संघटन, कार्य आणि नेतृत्व
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
असाधारण संघटन कौशल्य
सन १९६६ चा कुंभ, गुरुजींच्या अद्भुत संघटन कुशलतेचे विलक्षण स्वरूप सादर करणारा ठरला. विश्व हिंदू परिषदेचे एक अखिल भारतीय अधिवेशन प्रयाग कुंभच्या मुहूर्तावर भरविले गेले. सा¬या देशातून आलेल्या सुमारे १५ हजार प्रतिनिधींशिवाय परदेशातूनही हिंदूंचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर शंकराचार्य, महामंडलेश्वर, शीख, जैन, बौध्द इ. अनेक संप्रदायांचे प्रमुख उपस्थित होते. हिंदू समाजाच्या विभिन्नतेतही एकतेचे दर्शन घडविणारे असे ते विलक्षण दृष्य होते. पुरीचे शंकराचार्य काही कारणाने नाखूष होऊन व्यासपीठावर काही विचित्र बोलू लागले. त्यामुळे सभेत विरोधाचे सूर उमटू लागले. असे वाटले की एकतेसाठी सारा आटापिटा करून एकतेसाठी केलेला हा प्रयत्त्न या संघर्षात संपून जातो की काय? श्रीगुरुजींनी व्यासपीठावर येऊन सर्वांना शांत केले आणि २-३ तासातच द्वारकेचे शंकराचार्य आणि पुरीचे शंकराचार्य यांना व्यासपीठावर आणून सामंजस्याचे वातावरण उत्पन्न केले. सर्वांच्या तोंडून असेच ऐकू येत होते की, आज श्रीगुरुजी नसते, तर हा संघर्ष पेटल्याशिवाय राहिला नसता. हिंदू समाजाला छोटया छोटया गोष्टींवरून भांडायची सवय लागली आहे. आपलेच नाक वर राहिले पाहिजे, मग समाजाचे, देशाचे काही का होवो या वातावरणात श्रीगुरुजींनी आपल्या असाधारण संघटन कौशल्याची अशी काही ओळख करून दिली की, त्यामुळे मोठेमोठे धर्माचार्य एकत्र आले, अधिवेशनात त्यांनी आपल्या समाजाच्या उत्थनाचा संकल्प केला आणि मगच ते आपापल्या स्थानी परतले. सारी व्यवस्था व प्रयत्त्न तर, श्रीगुरुजींच्या प्रेरणेने संघाच्या व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलाच होता; परंतु संमेलनाच्या यशस्वितेसाठी जर कोणती एक व्यक्ती कारणीभूत असेल तर, ती होती श्रीगुरुजी, असेच सा¬या कुंभाचे वातावरण होते.
- रज्जू भैया
 
जेवण आणि स्वास्थ्य
पूजनीय श्रीगुरुजींची प्रकृती अत्यंत खराब असूनही ते सतत दौरा करत असत आणि डॉक्टरांनी आग्रह करूनही रात्री जेवत नसत, तसेच फळे, लोणी इ. पौष्टिक पदार्थही घेत नसत. केंद्रीय अधिका¬यांनी वारंवार सांगूनही श्रीगुरुजींनी रात्रीचे जेवण सुरू केले नाही तसेच फळे, लोणी यांनाही हात लावला नाही. एकदा उन्हाळयातील संघ शिक्षा वर्ग, अलाहाबादमध्ये सुरू असताना मा. भाऊराव देवरस, मा. रज्जूभैया आम्हा संघचालकांकडे आले आणि म्हणाले, ''श्रीगुरुजी आमच्या सांगण्याकडे लक्ष देत नाहीत. ते सरसंघचालक आहेत, आपण संघचालक आहात. त्यामुळे कदाचित ते आपली गोष्ट मानतील आणि आपल्या जेवणात सुधारणा करतील. म्हणून आपण त्यांच्याशी या संबंधात बोलावे.'' आम्ही म्हटले की, काही हरकत नाही, या निमित्ताने आमची श्रीगुरुजींशी भेट तर होईल! आम्ही श्रीगुरुजींच्या भेटीत त्यांना म्हटले, ''गुरुजी! आजकाल आपली प्रकृती कशी आहे?'' ते म्हणाले, ''प्रकृती आपले काम करते आणि मी आपले काम करतो. वास्तविक कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास मला वेळच मिळत नाही.'' जेव्हा आम्ही त्यांना म्हटले, ''आपली प्रकृती पुष्कळच अशक्त झाली आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की, आपण रात्रीही जेवावे तसेच काही फळे, लोणी इ. ही घेण्यास सुरुवात करावी. यामुळे आपली प्रकृती नीट राहील.'' यावर ते म्हणाले, ''किती लोकांना दोन वेळचे जेवण मिळते आणि फळे, लोणी इ. खायला मिळते? हे शरीर टिकावे आणि त्याद्वारे संघकार्य ठीक प्रकारे व्हावे यासाठी मी एक वेळेस जेवतो.'' आम्ही म्हणालो, ''हे शरीर आता आपले नाही. हे तर आता राष्ट्राची संपत्ती आहे. म्हणून कृपया आपण काळजी घ्यावी.'' श्रीगुरुजींनी स्मित हास्य करून म्हटले, ''माझे शरीर जेवणामुळे नव्हे तर संघकामाच्या वाढीमुळे सुधारेल. जर आपल्याला माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हावी असे वाटत असेल, तर आपण संघाचे काम वेगाने वाढवा.'' या उदाहरणावरून असे स्पष्ट दिसते की, श्रीगुरुजींनी आपल्या शरीराची कधी पर्वा केली नाही की भौतिक सुखांची काळजी कधी केली नाही. त्यांना सदैव एकच काळजी होती. ती म्हणजे संघाचे काम निरंतर कसे वाढेल?
 
