स्वयंसेवकांवरील चांगले संस्कार
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
ती पहिली बैठक
१९४३ मध्ये पंजाब व गुजरात दोन्ही प्रांतांचा संघ शिक्षा वर्ग गुजरात प्रांतात बडोदा येथे होता. त्यावेळी मी अमृतसरमध्ये शिकत होतो. तेथूनच संघ शिक्षा वर्गाच्या प्रथम वर्षासाठी बडोद्यास गेलो होतो. वर्गात सरसंघचालक श्रीगुरुजी येणार असल्याची सूचना आम्हाला मिळाली. मला पहिल्यांदाच श्रीगुरुजींचे दर्शन घेण्याचा योग होता. त्यांच्या दर्शनाची उत्सुकताही होती. श्रीगुरुजी ठरलेल्या कार्यक्रमानुसार बडोद्याच्या वर्गात आले.
 
ठरल्याप्रमाणे श्रीगुरुजींचे वर्गातील कार्यक्रम सुरू झाले. प्रभात व सायं शाखांतून आलेल्या स्वयंसेवकांच्या जिल्हाशः बैठका झाल्या. त्या काळात प्रांताच्या काही जिल्ह्यातीलच स्वयंसेवक वर्गात येत असत. श्रीगुरुजी बैठकीत प्रत्येक स्वयंसेवकास नाव, वडिलांचे काम, ठिकाण, शिक्षण इ. गोष्टी विचारत असत. या परिचयाच्या कार्यक्रमात अनेक वेळा हास्यविनोदाचे अनेक प्रसंग श्रीगुरुजींच्या बोलण्यात येत असत. तो निर्भेळ आनंदाचा विषय असे. या खेळीमेळीच्या वातावरणात श्रीगुरुजी व्यक्तीची नीट ओळख करून घेऊन त्यास योग्य ते मार्गदर्शनही करत असत.
 
जेव्हा माझ्या परिचयाची पाळी आली तेव्हा मी उभे राहून नाव वगैरे सगळे एका दमात सांगून टाकले, खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे ते हसून म्हणाले की, तुम्ही पंजाबात कसे गेलात? मी हा प्रश्न ऐकून आश्चर्यचकित झालो. माझ्या लक्षात येईना की मी पंजाबचा रहाणारा नसून माझा जन्म गढवालमध्ये झाला आहे हे यांना कसे माहीत झाले? मी घाबरून डोके हलवून म्हटले की, होय मी गढवालचाच रहाणारा आहे. जवळचा माणूस जसा घरातील सर्वांची चौकशी करतो त्याप्रमाणे त्यांनी मला घरातील वडिलांचे काम आणि इतरही काही प्रश्न विचारले. मी देखील ज्याप्रमाणे कुटुंबात मोठया माणसासमोर निःसंकोचपणे बोलले जाते त्याप्रमाणे श्रीगुरुजींच्या प्रश्नांना उत्तरे देत गेलो.
 
त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला की, तुमचे लग्न झाले आहे का? मला संकोचल्यासारखे झालेच पण मी बुचकळयातही पडलो की, हे असे का विचारत आहेत? मी काही उत्तर दिले नाही. त्यांनी पुन्हा विचारले की, तुमच्या वडिलांनी अजूनपर्यंत तुमच्या लग्नाची गोष्ट कधी काढली नाही? मी म्हणालो की, वडिलांनी काढली होती, पण मीच वडिलांना सांगून टाकले की, मी या झगडयात पडणार नाही. झगडयाचे नाव ऐकले व ते म्हणाले, की हा झगडा कसा? माझे आणि तुमचे पिता, दादा, नाना इ. सा¬यांनी जे केले तो झगडा कसा काय? त्यांनी माझे नाव या गोष्टीमुळे 'झगडा' असे ठेवले. पुढे जेव्हा जेव्हा माझी संघाच्या कार्यक्रमात त्यांची भेट होई तेव्हा ते मला झगडा या नावानेच बोलावत असत. मी बडोद्याच्या संघ शिक्षा वर्गाच्या त्या बैठकीनंतर, श्रीगुरुजींच्या आत्मीयतापूर्ण व्यवहारामुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळेच संघाच्या कामासाठी बाहेर पडण्याचा निश्चय केला.
- देवेंद्र शास्त्री
 
स्वयंसेवकांची मानसिकता ओळखून मार्गदर्शन
मी १९४५ मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षासाठी नागपूरला गेलो होतो. आमच्या रहाण्याची व्यवस्था नील सिटी स्कूलच्या वसतिगृहात होती. श्रीगुरुजींचे ओळीने तीन बौध्दिक वर्ग झाले. बौध्दिकच्या वेळी काही स्वयंसेवक ऐकता ऐकता झोपत असत. श्रीगुरुजींना याची कल्पना होती. दुस¬या दिवशी जेव्हा श्रीगुरुजींचे बौध्दिक सुरू झाले तेव्हा श्रीगुरुजींनी सुरुवातीसच सांगितले की, मी बोलण्याच्या आधी एक आवश्यक सूचना देतो. आम्ही सर्व स्वयंसेवक थोडे गोंधळल्या सारखे झालो. स्वतः श्रीगुरुजी सूचना देणार म्हणजे ती अतिशय महत्त्वाचीच असणार अशी आमची समजूत. आता ती कोणती सूचना देणार याचे आम्हाला कुतूहलही होते. नील सिटी मध्ये एक छोटासा पाण्याचा हौद होता. तो त्या दिवसांत कोरडा पडला होता. स्वयंसेवक त्या हौदाच्या चारी बाजूंना बौध्दिकासाठी बसत असत. श्रीगुरुजींनी सूचना दिली की, हौदाच्या बाजूला जे स्वयंसेवक बसले आहेत त्यांनी हौदाच्या काठापासून थोडया अंतरावर बसावे कारण झोप आल्यावर हौदात पडून कोणाला जखम होऊ नये म्हणून. माझ्या ध्यानात आले की श्रीगुरुजींच्या या सूचने मागे जो भाव होता तो लक्षात घेऊन कोणत्याही स्वयंसेवकाने बौध्दिक वर्गात झोपण्याचे धाडस केले नाही.
- देवेंद्र शास्त्री
 
माझ्या पाया पडू नका
जेव्हा श्रीगुरुजी अलीगडला येत असत किंवा तेथून परत जात असत तेव्हा मी त्यांच्या पाया पडत असे. एक दोनदा ते मला काही म्हणाले नाहीत परंतु त्यांनी मला समजावून सांगितले की, संघामध्ये व्यक्तिनिष्ठे ऐवजी ध्येयनिष्ठेला महत्त्व दिले जाते. आपण जर माझ्या पाया पडलात, तर अन्य स्वयंसेवकही तसे करू लागतील आणि अशा प्रकारे ज्या वेळात मी स्वयंसेवकांसमोर काही विचार ठेवू शकलो असतो तो बराचसा वेळ वाया जाईल. अशीच एक घटना एकदा चन्दौसी गावात झाली. अलीगड जिल्ह्यातील सिकंदराराऊचे श्री. रमेशचंद्र श्रीगुरुजींच्या पाया पडू लागले तेव्हा श्रीगुरुजींनी त्यांचा हात पकडला. श्री रमेशचंद्र म्हणाले, ''आपण आपले शरीर राष्ट्राला अर्पण केले आहे त्यामुळे आपल्या पाया पडून आम्ही राष्ट्राविषयी श्रध्दा व्यक्त करत असतो.'' यावर श्रीगुरुजी म्हणाले की, ज्याच्या पाया पडले जाते त्याचे आयुष्य कमी होते. जर माझे आयुष्य कमी करण्याची आपली इच्छा असेल तर अवश्य माझ्या पाया पडा.
- कृष्ण सहाय
 
'वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि'
१९४४ मधील नागपूर संघ शिक्षा वर्गातील ही घटना! मी आपल्या हायस्कूलच्या परीक्षेनंतर, दिल्ली प्रांतातील स्वयंसेवकांबरोबर तृतीय वर्षासाठी नागपूरच्या वर्गात गेलो होतो. माझे परीक्षेचे पेपर्स फारसे चांगले गेले नव्हते आणि मी पास होण्याची शक्यताही फार कमी होती.
 
जून महिन्याच्या तिस¬या आठवडयात दोन किशोर स्वयंसेवक दुपारी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की, आपल्याला श्रीगुरुजींनी बोलावले आहे. मला कुतूहल, उत्सुकता, जिज्ञासा तर होतीच पण शंकाही येत होती. की श्रीगुरुजींनी आपल्याला कशासाठी बोलावले असावे! मी श्रीगुरुजींना भेटल्यावर मला श्रीगुरुजींनी विचारले की, परीक्षा कशी झाली? मी सांगितले की, पेपर साधारण बरे गेले आहेत. त्यांनी पुन्हा विचारले की, पास होणार? मी म्हणालो की, गणिताचा पेपर जरा कठीण गेला, त्यामुळे फारशी आशा नाही. मग त्यांनी दिल्ली प्रांतप्रचारकांनी पाठवलेली तार मला दिली आणि म्हणाले की, जा मिठाई खाऊन तोंड गोड कर. मी रोमांचित झालेल्या मनाने सिटी स्कूलच्या निवासस्थानी परत आलो आणि प्रांताच्या कार्यकर्त्यांना सूचना दिली. सर्वांना मोठा आनंद झाला. प्रांत प्रमुख श्री. भूपालसिंहांच्या सल्ल्यानुसार असे ठरले की, नगरातील एखाद्या चांगल्या हलवायाकडून मिठाई आणायची आणि दुस¬या दिवशी दुपारच्या बौध्दिकवर्गानंतर सर्वाधिका¬यांच्या निवासस्थानी सर्वांनी जाऊन ती वाटायची.
 
दुस¬या दिवशी दुपारच्या बौध्दिकवर्गानंतर आम्ही मिठाई घेऊन सर्वाधिका¬यांच्या निवासस्थानी पोहोचलो, तेथे प. पू. सरसंघचालकांचे तत्कालीन निजी सचिव श्री. के. डी. जोशी यांच्या अनुमतीने सर्वप्रथम मा. सर्वाधिकारी श्रीमान् बाबासाहेब कोलते आणि अन्य उपस्थित वर्गास मिठाई वाटली आणि नंतर आम्ही सर्वांनीही ती खाल्ली. श्रीगुरुजी त्यावेळी तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची मिठाई तेथेच ठेवली.
 
त्याच दिवशी सायंकाळी प्रार्थनेनंतर श्रीगुरुजींनी संघस्थानावरच मला बोलावले आणि विचारले की, तुम्ही कुणाला विचारून सर्वाधिका¬यांच्या निवासस्थानी मिठाई वाटली? मी उत्तर दिले की, श्री. जोशींच्या अनुमतीने मी मिठाई वाटली. श्रीगुरुजी म्हणाले की, सर्वाधिका¬यांच्या अनुमतीशिवाय मी तेथे बैठकही घेत नाही आणि तुम्ही मात्र अनुशासन विसरून अशा गोष्टी करता! शेकडो स्वयंसेवकांसमोर माझी स्थिती दयनीय झाली होती. डोळयांसमोर अंधेरी आली, पायाखालची जमीन जणु घसरली. मी स्तब्ध होऊन त्यांची वज्रासारखी गंभीर कठोर वाणी ऐकत राहिलो. दोन मिनिटातच आपले रौद्ररूप सोडून श्रीगुरुजी शांत, स्निग्ध स्मित हास्य करत इतर स्वयंसेवकांसमवेत इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आपल्या निवासस्थानी गेले आणि स्वयंसेवकांचे गण देखील नेहमीप्रमाणे आपापल्या निवासस्थानी पोहोचले. माझी स्थिती मोठी विचित्र झाली होती. पश्चातापाने दग्ध होऊन हरवून गेल्यासारखा मी कसाबसा आपल्या निवासस्थानी आलो. दोन दिवस उदास वाटत होते, कुठल्या कामात मन लागत नव्हते, कुणाशी बोलण्याची इच्छा होत नव्हती, काही खावे प्यावेसे पण वाटत नव्हते.
 
