प्रेरणा व प्रबोधन
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
कामाशिवाय इकडे तिकडे भटकू नये
संघावरील पहिली बंदी उठल्यानंतर श्रीगुरुजी दिल्लीला यायचे होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. मेरठमधील सुमारे २० - २५ जण जीपमधून निघाले. त्यात श्री. चमनलाल यांची धर्मपत्त्नीही होती. श्री. चंद्रसेन रावत जीप चालवण्यास बसले. खरे तर श्री. रावत हे नुकतेच मानसिक रोगातून बरे झाले होते त्यामुळे त्यांच्या हातात जीप देणे धोक्याचे होते. पण उत्साहाच्या भरात त्यांच्या आग्रहाला सर्व बळी पडले आणि जीप दिल्लीच्या दिशेने सुसाट सुटली. जीप वेगाने चालली होती. रस्त्यावर बैलगाडी येताना पाहून चालकाला वेग कमी करण्यास सांगितले गेले. परंतु चालकाने ब्रेक न दाबता चुकून एक्सलेटर दाबला. गाडीने अधिकच वेग घेतला. बैलगाडीपर्यंत पोहोचेपर्यंत गाडीचे हँडल मोडले आणि गाडी झाडावर आदळता आदळता थोडक्यात वाचली. भगवंताच्या कृपेने गाडीने कुठे धडक दिली नाही. नंतर मात्र रतनजींनी गाडी चालवली आणि सर्वजण दिल्लीस पोहोचले. दिल्लीस जेथे श्रीगुरुजी उतरले होते, तेथे सर्वजण गेले. श्रीगुरुजींनी विचारले, ''मेरठवाले कशासाठी आले आहेत?'' आम्ही म्हणालो, ''आपल्या दर्शनासाठी.'' श्रीगुरुजींनी प्रथम सर्व हालहवाल विचारला आणि मग ते म्हणाले, ''कामाशिवाय इकडे तिकडे भटकता कामा नये. त्यात वेळ व्यर्थ नष्ट होतो.''
- बाबूलाल शर्मा
 
महान योगी
१९६५-६६ ची गोष्ट असेल. श्रीगुरुजी सीतापूर विभागाच्या कार्यकर्त्यांची बैठक सीतापूरमध्ये घेत होते. जिल्ह्यांचे कार्यवाह आपापल्या जिल्ह्याचे प्रतिवृत्त देत होते. माझी पण पाळी आली. मी प्रतिवृत्त देण्यासाठी जसा उभा राहिलो, त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिले आणि लगेच शेजारी बसलेल्या मा. रज्जूभैयांकडे ते पाहू लागले. मा. रज्जूभैयांना श्रीगुरुजींच्या मुद्रेवरील भाव समजण्यास वेळ लागला नाही. ते लगेच म्हणाले की, ह्याच्या डोक्यावरचे केस पांढरे होऊ लागले आहेत.
 
मी जिल्ह्याचे प्रतिवृत्त दिले. त्यांनी काही प्रश्न विचारले. मी यथाशक्ती उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी म्हटले की, प्रार्थनेच्या शेवटी आपण 'भारतमाता की जय' म्हणतो. ही घोषणा नाही, प्रार्थनेचे अंग आहे. आणि 'जय' म्हणत असताना भारत मातेच्या उत्थानाच्या जबाबदारीची अनुभूतीही स्वयंसेवकांना व्हावी, असा प्रयत्न शाखेवर होतो का? गोष्ट स्पष्ट आहे ना! 'स्पष्ट' शब्द पुन्हा उच्चारून ते माझ्याकडे पाहू लागले. माझ्या मनात आले की, महापुरुष शब्दाचा कसाही उच्चार करोत, तोच मान्यता पावतो. या वाक्याची रचना जशी माझ्या मनात तयार झाली, जशीच्या तशी मी मा. रज्जूभैयांना सांगून टाकली. पुढे काही बोलण्याचे माझे धाडस झाले नाही आणि मी त्या महान योग्याला मनोमन वंदन करत खाली बसलो.
- श्यामसुंदर
 
घाई करा, उशीर होईल
१९४० चे वर्ष असेल. श्रीगुरुजींचा लखनौचा प्रवास होता. लखनौमध्ये कशाबशा ६-७ शाखा लागत होत्या. गोमती नदीच्या पलिकडे विश्वविद्यालय शाखेवर सायंकाळी नगराचे सांघिक होते. लखनौची आद्य शाखा कुंडरी शाखेपासून सांघिकचे ठिकाण ३ कि.मी. अंतरावर होते. सायकलचा वापर फारसा नव्हता. सर्व पायीच जात असत. मी गटनायक असल्याने आपल्या गटातील जास्तीत जास्त स्वयंसेवकांना घेऊन मी संघस्थानावर लवकर पोहोचण्याचा प्रयत्त्न करत होतो.
 
अचानक पाठीमागून एक टांगा आम्हाला मागे टाकून पुढे गेला. टांग्यात बसलेल्या दोन व्यक्तींवर आमची दृष्टी पडली. त्यातील एका व्यक्तीने मोठयाने म्हटले की, घाई करा, उशीर होईल. सांगता सांगताच त्यांनी हाताने व डोळयांनी खूणही केली.
कानावर शब्द पडताच आम्ही धावत सुटलो. टांगा रस्त्याने चालला होता. आम्ही मात्र गल्लीतून झटकन संघस्थानावर येऊन पोहोचलो. एका मिनिटातच टांगाही तेथे आला. टांगा संघस्थानावर येताच शिट्टी वाजली, 'दक्ष' ही आज्ञा झाली. तेव्हा कुठे आमच्या लक्षात आले की, टांग्यामध्ये ज्या दोन व्यक्ती होत्या, त्यातील एक होती ऍडव्होकेट श्री. तेजनारायण (संघचालक) आणि दुसरी श्रीगुरुजी.
 
आजही जेव्हा श्रीगुरुजींचे ते शब्द, 'घाई करा उशीर होईल' कानावर पडल्याचा आभास होतो तेव्हा 'आपलीही गती आपण वाढवली पाहिजे, कारण तरच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत वेळेपूर्वी पोहोचू,' असे लक्षात येते.
- वीरेंद्र भटनागर
 
संन्यासापेक्षा देशकार्य श्रेष्ठ
पश्चिम उत्तर प्रदेशातील एका नगराची गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ होता. कार्यकर्त्यांची बैठक चालली होती. श्रीगुरुजी आपल्या स्वभावानुसार हास्यविनोद करत, चुटके सांगत सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. एक संघचालक म्हणाले की, गुरुजी! आपण हिंदू राष्ट्र बोलता त्यामुळे सरकार नाराज होते. त्यावेळी श्रीगुरुजींनी हातातील दंड उंचावून म्हटले की, अरे! त्याला घाबरतो कोण? याच प्रकारे कानपूरमधील एका सार्वजनिक सभेत श्रीगुरुजींनी सुस्पष्ट शब्दात हिंदू राष्ट्राची व्याख्या केली. नंतर कार्यालयात अनौपचारिक गप्पागोष्टीत मी श्रीगुरुजींना म्हणालो की, आपण तर अत्यंत स्पष्ट शब्दात हिंदू राष्ट्र बोललात. त्या काळात हिंदू राष्ट्राचा उल्लेख संकटाला निमंत्रण देण्यासारखा होता. श्रीगुरुजी उत्तरले, ''जी गोष्ट आपण मानतो ती सुस्पष्टपणे बोलण्यात भय कसले?''
 
मेरठमधील देवनागरी कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्ग सुरू होता. श्रीगुरुजी वर्गात चार दिवस राहणार होते. श्रीगुरुजींच्या निवासाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली होती ते ठिकाण मुख्य भवनापासून जरा दूर होते. श्रीगुरुजींना येऊन दोन दिवस झाले होते. तिस¬या दिवशी वर्गातील एक परिचित स्वयंसेवक भेटल्यावर श्रीगुरुजींनी त्यांना विचारले, ''अरे; मी तर दोन दिवसांपासून येथे आहे, तुम्ही आतापर्यंत कोठे होता?'' स्वयंसेवकाने उत्तर दिले, ''गुरुजी, या बाजूला येण्यास आम्हाला मनाई आहे.'' श्रीगुरुजी ताबडतोब म्हणाले, ''असे तुम्ही आधी का नाही सांगितले? नाहीतर मी देखील येथे आलो नसतो.'' या उद्गारांवरून श्रीगुरुजींचे मनोगत स्पष्ट झाले. स्वयंसेवकांना भेटण्यात काही प्रतिबंध उत्पन्न होणे श्रीगुरुजींना पसंत नव्हते.
 
