अतूट आत्मविश्वास
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
आत्मविश्वास
श्रीगुरुजींचे मनोधैर्य आणि आत्मविश्वास असामान्य होता. १९४८-४९ ची बंदी उठल्यानंतर एकदा आग्रा येथे माथुर वैश्य इंटर कॉलेजमध्ये विभागातील कार्यकर्त्यांची बैठक होती. काही कार्यकर्त्यांचा निराशेचा सूर होता. आता काम वाढणे अवघड, अशी त्यांची धारणा बनली होती. यावर श्रीगुरुजींनी कणखरपणे म्हटले की, आपण काय करू शकता आणि किती करू शकता हे आपल्यालाच माहीत. मी मात्र आपल्या स्वत:च्या बाबतीत असे म्हणू शकतो की, जरी आपण सगळयांनी मिळून मला सहकार्य दिले नाही, तरीदेखील मी एकटा पुन्हा एकदा संघाचे काम उभे करून दाखवीन. हे आत्मविश्वासाचे बोल ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांची निराशा दूर झाली आणि आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मोठया उत्साहाने आखली गेली.
- कृष्ण सहाय
 
आत्मविश्वास
भारताच्या फाळणीपूर्वी श्रीगुरुजींनी दोन-दोन जिल्ह्यांचा प्रवास केला. त्याच अनुषंगाने ते उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील बदायूँ या जिल्ह्याच्या ठिकाणी आले. त्या काळात सर्व हिंदूंची भावना अशी होती की, सा¬या देशात हिंदू संघटनेच्या आधारे किंवा संघ-शाखेच्या माध्यमातूनच आपण आपला परिवार, मंदिरादि आपली श्रध्दास्थाने तसेच हा देश वाचवू शकू. आणि म्हणून असंख्य लोकांचा कल संघाकडे मोठया प्रमाणात झुकत होता. श्रीगुरुजी येणार म्हणून अपार जनसागर कार्यक्रमाच्या ठिकाणी उसळला होता. श्रीगुरुजींचे उद्बोधक, दिशा देणारे, धीर गंभीर भाषण झाले. कार्यक्रम झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक होती. बैठक माडीवर होती. श्रीगुरुजी जिन्याने वर गेले. तेवढयात पाठीमागे कोणीतरी श्रीगुरुजींना म्हटले की, सांभाळून! पाय घसरेल! तेव्हा श्रीगुरुजींनी गंभीरपणे आणि आत्मविश्वासाने उद्गार काढले की, गोळवलकर जीवनात कधी घसरणे, पडणे शिकला नाही.
- उमाशंकर