दोन दिवसांनंतर पुन्हा सायंकाळच्या प्रार्थनेनंतर श्रीगुरुजी आपल्या स्थानावरून दोन पावले पुढे आले आणि मला बोलावून अत्यंत प्रेमाने त्यांनी मला माझे क्षेम कुशल विचारले. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी मला सांगितले की, योग्य तो विचार करण्यास शिकले पाहिजे. ते मोकळेपणाने हसले, मला आपल्या छातीशी घेऊन त्यांनी मोठया प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझे हृदय भरून आले. मी आपले सारे दुःख विसरून गेलो. माझी खिन्नता दूर झाली. मी भावविव्हल झालो. मला जाणीव झाली की, 'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ह्यालाच म्हणतात.
- रतन भट्टाचार्य
 
औपचारिकता नको
एका कार्यकर्त्यांना विद्यालय पत्रिकेत श्रीगुरुजींचा आशीर्वाद छापायचा होता, त्यासाठी त्यांनी मला विचारले. मी त्या कार्यकर्त्यांना सांगितले की, तुम्ही त्यांना पत्र लिहा. त्या कार्यकर्त्यांनी पत्रात एक वाक्य असे लिहिले जे गुरुजींना रुचले नाही. ते वाक्य असे होते की, ' मै आपको कुछ कष्ट देना चाहता हूँ' (मी आपल्याला थोडे कष्ट देऊ इच्छितो.) श्रीगुरुजींनी स्वतः पत्राचे उत्तर लिहिले की, आपल्याला समजेल अशी आणि ज्यामुळे मी अपराधी गणला जाईल अशी कोणत्याही प्रकारची चूक मी केलेली नाही. परंतु न कळत काही त्रुटी राहून जाऊ शकते. आणि जर असे असेल तर आपण जो दंड (कष्ट) मला द्याल तो मी स्विकारीन.
 
त्याच वर्षी त्या कार्यकर्त्यांना द्वितीय वर्षासाठी संघ शिक्षा वर्गात जायचे होते. त्यांना संकोच वाटत होता, पण सर्वांच्या आग्रहामुळे ते गेले. वर्गात सीतापूर विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीत हे कार्यकर्ते परिचयासाठी उभे राहिले. त्यांनी नाव सांगताच श्रीगुरुजींनी त्यांच्याकडे रोखून पाहिले. त्यांनी मान खाली घातल्यावर श्रीगुरुजींनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. बैठकीनंतर श्रीगुरुजींनी मला विचारले की, आपण आपल्या स्वयंसेवकांना काय शिकवता? त्यांना स्पष्ट तसेच निःसंकोचपणे बोलण्याचा अभ्यास नाही का? श्रीगुरुजींनी ओळखले होते की, हा तोच स्वयंसेवक आहे ज्याने ते वाक्य (मैं आपको कुछ कष्ट देना चाहता हूँ) लिहिले होते. श्रीगुरुजींची अपेक्षा अशी असे की, प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्याशी नि:संकोचपणे बोलावे, स्वयंसेवकाने जीवनांत धीटपणे राहिले पाहिजे. आपल्यामध्ये औपचारिकतेची गरज नाही.
- संकठा प्रसाद सिंह.
 
अप्रामाणिकपणा राष्ट्रासाठी घातक
एकदा एका शिबिरात श्रीगुरुजी उपस्थित होते. जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांचे शिबीर होते. ते दुरूनच एका गणाचे कार्यक्रम पहात होते. दोन पक्ष करून खेळ चालला होता. एका पक्षाने अप्रामाणिकपणे खेळ खेळून खेळात विजय मिळवला. शिक्षकाचे खेळाकडे नीट लक्ष नव्हते पण लांब असूनही श्रीगुरुजींचे होते. प्रार्थना झाली आणि विकीर झाल्यानंतर सर्वजण त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. अनेक गप्पागोष्टी झाल्या. त्यात त्यांनी शिबीरात झालेल्या खेळाचा प्रसंगही सहजतेने आणला आणि असे म्हटले की, खेळात दाखवलेला अप्रामाणिकपणाही राष्ट्रासाठी घातक ठरतो. जीवनात प्रामाणिकपणा येण्यासाठी छोटया छोटया गोष्टींकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रभक्त तोच होऊ शकतो जो प्रामाणिक आहे.
- संकठा प्रसाद सिंह
 
प्रसिध्दीपासून दूर
सन १९५३ मध्ये केंद्रीय योजनेप्रमाणे ज्या गावी संघाचे काम चांगले होते तेथे श्रीगुरुजींचे कार्यक्रम झाले. ३० जानेवारी १९५३ रोजी असाच एक कार्यक्रम सीतापूर जिल्ह्यातील हरगाँव नावाच्या गावी झाला. ज्यावेळी श्रीगुरुजी कार्यक्रमासाठी व्यासपीठाकडे चालले होते, त्यांच्या मागोमाग लखीमपूरचे पं. श्यामनारायण मिश्र आणि मीही होतो. मार्गाच्या कडेलाच शिवकुमार खंडेलवाल नावाचा स्वयंसेवक श्रीगुरुजींचा फोटो काढण्यासाठी उभा होता. पण श्रीगुरुजींनी लगेच त्याच्याकडून कॅमेरा हिसकावून घेतला आणि ते व्यासपीठाकडे निघूनही गेले.
 
या कार्यक्रमासाठी तयार केलेले व्यासपीठ भव्य होते. मोठमोठया दगडांनी कैलास पर्वतासारखी प्रतिमा तयार केलेली होती. वरच्या बाजूस प. पू. डॉक्टरांचे चित्र लावलेले होते. आणि खाली श्रीगुरुजी भाषण देत होते. कार्यक्रम संपल्यावर प्रांताचे तत्कालीन प्रमुख श्री. माधवराव देशमुखांना श्रीगुरुजी म्हणाले की, असे भव्य व्यासपीठ माझ्यासारख्या व्यक्तीला अनुरूप नाही. माझ्या समजुतीप्रमाणे तेव्हापासून श्रीगुरुजींसाठी सामान्य व्यासपीठाची व्यवस्था होऊ लागली. असे होते श्रीगुरुजी, प्रसिध्दीपासून दूर रहाण्याची इच्छा असणारे.
- रामदुलारे मिश्र
 
अनौपचारिक गप्पागोष्टीतून बहुमोल संस्कारांची उपलब्धी
श्रीगुरुजी किती विद्वान होते, हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण लोकांशी होणारा त्यांचा व्यवहार सर्वसामान्य माणसाप्रमाणे होता. जणु चार सामान्य माणसांसारखेच एक, असे ते होते. त्यांच्या मनात सर्वांसंबंधी आस्था होती. औपचारिक बैठका आणि बौध्दिक वर्गांपेक्षा त्यांच्या अनौपचारिक गप्पागोष्टीतून खूप काही शिकायला मिळत असे, संस्कारही होत असत. सकाळ संध्याकाळ चहाच्या वेळी जे उपस्थित असत त्या सर्वांशी त्यांच्या मनमोकळया गप्पा होत असत. चहापानाच्या वेळी कोणीही येऊन बसू शकत असे. त्यावेळी कोणीही श्रीगुरुजींशी बोलू शकत असे. तसेच संध्यावंदना नंतर रात्रौ ९ पासून १२ वाजेपर्यंत श्रीगुरुजींच्या बैठकीत कोणीही येऊ शकत असे. यामुळे श्रीगुरुजींना जनमानसाचा कानोसा घेता येत असे. यावेळी स्वाभाविकपणेच आपसात मिळून मिसळून मोठया आपुलकीने गप्पा होत असत. श्रीगुरुजींच्या मनात प्रत्येकाविषयी चिंता असे, त्यामुळे प्रत्येकाशी होणारा त्यांचा व्यवहार आपुलकीचा असे. स्वामी चिन्मयानंद येणार असतील, तर त्यांची रहाण्याची व्यवस्था काय आहे, याचीही श्रीगुरुजींना चिंता असे. कार्यालयात आपला स्वयंपाकी मंगल प्रसाद आहे, त्याच्या सुखसोयींचाही विचार होत असे.
- दत्तोपंत ठेंगडी
 
गंभीर प्रश्न
एकदा श्रीगुरुजींनी पदवीधरांची बैठक घेतली. हास्यविनोदाच्या वातावरणात अनेकांना प्रश्न विचारले.
क्रमाक्रमाने माझ्यावर पाळी आली. त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला की, तुम्ही काय करता? मी म्हणालो की, मी मेडिकलच्या चौथ्या वर्षाला आहे. अचानक त्यांची मुद्रा गंभीर झालेली पाहिल्यावर माझ्या ध्यानात आले की, ते आता एखादा गंभीर प्रश्न विचारतील आणि झालेही तसेच. श्रीगुरुजी म्हणाले की, माझा प्रश्न जटिल आहे. माझ्या एका मित्र डॉक्टरने मला सांगितले की, माझ्या मेंदूत चर्बी तयार होते. ती वितळून तोंडात उतरते. जोपर्यंत मी तीन तास बोलणार नाही, तोपर्यंत ती Neutralize होत नाही. त्यामुळे मला बोलावे लागते. याची पॅथॉलॉजी सांगा. आणि मला बोलावे लागणार नाही याचे निदान सांगून उपाय सांगा. प्रश्न विचारल्यानंतर श्रीगुरुजींनी स्मित हास्य केले आणि डोळे विस्फारून ते माझ्याकडे पाहू लागले. मी काहीच न बोलल्याने ते हसले. श्रीगुरुजी पुढे म्हणाले की, बाबा रे! हा प्रश्न माझा नाही, माझ्या मित्र डॉक्टरने सांगितलेला आहे.
ही गोष्ट ऐकून एकदम मला बळ आले आणि उत्तरादाखल मी एवढेच म्हटले की, अजून मी डॉक्टरचे साहित्य वाचले नाही. हे ऐकताच सगळेच हसले. श्रीगुरुजी थोडे गंभीर होऊन म्हणाले की, ते वाचणेही सोपे नाही.
 
खरी गोष्ट ही आहे की, श्रीगुरुजींच्या डोक्यात मातृभूमीच्या चिंतेमध्ये कितीतरी उद़्गार तयार होत होते आणि तेच उद़्गार त्यांच्या मुखकमलामधून आपल्यासाठी प्रेरणा-सोपान बनून अवतरित होत होते.
राष्ट्राच्या या पवित्र कार्यात आपण जेवढे काही करू ते श्रीगुरुजींसाठी श्रध्दा सुमन असेल.
- राजेंद्रकुमार शर्मा
 
प्रत्येक पूजा पध्दती श्रेष्ठ
१९७२ च्या शिबीरातील प्रसंग! पश्चिम उत्तर प्रदेशच्या कार्यकर्त्यांचे शिबीर होते. शिबीराच्या दुस¬या दिवशी रात्रीचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व जिल्हा प्रचारक एका तंबूत श्रीगुरुजींच्या सान्निध्यात बसले होते. रांगेत किंवा मंडलात न बसता ज्याला जसे जमेल तसे सर्वजण श्रीगुरुजींभोवती बसले होते. तेथे नुसते बसण्यातच आत्मिक सुख होते, दैवी अनुभूती होती.
सहजपणे गप्पागोष्टी चालल्या होत्या. अशा बैठकांमधून श्रीगुरुजी कार्यकर्त्यांच्या विकासाच्या दृष्टीने काही निर्देश करत असत. निर्देशाची पध्दती प्रत्येकासाठी वेगवेगळी होती. आमच्यातील कितीजण नित्य व्यायाम करतात, कितीजण स्वाध्याय करतात आणि कितीजण एकान्तात बसून ईश्वराधना करतात, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारत होते. व्यायाम करता तर काय व्यायाम करता, स्वाध्यायामध्ये काय काय वाचता? रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील कामांचा आढावा घेता का? असेच त्यांचे प्रश्न असत. परंतु कधीही त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याला असा प्रश्न विचारला नाही की, ईश्वराची कोणत्या रूपात पूजा करता?
त्या दिवशी आमच्यातीलच एका कार्यकर्त्याने श्रीगुरुजींना विचारले की, आम्हाला ईश्वराची आराधना करण्याची इच्छा आहे, पण आम्हाला हे समजत नाही की, त्याची कोणत्या रूपात आराधना करावी. श्रीगुरुजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की, यासंबंधी काही सांगता येत नाही. ज्याला जसे सुचेल, ज्याची जितकी समज असेल तसे त्याने करावे, पण जे काही करायचे ते निष्ठेने आणि नियमितपणे.
 