१९५० च्या प्रारंभिक काळातील गोष्ट! संघावरची बंदी उठली होती. मला संन्यास ग्रहण करावासा वाटत होता. मी विचार केला की, ज्या महापुरुषाच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत काम केले त्यांचा या विषयात सल्ला घेतला पाहिजे. मी श्रीगुरुजींना नागपूर कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवून दिले. श्रीगुरुजींनी प्रवासाहून परतताच त्या पत्राचे उत्तर दिले. पत्राचा आशय असा होता की, संघाच्या संस्थापकांनी माझ्या खांद्यावर संघकार्य वाढवण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि केवळ त्या विषयासंबंधीच मी चांगला सल्ला देऊ शकतो. श्रीगुरुजींचा संकेत स्पष्ट होता. श्री गुरुजींना संन्यासापेक्षा देशकार्य श्रेष्ठ वाटत होते.
- विष्णुशरण
 
फाळणीच्या आधी सात दिवस सिंध प्रांताचा दौरा
फाळणीच्या सात दिवस आधी श्रीगुरुजी सिंधमध्ये पोहोचले. त्यावेळी हैदराबादमध्ये श्रीगुरुजींचे भाषण ऐकण्यासाठी अपार जनता आलेली होती. सिंधचे प्रसिध्द संत श्री साधू वासवानी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या काव्यमय भाषणात संघाला हिंदू समाजाचा तारणहार म्हणून म्हटले.
 
५ ते ८ ऑगस्टपर्यंत श्रीगुरुजी कराचीत होते. या अवधीत 'क्लिप्टन' समुद्र किनार्‍यावर झालेल्या स्वयंसेवकांच्या संमेलनात श्रीगुरुजींनी पाच मिनिटेच भाषण केले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या त्या भाषणात जशी माणुसकीवर ओढवलेल्या दु:खामुळे अंत:करणात उत्पन्न झालेली खळबळ प्रकट झाली होती, तशीच नि:स्वार्थ बुध्दीने काम करण्यासाठी प्रत्येक भारतीय तरुणाला आवाहन करणारी तळमळही व्यक्त झाली होती.
 
पतियाळा, नाभा तसेच मालेरकोटला या संस्थानांच्या सीमेला लागून असलेल्या संगरुरच्या मस्तवाना साहब गुरुद्वाराला जुलैच्या शेवटच्या आठवडयात श्रीगुरुजींनी भेट दिली. त्यावेळी पेप्सूच्या अन्य गुरुद्वारांच्या जत्थेदारांनाही बोलावले होते.
गुरुद्वाराच्या प्रमुखाने स्वागतपर भाषणात म्हटले की, ज्यांनी आपल्या हातात धर्मरक्षणाचे कंकण बांधले आहे असे एक महापुरुष आज आपल्यात आहेत हे आपले सद़्भाग्यच आहे. ते आपल्या तपोबलाने अशी शक्ती उभी करत आहेत की, ज्यामुळे निश्चितच धर्माचे रक्षण होईल.
 
श्रीगुरुजी आपल्या भाषणात म्हणाले की, मी आज आपल्या समोर जे दृश्य पहात आहे त्यामुळे मला तीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या एका पृष्ठाची आठवण होत आहे. गुरु गोविंदसिंगांच्या रूपाने उत्तरेकडे एक भारतीय शक्ती निर्माण झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने दक्षिणेकडेही भारतीय शक्ती निर्माण झाली होती. देशाच्या दुर्भाग्याने या दोन शक्ती एकत्र येऊ शकल्या नाहीत. त्या जर एकत्र आल्या असत्या, तर भारताचा इतिहासच बदलून गेला असता. परंतु त्या काळी जे शक्ती-संघटन शक्य झाले नाही, ते आज होत आहे. मला विश्वास वाटतो की, या संघटनेमुळे धर्मावर संकट येण्याची कोणती शंकाही राहणार नाही.
 
अशा प्रकारे पंजाबमधील सर्व शक्तींचा समन्वय करण्याचा प्रयत्न त्या काळी होत होता तसाच आजही होत आहे.
- श्रीचंद्र
 
फाळणीचे दु:ख
देशाच्या फाळणीमुळे निर्वासित झालेल्यांसाठी ठिकठिकाणी, स्वयंसेवकांनी शिबीरे उभारली होती. अशा शिबीरात जेव्हा श्रीगुरुजी जात तेव्हा अनेक लोक त्यांच्या पायाशी लोळण घेऊन त्यांना आपल्या करुण कथा सांगत असत. श्रीगुरुजींनी त्या सर्वांचे वैभवपूर्ण जीवन आपल्या डोळयांनी प्रत्यक्ष पाहिले होते पण आता त्यांच्यापुढे जे होते ते कोमेजलेल्या चेह¬यांचे, फाटक्या तुटक्या कपडयांनी अंग झाकलेले असे स्त्रीपुरुष. त्यांना पाहून श्रीगुरुजींचे अंत:करण तिळ तिळ तुटत असे.
 
शीलाचे तसेच धर्माचे रक्षण करण्याच्या उदात्त भावनेने प्रेरित होऊन पंजाबच्या अनेक माताभगिनींनी हौतात्म्य स्वीकारले होते. या वार्ताही श्रीगुरुजींपर्यंत या दौ¬यामुळे पोहोचत असत. अशाच एका प्रसंगी त्यांनी म्हटले होते की, आजदेखील हिंदू समाजात वीर पदिमनी जिवंत आहेत. म्हणून मला विश्वास वाटतो की, या विपरीत परिस्थितीतही समाजाच्या उन्नतीसाठी केले जाणारे प्रयत्न अवश्य यशस्वी होतील.
(संकलित)
 
आपण भारतमातेचे पुजारी आहोत
१९४३ मधील दिवाळीच्या काळात श्रीगुरुजी सिंधमधील हैदराबादमध्ये होते. मी कराचीच्या कॉलेजमध्ये शिकत होतो. सुट्टीमध्ये घरी आलो होतो. एका कार्यक्रमाची मला आठवण आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा. संघचालक श्री. होतचंद्रजी यांनी श्रीगुरुजींना हार घालण्याची इच्छा प्रकट केली. श्रीगुरुजी त्यावेळी म्हणाले की, हा फुलांचा हार कशासाठी? याची आज आपल्याला आवश्यकता नाही. आपण तर भारतमातेची पूजा करण्यासाठी निघालो आहोत. मातेला आपले समर्पण हवे आहे, त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
- केवलराम मलकानी
 
दुर्दम्य आत्मविश्वास
वीर जीं (प्रो. धर्मवीरजी) नी श्रीगुरुजींना निराशेने म्हटले की, आजची सारी परिस्थिती आपल्यासमोर आहे. यातून मार्ग कसा निघेल?
 
श्रीगुरुजींनी मोठया विश्वासाने उत्तर दिले, ''वीरजी आपण हे कसे विसरता, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आपल्या शाखा आहेत, आपले लोक आहेत. जरुर पडली, तर ते अवश्य जनतेचे नेतृत्व करतील. आपली जनता फार काळ भ्रमात राहू शकत नाही. भ्रम संपताच नेतृत्व आपल्या हातात येईल.''
''पण तरी हे कसे होईल!'' वीरजींनी पुन्हा निराशेनेच विचारले.
 
गोष्ट गांभीर्याने समजावून सांगताना श्रीगुरुजी म्हणाले, ''जशी परिस्थिती येईल, त्याला तोंड देण्यास स्वयंसेवक तयार आहेत. जर जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली, तर ती देखील ते निभावून नेतील. सार हे आहे की, माणसे पाहिजेत, सर्व कामे होतील. हे मात्र खरे आहे की, उद्या कोणती घटना घडेल आणि त्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागेल या संबंधी आज काही विस्ताराने सांगणे अवघड आहे. पण एवढा विश्वास ठेवायलाच हवा की, जे काही पाऊल उचलले जाईल, ते योग्यच असेल.''
गोष्ट वीरजींच्या ध्यानात आली.
- श्रीनिवास
 
संघकार्य - ईश्वरीय कार्य
1970 च्या जुलै महिन्यात कॅन्सरच्या ऑपरेशननंतर श्रीगुरुजींचे वास्तव्य नागपूरमध्ये आमच्या घरी होते. सकाळी आणि दुपारी श्रीगुरुजींना मोकळा वेळ असे. आम्ही त्यांच्यापाशी जाऊन बसत असू. श्रीगुरुजींचे आमच्या घराशी अत्यंत घरगुती संबंध असल्यामुळे आम्ही श्रीगुरुजींना नि: संकोचपणे प्रश्न विचारत असू आणि तेही त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे देत असत.
अशाच एका चर्चेच्यावेळी मी त्यांना म्हणालो की, गुरुजी, संघाची स्थापना होऊन आज ४५ वर्षे झाली. परंतु समाजाची सर्वांगीण उन्नती होण्याच्या दिशेने संघ काही योगदान देऊ शकला आहे का? १९२५ मध्ये हिंदू समाजात नीतीमत्तेची जी स्थिती होती, त्यापेक्षा आज काही त्यात सुधारणा झाली आहे का? दिसतं तर असं की व्यावहारिक, नैतिक आणि आध्यात्मिक सर्व दृष्टींनी आज समाजाची अधोगती झालेली आहे. मग संघाने या ४५ वर्षात काय केले? समाजाला पतनापासून वाचवले असते, तर कदाचित ह्याचे श्रेय संघाला मिळाले असते. परंतु स्थिती बिलकुल विपरीत दिसते. म्हणून अशा स्थितीत संघकार्याला ईश्वरीय कार्य कसे म्हणता येईल?
 
