राष्ट्रीय एकात्मता
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
तेव्हा आपण दात तोडून देत नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उठल्यानंतर जेव्हा श्रीगुरुजी दिल्लीला गेले तेव्हा त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. असे स्वागत की पूर्वी कधी कुणाचे झाले नसेल आणि नंतरही आतापर्यंत कधी झाले नाही. आणि तरीही त्यांच्या बोलण्या चालण्यात कोठेही उन्मादाची किंचितही छटा नव्हती. तसेच या आधीच्या खडतर काळातही त्यांच्या मुद्रेवर कोठेही विषादाची रेखा नव्हती. ते एक योगी होते. यश आणि अपयश, सुख आणि दुःख दोन्ही स्थितीत तटस्थ, स्थितप्रज्ञ!
 
त्या दिवशी संध्याकाळी रामलीला मैदानावर त्यांनी एका विशाल सभेत भाषण केले. सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आघात केला होता; परंतु त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नव्हता. त्यांनी सर्व गोष्टी वास्तव स्विकारून मांडल्या. ते म्हणाले की, योगायोगाने जीभ जर दाताखाली सापडली, तर आपण तेव्हा दात तोडून नाही देत! ते आपलेच तर दात आहेत.
- केवलराम मलकानी
 
राष्ट्राच्या आदर्शाला मनापासून स्वीकारले तर...
मुंबईत राहणारे पीरजादा नावाचे 'जमाते इस्लामी' चे एक पदाधिकारी श्रीगुरुजींना भेटण्यासाठी नागपूरच्या मोहिते कार्यालयात आले होते. बहुधा १९६८ ची गोष्ट असावी. दिल्लीत मा. लाला हंसराज महापौर होते. उत्तर भारतात काँग्रेसचा राजकीय क्षेत्रातील प्रभाव कमी होत चालला होता. मशिदीत शस्त्रांचा साठा केला जातो इ. गोष्टी श्रीगुरुजींच्या भाषणातून प्रकट केल्या जात होत्या. सरकार हे जाणत होते.
 
पीरजादा म्हणाले की, आम्हीही भारताचेच रहिवाशी आहोत. भारताविषयीही आमच्या हृदयात प्रेम आहे. संघाने मुसलमान विरोधी होऊ नये असे आम्हाला वाटते. देशाच्या कामासाठी आम्हालाही बरोबर घेण्याचा विचार केला पाहिजे.
श्रीगुरुजी म्हणाले की, आपण भारताचे पुत्र आहोत, रामकृष्ण हे आपल्या राष्ट्राचे आदर्श आहेत, हे आपण मनापासून स्वीकारलेत, तर आपल्याला आमच्या बरोबर देशाच्या कामासाठी घेऊच, एवढेच नव्हे तर आमच्या बरोबर भारतमातेची पूजा करण्यासाठी आम्ही आपल्याला आमच्या देवळातही बसवू.
पीरजादा मग पुढे काही बोलले नाहीत.
- श्री बापूराव
 
डोळे उघडून घटना पहा
दैनिक 'हिन्दू'चे श्री. के. नरसिंहन्, 'इंडियन एक्सप्रेस'चे श्री. आर. एस. नारायणस्वामी व अन्य लोकांसमवेत श्रीगुरुजी बोलत होते. श्रीगुरुजी सन १९६४ मध्ये केरळ व तामिळनाडूच्या प्रवासाच्या काळात जानेवारी महिन्यात चेन्नई (मद्रास) येथे आले होते, त्यावेळची ही घटना आहे.
 
नुकतेच कलकत्त्यात जे दंगे झाले होते त्यावर गप्पागोष्टी चालल्या होत्या. श्रीगुरुजी म्हणाले की, वृत्तपत्रातून दंगलींसंबंधी जी माहिती आली आहे ती सत्यतेपासून खूप दूर आहे. कलकत्त्यात ज्या दंगली झाल्या त्या, पाकिस्तानातील खुलना, डमडम इ. ठिकाणी झालेल्या दंगलींची हिंदूंची प्रतिक्रिया म्हणून झालेल्या नाहीत.वास्तविक सीमेवरील भागात आणि कलकत्त्यात राहणारे मुसलमान, पाकिस्तानात जे दंगे झाले त्याच साखळीत, भारतातील प्रांतातही दहशत निर्माण करू इच्छित होते. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या विवेकानंद जन्मशताब्दी मंडपाला आग लावण्याच्या घटनेतून हे स्पष्ट होते. काय, आपण अशी कल्पना करू शकता की, आग लावण्याचे हे काम हिंदूंचे असू शकते? मुसलमानांनी आक्रमक पवित्रा घेऊन दंगली पसरवल्या. सुरुवातीस अनेक ठिकाणी निरपराध हिंदू याला बळी पडले परंतु नंतर मात्र हिदूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हिंदूंचे हे प्रत्युत्तर तितकेच प्रखर होते.
 
खरोखर आश्चर्याची गोष्ट अशी की, एकाही वृत्तपत्राने या घटनांची ही वास्तवाला धरून असलेली पार्श्वभूमी प्रसिध्द केली नाही. सर्व वृत्तपत्रांनी हेच प्रसिध्द केले की, हे दंगे पूर्व पाकिस्तानातील दंग्यांची प्रतिक्रिया म्हणून झाले. कलकत्ता आणि बंगालच्या सीमा प्रदेशात मुसलमानांचा जो आक्रमक रोख होता तो त्यांच्या मनसुब्यांचे द्योतक होता आणि वृत्तपत्रांनी त्यांचे हे कारस्थान उघड करावयास हवे होते.
(संकलित)