सर्वांना हे माहीत आहे की, श्रीगुरुजी आध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी पुरुष होते. ते विस्ताराने कोणत्याही एका विशेष पूजा पध्दतीचा, एखाद्या कर्मकांडाचा तर्कसंगत निर्देश देऊ शकत होते. मनात असते, तर त्यांनी स्वत:च्या अनुभूतीचे काही प्रसंगही सांगितले असते. परंतु त्यांनी असे केले नाही. ते कधीही कोणाला त्याच्या आराध्य देवतेविषयी विचारतही नव्हते. मग टीका करणे तर दूरच. याचे कारण स्पष्ट होते. कोणतीही संघटना संप्रदाय बनण्यापासून रोखायची असेल, तर त्याच्या प्रमुखाला सावध रहावेच लागेल. आमच्यातीलच कितीतरी जण श्रीगुरुजींनी सांगितलेल्या एखाद्या पध्दतीचे समर्थन ऐकून त्यांचेच कट्टर अनुयायी बनले असते आणि ह्याच गोष्टीने पुढे असहिष्णुतेचे रूप धारण केले असते. आणि मग संघाच्या सर्वस्पर्शी हिंदू संघटनेच्या कल्पनेचे काय झाले असते?
- सुशीलकुमार
 
अहंकाराचा त्याग केला पाहिजे
१९३८ च्या शारीरिक शिक्षण शिबीरात प. पू. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवारांसाठी श्रध्दा - निधी भेट म्हणून द्यायचा होता. प्रत्येकाने आपल्या श्रध्देनुसार निधीमध्ये काही ना काही दिले. पण कोणी काय दिले आहे हे कुणाला समजले नाही. एका स्वयंसेवकाने दुसरे काही न देता घडयाळाची सोन्याची साखळीच श्रध्दा-निधीच्या रूपाने भेट म्हणून दिली. बस, ती सोन्याची साखळी देणा¬या स्वयंसेवकाची सर्वांनी प्रशंसा केली. त्या दिवसाचा तो जणु 'हिरो' बनला. सर्वाधिकारी या नात्याने समारोपाचे भाषण करताना श्रीगुरुजींनी त्या साखळीचा उल्लेख केला आणि म्हटले की, मी जाणून आहे की, साखळी भेट म्हणून देणा¬या स्वयंसेवकाच्या अंत:करणात डॉक्टरांविषयी अत्यंत प्रेम, श्रध्दा तसेच आदर आहे, परंतु तो अजून पूर्ण स्वयंसेवक नाही. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे 'अहं' लपलेला आहे. जो निधी दिला गेलेला आहे, त्यामध्ये कुणाचे वेगळे अस्तित्व नाही. त्या निधीबरोबरच न देता वेगळेपणाने देण्याच्या वृत्तीत मुळातून कुठेतरी स्वत:च्या व्यक्तित्वाचे वेगळेपण आणि अहंकाराची भावना लपलेली आहे. श्रीगुरुजींचे हे शब्द ऐकून आम्हा सर्वांना एकदम धक्काच बसला; परंतु संघाचा स्वयंसेवक बनण्यासाठी स्वत:चे व्यक्तित्व संघामध्ये किती विलीन करावे लागते याचा असा एक धडा मिळाला, जो कधीही विसरला जाऊ शकत नाही.
- दीनदयाळ उपाध्याय
 
कडक तपमान आणि इंग्रज
१९५४ मध्ये मी संघाच्या तृतीय वर्षासाठी नागपूरला गेलो होतो. मे महिन्याचा कडक उन्हाळा होता. बंगलोरची हवा शीतल तर नागपूरची हवा अतिशय गरम. त्यामुळे बंगलोरसारख्या थंडगार वातावरणातून एकदम नागपूर सारख्या कडक तपमानाच्या वातावरणात आल्याने अनेकांना ते त्रासदायक वाटू लागले. ही गोष्ट श्रीगुरुजींच्या ध्यानात आली. एकदा संघस्थानावरील संध्याकाळचे कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वयंसेवकांशी मिळून मिसळून गप्पागोष्टी करू लागले. नागपूरमध्ये उन्हाळयात अतिशय गरम हवामान असते, ते सोसते का, अशा प्रकारची विचारपूस ते करू लागले. या गरम हवामानासंबंधी स्वयंसेवकांना काय वाटते याचा त्यांना कानोसा घ्यायचा होता. ज्या काळात इंग्रज या देशावर राज्य करत होते त्या काळाची आठवण देत श्रीगुरुजी म्हणाले,
 
''हे पहा इंग्रजांनी आपल्या सैन्याच्या काही तुकडया या देशातील अनेक गरम हवामानाच्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यांच्या सत्तेचा आधार सैन्यच होते. अत्यंत थंड वातावरण असलेल्या इंग्लंडमधून अत्यंत गरम अशा हिंदुस्थानात त्यांच्या सैन्याचे इंग्रज तरुण येत होते. हवामानातील हा बदल त्या तरुणांसाठी आकस्मिक आणि त्रासदायक होता. परंतु ते त्याची पर्वा करत नव्हते. पाठीवर सामान लादून कडक उन्हातून अनेक तास त्यांना चालवले जात होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की, त्यांनी हे गरम हवामान तक्रार न करता सहन करावे. आणि ते इंग्रज तरुण अत्यंत प्रसन्नतेने सर्व आज्ञांचे पालन करत या परीक्षेत खरे उतरले.
 
''ब्रिटनचे युवक आपला 'राजा आणि देशा'साठी प्रसन्नतेने असे त्रासदायक जीवन स्वीकारत होते. यामुळेच ब्रिटन जगातील एक सामर्थ्यशाली राष्ट्र होते, यात काही आश्चर्य नाही. आपण त्यांच्यापासून हा धडा घ्यायला नको का?''
- एम. सी. सत्यनारायण
 
तुम्ही असले कसले स्वयंसेवक!
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे श्रीगुरुजींचा बौध्दिक वर्ग चालला होता. त्यावेळी एक स्वयंसेवक पेन्सिलीने कागदावर श्रीगुरुजींचे चित्र काढत होता. भाषण संपेपर्यंत त्याने माईकजवळ उभे असलेल्या श्रीगुरुजींचे हुबेहूब चित्र काढले होते. कार्यक्रम संपल्यावर तो मा. रज्जूभैयांपाशी आला. त्याने रज्जूभैयांना ते चित्र दाखविले आणि त्यांना तो म्हणाला की, यावर श्रीगुरुजींची स्वाक्षरी मिळवून द्या. रज्जूभैया त्याला श्रीगुरुजींकडे घेऊन गेले. श्रीगुरुजींनी ते चित्र पाहिले आणि विचारले की, तुम्ही केवळ चित्रकार आहात की स्वयंसेवकपण आहात? त्याने उत्तर दिले की, मी स्वयंसेवक आहे, नियमित शाखेत जातो. तेव्हा श्रीगुरुजी म्हणाले की, मी ज्यावेळी आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपल्या हृदयातील भाव वाणीने व्यक्त करत होतो त्यावेळी तुम्ही त्याकडे लक्ष न देता चित्र काढण्यात तल्लीन होता, ती वेळ हे काम करण्यासाठी नव्हती, तुम्ही असले कसले स्वयंसेवक? या चित्रावर माझी स्वाक्षरी मिळणार नाही. पुढे ते म्हणाले की, मी आता बसलेलो आहे, यावेळी जर तुम्ही चित्र काढले असते तर मी स्वाक्षरी दिलीही असती.
- नरनारायण पाण्डेय
 
पद्य देखील तोंडपाठ
कार्यकर्त्यांची बैठक होती. सुरुवातीला वैयक्तिक पद्य होते. पद्य म्हणणा¬या स्वयंसेवकाने पद्य म्हणण्यास सुरुवात केली. - 'बढ रहे है हम निरंतर.....' दोन कडव्यानंतरच्या ओळीवर तो थांबला. श्रीगुरुजी मागेच बसले होते. त्यांनी हळूच पुढची ओळ सांगितली. आता पद्य म्हणणारा स्वयंसेवक अधिकच घाबरला. श्रीगुरुजी त्याला हळूच पुढची एकेक ओळ सांगत गेले आणि तो स्वयंसेवक म्हणत राहिला. अशा प्रकारे जेव्हा पद्य पूर्ण झाले तेव्हा तो स्वयंसेवक तोपर्यंत घामाघूम झाला होता. तो आपल्या जागी जाऊन बसला. यावर श्रीगुरुजी काहीही बोलले नाहीत, पण इतके सगळे उद्योग आणि विवंचना पाठीमागे असूनही त्यांना पद्याचे कडवे न् कडवे आणि सर्व शब्द पाठ आहेत याचा फार मोठा प्रभाव न बोलताही त्या स्वयंसेवकाच्या मनावर पडला.
- माधवराव नवलगुंद
 
देश आपला, हिंदू आपला
श्रीगुरुजी सा¬या देशाला आपले घर आणि प्रत्येक हिंदू कुटुंबाला स्वजन मानत होते. श्रीगुरुजींनी एकदा अनौपचारिकपणे बोलत असताना आम्हाला नागपूरच्या एका सद़्गृहस्थाचे उदाहरण दिले. ते सद़्गृहस्थ असे मानत असत की, आपले घर सोडून दुस¬या कोणाच्याही घरी जेवण करणे म्हणजे परान्न घेणे होय. कुठे नि:शुल्क जेवण करण्याची वेळ आलीच, तर परान्नाचा दोष परिमार्जन व्हावा म्हणून ते जेवणाच्या थाळीखाली एक रुपया ठेवत असत. तो त्यांचा नियमच होता. श्रीगुरुजी म्हणाले की, त्या सद़्गृहस्थांची माझी एकदा भेट झाली. त्यांनी मला आपला तो नियम सांगितला. मी त्यांना म्हणालो की, मी देखील कधी परान्न घेत नाही. हे ऐकून ते सद़्गृहस्थ चकित झाले. ते म्हणाले की, आपण तर देशभर फिरता, मग आपल्याला परान्न न घेणे कसे शक्य आहे? मी त्यांना म्हणालो की, मी जेथे कोठे जातो ते आपलेच घर आहे अशी माझी दृढ धारणा असल्यामुळे तेथेही मी आपल्याच घरी जेवण करतोय असा संतोष माझ्या मनात राहतो. ते सद़्गृहस्थ यावर काही बोलले नाहीत.
- ए. दक्षिणामूर्ती
 
स्वयंसेवकांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास
सरकारने संघावरची पहिली बंदी कोणतीही अट न घालता उठवली. बंदीच्या काळात अनेक स्वयंसेवकांची नोकरी गेली, कामधंदा बुडाला. स्वयंसेवकांना सरकारी नोकरीत घेतले जाऊ नये अशा सूचना दिल्या गेल्या. शाळा कॉलेजात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले. स्वयंसेवकांच्या पालकांवरही सरकारची देखरेख राहू लागली. स्वयंसेवकांना जर असे कष्ट झेलावे लागत आहेत, तर सरकारकडून त्यांना काही मदत मिळावी असा विषय श्रीगुरुजींनी सरदार पटेलांशी बोलताना का काढला नाही? सरकार जी विघ्ने निर्माण करत आहे, त्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी श्रीगुरुजी त्यासंबंधी सरकारशी का बोलत नाहीत? अशी चर्चा सुरू होत होती. श्रीगुरुजींच्या सूक्ष्म दृष्टीतून हे प्रश्न सुटले नाहीत. बैठकातून किंवा बौध्दिक वर्गातून त्यांनी सांगितले,
 
''माझा आपल्या स्वयंसेवकांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. कोणाच्याही मदतीशिवाय अगदी, सरकारच्या सुध्दा, तो आपल्या जीवन-व्यवहारासाठी आवश्यक ती कमाई करेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने आणि स्वत:च्या कष्टाने मिळवलेल्या द्रव्यामुळे स्वयंसेवकांचा आत्मविश्वासही वाढेल. या उलट सरकारवर अवलंबून राहण्याची सवय लागली, तर स्वयंसेवक परावलंबी बनेल. यानंतर संघावर संकटे येणारच नाहीत असे आपण सांगू शकत नाही. स्वत:च्या पुरुषार्थाने भावी स्वयंसेवक ती संकटे झेलू शकतील. पण परावलंबी कार्यकर्ता संकटांनी हतबल होईल.''
बंदीकाळात ज्या स्वयंसेवकांना अतिशय हानी सहन करावी लागली, तुरुंगात रहावे लागले त्यांना आपल्या संघकार्यात विशेष प्रतिष्ठा मिळाली पाहिजे अशा आशयाचे विचार जेव्हा एका स्वयंसेवकाने व्यक्त केले तेव्हा श्रीगुरुजी म्हणाले,
 
''तसे काँग्रेसमध्ये झाले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जो त्याग केला त्याच्या बदल्यात प्रतिष्ठेचे पद, खुर्ची इ. ची मागणी केली जाते. काँग्रेसची काही नेतेमंडळी तर म्हणतातच की, We have sacrificed so much for the country, in the freedom struggle, now what is wrong if we cash the sacrifice. श्रीगुरुजींनी पुढे म्हटले की, ही भावना, हा विचार चुकीचा आहे. भारत स्वतंत्र व्हावा यासाठी संकटे सहन करणे, कष्ट करणे हे तर आपले कर्तव्यच आहे. आम्ही काही केले त्या बदल्यात आम्हाला काही मिळावे ही सौदेबाजी होईल. ही स्वार्थी प्रवृत्ती आहे. स्वयंसेवकाने कधीही असा विचार करता कामा नये. We shall not cash our sacrifiece.
- श्री. बापूराव
 
अहंकार राहू नये
'मीच संघाचा सर्वांपेक्षा अधिक निष्ठावान स्वयंसेवक आहे', अशा प्रकारचा अहंकार कोणत्याही स्वयंसेवकाने आपल्या मनात कधीही येऊ देऊ नये असे सांगताना श्रीगुरुजींनी बायबलमधील येशू ख्रिस्ताचा शिष्य पीटरची गोष्ट सांगितली. पीटर येशूला प्रत्येक वेळी सांगत असे की, या जुलमी राज्यात दुसरे सर्व शिष्य आपल्याला सोडून गेले पण तरीही मी आपल्याला कधीही सोडणार नाही. येशूने त्याला म्हटले की, तू असे म्हणू नकोस Thou shall deny me thrice before the cock crows tomorrow morning आणि तसेच झाले.
 