यावर श्रीगुरुजी म्हणाले, ''तुमचे म्हणणे बरोबर आहे. १९४५ पेक्षा आज समाजाचे नैतिक दृष्टीने अधिक पतन झाले आहे. सार्‍या समाजाला पतनापासून वाचवणे संघाला शक्य देखील नाही. परंतु ह्याबरोबरच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ही अधोगती शेवटी 'केऑस'च्या स्थितीपर्यंत पोहोचेल, त्यावेळी केवळ संघच उपयोगी पडेल. अत्यंत भयानक परिस्थितीत सर्व नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक मूल्ये लुप्त होऊन जाण्याच्या स्थितीतही सुप्त ठिणग्या सुरक्षित ठेवण्याचे कार्य तर संघच करणार आहे. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो, त्या प्रमाणे समाजाच्या पतनातूनही हिंदू समाजाचे कल्याणच होईल. आपली पुराणे, रामायण, महाभारत इ. प्राचीन ग्रंथात अशी अनेक उदाहरणे आहेत. पुरातन काळात हिरण्यकश्यपू, भस्मासुर, त्रिपुरासूर, रावण, कंस, जरासंध इ. अनेक राक्षसांनी किती भयानक अत्याचार केले. पण कुठे ना कुठे सत्प्रवृत्ती होतीच. त्यामुळेच आपल्या समाजाचे पुन्हा उत्थान होऊ शकले. आज देखील समाज विनाशाच्या दिशेने वेगाने जात आहे. तरीदेखील घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नाही. आपण आपले कर्तव्य आत्मविश्वासाने आणि सातत्याने करत राहिले पाहिजे. समाजाच्या पुनरुत्थानासाठी सत्प्रवृत्तीची बीजे सुरक्षित ठेवावी लागतात. त्यांची सुरक्षा हेच संघकार्य आहे. सत्प्रवृत्तीचे बीज सुरक्षित असल्यावर समाजाची कितीही अधोगती होऊ दे, कितीही भयंकर स्थिती निर्माण होऊ दे, संकटे येऊ देत समाजाचे भविष्य उज्ज्वलच राहील. पुरातन काळात सत्प्रवृत्तींच्या रक्षणाचे दायित्व ऋषि-मुनींनी सांभाळले, ते जसे ईश्वरीय कार्य होते, तसेच आपले संघकार्यही ईश्वरीय कार्यच आहे. त्याचे फळ आज दिसेल अगर न दिसेल.
- कृ. मा. घटाटे
 
विश्व हिंदू परिषद आणि मठाधिपती
श्रीगुरुजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचे प्रेरणास्रोत होते. परंतु परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये ते केव्हातरी लोकांच्या समोर येत असत.
परिषदेच्या कार्यासंबंधी चर्चा करताना एकदा मी त्यांना विचारले, ''जनमानसांत मठाधिपतींच्या बाबतीत अशी धारणा आहे की, ते प्राचीन युगातच रमणारे आहेत. म्हणून त्यांना सक्रीय करण्यात लाभ कोणता?''
 
श्रीगुरुजी म्हणाले, ''आपली भीती निराधार आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच शतकानुशतके आपली संस्कृती तसेच परंपरांचे पोषण होत आले आहे. समाजामध्ये धर्म-संस्कृती विषयी जी आस्था दिसते ती देखील त्यांच्यामुळे आहे. अन्यथा ती नष्ट झाली असती. अनेक मठाधिपती शील-चारित्र्य संपन्न आहेत, वैदिक परंपरांचे प्रकांड पंडित आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या कामात त्यांचे सहकार्य मिळाले, तर अनायासे कोटयवधी लोकांचे सहकार्य परिषदेला मिळेल. मठाधिपती देखील समाजाभिमुख होऊन आधुनिक समाजाच्या आवश्यकतांच्या दृष्टीने चिंतनशील बनतील. जाती-उपजातींची बंधने तोडण्यासाठी परिषदेचे काम वाढणे आवश्यक आहे. हे काम मठाधिपती करू शकतात. काही थोडे मठाधिपती तथाकथित प्रतिक्रियावादी असतील, परंतु तरीही त्यांचा दृष्टिकोण समाजद्रोही वा राष्ट्रद्रोही आहे असा आरोप त्यांच्यावर करता येणार नाही.''
 
शेवटी श्रीगुरुजी म्हणाले, ''पण तरीही हिंदूंचा आत्मविश्वास दृढ असला पाहिजे. हिंदूंना धर्माविषयी आस्था आहे. त्याला धर्मात बदल नको असतो, पण त्यासंबंधी तो आग्रही पण नाही. आपली अपेक्षा आहे की, हिंदूंची पराभूत मनोवृत्ती किंवा उदासीन वृत्ती दूर होऊन त्यांच्यात असा अभिमान जागृत व्हावा की, आम्ही हिंदू आहोत. विश्व हिंदू परिषद लवकरात लवकर हे कार्य करील अशी आशा आहे.
- प्रा. महादेवन
 
गोवा प्रवासाच्या विशेष आठवणी
श्रीगुरुजी दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी १९७२ पर्यंत सावंतवाडी जिल्ह्याच्या प्रवासात होते. त्यांनी गोव्यातील कवळे, मंगेशी, फोंडा तसेच डिचोली या ठिकाणांना भेट दिली.
 
२६ फेब्रुवारी रोजी ते कवळ्याला पोचले. त्यांच्या या वास्तव्यात काही स्वयंसेवकांच्या प्रतिज्ञेचा कार्यक्रम झाला. यामध्ये एक स्वयंसेवक थोटा होता, जन्मापासूनच त्याला उजवा हात नव्हता. म्हणून त्याने लाकडाचा कृत्रिम हात लावला होता आणि त्याने त्या हातानेच ध्वजास प्रणाम केला होता. श्रीगुरुजींच्या ध्यानात ही गोष्ट आली. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी त्यासंबंधी विचारपूस केली आणि म्हणाले, ''डाव्या हाताने प्रणाम केला असता तरी बिघडले नसते. उजव्या हाताने प्रणाम करण्याचा नियम आहे, पण अशा परिस्थितीत डाव्या हाताने प्रणाम चालू शकतो. हा नियमाला अपवाद समजला पाहिजे.''
 
श्रीगुरुजींनी कवळयाच्या संस्कृत पाठशाळेला भेट दिली. शाळेच्या संचालकांनी त्यांना अभिप्राय लिहिण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी पुढील अभिप्राय लिहिला - 'भारतीय जीवनाच्या आधारभूत ज्ञानाचे मुळापासून अध्ययन करण्यासाठी देववाणी संस्कृतचे अध्ययन करून त्यात पारंगत होणे अनिवार्य आहे. आपल्या राष्ट्रीय प्रवाहाच्या सद़्गुण संपन्न संस्कृतीचे उत्तम रीतीने आकलन होण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन राष्ट्र परंपरेला अनुरूप होण्यासाठी ज्या भाषेत त्या संस्कृतीचे मुळातून निरुपण झालेले आहे त्याचे सम्यक् ज्ञान आवश्यक आहे. जीवनावर सत्संस्कार करणा¬या क्रियांचे उगमस्थान श्रुती आहेत. त्यांचे अध्ययन-अध्यापन अखंडपणे चालले पाहिजे. परंतु सध्या संस्कृत भाषेच्या अध्ययनाकडे तसेच वेदाध्ययन आणि तदंगभूत उपासनेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम वर्तमान पिढीत अभारतीयता, उपभोग प्रवणता, अनैतिकता इ. दुर्गुण वाढण्यात झाल्याचे सर्व विचारवंत व्यक्तींना दिसून येत आहे. राष्ट्राचे संवर्धन आणि संरक्षण या दृष्टीने ही अवस्था भयावह आहे. म्हणून संस्कृत भाषेचे शास्त्रीय अध्ययन तसेच वेदाभ्यासाचा उपक्रम, एक महान राष्ट्रीय आवश्यकतेची पूर्ती करणारा आणि अभिनंदनीय आहे. त्याचा लाभ सर्वांनी उठवला पाहिजे. बालांना-तरुणांना ते शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या उपक्रमाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी आवश्यक ते धनादि सहाय्य करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. कवळे येथील 'श्री शांकर विद्यापीठ' या दृष्टीने एक उपकारक उपक्रम आहे. अनेक संस्कृत प्रेमी आणि राष्ट्र परंपरेच्या अभिमान्यांनी स्वत:च्या बळावर याची प्रतिष्ठापना केली तसेच विद्यार्थ्यांना नि:शुल्क ज्ञानदानाची व्यवस्था केली हे स्पृहणीय आहे. विद्यालयाचे वातावरण शांत, प्रसन्न आणि अनुशासनपूर्ण आहे. अशा विद्यापीठाच्या संवर्धनासाठी सर्व उदार हृदयी महानुभावांनी सर्वतोपरी प्रयत्त्न करावा आणि या मार्गाने राष्ट्रसेवेचे श्रेय संपादन करावे. यासाठी मी परम मंगलमयी श्री जगंदबेच्या चरणी प्रार्थना करतो की, अशी बुध्दी सर्व समाजात जागृत व्हावी.
- एक स्वयंसेवक
 
परिवर्तनाचे सामर्थ्य
श्रीगुरुजींच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे एक मराठी दैनिक विशेषांक प्रसिध्द करण्याची योजना तयार करत होते. आमच्या इंग्रजी दैनिक 'नागपूर टाइम्स' ने देखील ही संधी साधून विशेषांक प्रसिध्द करावा, असा प्रस्ताव आमच्या जाहिरात विभागाने 'नागपूर टाइम्स'चे तत्कालीन कार्यकारी संपादक श्री. वासुदेवराव शेवडे यांच्यासमोर ठेवला. परंतु त्यांना श्रीगुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांच्या दृष्टीने श्रीगुरुजी नागपूरच्या सामान्य नागरिका व्यतिरिक्त आणखी काहीही नव्हते.
 
