राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उर्फ श्रीगुरुजी यांच्या जीवनातील अविस्मरणीय आठवणींचा 'स्मृती-शलाका' हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना आम्हास आनंद होत आहे.
श्रीगुरुजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग ग्रंथ वा पुस्तकांच्या रूपाने या पूर्वी प्रसिध्द झाले आहेत. तरीही अनेक आठवणी अद्यापही अप्रकाशितच होत्या. या अप्रकाशित आठवणी वाचकांसमोर याव्यात, या उद्देशाने लखनऊच्या लोकहित प्रकाशनाने या आठवणी प्रथम हिंदीत प्रसिध्द केल्या. श्री. कौशलेन्द्र यांनी संकलित केलेल्या या आठवणी, जीवन प्रसंग 'अविस्मरणीय पूजनीय श्री गुरुजी' या मूळ ग्रंथात हिंदीत वाचायला मिळतात.
या आठवणी भारतीय विचार साधना प्रकाशनाच्यावतीने आता मराठीतून प्रकाशित होत आहेत. श्रीगुरुजींच्या जीवनातील शेकडो हृद्य आठवणी आणि प्रेरणादायी प्रसंग या निमित्ताने वाचकांसमोर येत आहेत. मूळ हिंदी ग्रंथाचे मराठी रुपांतर प्रकाशित करण्यासाठी लोकहित प्रकाशनाने आम्हाला परवानगी दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- प्रकाशक
संकलनकर्त्याचे मनोगत
पूजनीय श्रीगुरुजींचे जीवन राष्ट्राच्या अखंड साधनेचे जिवंत प्रतीक होते. प्रत्येक क्षण प्रेरक व मार्गदर्शक. त्यामुळेच सा¬या देशात त्यांच्या संबंधात आलेल्या सामान्य व्यक्तीही आजच्या समाज परिवर्तनाच्या काळात उदात्त प्रेरणा व असामान्य कर्तृत्व प्रकट करत आहेत. मानवतेच्या उज्ज्वल भविष्याचा हाच आधार आहे.
पूजनीय श्रीगुरुजींच्या जीवनाशी निगडित असे प्रेरणेचे असंख्य प्रसंग आहेत जे संपूर्ण जीवनाशी संबंधित आहेत. ते या आधी दोन भागात प्रसिध्द झाले आहेत. अप्रकाशित आठवणींपैकी काही आठवणींचे संकलन करून व्यवस्थित करण्याची संधी मला योगायोगाने आपल्या नागपूरच्या निवासस्थानी मिळाली. त्या आठवणीच या पुस्तकात एकत्र केल्या आहेत.
अनेक ज्येष्ठ संघ अधिका¬यांचे साधना-केंद्र नागपूर आहे. ते देशभर भ्रमण करतात. अनौपचारिकपणे उठता-बसता विभिन्न चर्चांमधून राष्ट्र-जीवनाला पुष्ट करणारे धडे त्यांच्याकडून शिकायला मिळतात. याची पध्दती प. पू. डॉक्टर हेडगेवार व पूजनीय श्रीगुरुजींच्या प्रत्यक्ष जीवनाने बसून गेली आहे. साधेपणाने, आत्मीयतेच्या वातावरणात स्वत:ला विशेष न मानता असंख्य जीवने समाजसेवेशी नि:स्वार्थी वृत्तीने व समर्पण भावनेने जोडली गेली हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा विषय आहे.
अपेक्षित समाज परिवर्तन करून उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी हे प्रसंग निश्चितच सहाय्यक ठरतील. याच भावनेने या प्रसंगांचा बोध सर्वजण प्राप्त करून घेतील, असा विश्वास वाटतो.
या आठवणी सहजतेने उपलब्ध होण्यास ज्येष्ठ बंधुवर श्री. रामभाऊ बोंडाळे यांचे अमूल्य सहकार्य उपयोगी पडले म्हणून त्यांचे आभार!