समाजजीवनाचे आदर्श
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
आता समाजाशी आपला ज्या विविध क्षेत्रांत संबंध येतो - उदा. आपले कुटुंब, आपले शेजारी, आपली शिक्षणकेंद्रे, आपले व्यवसायक्षेत्र, त्यांचा विचार करूया. जीवनाच्या या सर्वच क्षेत्रांत हिंदूंनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. इतकेच नव्हे, तर मानवी जीवनाच्या लहानमोठया सर्व व्यापांचा सर्वंकष विचार कोणी केला असेल तर तो हिंदू तत्त्वज्ञानानेच होय. आपल्या दृष्टीने कुटुंब ही आत्मविस्ताराची पहिली पायरी आहे. म्हणून कुटुंबातील घटक या नात्याने आपली जी कर्तव्ये असतील ती, कुटुंबातील सर्व मंडळींचे परस्परजिव्हाळयाचे संबंध आणि एकत्व व्यवस्थित व सुरक्षित राहतील अशा रीतीनेच पार पाडली पाहिजेत. पुत्र, बंधू, पती किंवा जे कोणते नाते असेल त्याबाबतचा उच्च हिंदू आदर्श आपण आपल्यासमोर ठेवला पाहिजे. ''अहो, मी समाजकार्य करीत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची चिंता मी कशाला करीत बसू ?'' असे म्हणणे हे आपल्याला भूषणास्पद नाही. आपल्या देशातील थोर आदर्शांकडे पाहा. वडिलांच्या आदेशाप्रमाणे श्रीराम बालवयातच राक्षसांचा नि:पात करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर वनात निघून गेले. पुढे पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी चौदा वर्षे आनंदाने वनवास पत्करला. भाऊ म्हणून लक्ष्मणाबद्दल व इतरांबद्दल त्यांच्या मनात केवढे अपार प्रेम होते ! आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श शिष्य - आणि त्याच्या वैऱ्यांचा आदर्श शत्रूही - या सर्व दृष्टींनी रामचंद्र हे एक आदर्श हिंदू पुरूष होते. श्रीकृष्णही असेच आदर्श पुरूष होते. नंद व यशोदा यांच्या दृष्टीने श्रीकृष्ण म्हणजे अखंड आनंदाचा स्त्रोत होता. आपल्या गोड वागणुकीने त्याने आपल्या निकटवासीयांना कसे भारून टाकले होते!
 
विद्यार्थिदशेत नुसती भरपूर माहिती डोक्यात ठासून भरण्याचा काही उपयोग नाही, विद्यार्जन आणि शीलाची जोपासनाही केली पाहिजे असा आपला आग्रह असे. आपण केवळ 'पुस्तकातले किडे' होता कामा नये. मनाची एकाग्रता ही सर्व विद्यार्जनाची गुरूकिल्ली आहे. शरीराला व मनाला नियमितपणे चांगल्या सवयी लावून मनाची एकाग्रता वाढविणे अवघड नाही. विविध शिक्षणसंस्थांमध्ये आपण अध्ययन करीत असतो. तेथे अध्यापक व सहाध्यायी यांच्याशी आपला संबंध योते, हिंदू परंपरेनुसार गुरू-शिष्यांचे नाते हे केवळ एखाद्याकरारासारखे नसते. ते नाते अतिशय उदात्त स्वरूपाचे आहे. गुरू म्हणजे ज्ञान व दिव्यत्व यांची साक्षात मूर्ती आहे असे शिष्य मानतो आणि त्याच्याशी अतिशय नम्रतेने व आदराने वागतो.
 