परंतु काही वर्षांनंतर एक दिवस असाच 'नागपूर टाइम्स' च्या कार्यालयात गेलो होतो. श्री. शेवडे यांनी मला विचारले की, काय तुम्ही श्रीगुरुजींना ओळखता? आणि लगेच हेही सांगून टाकले की, श्रीगुरुजी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आले होते. मोठया आपुलकीने ते गप्पा मारीत होते. श्रीगुरुजींशी झालेल्या संभाषणाने आणि त्यांच्या सौहार्दपूर्ण व्यवहाराने श्री. वासुदेवराव शेवडे अतिशय प्रभावित झाले. श्रीगुरुजींबद्दलची त्यांची भावना पूर्णपणे बदलून गेली. ते श्रीगुरुजींचे चाहते बनले. त्यांनी आपली भावना पुढील शब्दात व्यक्त केली. - He (Shri Guruji) was talking authoritatively on the subjects under the Sun.
श्रीगुरुजी ओरिसाच्या संघचालकांनी लिहिलेला एक ग्रंथ घेऊन श्री. शेवडे यांच्या घरी गेले होते. श्रीगुरुजींनी त्या ग्रंथाचे परीक्षण 'नागपूर टाइम्स'मध्ये प्रकाशित करण्याची सूचना केली. श्री. शेवडे यांनी, ज्या अंकात ग्रंथाचे परीक्षण प्रसिध्द झाले त्या अंकाच्या प्रती श्रीगुरुजींना स्वत: नेऊन देण्याचा आदेश मला दिला.
 
निवृत्तीनंतर श्री. शेवडे यांनी 'ऑर्गनायझर'मध्ये काम करण्याची आपली मनीषा व्यक्त केली होती. कोणत्याही व्यक्तीमध्ये असे परिवर्तन करण्याचे सामर्थ्य श्रीगुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात अंतर्भूत होते.
 
मुंबईमध्ये आयोजित केलेले 'विश्व हिंदी संमेलन' यशस्वी करण्यासाठी तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष बॅ. शेषराव वानखेडे यांनी खूप प्रयत्न केले होते. त्या बॅ. शेषराव वानखेडे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्या दरम्यान एकदा श्री. वानखेडे यांच्याबरोबर गप्पागोष्टी करताना सहजपणे संघ आणि श्रीगुरुजी यांचा उल्लेख निघाला. त्यावेळी ते अचानकपणे म्हणाले की, आपण काय सांगता आहात? माझा श्रीगुरुजींशी खूप जुना आणि घनिष्ट संबंध आहे. त्यांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना लगेचच सर्व प्रथम भेटणारी व्यक्ती मीच होतो.
- श्री. कासखेडीकर
 
मग काय सार्‍या देशातील संघकार्य बंद करायचे?
१९७२ मध्ये प्रयाग विभागाच्या संमेलनप्रसंगी श्रीगुरुजींचे प्रयाग नगरात आगमन झाले (दुर्दैवाने हे त्यांचे आगमन त्यांचा अंतिम प्रवास ठरला.) कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रतिवृत्त सांगितले जात होते. श्रीगुरुजींच्या लक्षात आले की, एका जिल्ह्यात संघाच्या कामाची आशादायक प्रगती दिसत नाही. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना याचे कारण विचारले. सर्व कार्यकर्ते गप्प होते. एका प्रचारकाने बोलण्याचे धाडस केले. तो म्हणाला की, त्या जिल्ह्यात इंदिरा गांधींचा (तत्कालीन पंतप्रधान) खूप जोर असल्यामुळे तेथे काम करणे अवघड झाले आहे. अशी कारण मीमांसा स्वाभाविक म्हटली पाहिजे. परंतु यानंतर त्या प्रचारकाने जेव्हा असे सांगितले की, या कारणामुळेच जिल्ह्यात अधिक काम करण्याचा काही फायदा नाही. हे ऐकताच श्रीगुरुजींना राहवले नाही आणि काहीसे रागावून आणि काहीसे व्यथित होऊन ते म्हणाले की, इंदिरा गांधींचा जोर तर देशभर आहे. मग काय सा¬या देशातीलच काम बंद करायचे की काय? त्या कार्यकर्त्याला सांगण्याच्या मिषाने सर्वच कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन झाले होते. यानंतर बैठकीचे वातावरणच बदलून गेले.
- वीरेश्वर द्विवेदी
 
कार्यकर्त्यांना शिकवण
१९६४ च्या ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत श्रीगुरुजींचा संपूर्ण उत्तराखंडचा पहिला प्रवास झाला. या दौर्‍यात श्रीगुरुजी नैनीताल, अल्मोडा, पिथौरागढ, टिहरी, श्रीनगर (गढवाल) या ठिकाणी जाऊन आले. हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यात दूरवर राहणारे स्वयंसेवक श्रीगुरुजींच्या प्रत्यक्ष दर्शनाने तसेच मार्गदर्शनाने प्रभावित झाले. आज हिमालयाच्या पर्वतराजीत दिसणारे संघकाम याच प्रेरणेने उभे राहिले. १९४८ पूर्वी श्रीगुरुजींचे आगमन केवळ नैनीतालमध्ये एकदा झाले होते.
 
सायंकाळी शाखेच्या मुख्य शिक्षकांची बैठक ऍड. शोषनसिंह जीनांच्या घरी ठरवलेली होती. श्रीगुरुजींना जवळून पाहण्याची तीव्र इच्छा सर्व स्वयंसेवकांना होती. त्यामुळे बैठकीत ४५ स्वयंसेवक बसले. यातील कुणाला बैठकीत राहू द्यावे आणि कुणाला नाही या संबंधी एकवाक्यता नव्हती. बैठकीची वेळ झाली. श्रीगुरुजी बैठकीच्या ठिकाणी आले. जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा परिचय झाला. मला जिल्ह्याचे तसेच नगराचेही प्रतिवृत्त द्यायचे होते. श्रीगुरुजींनी विचारले, ''बैठक कोणाची आहे?'' ''मुख्य शिक्षकांची.'' ''कार्यक्रमात किती स्वयंसेवक होते?'' मी उत्तर दिले, ''150 होते.'' ''नगरात तसेच जिल्ह्यात किती शाखा आहेत? एक महिन्यापूर्वी किती शाखा होत्या?'' या सा¬या प्रश्नांची उत्तरे देताना मी वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि मी सहजपणे बोलून गेलो की, सध्याच्या वातावरणामुळे कार्यकर्ते तयार झाले. बस मी एवढे म्हणताच पहिल्यांदाच श्रीगुरुजींचे कठोर शब्द ऐकण्यास मिळाले. परंतु त्या कठोर शब्दातून कार्यकर्त्यांना दिशा-बोध झाला, तसेच आपण वस्तुस्थिती लपवण्याची आपली प्रवृत्ती बदलली पाहिजे हेही कार्यकर्त्यांच्या ध्यानात आले. श्रीगुरुजी म्हणाले की, कार्यक्रमास आलेल्या जनतेकडे पाहून अनुकूल वातावरणाची कल्पना करता कामा नये. तसेच कार्याचे मूल्यांकनही करू नये. कार्य टिकविण्यासाठी नियमित शाखा चालविणारे चांगले कार्यकर्ते उभे करावे लागतील. या शाखाच आपल्या कार्याचा आधार बनतील. बैठकीचे वातावरण गंभीर बनले. मी देखील भानावर आलो. मानपत्र भेटीचा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे ज्यांचे समाधान झाले होते अशा बैठकीस आलेल्या नगराच्या प्रमुख ऍडव्होकेट्सनीही ते कठोर शब्द ऐकले.
 