- कृष्ण सहाय
 
प्रेमाने थबथबलेली ती थाप
१९६८ मध्ये उन्हाळयातील संघ शिक्षा वर्ग कानपूरला होता. मी शारीरिक विभागात शिक्षक होतो. संध्याकाळच्या शारीरिक कार्यक्रमानंतर प्रार्थनेसाठी 'घनस्तंभ व्यूहा'च्या रचनेत उभे करण्यासाठी 'अग्रेसर संपत्' ची आज्ञा होताच गणांचे अग्रेसर आपापल्या निश्चित स्थानावर ७-७ पावलांच्या अंतरावर उभे रहात गेले. परंतु वाहिनीचा एक अग्रेसर मी लागोपाठ तीन वेळा प्रयत्त्न करूनही सहाव्या पावलावर स्तब करत राहिला.
 
श्रीगुरुजी ध्वजस्थानाजवळ उभे राहून हे दृश्य पहात होते. माझा राग आणि त्रागा पाहून श्रीगुरुजी गुपचुप माझ्या मागे येऊन उभे राहिले. मी मोठया हिमतीने पुन्हा एकदा आज्ञा दिली - 'सप्त पदान्तरम् प्रचल' आणि पुन्हा तीच चूक त्या अग्रेसरने केली. मला दरदरून घाम फुटला. त्याचवेळी गालातल्या गालात हसून श्रीगुरुजींनी पाठीवर थाप दिली आणि म्हटले की, जाऊ दे.
 
ती प्रेमाने थबथबलेली थाप आजही आठवते. ती थाप म्हणजे जणु स्नेहमय व मौन शिक्षण होते.
 
- उमाशंकर
 
लोकशाहीबद्दल आस्था
१९६३ च्या सुमारास पं. नेहरूंची प्रकृती खूपच बिघडत चालली होती. सगळीकडे 'नेहरूंनंतर कोण?' या विषयावर चर्चा चाललेली होती. त्यावेळी एक अमेरिकन पत्रकार भारतात आला होता. त्यानेही श्रीगुरुजींना नेहरूंनंतर कोण, असा प्रश्न केला. श्रीगुरुजींनी उत्तर दिले की, आपली आमच्या भारताविषयी काय कल्पना आहे? उद्या समजा नेहरू गेले तर काय आम्ही आपापसात मारपीट, कत्तल सुरू करू, असे का आपल्याला वाटते? भारतात लोकशाहीची परंपरा खूप प्राचीन काळापासून आहे. आम्ही सत्तेसाठी दंगा करणारे नाही. आमच्या पन्नास कोटी भारतीयांपैकी प्रत्येक व्यक्ती नेहरूंचे स्थान घेऊ शकते आणि जो ते स्थान घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण विश्वासाने जाऊ. श्रीगुरुजींचे हे उत्तर ऐकल्यावर त्या परदेशी पत्रकाराला त्यांच्या लोकशाहीविषयी निष्ठेचा अपूर्व अनुभव आला.
 
- वसंतराव ओक