असे म्हटल्याबरोबर आज काहीजण लगेच विचारतात, की सध्याचे अध्यापक अशा आदराला खरोखर पात्र असतात काय ? परंतु विद्यार्थ्यांनी या विपर्यस्त दृष्टिकोनाला बळी पडू नये. जो आदर्श आहे, त्यानुसारच आपण वागावे. त्यातच आपले हित आहे. त्यातच आपली प्रगती आहे. देवळात जाऊन आपण हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतो. नित्य शेंदूर लावल्यामुळे काही काळानंतर त्या मूर्तीवर शेंदराची एवढी दाट पुटे चढतात की, त्या मूर्तीचे रूप ओळखूही येणार नाही इतके पालटून जाते. तरीही त्याच निष्ठेने हनुमान म्हणून त्या मूर्तीची पूजा होत असते. विद्येची देवता विनायक या देवतेचे पोट विशाल आहे आणि डोके हत्तीचे आहे, पण केवळ तेवढयामुळे त्यावरील भक्तीमध्ये उणेपणा येत नाही. स्वत: जगद्गुरू असूनही सांदीपनींच्या आश्रमात एखाद्या सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आदर्श पाहा. श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये एका आदर्श हिंदू विद्यार्थ्याचे चित्र तुम्हाला दिसेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ते आपल्या गुरूची अत्यंत प्रेमाने व भक्तीने सेवा करीत. यज्ञासाठी वाळलेली लाकडे आणण्यासाठी भर पावसात व वादळात जंगलात जात. वस्तुत: ते स्वत: ज्ञानाची साक्षात् मूर्ती होते. त्यांना आणखी शिकायचे ते काय होते?
 
आपले मित्र व सहाध्यायी यांच्यात ते कसे वावरत होते हेही पाहण्यासारखे आहे. सर्वांविषयी त्यांच्या मनात किती गाढ आणि विशुध्द प्रेम होते! सांदीपनींच्या आश्रमात सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मणपुत्र त्यांचा वर्गबंधू होता. पुढे मोठा झाल्यावर श्रीकृष्णांची दूरवर पसरलेली कीर्ती ऐकून गरीब सुदामा फाटकेतुटके कपडे घालून बरोबर मूठभर पोहे घेऊन आपल्या जुन्या वर्गबंधूला भेटावयास निघाला. सुदाम्याला पाहताक्षणीच श्रीकृष्ण धावत पुढे आले आणि त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. आपल्या मित्राने आणलेली पोह्यांची ती मौल्यवान भेट श्रीकृष्णांनी त्याच्याजवळून ओढून घेतली आणि मोठया आवडीने खाऊन टाकली. त्यांनी नंतर सुदाम्याला अपार धनही दिले.
 
कदाचित काही मुद्यांबाबत वडीलमंडळींशी आपले वैचारिक मतभेद असले तरीही त्यांच्याशी असलेल्या आपल्या आदरयुक्त व्यवहारात बदल होण्याचे काहीही कारण नाही. भारतीय युध्दात भीष्म आणि अर्जुन समोरासमोर उभे ठाकले, तेव्हा अर्जुनाने पहिले पाच बाण त्यांच्या पायाशी सोडले. अर्जुनाचे अचूक बाण भीष्मांच्या छातीवर न येता नेमके त्यांच्या पायापाशी येत असलेले पाहून भीष्मांचा सारथी आश्चर्यचकित झाला. भीष्म त्याला म्हणाले, ''माझा प्रिय शिष्य अर्जुन माझे आशिर्वाद मागण्यासाठी आपल्या पंचप्राणांनिशी मला प्रणिपात करीत आहे.'' या सर्व पुराणातल्या कथा आहेत असे म्हणून त्या बाजूस सारता कामा नये. साऱ्या जगाला हेवा वाटावा असे हिंदू जीवन ज्या संस्कृतीने घडविले तिच्यातील काही अमोल रत्ने त्या कथांमध्ये गुंफलेली आहेत. आजच्या काळात ती जीवनमूल्ये आचरणात आणणे असंभव आहे असे म्हणून ती टाकून देता कामा नये. कारण आजच्या या विसाव्या शतकातही अशी स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आढळतात. संघाचे संस्थापक, आपले डॉ. हेडगेवार यांचे एक उदाहरण आहे. संघाच्या कामासाठी ते एकदा पुण्यास गेले असता, त्यांचे पुण्याच्या ज्या प्रतिष्ठित मंडळींसमोर भाषण व्हावयाचे होते त्यामध्ये त्यांचा एका जुन्या शिक्षकांनाही बोलावले होते. पुण्यातील अनेक प्रमुख मंडळी सभेला जमली होती. ते वृध्द शिक्षक थोडे उशिरा आले. डॉक्टरांनी त्यांना पाहिले मात्र, ते उठले, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आपल्या जागी त्यांना नेऊन बसविले. (ते शिक्षक काँग्रेस पक्षाचे होते व संघाविरूध्द नेहमी गरळ ओकणारे, पण त्यामुळे डॉक्टरांचे त्यांच्याविषयी प्रेम व आदर कधी कमी झाला नाही.)