श्रीगुरुजींच्या त्या शब्दांनी माझ्या अंत:करणास धक्का देण्याचे काम केले. नंतरच्या काळात जेव्हा माझ्यावर प्रतिवृत्त देण्याची पाळी आली तेव्हा मी वस्तुस्थिती थोडक्यात मांडत असे. श्रीगुरुजींनी देखील अधिक सविस्तर चौकशी केली नाही.
- ब्रह्मदेव शर्मा
 
वागण्यातील सहजता
1973 ची गोष्ट. मेरठ येथील भैंसाली मैदानावर विभागातील स्वयंसेवकांचा तसेच निमंत्रित नागरिकांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा मी मुख्य शिक्षक होतो. श्रीगुरुजींनी संघस्थानावर प्रवेश करताच सरसंघचालक प्रणामाची आज्ञा मलाच द्यायची होती. श्री. विश्वनाथ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची योजना चाललेली होती. श्रीगुरुजी येण्यापूर्वी दोन मिनिटे आधी एक कार्यकर्ता धावत असताना वायर पायात अडकून तुटली आणि माईक बंद पडला. त्याचवेळी श्रीगुरुजी आल्याची सूचना मिळाली. सर्व नागरिक तसेच स्वयंसेवक 'सरसंघचालक प्रणामा'च्या आज्ञेची वाट पहात होते. परंतु माईक चालत नाही हे पाहून माझ्या हातापायातील अवसानच गळून गेले आणि मी किंकर्तव्यमूढ होऊन व्यासपीठाच्या खालीच उभा राहिलो. परंतु श्रीगुरुजी मात्र स्वयंसेवकांमधून काढलेल्या मार्गाने वेळेवर व्यासपीठाजवळ आले, क्षणभर थांबले आणि त्यांनी मला व्यासपीठावर जाऊन 'संघ दक्ष' आज्ञा देण्याचे सूचित केले. मी यंत्रवत् व्यासपीठावर चढलो. 'संघ दक्ष'ची आज्ञा झाल्यावर श्रीगुरुजी व्यासपीठावर आले, ध्वजारोहण आणि प्रार्थना झाल्यावर सहजतेने स्मितहास्य करीत आपल्या स्थानावर विराजमान झाले आणि पुढचा कार्यक्रम सुरू करण्याचे त्यांनी सूचित केले. पुढचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला.
- वासुदेव शर्मा
 
उत्साहवर्धक पद्य म्हणा!
राजघाटावर कार्यकर्त्यांचे शिबीर होते. बैठकीपूर्वी 'वंगपंचनद बलिवेदीवर झाले जे बलिदान.....' हे सांघिक पद्य चालले होते. श्रीगुरुजी आले. ज्यावेळी श्रीगुरुजी आले त्यावेळी 'खंडित भारत अखंड कधी होणार' ही ओळ म्हटली जात होती. 'उपविश' होताच त्यांनी म्हटले की, काय पद्य म्हणताहात? 'खंडित भारत अखंड कधी होणार' हे! अरे जेव्हा कराल तेव्हा होईल, असे रडगाणे गाऊन काय उपयोग? उत्साहवर्धक पद्य म्हणत चला.
- तेजपाल सेठी
 
कार्यकर्ता आणि कार्य
बहुधा जानेवारी 1973 चा प्रसंग. श्रीगुरुजींचा पश्चिम उत्तर प्रदेशाचा तो शेवटचा दौरा होता. प्रांताचे सर्व मंडल कार्यवाह आणि त्यावरचे सर्व अधिकारी बरेलीच्या 'मनोहर भूषण इंटर कॉलेज'मध्ये शिबीराच्या रुपाने एकत्र आले होते. संघाच्या अन्यान्य क्षेत्रात काम करणा¬या काही प्रमुख स्वयंसेवक कार्यकर्त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जरा अधिक होती. कार्यक्रमास आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहून काही कार्यकर्त्यांना आपले काम आता बरेच वाढले आहे असा कार्यविस्ताराचा खोटा आभास होणे स्वाभाविक होते. परंतु हा खोटा आभास कार्यासाठी किती अहितकारक होऊ शकतो, हे संघटन शास्त्राचा सामान्य विद्यार्थीही समजू शकतो.
 
श्रीगुरुजींच्या ही सर्व परिस्थिती लगेच लक्षात आली. पहिल्याच सर्वांच्या एकत्रित बैठकीतच त्यांनी असे उद्गार काढले की,
अरे बापरे! इतक्या मोठया प्रमाणात कार्यकर्ते आले! आपल्या संघटनेतही आता इतर संस्थांप्रमाणे केवळ पदाधिकारी राहिले की काय.....?
 
कार्यकर्त्यांच्या संख्येच्या तुलनेत कार्य फारसे नव्हते हे स्पष्ट होते. श्रीगुरुजींची कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा होती, त्याने किती कार्य केले पाहिजे, कार्यकर्ता आणि कार्याचे कोणते परिणाम झाले पाहिजेत इ. अनेक विषय सहजपणे त्यांच्याकडून केवळ या उद्गारातून समोर ठेवले गेले. अपेक्षित वेगाने कार्याची वाढ न झाल्याची मनातील वेदनाही सहज प्रकट झाली. त्या वेदनेची तीव्रता आम्हालाही त्या प्रमाणात स्पर्श करावयास हवी आहे.
- ओम प्रकाश
 
दुर्दम्य उत्साह का दिसत नाही?
सरकारने 12 जुलै 1948 ला संघावरील बंदी उठवली. आगीतून तावून सुलाखून निघाल्यावर विशुध्द झालेले सोने ज्याप्रमाणे अधिक तेजाने चमकते त्याप्रमाणे बंदीनंतर संघ जनतेसमोर आला. महात्मा गांधींसारख्या जगविख्यात थोर पुरुषाची हत्या संघामुळे झाली असा खोटा कलंक संघाच्या कपाळावर होता. जवाहरलाल नेहरूंसकट सर्व नेते मंडळी संघाला बदनाम करत होती. वर्तमानपत्रे, आकाशवाणी इ. सर्व संघविरोधी प्रचारात अग्रेसर होते. लोकसभेत किंवा विधानसभेत संघाच्या बाजूने बोलणारा एकही समर्थक नव्हता. गांधी हत्येनंतर लगेच संघाच्या 2,000 प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली आणि श्रीगुरुजींना देखील तुरुंगात डांबण्यात आले. काँग्रेसचे पुढारी स्वयंसेवकांच्या घरांवर हिंसक हल्ले करण्यासाठी, लोकांना चिथावत होते. श्रीगुरुजींच्या कुशल नेतृत्वामुळे आणि स्वयंसेवकांच्या धीरोदात्त व्यवहारामुळे 80,000 स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. हे सत्याग्रह पर्व असामान्य ठरले, सत्याग्रहाची कीर्ती सर्वदूर पसरली. शेवटी सरकारला नमावे लागले आणि संघावरील बंदी उठवावी लागली.
 
संघावरील बंदी उठल्यानंतर संघ मृत्युंजय ठरला हे ध्यानात घेऊन विजयाच्या आवेगाने आणि विलक्षण उत्साहाने संघाचे कार्य वाढावयास हवे होते, हे ईश्वरीय कार्य आहे, याची कोणी हानी करू शकत नाही, हे समजल्यावर स्वयंसेवकांनी दुप्पट उत्साहाने संघाच्या शाखा वाढविण्यासाठी का प्रयत्न केला नाही? बंदी उठल्यानंतर संपूर्ण भारतात श्रीगुरुजींचे सत्कार समारंभ मोठया प्रमाणात झाले. त्यावेळी श्रीगुरुजींनी स्पष्ट शब्दात असे सांगितले की, आता घोषणा व जयजयकार पुरे झाले, ते विसरून पुन्हा आपल्या शाखा सुदृढ केल्या पाहिजेत, शाखांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीगुरुजींनी असे म्हणूनही कार्यकर्ते दुर्दम्य उत्साहाने प्रेरित होऊन का नाही कामाला लागले?
 
एका स्वयंसेवकाने अशा प्रकारचे प्रश्न श्रीगुरुजींना विचारले. श्रीगुरुजींनी सांगितले की, अशा प्रकारचा स्थायी स्वरूपाने वाढणारा उत्साहाचा आवेग दोन कारणांनी येतो. एक म्हणजे संघाच्या कार्याचे सुस्पष्ट ज्ञान आणि दुसरे म्हणजे संघाचे ध्येय-धोरण. तसेच कार्यपध्दती हीच भारताच्या उत्थानाचा एकमेव मार्ग आहे अशा प्रकारची पूर्ण वैचारिक नि:संदिग्ध समज किंवा पूजनीय डॉक्टरांच्या तपश्चर्येने सुरू झालेले संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे, ते आपण आपल्या अथक परिश्रमांनी होता होईल तो लवकरात लवकर देशव्यापी करू, ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची हृदयात दृढ श्रध्दा. सरकारला संघावरची बंदी हटवावी लागली. तसेच संघ शत प्रतिशत यशस्वी झाला या घटनेच्या केवळ चर्चेने स्वयंसेवकांच्या उत्साहाला उधाण येणार नाही. कार्याचे पूर्ण ज्ञान व्हावे लागेल आणि अतूट श्रध्दा जागवावी लागेल.
- श्री. बापूराव
 
व्यवहार प्रामाणिकपणेच केला पाहिजे
व्यापाराशी संबंधित स्वयंसेवकांची बैठक होती. व्यापारात थोडा फार खोटेपणा चालतोच. त्याशिवाय व्यापार करणे अशक्य आहे. खरे बोलणारा, प्रामाणिकपणे व्यवहार करणारा व्यापारी व्यापारात यशस्वी होणार नाही अशा प्रकारची अनेकांची धारणा होती.
 
