांना श्रीगुरुजींनी शास्त्रोक्त योगासन क्रिया आणि त्यामुळे शरीर - मन - बुध्दीवर होणा¬या परिणामांची सविस्तर माहिती दिली होती.
योगासने झाल्यावर स्नान, थोडा वेळ विश्रांती आणि वाचन. नंतर चहापान. दुपारी चार-साडेचार वाजता तेथे जे व्यवस्थेत असत त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी वाचन होई. श्रीगुरुजींच्या वाचनाची अशी शैली होती की, ऐकणा¬याला ऐकता ऐकता सहजपणे अर्थाचा बोध होत असे. एखादा शब्द किंवा शब्द-रचना अवघड असेल तर श्रीगुरुजी त्याचे स्पष्टीकरणही देत. स्पष्टीकरण देताना श्रीगुरुजी पौराणिक संदर्भ सांगत असत. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत ते सिंहगडाच्या परिसरात हिंडत असत, संपूर्ण तटबंदी इ. न्याहाळत असत. मनोमन चिंतन चालतच असे. समाजाची स्थिती, सरकारी व्यवस्थेची क्षमता, भग्न देऊळ, विद्यार्थी सिंहगड पहायला येत पण त्याचे छिन्न भिन्न अवशेष पाहूनही त्यांच्या मनाला वेदना झाल्याचे न जाणवणे, गडाची योग्य ती देखरेख करण्याच्या व्यवस्थेत असलेली त्रुटी अशा सर्व गोष्टींचा विचार चालत असे.
गडाच्या व्यवस्थेसाठी जे सेवक नेमलेले होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी होत असत. त्यांच्याकडून समजले की, गडाची दुरुस्ती करण्याच्या हेतूने दरवर्षी एक दोन सद़्गृहस्थ गडाची पाहणी करण्यास येत असत, परंतु आवश्यक पैसा मिळत नव्हता. संबंधित शासकीय विभाग प्रमुखाला सांगूनही तो दुर्लक्ष करत असे. ह्याच्या विपरीत प्रतापगडावर अफझलखानाच्या दर्ग्याची व्यवस्था उत्तम आहे. कुठे काही कमी पडले तर केंद्रीय मंत्र्याकडून सूचना मिळे तसेच पैशाचीही व्यवस्था होत असे. प्रतापगडावर श्री शिवछत्रपती जिची पूजा करत असत त्या जगन्माता देवीच्या मंदिराचे महत्त्व कमी आहे परंतु दर्ग्याला मात्र महत्त्वपूर्ण मानले आहे.
सिंहगडावर गडाच्या जवळ असलेल्या गावातील लोक येत असतात. श्रीगुरुजी त्यांच्याशी सहानुभूतीने बोलत असत, तसेच त्यांच्या परिश्रम करण्याच्या क्षमतेची प्रशंसा करत असत.
- डॉ. आबाजी थत्ते
जेव्हा मानपत्र भेट दिले गेले
''सार्वजनिक समारंभ आणि सत्कारासारख्या कार्यक्रमांची त्यांना इतकी नावड आहे की...'' नागपूरहून आलेल्या पत्रात हे शब्द होते. श्रीगुरुजी अल्मोडा येथे येणार आहेत. या बातमीमुळे अल्मोडा नगरच्या लोकांना ६५ वर्षापूर्वीचे चित्र आठवले. त्या वेळी अल्मोडावासीयांनी स्वामी विवेकानंदांचा अभूतपूर्व सत्कार केला होता. १९६४ मध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. गोळवलकर यांचा सत्कार करून अल्मोडाच्या लोकांना त्याची पुनरावृत्ती करायची होती. नैनीतालचे तत्कालीन जिल्हा प्रचारक श्री. मथुरा दत्त पांडे अल्मोडयास आले आणि तीन-चार दिवस तेथे राहिले. श्री. मथुरा दत्त पांडे यांनी अल्मोडा नगरपालिकेचे रीतसर निमंत्रण मा. बॅ. नरेंद्रजित सिंह यांच्या शिफारसीसह नागपूरला पाठवले होते. यामध्ये श्रीगुरुजी अल्मोडा येथे आल्यानंतर त्यांचा सार्वजनिक सत्कार करण्याची अनुमती मागितली होती. श्रीगुरुजींच्या प्रसिध्दी पराङ्मुख प्रकृतीचा उल्लेख करून नागपूरने एक पर्याय सुचवला होता की, जर पालिकेच्या सभासदांनी एकमताने श्रीगुरुजींचा सत्कार ठरवला तर मान्यता मिळेल नाही तर नाही. पालिकेच्या सर्व सभासदांनी एकमताने सत्काराचा ठराव मान्य केला व सत्कार समारंभाची तयारी सुरू झाली.
१३ एप्रिलला सकाळीच कुमाऊँचे लोकप्रिय नेते श्री. शोबन सिंह जीना, नगराध्यक्ष श्री. मोहनलाल वर्मा इ. नी रस्त्यातच श्रीगुरुजींचे स्वागत केले. जकात नाक्यापाशी गाडी आल्यानंतर स्वत: श्रीगुरुजींनी गाडी थांबवली, जकात देण्याची व्यवस्था केली आणि मग पुढे गेले. नगराच्या मुख्य रस्त्याने जाताना बद्रीश्वर मंदिराचे मोठे आवार लागते. तेथेच संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी चाललेली होती. नगरपालिकेने तेथे एक प्रवेशद्वार उभे केले होते, थोडी सजावट केली होती. याच प्रवेशद्वारातून श्रीगुरुजींचे स्वागत होणार होते. आवाराच्या जवळून जाताना श्रीगुरुजी म्हणाले, ''संध्याकाळचे नाटक इथेच व्हायचे आहे वाटते!'' आमच्यातील एकाने विचारले, ''नाटक का म्हणता?'' ते गांभीर्याने म्हणाले की, ''अरे वक्ता तर नाटकच करत असतो. जर त्याला देशाच्या अंतर्बाह्य स्थितीची अनुभूती झाली तर तो भाषण देऊच शकणार नाही.''
श्री. शोबन सिंह जीना यांचे सजलेले घर त्या दिवशी जणु तीर्थक्षेत्र बनले होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते तासभर व्हरांडयातच बसले होते. वयोवृध्द समाजसेवक श्री. गुरुदास साह यांनी 'दैशिक शास्त्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानववादा'चे अनेक मुद्दे या ग्रंथावर आधारित आहेत.