पीटरच्या दुर्बलतेमुळेच येशूला पोलिसांनी पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले. जाताना पीटर येशूच्या मागोमाग जात होता. जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने म्हटले की, मी येशूला ओळखत नाही. येशूची तुरुंगात गैरसोय होऊ नये यासाठी पीटरने पुन्हा एकदा प्रयत्त्न केला. तेव्हा पोलिसांनी लगेच त्याला विचारले, त्यावेळीही पीटरने माझा येशूशी काही संबंध नाही असे म्हटले. सूर्योदयापूर्वी पीटर पुन्हा एकदा तुरुंगात गेला. तेव्हा पुन्हा एकदा तेथील रक्षकांनी त्याला विचारले. तेव्हाही मी येशूचा शिष्य नाही असे पीटरने म्हटले आणि त्याच वेळी कोंबडा आरवला.
पीटरला येशूचे बोलणे आठवले आणि तो रडू लागला.
- श्री. बापूराव
 
हिंदू म्हणून जगण्यात सार्थकता
श्रीगुरुजींच्या स्वयंसेवकांबरोबर अनौपचारिक गप्पागोष्टी चालल्या होत्या. संघासाठी आपण नित्य व नैमित्तिक कार्यक्रम करतो. दैनंदिन शाखेत जातो. श्रीगुरुदक्षिणा समर्पण करतो. प्रचारकाच्या जीवनाचा स्वीकार करतो. अशा प्रकारचे विचार स्वयंसेवक व्यक्त करत होते. श्रीगुरुजी म्हणाले की, संघासाठी आवश्यक आहे म्हणून आपण काही करतो असे म्हणणे योग्य नाही. आपण काही केले नाही तरी संघाचे काम वाढेल. 'संघासाठी आपण काही करतो' या विचारात दोष आहे. संघाच्या दैनंदिन शाखेत जाणे, नवीन नवीन मित्र मिळवून स्वयंसेवकांची संख्या वाढविणे अशा या कार्यासाठी जीवनपुष्प अर्पण करण्यात जीवनाचे साफल्य आहे. आपल्या देशात हिंदू म्हणून पुरुषार्थयुक्त जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहे, म्हणून आपण संघाचे काम करतो. अशी धारणा ठेवल्याने आपले जीवन निर्मळ व उदात्त होते. देवाला आवश्यक आहे म्हणून आपण त्याची पूजा करत नाही. देवाला पूजेची आवश्यकता नाही. आवश्यकता तर आपल्याला आहे. संघाचे कार्य हे मातृभूमीच्या पूजेचे कार्य आहे, विशुध्द देशभक्तीचे काम आहे. ते करण्यात, अगदी सर्वस्व पणाला लावून करण्यात आपल्या जीवनाची, हिंदू म्हणून जगण्याची सार्थकता आहे, असा विचार करणे योग्य आहे.
- श्री. बापूराव
 
हिंदू जीवनात राजकारण सर्वश्रेष्ठ नाही
सोलापूरहून श्री. किंकर नावाचे एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्रीगुरुजींशी सविस्तर बोलण्याच्या हेतूने नागपूरला आले. नागपूरच्या नागोबा गल्लीतील श्रीगुरुजींच्या घरी ते पोहोचले. बैठकीनंतर त्यांनी श्रीगुरुजींना म्हटले की, राजकारण हे आपल्या जीवनाचा परिपाक आहे. असे असूनही आपण संघाला राजकारणापासून अलिप्त का ठेवता?
 
श्रीगुरुजी म्हणाले की, संघकार्य करताना मी केवळ हिंदूंशी बोलतो. जो विचारांनी हिंदू नाही त्याच्याशी चर्चा करणे, आज मला आवश्यक वाटत नाही.
त्या व्यक्तीला धक्काच बसला. ते म्हणाले, ''मी हिंदू आहे असे आपल्याला वाटत नाही? माझे विचार हिंदू नाहीत असे आपल्याला वाटते?''
 
श्रीगुरुजी म्हणाले की, राजकारण हे जीवनाचे सर्व काही आहे असे म्हणणारा हिंदू कसा? हिंदू विचारानुसार समाज जीवनाच्या व्यवस्थेशी संबंधित असे ते एक अंग मात्र आहे. हिंदू जीवनात राजकारणास कधीही सर्वश्रेष्ठ मानलेले नाही. आपण तर राजकारणालाच जीवनाचा परिपाक मानता.
त्या हिंदुत्ववादी माणसाची बोलतीच बंद झाली. अन्य काही औपचारिक गोष्टी बोलून ते निघून गेले.
- श्री. बापूराव
 
आपल्यासमोर आदर्श... पूजनीय डॉक्टर
बैठकीत स्वयंसेवकांचा परिचय चालला होता. एक ज्येष्ठ कार्यकर्ते परिचय करून देताना स्वयंसेवकांच्या सद़्गुणांची अनावश्यक प्रशंसा करत होते. ती ऐकून श्रीगुरुजींनी स्वयंसेवकांसमोर तर काही म्हटले नाही. परंतु बैठकीनंतर त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलताना श्रीगुरुजी म्हणाले की, स्तुती, प्रशंसा नीट विचार करून केली पाहिजे. स्वयंसेवकाला काम करण्यास प्रेरित करण्याकरता त्याच्या चांगल्या गुणांचा सुयोग्य शब्दात उल्लेख करणे तर आवश्यक आहे. पण अधिक प्रशंसा करणे धोक्याचे आहे. कारण त्यामुळे अहंकार वाढतो. स्वयंसेवकाचा आत्मविश्वास वाढून तो अधिक उत्साहाने कामास लागावा यासाठी आवश्यक तेवढी प्रशंसा संयमित शब्दात करणे उचित आहे.
 
भगवान शंकर विष पचवू शकले. पण त्यांची स्तुती करणारांना त्यांनी अनेक वर दिले आणि त्यामुळे सा¬या जगावर अनेक वेळा संकटे आली. रावण, भस्मासुर इ. दानवांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
 
कार्य करताना स्वयंसेवकांसमोर योग्य आदर्श असला पाहिजे. व्यायाम करताना ज्याप्रमाणे हनुमानाचा आदर्श राहतो त्या प्रकारे मी आदर्श स्वयंसेवक होईन असे चिंतन प्रत्येक स्वयंसेवकाने करत राहिले पाहिजे. श्रीगुरुजींनी म्हटले की, शिवछत्रपतींचा आदर्श स्वयंसेवकांसमोर सतत असला पाहिजे असे आपल्या पूजनीय डॉक्टरांनी म्हटले आहे. जिवंत व्यक्ती कितीही गुणसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न असली, तरी ती आपल्यासमोर आदर्श असता कामा नये असे आपले डॉक्टर म्हणत असत. ज्यांच्या जीवनाचे पूर्ण विकसित सुगंधित पुष्प आपल्याला पूर्णपणे परिचित आहे अशा अलीकडील भूतकाळातील व्यक्तीला आदर्श ठेवले पाहिजे, असे डॉक्टर म्हणत असत.
 
अशी व्यक्ती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपल्यासमोर असली पाहिजे. शिवाजी महाराजांचे बोलणे कसे होते, त्यांचे चालणे कसे होते (त्यांचा व्यवहार कसा होता) याचे स्मरण आम्ही करत राहिले पाहिजे, असे डॉक्टर म्हणत असत. आज तर आपल्यासमोर आपल्याला पूर्ण परिचित असलेल्या डॉक्टरांचे जीवन आहे. संघकार्य करताना आपली योग्यता सदैव वाढत रहावी यासाठी डॉक्टरांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.
- श्री. बापूराव
 
उत्तम पुरुषाचे जीवन
एका बैठकीत श्रीगुरुजींनी अर्जुनाचा उल्लेख उत्तम पुरुष म्हणून केला. ते म्हणाले की, मनुष्याला जीवनाच्या अनेक अंगांचा विकास करून त्याबरोबरच जीवनाचा सर्वस्पर्शी पूर्ण अनुभव घेता आला पाहिजे, असेच अर्जुनाचे जीवन होते. अत्यंत बलवान असा तो कुस्तीतही निपुण होता. श्रीकृष्णाने जरासंधाचा नाश करण्यासाठी अर्जुनाला बरोबर घेतले होते. अर्जुन, भीम किंवा स्वत: श्रीकृष्ण या तिघांपैकी कोणाशीही जरासंधाने कुस्ती खेळावी असे आवाहन जरासंधासाठी होते. अर्जुन उत्तम धनुर्धर होता, सर्व प्रकारच्या अस्त्रांचे ज्ञान त्याला होते. असे असूनही तो संयमी होता. एकदा अश्वत्थाम्याने अविचाराने ब्रह्मास्त्राचा वापर केला; परंतु त्याचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुनाने मात्र ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला नाही. अर्जुन प्रेमीही होता. सुभद्राशी त्याने केलेला विवाह प्रेमविवाहच होता. तो नृत्य गायनामध्ये प्रवीण होता. विराट विश्वरूपाचे दर्शन घेण्याची त्याची क्षमता होती. गीतोपदेश ग्रहण करण्याची पात्रता त्याच्याजवळ होती. तो पौरुष, पराक्रमसंपन्न असून शिवाय शीलवान होता. जेव्हा विराटाने आपली मुलगी उत्तरा अर्जुनाला द्यायचे ठरविले तेव्हा ती माझी विद्यार्थिनी असल्याने मी तिच्याशी विवाह करणे अनुचित ठरेल, असे सांगून त्याने तिचा विवाह आपला पुत्र अभिमन्युशी ठरवला. इंद्राने जेव्हा स्वर्गात त्याची परीक्षा घेतली तेव्हा त्याने उर्वशीला माता म्हणून नमस्कार केला. उर्वशीने शाप दिल्यावर, आईने दिलेला शापही कल्याणकारक आहे असा त्याने पूर्ण विश्वास प्रकट केला.
उत्तम पुरुषाचे जीवन ह्या प्रकारे सर्वांग परिपूर्ण असले पाहिजे.
- श्री. बापूराव
 
प्रचारक अभूतपूर्व कार्य कसे करू शकले?
कमी शिकलेल्या पण निष्ठेने काम करणा¬या कार्यकर्त्यांसंबंधी व प्रचारकांसंबंधी, बैठकीत गप्पागोष्टी चालल्या होत्या. माननीय बाबासाहेब आपटे, माधवराव मुळये, दादाराव परमार्थ इ. ज्येष्ठ प्रचारकांचा उल्लेख होत होता. पंजाब, मद्रास, बंगाल इ. दूरदूरच्या प्रांतांमध्ये पूजनीय डॉक्टरांकडून मिळालेल्या परिचय पत्रामुळे कोणा एकाची ओळख, बाकी सर्व अनोळखी! भाषा बोलू शकत नव्हते, त्यांच्या रीती-रिवाजांची माहिती नाही, संघासंबंधी माहिती देणारे काही प्रकाशित संघ साहित्य जवळ नाही, संघाचे नावही तेथे अपरिचित, वर्तमानपत्रांतून कधी कधी संघाचा उल्लेख तोही विपर्यस्त. अशा सा¬या परिस्थितीत त्या प्रांतांमध्ये संघाचे प्रबळ काम त्यांनी उभे केले, ठिकठिकाणी प्रभावी संघ शाखा निर्माण केल्या, प्रचारक काढले, असे अभूतपूर्व कार्य ते कसे करू शकले? या सहज प्रश्नाला उत्तर देताना श्रीगुरुजी म्हणाले,
 