श्रीगुरुजी म्हणाले की, व्यापारच काय, कोणत्याही व्यवसायात खरे बोलणारा, प्रामाणिकपणे आपला धंदा करणारा नेहमीच यशस्वी होतो. हे मात्र खरे की, यश मिळण्यासाठी त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. परंतु खरे बोलल्यामुळे, प्रामाणिकपणे व्यवहार केल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते, टिकून राहते आणि शेवटी त्याला धनलाभही होतो. आपल्या स्वयंसेवकांकडून अशीच अपेक्षा आहे. जसे इतर लोक करतात तसेच स्वयंसेवकांनी केले, लबाडी केली, फसवले, तर कदाचित लवकर पैसा मिळेल पण तो फार काळ आपल्याजवळ राहणार नाही. कोणत्याही व्यवसायाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व्यवहार करूनच आपण त्या क्षेत्रालाही समाजहिताला अनुकूल करू शकू. पहिल्या संघ बंदीच्या वेळी ज्यांनी सर्व गमावले होते अशा अनेक व्यावसायिक बंधुंनी प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या योगे पुन्हा आपली पूर्वीची प्रतिष्ठा आणि धन मिळविले.
- श्री. बापूराव
 
आपल्या संस्कृतीची विशेषता संघाच्या सहा उत्सवांमधून
''आपल्या संस्कृतीची विशेषता काय आहे? धर्म, संस्कृती इ. शब्द समजणे अवघड. आपली हिंदू संस्कृती सा¬या जगात वैशिष्टयपूर्ण आहे, श्रेष्ठ आहे असे आपण म्हणतो. ह्या हिंदू संस्कृतीची कोणती वैशिष्टये आहेत?'' बैठकीत एका स्वयंसेवकाने प्रश्न विचारला.
 
श्रीगुरुजी म्हणाले की, स्वयंसेवकांना हे लक्षात ठेवणे फार सोपे आहे. आपल्या डॉक्टरांनी संघाचे सहा उत्सव निश्चित केले आहेत. प्रत्येक उत्सवाच्या वैशिष्टयातूनच आपल्या संस्कृतीची वैशिष्टये ध्यानात येतील.
 
१) श्री गुरुपौर्णिमा व गुरुदक्षिणा - संघाच्या ध्येयावर व त्याच्या मार्गदर्शकावर पूर्ण निष्ठा. अधिकाधिक गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी ह्याचे नित्य स्मरण.
यस्य देवे पराभक्ति तथा देवे तथा गुरौ।

तस्यैते कथितां ह्येषां प्रकाशन्ते महात्मन:।
ध्येयावर तसेच मार्गदर्शनावर पूर्ण भक्ती असेल, तर अनेक कठीण प्रश्न सोडवण्याचा मार्ग स्वत:च्या बुध्दीनेच सापडतो.
२) रक्षाबंधन - समाज जीवनात स्त्री-पुरुषांच्या जीवनातील पावित्र्य.
३) विजयादशमी - विजयाची आकांक्षा.
४) मकर संक्रमण - समाजात मधुर, स्नेहमय संबंधांचे स्मरण. समाजजीवन ईर्षा तसेच स्पर्धेपासून मुक्त ठेवून आत्मीयतापूर्ण संबंधांचे स्मरण.
५) वर्षप्रतिपदा - संकल्प करून त्याची पूर्ती करण्याचा निश्चय. हा आपल्या डॉक्टरांचा जन्म दिवस असल्याने त्यांचा आदर्श स्वयंसेवकांसमोर स्वाभाविकपणे राहतो.
६) हिंदू साम्राज्य दिनोत्सव - कार्य करत असताना विजय प्राप्त करण्याचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या स्वयंसेवकांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असला पाहिजे, असे डॉक्टरांचे सांगणे असे.
- श्री. बापूराव
 
आपल्या हिंदू समाजाच्या संघटनेच्या कामाचा आधार - दैनंदिन संघ शाखा
संघ परिवारात अन्यान्य कामे वाढत होती. विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनसंघ, वनवासी कल्याणाश्रम इ. क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने संघाच्या विचारांचा प्रभाव वाढत होता. 1965 च्या शेवटी भारत - पाक युध्दात पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला. यामुळे विचार-विनिमयाचा विषय, दैनंदिन शाखेसंबंधी चिंता एवढा एकच न राहता अन्य क्षेत्रात होणा¬या प्रगतीची चिंताही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत होत असे. केवळ दैनंदिन शाखेची चिंता न करता, अन्य कामांवरही आपण भर दिला पाहिजे, अन्यान्य कार्यांचा अधिक विचार आपण केला पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन जेव्हा एका कार्यकर्त्याने केले तेव्हा श्रीगुरुजींनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले,
 
''आपल्या संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्याच्या आपल्या कार्यपध्दतीत चांगली संघशाखा, शाखेत येणा¬या समाजातील सर्व स्तरातील स्वयंसेवकांशी घनिष्ठ आणि आत्मीयतापूर्ण संपर्क, समाजाच्या अन्य घटकांशी मतभेद असूनसुध्दा आपलेपणाचे विश्वासाचे संबंध, ह्या संपर्काच्या आधारे त्यांच्या गुणांचा समाजाच्या सर्व क्षेत्रांना उपयोग व्हावा अशी आपली योजकता, शाखेच्या स्वयंसेवकांच्या या प्रकारच्या समाजव्यापी संपर्कामुळे तसेच शील चारित्र्यामुळे जनतेत आपल्याविषयी स्वाभाविकपणे निर्माण होणा¬या विश्वास - सूत्राच्याद्वारे संपूर्ण समाजाला आपल्या स्नेहपाशात बध्द करूनच आपण आपल्या समाजाला सुसंघटित करू शकू.
 
''संघाचे काम करताना समाजातील काही लोकांनी आपली प्रशंसा केली किंवा निंदा केली, त्यांच्या बोलण्याने किंवा लिखाणाने आपल्याला सुख होवो वा दु:ख दोन्हीचा आपल्यावर एकाच प्रकारचा परिणाम झाला पाहिजे, अधिक उत्साहाने दुप्पट वेगाने आपण आपल्या संघाचे काम आपल्या कार्यपध्दतीनुसार निरंतर करत राहिले पाहिजे.''
''किन्तु सुख दु:ख से सदा ही, एक सी अभिनन्दना ले।
बढ़ रहे हैं हम निरंतर, चिर विजय की कामना ले॥''
- श्री. बापूराव
 
आपल्या कार्याचा आधार
निष्ठा आपल्या कार्यावर असली पाहिजे. हे श्रेष्ठ ईश्वरीय कार्य आहे, ते यशस्वी होईलच असा पूर्ण विश्वास असला पाहिजे. पूजनीय डॉक्टरांच्या बैठकीत घडलेला एक प्रसंग श्रीगुरुजींनी सांगितला. पूजनीय डॉक्टरांनी विचारले, ''आपल्या कार्याचा आधार कोणता? आपण, अखिल भारतात पसरलेल्या या आपल्या हिंदू समाजाचे संघटन कशाच्या आधारावर करत आहोत?'' प्रत्युत्तरादाखल काही स्वयंसेवकांनी आपला भगवा ध्वज, भारतमातेसंबंधी श्रध्दा, संघावर निष्ठा या प्रकारचे काही विचार मांडले. एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने म्हटले की, आपले डॉ. हेडगेवार हेच संपूर्ण संघटनेचा आधार आहेत.
 
डॉक्टरांनी चर्चा समाप्त केली. परंतु ज्यांनी डॉ. हेडगेवार हेच आपल्या संघटनेचा आधार आहेत असे म्हटले होते त्यांच्याशी काही दिवसांनी अनौपचारिकपणे बोलताना डॉक्टर म्हणाले, ''एक व्यक्ती' हा संघटनेचा आधार असे प्रतिपादन करण्यात एक दोष निर्माण होतो. आज आपल्याला माझ्यात काही गुण दिसतात, त्यामुळेच आपल्याला तसे वाटते. परंतु मनुष्य स्खलनशील आहे. उद्या माझ्यात एखादा दोष दिसला तर, त्यांना जबरदस्त धक्का बसेल. म्हणूनच एक व्यक्ती हा संघाचा आधार आहे असे म्हणता कामा नये. चांगली शाखा हाच आपल्या कार्याचा आधार आहे.''
- श्री. बापूराव
 
नागपूरमध्ये १ फेब्रुवारी १९४८ चा दिवस
दिनांक १ फेब्रुवारी १९४८! नागपूरच्या नागोबा गल्लीत श्रीगुरुजींच्या घरावर प्रक्षुब्ध लोकांचे हल्ले सुरू झाले होते. दुपारी जिल्हाधिकारी श्री. गजाधर तिवारींच्या सूचनेनुसार पोलिसांच्या संरक्षक दलाने घराला वेढा घातला. संध्याकाळी दिल्लीतील श्री. वसंतराव ओकांशी फोनवरून बोलणे झाले. श्री. वसंतराव ओकांना सांगितले गेले की, श्रीगुरुजींच्या घरावर हल्ले होत आहेत. या बाबतीत सरदार पटेलांशी बोलणे करा. हल्ले बंद झाले पाहिजेत. नाहीतर अनर्थ होऊ शकतो. रात्री साडेआठ वाजता श्री. वसंतरावांचा नागपूरला फोन आला. श्रीगुरुजी तसेच अन्य काही प्रमुखांना प्रोटेक्टिव्ह कस्टडी (Protective Custody) द्वारा तुरुंगात न्यावे, अशा प्रकारचा आदेश सरदार पटेलांनी मध्यप्रदेशाला आताच दिला आहे. सुमारे दीड ते दोन तासात ही कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
 
