जीवनविषयक आपल्या शाश्वत मूल्यांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या व्यवहारात आढळणाऱ्या काही थोडया गोष्टींचे दिग्दर्शन मी केले. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रही आपल्या स्वधर्माच्या मुळांना चिकटून राहिले तरच त्याची सर्वांगीण उन्नती होते. वैभवाने ते बहरते. स्वधर्माची मुळे उपटून टाकून त्या जागी दुसरे काही लावले तर त्यातनू अव्यवस्था आणि अध:पात मात्र ओढवले. भगवद्गीतेत म्हटलेच आहे की स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:। (स्वधर्माचरण करीत असता मरण ओढवले तरी ते श्रेयस्कर आहे. परधर्माचे परिणाम भयानक असतात.)
या पवित्र भूमीच्या राष्ट्रीय आत्म्याची विशुध्द ज्योत पुन्हा एकदा झळाळून उठावी म्हणून हिंदू मनातील युगानुयुगींच्या अमर अग्नीवर आत्मविस्मृतीची व परानुकरणाची चढलेली राख झटकून टाकून हिंदू जीवनपध्दतीचे पुनरूज्जीवन करणे हाच आजचा आपला राष्ट्रधर्म आहे.