''ज्यांची आपल्या ध्येयावर तसेच लक्ष्य-प्राप्तीकडे घेऊन जाणा¬या मार्गदर्शकावर पूर्ण श्रध्दा असते, त्यांच्या जीवनातच असे विलक्षण आश्चर्य दिसून येते. आपल्या या हिंदू समाजास सुसंघटित करून आपल्या राष्ट्राला सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न करण्याचे आपले ध्येय आणि ते प्राप्त करण्यासाठी संघाची कार्यपध्दती निर्माण करणारे आपले संघाचे मार्गदर्शक पूजनीय डॉक्टरांवर अनन्य निष्ठा असल्यामुळे या प्रचारकांकडून या प्रकारचे आश्चर्यकारक काम शक्य झाले. आपल्या उपनिषदांमध्ये एक श्लोक मोठा उद़्बोधक आहे -
यस्य देवे पराभक्ति यथा देवे तथा गुरौ।
तस्यैते कथिताह्यर्था प्रकाशन्ते महात्मन:॥
परमेश्वरावर आणि त्याच्या प्राप्तीसाठी पथ प्रदर्शक असणा¬या गुरुच्या बाबतीत श्रेष्ठ प्रकारची शुध्द भक्ती ज्यांच्या हृदयात असते, त्यांना जीवनात कित्येक गहन तत्त्वांचा आविष्कार करणे सहज शक्य होते. काही अगम्य, दुर्बोध वाटणा¬या सूत्रांचा अर्थ त्यांना अवगत होतो.
- बापूराव व¬हाडपांडे
 
हिंदू राष्ट्राची निर्मिती किती वर्षात?
एकदा वर्गात एका शिक्षार्थीने श्रीगुरुजींना प्रश्न विचारला की, गुरुजी हिंदू राष्ट्राची निर्मिती किती वर्षात होईल? श्रीगुरुजींनी हसत हसत एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, इंग्लंडमधील गोष्ट आहे. तीन तत्त्वज्ञ सायंकाळच्या सुमारास चहापानासाठी एकत्र आले. चहा घेता घेता त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. एका तत्त्वज्ञाने बाकीच्या दोघांना विचारले की, आकाशाला शिवण्यासाठी एकावर एक असे मासे उभे केले, तर किती मासे उभे केल्यानंतर आकाशाला शिवता येईल? चहाचा घोट घेताना एका तत्त्वज्ञाने विचार केला की, माशाची लांबी तर काही सांगितली नाही. तो म्हणाला की, पुरेसा लांब असेल तर एकच मासा पुरे. श्रीगुरुजी स्मित हास्य करत म्हणाले की, आले का लक्षात! जर आपण सगळेजण प्राणपणाने कामाला लागलो, तर एका दिवसातच काम होऊन जाईल.
- डॉ. प्रेमचंद जैन
 
विरोधकांशीही आपुलकीचा व्यवहार, सद़्गुणांची प्रशंसा
श्रीगुरुजी अजातशत्रु होते. पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. राम मनोहर लोहिया हे संघाचे विरोधक होते. पण या नेत्यांशी श्रीगुरुजींचे संबंध चांगले होते. महात्मा गांधींविषयी त्यांच्या मनात आदराची भावना होती. संघाला विरोध करण्यात ज्यांना रस होता, त्यांच्या विषयीदेखील श्रीगुरुजी कधी कडवटपणे बोलले नाहीत. उलट त्यांच्या गुणांची त्यांनी प्रशंसाच केली.
 
प्रभु श्रीरामचंद्राचे उदाहरण पुढे ठेवून श्रीगुरुजी म्हणत असत की, रावण त्यांचा शत्रू होता, परंतु रणांगणात त्यांनी रावणाला जेव्हा प्रथमच पाहिले तेव्हा त्यांनी म्हटले की, कसा तेजस्वी पुरुष आहे हा. जर त्याला अहंकार नसता आणि स्वार्थासाठी दुस¬याला त्रास देण्याचा विपरीत व्यवहार त्याने केला नसता, तर तो त्रैलोक्याधिपती बनला असता, असा तो श्रेष्ठ पुरुष आहे. रावणाच्या मृत्युनंतर त्याची र्औध्वदेहिक क्रिया करण्यास जेव्हा बिभिषण संकोच करू लागला तेव्हा प्रभु रामचंद्रांनी त्याला समजावले की, रावण तुझा मोठा भाऊ असल्याने तुलाच औध्वदेहिक क्रिया करावी लागेल. वैचारिक विरोधकांविषयी स्वयंसेवकांची अशीच गुणग्राहक वृत्ती रहावी, असे श्रीगुरुजी म्हणत असत.
- डॉ. आबाजी थत्ते
 
नेतृत्वाची परीक्षा
श्रीगुरुजींनी सन १९४० मध्ये सरसंघचालक पद या विश्वासाने पत्करले की, हे विक्रमादित्याचे सिंहासन आहे, यावर जो कोणी बसेल तो योग्य तेच काम करेल.
दोन वर्षातच सन १९४२ ची 'भारत छोडो चळवळ' आली. संघासाठी स्वराज्य हा आस्थेचा विषय राहिलेला आहे. पूजनीय डॉक्टरांनी स्वातंत्र्य चळवळीत संघाला बाजूला ठेवून स्वतः त्यात व्यक्तिगत रीतीने भाग घेतला. या स्वातंत्र्य चळवळीत अनेक स्वयंसेवकांनीही भाग घेतला, चळवळीला मदतही केली. तशी १९४२ च्या चळवळीची योजनाही अस्पष्ट होती. लोकनायक जयप्रकाशांनी म्हटले की, ही क्रीमनल (अपराध) गोष्ट आहे. पं. नेहरुंनी तर विरोध केला होता. पण तरीही समाजात चळवळीविषयी उत्कट भाव होते. संघाची सारी शक्ती यात झोकून द्यावी असा विचारही काही मनांमध्ये होता.
 
त्यावेळी एकूण अशी स्थिती होती. आम्ही काहीजण ह्यासाठी श्रीगुरुजींना भेटलो होतो. श्रीगुरुजी म्हणाले की, संघ संपवून जर स्वातंत्र्य मिळत असेल, तर संघाला झोकून देण्यास काहीच हरकत नाही. परंतु असे करून लक्ष्य प्राप्त होईल का? क्रांतीच्या दृष्टीने संघशक्तीचे आकलन केल्यावर ध्यानात येते की, आपल्याला जनतेची किती साथ मिळेल हे सांगता येत नाही. समजा जनतेचे पूर्ण सहकार्य मिळाले, तरी आज आपण गोंदियापासून बेळगावपर्यंतच्या क्षेत्रात क्रांती करू शकतो. पुढे काय होईल? हा प्रदेश कोणता आहे?
 
त्यांनी (Geopolitics) जिओपॉलिटिक्स शब्दाचा प्रयोग केला. याचा विचार करणे आवश्यक आहे. जेथे आपण काही करू शकतो असा गोंदियापासून बेळगावपर्यंतचा प्रदेश हिंदुस्थानच्या मध्यभागी येतो. चारी बाजूंनी सैन्य आम्हाला घेरू शकते. तेव्हा आपण अधिक प्रतिकार करू शकणार नाही. केरळ, आसाम, काश्मीरप्रमाणे हाच प्रदेश जर देशाच्या कोप¬यात असता, तर दुस¬या कोणत्यातरी मार्गाने निघून जाता आले असते. सैन्य येण्यामुळे आणि त्यांच्याकडून वेढले गेल्यामुळे Demoralization होईल. (मनोधैर्य खच्ची होईल) याचा परिणाम चांगला होणार नाही यामुळे संघ काही करणार नाही.
 
दूरदृष्टी ही नेतृत्वाची परीक्षा आहे. गुरुजी सवंग लोकप्रियतेमागे धावणारे नव्हते. श्रीगुरुजींनी काळवेळ लक्षात घेऊन आपले कार्य अधिक वाढविण्याचा प्रयत्त्न केला.
- दत्तोपंत ठेंगडी
 
अस्पृश्यता
श्रीगुरुजींनी सामाजिक विषयांसंबंधी जे मतप्रदर्शन केले त्याविरुध्द काही मंडळींनी वादळ उभे केले. पण जाणकार लोक जाणतात की, सामाजिक विषयांसंबंधी श्रीगुरुजींच्या धारणा स्पष्ट होत्या. डाव्या लोकांनी जाणूनबुजून भ्रम निर्माण केला. हिंदुस्थानात एक देखील वर्ण नाही. एकच वर्ण आहे तो म्हणजे हिंदू. एकच जात आहे ती हिंदू. असेच मानले पाहिजे. ते थट्टेने म्हणत वर्णाचे नावच द्यायचे असेल तर सारे शूद्र आहेत. आणि म्हणून ते म्हणत सा¬यांनाच हिंदू करायचे आहे. सर्वांना जानव्याचा अधिकार आहे. स्पृश्यास्पृश्य भेद चुकीचा आहे. अस्पृश्यता असंगत आहे, सर्व हिंदू एक आहेत. ज्यांना तथाकथित अस्पृश्य म्हटले जाते त्यांनाही जानवे दिले पाहिजे. बॅकवर्ड, वनवासी, अस्पृश्य इ. सर्वांना कश्यप गोत्र देऊन जानवे दिले पाहिजे.
- दत्तोपंत ठेंगडी
 
परस्पर विरोधाभासाचा भ्रम
पूजनीय श्रीगुरुजी नेहमी समय सूचकता, दूरदर्शिता, सूक्ष्मता व संतुलित समतोल दृष्टिकोण समोर ठेवूनच भिन्न भिन्न ठिकाणच्या लोकांच्या मनोवृत्ती व रुचीनुसार बौध्दिक वर्ग देत असत. तो कधी कधी परस्पर विरोधाभासाचा भ्रम निर्माण करत असे, परंतु तो पूर्णपणे 'बॅलन्स्ड' म्हणजे समतोल असे.
 
एकदा उत्तर भारतात एका प्रांताच्या प्रवासात श्रीगुरुजींच्या ध्यानात आले की, तेथे राजकारणाचे भूत सर्वांच्या मानेवर बसले आहे. तेथे श्रीगुरुजींनी असे म्हटले की, तुम्ही असे करा की शाखा बंद करून टाका, एकदा यथेच्छ राजकारण करून घ्या. जेव्हा तुमची तृप्ती होईल, इच्छा पूर्ण होईल तेव्हा आरामात शाखा सुरू करा. मला बिलकुल घाई नाही.
 
नंतर सुमारे अडीच महिन्यांनी श्रीगुरुजी दक्षिण भारताच्या दौ¬यावर गेले. तेथे जनसंघाचा प्रारंभही झालेला नव्हता. तेथील प्रमुख व्यक्तींनी श्रीगुरुजींना सांगून टाकले की, आम्हाला राजकारणात मुळीच रस नाही आणि ते इथे सुरुवात करण्याची इच्छाही नाही. तेथे श्रीगुरुजींनी म्हटले की, अरे आपण हे काय करत आहात? दीनदयाळ उपाध्यायांसारखी व्यक्ती आपण या कार्यासाठी दिली आहे, म्हणून हे आपलेच काम आहे. आपण या कामासाठी कार्यकर्ते दिले पाहिजेत. आपल्या सगळयांना इथे ते काम उभे करावयाचे आहे.
 