श्री. भैयाजी दाणी, श्री. एकनाथजी रानडे यांना हा निरोप देण्यात आला. त्यांनी म्हटले की, श्रीगुरुजींना भेटून त्यांच्या सूचना लिखित स्वरूपात मिळवा, तोंडी नको. त्यांच्या तुरुंगात जाण्यासंबंधी स्वयंसेवकांना निश्चित स्वरूपाच्या सूचना हव्या.
पोलीस पहा¬यामुळे सरळ रस्त्याने श्रीगुरुजींच्या घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे दुस¬या मार्गाने श्रीगुरुजींच्या घरी गेलो. लिहिण्यासाठी पेन आणि पॅड समोर ठेवले. दिल्लीहून फोनने आलेला निरोप आणि भैयाजी, एकनाथजी यांनी लिखित स्वरूपात सूचना आणा असा दिलेला निरोप असे दोन्ही निरोप श्रीगुरुजींना सांगितले. श्रीगुरुजी म्हणाले, ''काहीही लिहून देण्याची आवश्यकता नाही. कारण काही दिवसातच ही वावटळ शांत होईल. तोपर्यंत संयमाने रहा.''
- श्री. बापूराव
 
संत तुलसीदासांच्या तत्त्वज्ञानावर व्यक्त केलेले विचार
बहुधा १९६४ ची गोष्ट असावी. गोस्वामी तुलसीदासांवर हिंदी भाषिक, तसेच अन्य भाषिक विद्वानांचा एक परिसंवाद योजलेला होता. हिंदीचे श्रेष्ठ साहित्यिक श्री. वियोगी हरि या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
 
श्रीगुरुजीही या कार्यक्रमास उपस्थित होते, परंतु त्यांना लगेच अन्यत्र कुठे जायचे होते म्हणून आपल्या आधी बोलण्याचा आग्रह स्वत: श्री. वियोगींनी श्रीगुरुजींना केला. श्रीगुरुजींचे विचार ऐकण्याची श्रोत्यांनाही उत्सुकता होती.
श्रीगुरुजींचे हे एक वैशिष्टय होते की, जो विषय त्यांना मांडायचा असेल त्या विषयाशी निगडित भावनेशी ते तत्काळ सहजतेने तादात्म्य पावत असत.
 
गोस्वामी तुलसीदासांच्या 'रामचरितमानसा'ची तात्त्वि ओळख करून देण्यासाठी श्रीगुरुजींनी एक दोहाच उद़्धृत केला.
राम-नाम मणिदीप धरु जीह देहरी द्वार।

तुलसी भीतर बाहिरों जो चाहेसि उजियार॥
आणि म्हटले, ''हा दोहा श्रीतुलसीदासांची समग्र चिंतनधारा, साधना आणि अनुभूतीचे उगमस्थान आहे. समग्र उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचा आरसा आहे. आपल्या अस्मिताशून्य, स्वाभिमान रहित, आत्मविस्मृत आणि विकृत आचरणशील राष्ट्राचे अंतर्बाह्य आकलन करून व्यक्ती व समाज जीवनाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी रामनामाची प्रतिष्ठापना केली. घोर अंधकारात बुडून गेलेल्या समाजाचे नाम महात्म्याच्या संदर्भात प्रबोधन करून प्रत्येकाच्या कंठात रामनाम-मणिदीप प्रस्थापित केला, ज्यामुळे तो अंतर्बाह्य, लौकिक-पारलौकिक, भौतिक-आध्यात्मिक, कर्म-ज्ञानरूप व तत्त्वमूलक अशा सर्व क्रियाकर्मांना तेजस्वी करेल, प्रकाशित करेल.''
 
''श्रीतुलसीदासांनी पराक्रमी, सत्यधाम, धर्मधुरीण रामाकरिता समर्पण व भक्ती जागरणाचा शंखनाद केला. श्रीतुलसीदासांच्या आधी होऊन गेलेल्या संत-आचार्यांचा ज्ञानोपदेश समाजाला एकसूत्रता देऊ शकला नव्हता. रामनामाच्या बळावर श्रीतुलसीदासांनी कर्म व ज्ञानाच्या पलिकडे निष्ठा आणि भक्तीची प्रतिष्ठापना केली. प्रेम, भक्ती व पूर्ण समर्पणाच्या भावनेने त्यांनी कर्म, उपासनेचे ज्ञान, द्वैत-अद्वैत, निर्गुण-सगुण इ. ची शिदोरी दिली. घोर नैराश्याने ग्रस्त जनमानसाला त्यांनी शाश्वत आशेचा आश्रय-किरण दिला. ज्याच्या आधाराने हिंदू समाज चैतन्यसंपन्न होऊन पुन्हा गतिशील झाला, त्याला आपल्या आध्यात्मिक शक्तीचा बोध झाला. रामनामाच्या केवळ स्मरणाने, पराक्रमी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या लोकप्रिय जीवनाने, त्याला आपल्याला घेरलेल्या संकटांशी झुंजण्याची प्रेरणा मिळाली, सामर्थ्य मिळाले. त्याला आदर्शाभिमुख व्यक्ती आणि समाज जीवनाचा अभ्युदय आणि नि:श्रेयसचा समन्वय उपलब्ध झाला. श्रीतुलसीदासांचे हे तत्त्वज्ञान सनातन सत्य आहे. आजच्या विषम स्थितीतही पूजनीय आहे.''
 
श्रोते भावविव्हल झाले. हिंदू संस्कृतीच्या सुगंधाने ज्यांचा प्रत्येक श्वास सुगंधित झाला आहे, ज्यांचे संवेदनशील हृदय क्षणोक्षणी हिंदू समाजासाठीच स्पंदन पावले आहे, संपूर्णपणे समर्पित झाले आहे, असे संततुल्य श्रीगुरुजी युगश्रेष्ठ लोकोत्तर संताचे जीवनदर्शन सूत्ररूपाने प्रस्तुत करत होते.
 
श्रीतुलसीदासांच्या जीवनदर्शनाची ही ओळख सर्व श्रोत्यांना अद्भुत होती.
- श्रीनिवास शुक्ल
 
एक संदेश
मद्रासमध्ये डॉ. करुणाकरन् यांचे 'मुरारी' नावाचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या अभ्यागत-पुस्तिकेमध्ये (व्हिजिटर्स-बुक) श्रीगुरुजींनी दिनांक ७ फेब्रुवारी १९७३ रोजी आपला संदेश लिहिला. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या त्या संदेशाचे मराठी रुपांतर असे आहे. -
'न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्॥'
''वरील प्रार्थना आपल्या जीवनाच्या सर्व कार्यांमध्ये प्रेरक आणि मार्गदर्शक होईल. जगात दु:खी आणि आर्त लोकांची संख्या खूप आहे. जीवनाचे याहून उच्च कोटीचे ध्येय दुसरे कोणते असूच शकत नाही. या रुग्णालयाच्या कल्पनेला ज्यांनी मूर्त रूप दिले, ते रुग्ण-सेवेचे प्रत्येक काम अत्युत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणून त्यांना आपल्या स्वीकारलेल्या कामात निश्चितच यश मिळेल. मी जगज्जननीला प्रार्थना करतो की, या रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन रोग्यांच्या सेवेसाठी सर्व सोयी लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात. या श्रेष्ठ कार्यात जे लागलेले आहेत त्यांना मी विनम्रपणे प्रणाम करतो.''
- ए. दक्षिणामूर्ती
 
राष्ट्र निर्माणाच्या पवित्र कार्यात सहभागी
श्रीगुरुजी १९४३ च्या मार्च महिन्यात पहिल्यांदाच सिंध प्रांताचा प्रवास करत होते. कराची येथील रामबागेत ब्रह्म समाज हॉलमध्ये सकाळी स्वयंसेवकांच्या पालकांची एक बैठक ठेवली होती.
 
एका सुखवस्तू पालकाने श्रीगुरुजींना म्हटले की, माझा मुलगा संघात सक्रीय आहे. आणि असे वाटते की, त्याला संघाचे वेड लागलेले आहे. माझी अशी खात्री आहे की, तो एक दोन वर्षांत शिक्षण पूर्ण करून संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडेल. यामुळे मी खूप संतापलेलो आहे. आमच्या त्याच्याकडून खूप मोठया अपेक्षा आहेत, कृपा करून आपण त्याला समजावून सांगा.
 