केवळ अडीच महिन्यांच्या फरकात दोन परस्परविरोधी वाटणारे विचार समोर आले. तथापि जसे दिसते तसे नसते. दूर दृष्टीने चिंतन केल्यानंतर लक्षात येईल की दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी योग्य आहेत आणि 'बॅलन्स्ड' पण आहेत.
- दत्तोपंत ठेंगडी
 
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या 'मनाचे श्लोका'च्या या ओळीसंबंधी चर्चा चाललेली होती. आतापर्यंत कोणत्याही संत महात्म्याने मनाला 'सज्जन' म्हटलेले नाही. मनाचा दुराग्रही स्वभाव अनेकांनी 'प्रमाथी, बलवत्, दृढ, अनावर पशु' इ. विशेषणांनी दाखवलेला आहे. यामुळे स्वामी समर्थांनीदेखील 'सज्जन' हे विशेषण मनाला न लावता कदाचित भक्तिपंथाला लावले असावे. म्हणून वाममार्गाच्या भक्तिमार्गाने न जाता सज्जनांच्या भक्तिपंथाचा स्वीकार कर असा समर्थांचा मनोबोध असावा, अशा प्रकारचा विषय एका स्वयंसेवकाने मांडला. श्रीगुरुजी म्हणाले, ''तसे नाही. श्रीसमर्थांनी मनाला सज्जन म्हणून त्याचा गौरव केला. आणि भक्तिमार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केले. दुर्जनांना देखील अपशब्दांनी संबोधित न करता गौरवान्वित करून सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न संतांनी केला आहे. तेच समर्थ करतात. अन्य श्लोकांमध्येही मनाचा उल्लेख सज्जन असाच येतो. 'मना सज्जना राघवी भक्ति कीजै' यातही मनाला सज्जन म्हटले आहे. श्री समर्थांचे 'राघव' ला सज्जन विशेषणाने संबोधित करणे विचित्र वाटेल.''
- श्री. बापूराव
 
हे ईश्वरीय कार्य आहे
'संघ ईश्वरीय कार्य आहे', या संबंधी स्वयंसेवक बोलत होते. समर्थ रामदास स्वामींच्या 'सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥' या ओळींचा उल्लेख करून पूजनीय डॉक्टरांनी संघाच्या कार्यास सुरुवात करताना ते यशस्वी करण्यासाठी त्याचा मूळ आधार 'हे ईश्वरीय कार्य आहे' असे म्हटले. परमेश्वराच्या आधाराशिवाय कोणतेही सामाजिक कार्य यशस्वी होऊ शकत नाही हेच या 'ओवी'च्या आधारात म्हटलेले आहे.
 
स्वयंसेवकांच्या चर्चेत या ओवीतील 'पाहिजे' शब्दाचा अर्थ 'हवे' (wanted) असा केला जात आहे, हे लक्षात येताच श्रीगुरुजींनी म्हटले, ''पाहिजे' याचा अर्थ 'पहा', 'अनुभव घ्या' असा घेतला पाहिजे. समर्थकालीन मराठीत 'नेणिजे', 'जाइजे', 'होइजे,' 'करीजे' अशा प्रकारचे शब्द प्रयोग बोलले जात होते. त्यांचा अर्थ नको, जा, कर असा होतो. याच प्रकारे 'पाहिजे'चा अर्थ समजून घ्या, पहा, अनुभव करा असा आहे. 'पाहिजे' म्हणजे मला पिण्यासाठी पाणी हवे या अर्थाने नाही. संघकार्य करताना त्यात समाज पुरुषाचे हित आहे, राष्ट्राचे व्यापक कल्याण आहे, माझा यत्किंचितही स्वार्थ नाही या प्रकारची धारणा ठेवून काम करणे हेच ईश्वरीय कार्य आहे असे समजले पाहिजे. पूजनीय डॉक्टरांना अशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत होता. संघकार्याला भगवंताचे अधिष्ठान आहे असे समजल्याने, काम करणारा कार्यकर्ता यशस्वी होतो.''
'पाहिजे' या शब्दाचा नवा सार्थक अर्थ स्वयंसेवकांना समजला.
- श्री. बापूराव
 
साधू चिलीम का ओढतात?
भगवे वस्त्र धारण करणा¬या आजकालच्या साधूंच्या संबंधी गप्पागोष्टी चालल्या होत्या. ते ढोंगी असतात, लोकांची फसवणूक करतात अशा प्रकारचे कुत्सित उद़्गार ऐकून श्रीगुरुजी म्हणाले,
 
''सगळे साधू असे असत नाहीत. काही चांगल्या साधूंना मी ओळखतो.'' एक स्वयंसेवक म्हणाला, ''साधू तर चिलीम, तंबाखू, गांजा घेतात. हे पाहून त्यांच्या चांगुलपणावर कसा विश्वास ठेवावा?'' श्रीगुरुजी म्हणाले, ''काही चांगले साधना करणारे साधू चिलीम का ओढतात, हे मला माहीत आहे. ते सतत चिलीम ओढत नाहीत. स्नानादि झाल्यानंतर, शरीराला भस्म लावल्यावर साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ते चिलीमीचा जोरदार दम घेतात. त्यामुळे मन व शरीराचा संबंध काही काळ समाप्त होतो. तसा अनुभव येताच चिलीम बाजूला ठेवून शरीर वेगळे आहे आणि मी त्यापासून वेगळा आहे हे सूत्र पकडून ते आपली साधना सुरू करतात. 'मी' आणि 'माझे शरीर' यांचा संबंध तोडून तर साधना करावी लागते. त्यांच्यासाठी चिलीम हे एक साधे साधन आहे.''
- श्री. बापूराव
 
वैचारिक समन्वय करणे आवश्यक
श्रीगुरुजी उच्च शिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांची बैठक, संघ शिक्षा वर्गात घेत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनसंघ इत्यादी संघटनांचा प्रारंभ झालेला होता. विद्यार्थी, कामगार तसेच राजकीय क्षेत्रात संघाच्या विचारांचा प्रभाव हळूहळू दिसू लागला होता. बैठकीच्या पूर्वी संघ शिक्षा वर्गातील बौध्दिक वर्गात दोन कार्यकर्त्यांची भाषणे झाली होती. त्यातील एकाने दैनंदिन शाखा, गटपध्दती, आत्मीयतेने व्यापक संपर्क इ. विषयासंबंधी विस्तृत विवेचन आपल्या बौध्दिकात केले होते. तर दुस¬याने समाज जीवनाच्या अन्यान्य क्षेत्रात स्वयंसेवकांनी तन्मयतेने काम करून तेथे संघाचा प्रभाव निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती.
 
बैठकीत एका स्वयंसेवकाने श्रीगुरुजींना प्रश्न विचारला की, गुरुजी, बौध्दिक वर्गांमध्ये एक दुस¬याच्या विरोधी विचारांचे प्रतिपादन होते. एकाने आपल्या बौध्दिकात संघ शाखेची अपरिहार्यता प्रतिपादन केली, तर दुस¬याने आपल्या बौध्दिकात दैनंदिन शाखेव्यतिरिक्त अन्यान्य क्षेत्रात कार्य करण्याची आवश्यकता मांडली. या दोन्ही विचारात मला परस्पर विरोध दिसतो.
 
प्रश्न विचारणारा स्वयंसेवक विद्वान, संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केलेला होता, ही माहिती श्रीगुरुजींना होती. श्रीगुरुजी उत्तर देताना म्हणाले की, बौध्दिक वर्ग घेणा¬या दोन्ही अधिका¬यांचे प्रतिपादन वेगळे वेगळे होते. परंतु दोघेही संघकार्यासंबंधीच बोलत होते का दुस¬या कोणत्या विषयासंबंधी? संघकार्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचाच दोघांचा प्रयत्न होता का आणखी काही?
स्वयंसेवकाने म्हटले की, दोघांनीही संघाच्या अपरिहार्य आवश्यकतेचे प्रतिपादन केले.
 
श्रीगुरुजी म्हणाले की, समाजात संघकार्य करताना स्वत:वर जी जबाबदारी असते, स्वत:चा जो अनुभव असतो, त्याच आधारे कार्याचे प्रतिपादन प्रत्येक कार्यकर्ता करतो. प्रत्येकाचे प्रतिपादन तसेच विवरण पध्दती वेगवेगळी असते हे खरे आहे. परंतु संघ शिक्षा वर्गात होणारे सर्व बौध्दिक वर्ग ऐकून त्यांचा वैचारिक समन्वय करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. प्रत्येकाचे प्रतिपादन संघकार्याचा एकेक पैलू स्पष्ट करणारे असल्याने हा समन्वय करणे अवघड नाही. चिरंतन सत्याचे, परब्रह्माचे प्रतिपादन उपनिषदात भिन्न भिन्न प्रकारांनी केले गेलेले आहे. सगुण, निर्गुण इ. वर्णन वाचताना एकाच परब्रह्माचे स्पष्टीकरण आपापल्या अनुभवांना अनुरूप भिन्न भिन्न वाटते. म्हणूनच समन्वयाची आवश्यकता, 'ततु समन्वयात्' ह्या ब्रह्मसूत्राच्या चौथ्या सूत्राचे विशदीकरण करताना, आद्य शंकराचार्यांनी स्पष्ट केली आहे.
- श्री. बापूराव
 
काल प्रवाहाच्या निरीक्षणात आनंद
१ फेब्रवारीपासून ६ ऑगस्ट १९४८ पर्यंतचा पहिला तुरुंगवास संपल्यानंतर श्रीगुरुजी घरी आले. तुरुंगात त्यांना एकटे रहावे लागले. तुरुंगात जाण्यापूर्वी ते सकाळी सहा साडेसहा पासून मध्यरात्रीपर्यंत स्वयंसेवकांशी, कार्यकर्त्यांशी बोलण्यात, गप्पागोष्टी करण्यात मग्न रहात असत. त्यांच्यावर एकटे राहण्याची कधी पाळी आली नाही. यामुळेच एका स्वयंसेवकाने त्यांना विचारले की, तुरुंगात एकटे रहावे लागल्याने त्रासदायक वाटले असेल? एकटे राहिल्यामुळे मन कंटाळले असेल? दुस¬याने शंका प्रकट केली.
 
श्रीगुरुजी म्हणाले, ''नाही मी एकटा राहिलो हे खरे आहे, परंतु ते एकटेपण आनंदात गेले.'' कोणीतरी विचारले, ''ते कसे?'' श्रीगुरुजी म्हणाले, ''शांतपणे बसल्यावर 'कालप्रवाह' पाहून होणा¬या विलक्षण आनंदाचा मी अनुभव घेत होतो. I was observing the flow of time.
 
हे ऐकून स्वयंसेवकांना काही समजले नाही. श्रीगुरुजी म्हणाले की, पवित्र भागीरथीच्या किना¬यावर तुमच्यापैकी कोणी थोडा वेळ बसून त्या भव्य पुण्यप्रद प्रवाहाकडे ध्यान देऊन पाहिले आहे? तो प्रवाह पाहिल्यावर आनंद होतो की नाही? भगीरथांनी कठोर परिश्रम करून गंगा भूतलावर आणली. ती पाप हरण करणारी पापहारिणी गंगा पाहून भारताचा पूर्ण इतिहास आठवतो. गंगा किनारी तपश्चर्या करणा¬या ऋषी मुनींची आठवण मनाला समाधान देते. मन स्वाभाविकपणे उदात्त विचारांनी भरून जाते. या आनंदाहून किती तरी पटीने अधिक आनंद कालप्रवाह पाहताना होतो.
 
स्वयंसेवकांना अशी कल्पना करणेही अवघड होते. स्वत: काठावर बसून शांत गतीने वाहणा¬या कालप्रवाहाचे निरीक्षण करणे आणि त्याच्या असीम आनंदाचा अनुभव घेणे, ही स्वयंसेवकांच्या क्षमतेच्या पलिकडची गोष्ट होती. ज्याने केवळ तलावच पाहिला आहे, तलावाहून अनंतपटीने विशाल असणारा समुद्र पाहिलाच नाही, त्याला समुद्राच्या विशालतेची कल्पना कशी येणार? समुद्राच्या विशालतेची कल्पना जशी अवघड तशीच त्या कालप्रवाहापासून मिळणा¬या आनंदाची कल्पनाही अवघड.
- श्री. बापूराव
 
ॐ चा अर्थ
ॐ चा अर्थ सांगताना श्रीगुरुजी म्हणाले की, अंतिम सत्याचे, परब्रह्माचे नाव ॐ आहे.
'तस्य वाचक: प्रणव:' असे कोणीतरी म्हटले आणि श्रीगुरुजींना त्याचा अर्थ विचारला.
श्रीगुरुजींनी याचे जे इंग्रजीत उत्तर दिले ते स्वयंसेवकांच्या स्मरणात राहिले. श्रीगुरुजी म्हणाले, '' If you can practically shut out every other sound falling on your ears from outside the only sound (नाद) that you hear in your ears resembles the sound A ॐ''
(बाहेरून आपल्या कानावर पडणा¬या आवाजांपासून आपल्याला मुक्त होता आले पाहिजे. त्यावेळी कानात घुमणारा आवाज जर आपण ध्यानपूर्वक ऐकला तर, तो ॐ कारासारखा जाणवेल.)
- श्री. बापूराव
 
श्रीगुरुजी आणि कामगार क्षेत्र
सन १९५० च्या सुरुवातीस मध्यप्रदेश 'इंटक'चे प्रमुख श्री. पु. य. देशपांडे यांनी मला त्यांच्या संस्थेत येण्याचे निमंत्रण दिले. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मा. बाळासाहेब देवरसांनी मला ते निमंत्रण स्वीकारण्यास सांगितले. मार्च महिन्याच्या शेवटी मी इंटकमध्ये प्रवेश केला. त्यावेळी परमपूजनीय श्रीगुरुजींनी सांगितले की, ज्या संस्थेत तुम्ही काम करण्यासाठी जात आहात त्या संस्थेचे अनुशासन पूर्णपणे पाळले पाहिजे. जेव्हा त्यांचे अनुशासन आणि तुमची सद़्सद़््विवेक बुध्दी यात संघर्ष निर्माण होईल तेव्हा त्यागपत्र देणे चांगले. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या संस्थेत आहात तोपर्यंत त्यांचे अनुशासनच प्रमाण मानले पाहिजे.
ट्रेड युनियनिझम मध्ये पूजनीय महात्मा गांधी तसेच मार्क्स या दोघांच्या विचारांचा अभ्यास करण्यासंबंधीही त्यांनी सांगितले. या दृष्टीने मी कोणकोणत्या पुस्तकांचे वाचन करत आहे या विषयी ते मधून मधून विचारत असत. काही दिवसांनंतर कामाचा व्याप वाढल्यामुळे मला अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. याबद्दल श्रीगुरुजींनी नापसंती दर्शवली आणि म्हटले की, दोन्ही गोष्टी बरोबरीने चालवण्यासाठी आवश्यक ते मानसिक संतुलन मिळवलेच पाहिजे. आपण स्वत:च आपल्याला कन्सेशन देण्याची प्रवृत्ती योग्य नाही.
 