श्रीगुरुजी म्हणाले की, आपण केवळ आपल्या परिवाराचा विचार करता आहात, आपला मुलगा सारे राष्ट्र आणि त्यातील कोटयवधी परिवारांचा विचार करतो. आपले राष्ट्र संकटात आहे, जर राष्ट्र दुर्बळ राहिले, तर कोणत्याही परिवाराचा सन्मान सुरक्षित राहणार नाही. आपला मुलगा सर्वांच्या कल्याणासाठी काम करतो. आपल्याला याचा अभिमान वाटायला हवा. आपण आपल्या दुस¬या मुलांना तसेच शेजारच्या व नातेवाईकांच्या मुलांनाही राष्ट्रनिर्माणाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी सांगितले पाहिजे.
- सिंध डायरी
 
देशाची फाळणी
१९४७ चा ऑगस्ट महिना. कराची येथे ब्रह्म समाज हॉलमध्ये प्रमुख नागरिकांची बैठक होती. बैठकीस श्रीगुरुजी उपस्थित होते. देशाच्या संभाव्य फाळणीचे सावट सर्वांच्या मनावर होते. सिंधमधील प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्र 'सिंध ऑब्झर्वर'चे मुख्य संपादक श्री. पूनियांनी श्रीगुरुजींना प्रश्न विचारला, ''देशाची फाळणी आनंदाने स्वीकारण्यात वाईट काय आहे! एक हात तोडला तरी माणूस जिवंत तर राहतो ना?'' श्रीगुरुजी म्हणाले, ''नाक कापले तरी काही हरकत नाही, तरीही माणूस जिवंत राहतोच.'' श्री. पूनिया आणि सर्व नागरिक एवढे स्पष्ट आणि तर्कशुध्द उत्तर ऐकून सुन्न झाले. पण या उत्तराने सर्वांचे समाधान झाले.
- सिंध डायरी
 
गोहत्याबंदी स्वाक्षरी आणि दुष्काळ
१९५२ मध्ये सार्‍या भारतात गोवंश हत्या बंदीची चळवळ चालविण्याचा निर्णय संघाने घेतला. गोकुळ अष्टमीपासून पुढे एक महिनाभर प्रचाराची योजना तयार झाली. सभा, स्वाक्षरी संग्रह, ठराव इ. ची निश्चिती झाली. सर्व चळवळ शांततेने आणि समाजाचे प्रबोधन करण्याच्या हेतूने चालवली गेली. संघाचे स्वयंसेवक, समाजाच्या हजारो गोभक्तांना बरोबर घेऊन एका महिन्यात ८१ हजार गावी पोहोचले. महिन्याभरात पावणेदोन कोटी लोकांच्या स्वाक्षर्‍या गोळा झाल्या. भारताच्या आधुनिक इतिहासात आणि सार्‍या जगात हा सर्वात मोठा स्वाक्षरी संग्रह ठरला.
 
याचवेळी १९५२ मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. सारा धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त होता. जून महिन्याच्या सुरुवातीसच कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जनसंपर्क करण्याचे ठरविले. योजना तयार झाली. याच काळात गोवंश हत्याबंदीचीही चळवळ चालू होती. जरी सगळया जिल्ह्यात गावोगाव जनजागरण करून स्वाक्षरी अभियान चालविणे आवश्यक होते, तरी गावोगावी पाण्याच्या अभावाने, चा¬याच्या तसेच धान्याच्या अभावाने जनावरेच नाही, तर माणसेही मरणोन्मुख स्थितीत दिसत होती. लोक आपले गाव सोडून अन्यत्र कुठे आश्रयासाठी जात होते.
 
कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करून श्रीगुरुजींना एक पत्र लिहिले गेले. त्या पत्रात दुष्काळाची माहिती देऊन गोवंश हत्या बंदीची चळवळ चालविण्याविषयी संदेह व्यक्त केला गेला.
 
दुसर्‍या आठवडयात श्रीगुरुजींचे उत्तर आले. त्या पत्रात दुष्काळाच्या तीव्रतेची अनुभूती होती. पत्रात पुढे म्हटले होते की, गावक¬यांची दुरवस्था, शेती तसेच जनावरांची दुर्दशा अंत:करणाला घरे पाडणारीच आहे. म्हणून त्यासाठी लोकांना जी जी मदत लागेल ती आपण केली पाहिजे. आपण त्या दृष्टीने काही योजना तयारही केली असेल. समाजातील सर्व बांधवांचे सहकार्य अवश्य घेतले पाहिजे. स्थानिक स्थितीच्या चिंतनाबरोबरच देशाच्या स्थितीचे चिंतन केले पाहिजे. गोवंश हत्या बंदीची आवश्यकता, जनमानसात त्यासाठी श्रध्दा जागरण तसेच एकात्मतेच्या अनुभूतीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी काम करत असतानाही ह्या महत्त्वाच्या समस्येकडे समाजाचे ध्यान आकृष्ट करणे अतिशय आवश्यक आहे.
 
श्रीगुरुजींचे हे पत्र सर्व कार्यकर्त्यांना वाचण्यास दिले. याचा परिणाम म्हणून जिल्हा कार्यवाहाने म्हटले की, आपण एक महिना या कार्याला देऊ आणि जिल्ह्याच्या ७२५ गावांमधून एक लाख स्वाक्षर्‍या गोळा झाल्या.
- नाना ढोबळे
 
जिद्दीने आणि तळमळीने प्रयत्त्न केले पाहिजेत
दर वर्षाप्रमाणे पुण्यात संघ शिक्षा वर्गास प्रारंभ झाला. या काळात प्रांतातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीचा समारोप श्रीगुरुजी करत होते. ते कार्याच्या वाढीसाठी जिद्दीने आणि तळमळीने प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन करत होते. त्यांनी पुढे म्हटले की, मला एका प्रचारकाचे पत्र मिळाले आहे. त्याने आपल्या पत्रात स्वत:चा अनुभव सांगताना असे म्हटले आहे की, जी शाखा ६-७ महिने प्रयत्त्न करूनही चालली नाही ती संघकार्याला होणार्‍या विरोधामुळे आता नियमितपणे भरते. थोडे थांबून श्रीगुरुजी म्हणाले की, काही लोकांनी संघ समाप्त करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की, परमेश्वराने त्यांना आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे बळ द्यावे. आपल्या सर्व शक्तीनिशी संघ कार्य वाढविण्याची प्रतिज्ञा आपण घेतली आहे याचे स्मरण सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. आपण आपले संघकार्य करत राहिले पाहिजे.
- नाना ढोबळे
 
निरनिराळया भाषांचे अध्ययन
एकदा नाशिक संघचालक प्रा. भाऊसाहेब गोविलकर आपल्या ५-६ प्राध्यापकांसमवेत बैठकीस आले. सर्वांना श्रीगुरुजींची ओळख होती. श्रीगुरुजींनी भाऊसाहेबांना म्हटले की, या सर्वांसाठी एक योग्य कार्य आहे. त्यांनी त्याचे चिंतन केले पाहिजे. त्यांच्या महाविद्यालयात जे बुध्दिवान विद्यार्थी आहेत त्यांना जगातील निरनिराळया भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आता हे जग जवळ येत चालले आहे. जगातील निरनिराळया मुत्सद्यांशी आपल्या राजकर्त्यांचा संपर्क येतो. केवळ संरक्षणच नव्हे, तर उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र इ. अनेक विषय असतात. अशा वेळी समन्वयकाच्या (दुभाषी) रूपाने विश्वासू देशभक्ताची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या राज्यकर्त्यांना त्या देशांचे सम्यक् ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी अशा लोकांची गरज असते. यासाठीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
- नाना ढोबळे
 
व्यापारी बंधूंना नवी दृष्टी
नगरचे व्यापारी तसेच व्यावसायिक बंधुंना संघकार्याची ओळख व्हावी आणि हळूहळू त्यांना संघकार्यात सक्रीय करावे या दृष्टीने त्यांना वेळोवेळी संघकार्यालयात आणण्याचा प्रयत्त्न होत असे. त्यांना श्रीगुरुजींना भेटण्याची तसेच त्यांच्याशी चर्चा करण्याची संधीही दिली जात असे.
 
अशाच एका कार्यक्रमात एकदा प्रमुख व्यापारी श्री. कोठारी आले होते. ते दुर्गादेवीचे उपासक होते आणि दुर्गा-सप्तशतीचा नित्य पाठ करत असत.
 
त्यांची अशी ओळख झाल्यावर श्रीगुरुजींनी त्यांना म्हटले की, दुर्गा सप्तशतीत अंकित देवी अथर्वशीर्षमध्ये 'अहं राष्ट्री संगमनी' असा उल्लेख आलेला आहे. आपण ते वाचले आहे का? स्पष्टीकरण करताना श्रीगुरुजींनी सांगितले की, राष्ट्राची सेवा ही भगवती मातेची सेवा आहे. याहून संघकार्य वेगळे आहे का?
 
श्रीगुरुजींच्या या मौलिक विचारामुळे श्री. कोठारी तसेच येथे उपस्थित असलेल्या अन्य व्यापारी बंधूंना एक नवी दृष्टी तसेच दिशा मिळाली. त्यामुळे ते संघाच्या अधिक जवळ आले आणि सक्रीयही झाले.
- श्री. कासखेडीकर