कम्युनिस्ट ट्रेड युनियन कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीचाही मी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले. हेही सांगितले की, जेथे जेथे शक्य आहे, तेथे आपल्या मजूर कार्यकर्त्यांच्या घरीच उतरले पाहिजे. गरीब लोकांच्या कुटुंबात मुक्काम राहिला नाही तर केवळ पुस्तके वाचून त्यांच्याशी मानसिक तादात्म्य होणार नाही असे त्यांना वाटत होते.
 
सन १९५० च्या डिसेंबरात 'इंटक'च्या जनरल कौन्सिलवर माझी निवड झाली. जमशेटपूरहून परतताच मी भय्याजी दाणींना ही बातमी सांगितली. माझ्या बोलण्याच्या शैलीमुळे त्यांनी ओळखले की, हे पद मिळाल्यामुळे माझ्या मनात कर्तव्याऐवजी व्यक्तिगत मोठेपणाला स्थान मिळाले आहे. त्यांनी मला श्रीगुरुजींकडे नेले आणि त्यांनाही ही बातमी सांगितली. श्रीगुरुजींनी लगेच कोणतीही प्रतिक्रिया प्रकट केली नाही. इकडच्या तिकडच्या काही गप्पागोष्टी झाल्यानंतर त्यांनी एकदम विचारले की, मी कोणत्या मजुरांचा प्रतिनिधी म्हणून जनरल कौन्सिलमध्ये गेलो आहे? मी म्हणालो की, मँगेनीज मजुरांचा प्रतिनिधी. त्यांनी विचारले की, मँगेनीज मजुरांमध्ये 'इंटक'ची सभासद संख्या किती आहे? मी अंदाजाने सांगितले की, तीस हजारापर्यंत. अर्धा मिनिट ते स्तब्ध राहिले आणि मग म्हणाले की, हे पहा! माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर द्या, गोलमाल नको. ज्या उत्कटतेने तुमची आई तुमच्यावर प्रेम करते तितक्याच उत्कटतेने तुम्ही तीस हजार मजुरांवर प्रेम करता का? खरेखुरे सांगा. मी उत्तर दिले की, प्रामाणिकपणे मी 'हो' म्हणू शकत नाही. यावर श्रीगुरुजी म्हणाले की, 'तर मग तुम्ही इंटकच्याच जनरल कौन्सिलचे सभासद बनू शकता, भगवंताच्या जनरल कौन्सिलचे नाही बनू शकत.
 
'इंटक' बरोबरच काही कम्युनिस्ट प्रभावित युनियनमध्येही काम करण्याचा मी अनुभव घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. योगायोगाने पी. ऍंड टी. तसेच बँकिंगच्या क्षेत्रात मला तशी संधी मिळाली. यामुळे श्रीगुरुजींना खूप बरे वाटले. त्यावेळीही त्यांनी हेच सांगितले की, जोपर्यंत त्या संस्थांमध्ये तुम्ही कार्यकर्त्याच्या रूपाने आहात तोपर्यंत त्यांच्या अनुशासनाचे चांगल्या पध्दतीने पालन केले पाहिजे. अन्य कारणांनी तसे करणे ज्यावेळेस अशक्य वाटेल त्यावेळेस राजीनामा द्या. परंतु संस्थेत राहून अनुशासनहीन व्यवहार करणे आपल्यासाठी चांगले नाही.
 
पी. ऍंड. टी. तसेच बँकिंग या दोन्ही क्षेत्रात असताना एक वेळ अशी आली की, त्याच्या कम्युनिस्ट नेतृत्वाने देशव्यापी हरताळाचा निर्णय घेतला. मला ते निर्णय अनुचित वाटत होते. परंतु त्या दोन्ही संस्थात माझ्या पदाची श्रेणी नगण्य होती. त्या दोन्ही वेळेला श्रीगुरुजींनी म्हटले की, वरच्या निर्णयात बदल घडवून आणण्यासाठी लोकशाही पध्दतीने जे करणे शक्य आहे ते सगळे करा. परंतु निर्णय कायम राहिला, तर त्याची कार्यवाही करावी लागेल. कारण या गोष्टीस एक 'इश्यू' बनवून राजीनामा देणे यावेळी हितकारक ठरणार नाही. दोन्ही निर्णय बदलून घेणे माझ्या ताकदीबाहेरचे होते. परंतु काही कारणामुळे त्या निर्णयात नंतर बदल झाला.
 
या अवधीत एकदा मध्यप्रदेश हातमाग विणकर काँग्रेसचे नेता श्री. रा. बा. कुंभारे मा. बच्छराज व्यासांबरोबर श्रीगुरुजींना भेटण्यासाठी आले. त्यांनी आपल्या विणकर काँग्रेससंबंधी काही गोष्टी सांगितल्या तसेच मदतीची याचना केली. नंतर श्रीगुरुजींनी श्री. बच्छराज व्यास यांना तसेच मला सांगितले की, आपले बळ लक्षात घेऊन जितकी शक्य असेल तितकी मदत, बुनकर काँग्रेसला करा. हे करत असताना राजकीय लाभालाभ किंवा सौदेबाजीचा विचार आपल्या मनात येऊ नये. आपल्या संपर्काचे क्षेत्र विस्तृत करणे आणि विणकरांच्या समस्यांसंबंधी प्रत्यक्ष माहिती मिळविणे एवढाच आपला हेतू असला पाहिजे. विणकरांचे संघटन, त्यांची चळवळ या संदर्भात विचार करताना आपण सर्व विणकरांची एकच इकाई (युनिट) समजून चालले पाहिजे, मग भले ते सवर्ण असोत, अस्पृश्य विणकर असोत वा मुसलमान विणकर. सर्व मिळून एकच आर्थिक इकाई (युनिट) आहे, असा विचार करणे योग्य ठरेल, असे श्रीगुरुजींचे तात्पर्य होते.
 
श्री. कुंभारेंशी बोलताना श्रीगुरुजींनी सुचविले की, आजच्या हातमागात काही तांत्रिक सुधारणा केल्या पाहिजेत. या सुधारणांमुळे उत्पादन वाढले पाहिजे तसेच त्यावर काम करताना विणकरांना अवघड वाटू नये, थोडयाशा प्रशिक्षणाने त्यांना त्यावर काम करता यावे.
याच प्रसंगी श्रीगुरुजींनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा, विणकरांची चालू परिस्थितीतील आर्थिक व्यवस्था याबाबतही आपले विचार प्रकट केले होते.
 
शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित करावेत, अशी श्रीगुरुजींची इच्छा होती. ते उच्चवर्णियांना शिव्या देतात एवढयाच कारणावरून उत्तेजित न होता आपण त्यांच्याशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे श्रेयस्कर ठरेल असे त्यांना वाटत होते. आपले संबंध व्यक्तिगत असावेत तसेच सामाजिक स्तरावरही असावेत परंतु राजकीय सौदेबाजीचा विचार मात्र मनात येऊ नये या विचारांचे ते होते. त्यांच्या मते राजकीय सौदेबाजीमुळे दीर्घकालीन राष्ट्रीय लाभापासून आपण वंचित राहू आणि सद्य:कालीन लाभ तर होणारच नाही. कामगार क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी बोलताना एकदा ते म्हणाले की, आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन म्हणजे अखिल भारतीय मजदूर शेतकरी मजदूर संघ आहे. हा आर्थिक 'कॅरेक्टर' त्यांच्या ध्यानात राहिला, तर बाकी शेतकरी मजुरांबरोबर मिसळून जाण्याची इच्छा त्यांच्यात जागी होईल आणि सामाजिक कडवटपणाची तीव्रता कमी होईल.
- श्री. दत्तोपंत ठेंगडी
 
पूर्वीचा आणि आजचा संन्यासी
कन्याकुमारीहून विडिंथकराईला जाताना श्रीगुरुजींबरोबर स्वामी अमूर्तानंद होते. पूर्वीचे संन्यासी आणि आजचे संन्यासी या विषयाला धरून त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. श्रीगुरुजी म्हणाले की, स्वामी विवेकानंद दिग्विजयासाठी पाश्चात्य देशात गेले होते. पाश्चात्य लोकांचे हृदय स्वामीजींनी जिंकले. पाश्चात्य लोक त्यांना पाहून अचंबित झाले होते. परंतु आजचा संन्यासी जेव्हा पाश्चात्य देशात जातो ते प्रशस्ती-पत्र तसेच पैसा मिळविण्यासाठी.
- सूर्य नारायणराव
 
नवा दृष्टिकोण
१९ फेब्रुवारी १९७२ रोजी पूजनीय श्रीगुरुजी नौगाव येथे आले होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. ते जिल्हा संघचालक श्री. भूमिदे गोस्वामींच्या घरी उतरले होते. तेथे गप्पागोष्टींमध्ये हिंदू समाजात होत असलेल्या बदलांचा विषय निघाला. त्यातच मिश्र विवाहांची चर्चा छेडली गेली. मी श्रीगुरुजींना विचारले की, आज, अनेक हिंदू अहिंदूंशी विवाह करतात. त्यांच्या संततीचे भविष्य काय? श्रीगुरुजींनी उत्तर दिले की, अशा सर्व अहिंदूंना हिंदू करून घेतले पाहिजे. त्यांची संततीही हिंदू राहील. यावर मी म्हटले की, हिंदू समाज एवढा प्रगत झालेला आहे का? तेव्हा त्यांनी म्हटले की, हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आणि नव्या समाज रचनेसाठी हे करावेच लागेल. हळूहळू हिंदू समाज या व्यवस्थेचा स्वीकार करेल.
- मधुमंगल शर्मा
 
भारताचे परदेशांशी कसे संबंध रहावेत?
सन १९६८ च्या जुलै महिन्याची गोष्ट. आपला संघ शिक्षा वर्गाचा दोन महिन्यांचा दीर्घ आणि थकवा आणणारा प्रवास संपवून श्रीगुरुजी विश्रांतीसाठी इंदोरमध्ये पं. रामनारायण शास्त्रींच्या घरी गेले होते. यावेळी संघ शिक्षा वर्गात पहिल्यांदाच श्रीगुरुजींना आपल्या छातीत डाव्या बाजूस खूप दुखत असल्याचे जाणवत होते. गोमूत्राने शेकण्याचा प्रयोगही सुरू झाला होता. रोग गंभीर आहे. हे सर्वांच्या लक्षात आले होते. परंतु तेथे कॅन्सरसारख्या घातक रोगाने ठाण मांडले असेल असे कोणाला वाटत नव्हते. स्वत: श्रीगुरुजींना अतिशय त्रास सहन करावा लागत असूनही त्यांना देखील कॅन्सरची शक्यता वाटत नसावी असे वाटत होते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच त्यांचा दिनक्रम चालला होता. आवश्यक ते उपचार चालू होते.
 
त्यावेळी आमच्या 'दिल्ली नगर निगम'च्या सभासदांनी रशियात एक शिष्टमंडळ पाठविण्याचा विचार केला होता. तत्कालीन महापौर या नात्याने त्यात माझाही समावेश होता. परंतु काही विशेष कारणामुळे भारतीय जनसंघाच्या वरिष्ठ अधिका¬यांनी माझे रशियात जाणे अनावश्यक ठरविले आणि रशियासारख्या देशाशी कोणताही संबंध ठेवता कामा नये असे धोरण पत्करले. मी जनसंघाचा सभासद नसूनही जनसंघाच्या पाठिंब्यानेच नगर निगमचा महापौर झाल्याकारणाने जनसंघाच्या श्रेष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करणे मी आपले कर्तव्य समजलो आणि रशियास जाण्याचा विचार सोडून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंजाब प्रांताचा प्रांत संघचालक असल्याने तसेच श्रीगुरुजींशी असलेल्या घरगुती जवळच्या संबंधामुळे मी आपल्या कार्यक्रमातील बदल त्यांनाही कळवला. त्यांनी पत्रोत्तरातून या विषयासंबंधी आपले विचार प्रकट केले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात जे लिहिलेले आहे की पहिले ते हरिकथा निरुपण दुसरे ते राजकारण, तीसरे ते सावधपण, सर्व विषयी। चवथा अत्यंत साक्षेप।, ते व्यवहारात आणणा¬या आणि जणु समर्थ रामदास स्वामी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा युगुल अवतार असणा¬या श्रीगुरुजींनी भारताच्या क्षितिजाकडे पाहून असे मत प्रकट केले होते की, रशियाच्या चुकीच्या धोरणासंबंधी नाराजी प्रकट करण्याचे काम राजकीय पक्षाच्या नात्याने जनसंघाने केले हे ठीकच झाले; तथापि भारताचे राजकीय संबंध तसेच आवश्यकता पाहता जगातील भिन्न भिन्न देशांशी मित्रत्वाचे संबंध राखणे आवश्यक आहे. केवळ राजकीय स्वार्थ किंवा आर्थिक मदत वा संस्कृतीच्या नावाखाली देशास काळिमा फासणा¬या तथाकथित शिष्टमंडळामुळे भारताच्या प्रतिष्ठेस धक्का बसतो. त्यामुळे अशी शिष्टमंडळे न पाठवता योग्य व्यक्तींची शिष्टमंडळे पाठवली जाणे, विचारांची देवाण घेवाण होणे हे आवश्यक आहे असे मत त्यांनी स्पष्टपणे प्रकट केले होते. प्रत्यक्ष मी किंवा निगमाच्या शिष्टमंडळाने जावे का न जावे यासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे जनसंघाच्या अधिका¬यांचा आहे आणि त्यांचा जो निर्णय होईल तो मी पाळणे योग्य होईल. या अनुशासनाचे मला स्मरण करून देण्याची सतर्कता त्यांनी स्वत:ची प्रकृती अस्वस्थ असतानाही प्रदर्शित केली. केवढी अद़्भुत सावधानता, आणि भारताच्या राजकीय क्षितिजाचे केवढे सुस्पष्ट आकलन! हे सर्व पाहून कुणाचीही बुध्दी गुंग झाल्याशिवाय राहणार नाही.
 
श्रीगुरुजींनी इंदोरहून २७ जुलै १९६८ रोजी लिहिलेल्या पत्राचा संबंधित अंश, विषय स्पष्ट करण्यासाठी पुढे उद़्धृत केलेला आहे.
आपले दिनांक २३ जुलै ६८ चे पत्र आज दुपारी मिळाले. श्री. माधवराव मुळयांच्या पत्रावरून समजले होते की, आपला रशिया इ. देशातील दौरा दिनांक ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या प्रस्तावात जे विघ्न निर्माण झाले आहे ते महत्त्वाचे आहे. जनसंघाच्या धोरणाविरुध्द, जनसंघ नियंत्रित 'दिल्ली निगम' आपले कोणतेही शिष्टमंडळ रशियाला पाठविण्याच्या बाजूने कसे राहील? परंतु जरी चार सभासदांचे शिष्टमंडळ आपल्या नेतृत्वाखाली पाठविण्याचे निश्चित झाले असले तरी, निगमच्या जनसंघाच्या सभासदांनी त्या निर्णयात बदल करणे योग्य ठरेल आणि मग आपल्यावर जावे का न जावे या निर्णयाची जबाबदारी राहणार नाही.
 
ही परिस्थिती काही काळ डोळयाआड करून जर या प्रश्नाचा विचार केला, तर मनात असा एक विचार येतो की, अनेक देशांशी आपले संबंध तुटलेले आहेत अशी स्थिती भारताच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. त्या स्थितीला भारतास तोंड द्यावे लागेल. अमेरिका, इंग्लंड, पश्चिम जर्मनीही भारताशी विशुध्द मैत्रीचा व्यवहार करत नाहीत. या सर्वांशी असलेले संबंध तोडावे लागतील. असे कुठपर्यंत शक्य आहे? आणि शक्य असले तरी कुठवर उचित आहे?
 
आपले पत्र वाचल्यावर असा विचार आला की, रशियाच्या धोरणासंबंधी जो Protest (निषेध) करायचा होता, तो जनसंघाने केला आहे. आता यापुढे त्यांच्याशी अस्पृश्यतेने धोरण बराच काळ चालू ठेवण्याची आवश्यकता नाही. आपल्या अत्यंत विश्वासाने, विशुध्द राष्ट्रीय दृष्टीने, राष्ट्रहितासाठी कौशल्याने वातावरण निर्माण करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे अशा सभ्य व्यक्तींना या सर्व देशांमध्ये वेळोवेळी पाठवून तेथील लोकांना तसेच राजकीय क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींना भारतानुकूल करण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल. केवळ सरकारी राजदूत, मुत्सद्दी किंवा ज्यांना सांस्कृतिक म्हणणे संस्कृतीचा घोर अपमान आहे अशा सांस्कृतिक मंडळांनी काम होणार नाही, असे मला वाटते. या विचाराने मी आपल्या रशियादि देशांना जाण्याच्या संकल्पाला उचितच मानतो. पण आपण आणि स्थानिक मंडळींनी यासंबंधी ठरवावे. हा जनसंघाचा विषय असल्यामुळे त्यांनीच विचार करणे चांगले राहील. आपण जनसंघाचे सभासद आहात आणि आपल्या संघाचे ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ अधिकारी आहात, या दृष्टीने मी आपले विचार आपल्याला सांगणे हे माझे कर्तव्यच आहे. या कारणाने हे पत्र लिहिले आहे.
- लाला हंसराज गुप्त
 
माणसाला सुधारण्याचे काम
एकदा श्रीगुरुजींसमवेत राजकीय सत्ता आणि राजकीय यांत्रिकपणा या विषयावर गोष्टी चालल्या होत्या. अचानक श्रीगुरुजींच्या अंतरंगातील शास्त्रज्ञाने म्हटले की, पॉवर; मशीन चालवू शकते तिला सुधारू शकत नाही, पॉवर; पॉवर हाऊसलाही सुधारू शकत नाही. पॉवर हाऊस, पॉवर आणि मशीन या तिन्हीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुधारलेला माणूस पाहिजे. ज्यामुळे माणूस सुधारेल अशी देशात कोठे व्यवस्था आहे?'
 
एडिंग्टनपासून चेस्टरबाडल्सपर्यंत सर्वांना हेच म्हणायचे होते. आइन्स्टाईन आपल्या अखेरच्या काळात हीच वेदना हृदयात वागवत होते. परंतु ही गोष्ट इतक्या स्पष्टपणे का सांगितली गेली नाही? आणि कुठे सांगितली गेली असेल तर, ती अंमलात का आली नाही? आज तर लोकशाहीची मशिनरी आहे, शिक्षणाचीही मशिनरी आहे. ही शब्दावली सर्वांना मोहून टाकणारी आहे. प्रत्येक विभाग एक मशीन आहे. परंतु मशीनचे काम न स्वत:ला सुधारण्याचे, न माणसाला सुधारण्याचे. माणसाला सुधारण्याचे काम करण्याची श्रीगुरुजींची इच्छा होती.
- अखिलेश मिश्र
 
दोषाचे दिग्दर्शनही अत्यंत स्पष्ट शब्दात
मॉरिशसच्या स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख नेते स्वामी कृष्णानंद नागपूरला स्थानिक इंग्रजी दैनिक 'नागपूर टाइम्स'च्या कार्यालयात एकदा मला भेटले. त्यांनी मला सांगितले की, मला श्रीगुरुजींना भेटायचे आहे. काही करून त्यांची मला भेट घालून द्या.
 
मी श्रीगुरुजींशी यासंबंधी बोलल्यावर त्यांनी मला मोठया प्रसन्नतेने सांगितले की, वा! ही मोठी चांगली बातमी आहे. त्यांना आवश्य घेऊन या. त्याचे जेवणही येथे होईल. मलाही त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे.
मी स्वामीजींना श्रीगुरुजींची इच्छा सांगितली आणि त्यांना माझ्याबरोबर कार्यालयात येण्याची विनंती केली. परंतु ते म्हणाले की, मी एकटाच जाऊन येईन. हे ऐकल्यावर मी चकित झालो. मला त्याचे कारण समजले नाही आणि ते एकटेच श्रीगुरुजींना भेटण्यास गेले.
 
या घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा माझी श्रीगुरुजींशी भेट झाली तेव्हा ते मला म्हणाले की, छान झाले! स्वामीजी आले आणि मला भेटले. त्यांनी जी चूक केली होती ती त्यांच्या कानावर घालायची होती. त्यांची चूक अशी होती की, त्यांनी परदेशातील हिंदू समाजात परस्पर वैमनस्य निर्माण केले. मी त्यांना म्हणालो की, ही चूक निस्तरून हिंदू समाजात सामंजस्य तसेच ऐक्य निर्माण करण्यावर विशेष भर दिला पाहिजे.
 
स्वामीजींचा भारत सरकारमध्ये मोठा प्रभाव आणि मान्यता होती. अशा प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तीला त्याचा दोष स्पष्ट शब्दात दाखवून देणारे श्रीगुरुजी पाहिलीच व्यक्ती असतील. श्रीगुरुजींचा अधिकारच तसा होता. स्वामीजींनीही श्रीगुरुजींनी सांगितलेली गोष्ट नीट ध्यानात घेतली आणि त्यानुसार पुढे काम करण्याचे ठरविले.
- श्री. कासखेडीकर
 
शेवटपर्यंत काळजी
पूजनीय श्रीगुरुजी अल्मोडाला एकदाच आले होते. परंतु तेथील श्री. शोबनसिंह जीनांची चौकशी बैठकांमधून अवश्य करत असत. ज्या वर्षी श्रीगुरुजींचा देहान्त झाला, त्यावर्षी तृतीय वर्षाला आलेले स्वयंसेवक वर्गाच्या शेवटच्या कालावधीत श्रीगुरुजींना प्रांतश: भेटत होते. अल्मोडाहून श्री. रमाकांत त्रिवेदी गेले होते. अल्मोडाचा विषय चर्चेत आल्याबरोबर श्रीगुरुजींनी श्री. शोबनसिंह जीनांची आठवण केली. श्री. रमाकांतनी याविषयी मला पत्रातून कळविले. 'श्रीगुरुजींनी स्वत: आजारी असतानाही आपली आठवण केली,' असे सांगण्यासाठी मी शोबनसिंहांना भेटावयास गेलो. श्री. शोबनसिंह त्यांना पत्र लिहिण्याचा विचार करत होते. परंतु दुस¬याच दिवशी सकाळी रेडिओवरून प. पू. श्रीगुरुजींनी देह ठेवल्याची बातमी प्रसारित झाली. शेवटपर्यंत श्रीगुरुजींची स्मरणशक्ती किती तीव्र होती आणि संपर्कात आलेल्या, देशातील प्रत्येक व्यक्तीची त्यांना किती काळजी होती हे या प्रसंगावरून दिसून येते.
- ब्रह्मदेव शर्मा
 
थंड चहा
पूजनीय श्रीगुरुजी टुंडला स्टेशनवरून चालले होते. आम्हा फिरोजाबादच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले होते की, श्रीगुरुजींना फ्लॅटफॉर्मवर जाऊन चहा पोचता करा. आम्ही मोठया उत्साहाने काही स्वयंसेवकांना घेऊन स्टेशनवर पोहोचलो. गाडी २० मिनिटे उशिरा येणार होती. आम्ही वाट पाहू लागलो. चहासाठी एका हॉटेलवाल्याला सांगून ठेवले होते. चहाचे सर्व सामान आम्ही आणले होते, हॉटेलवाल्याने फक्त चहा करून द्यायचा अशी व्यवस्था करून आम्ही गाडीची वाट पहात राहिलो.
 
गाडी आली. मा. आबा थत्ते खिडकीजवळ उभे होते. आम्ही चहा करून आणला आणि किटलीत भरून श्रीगुरुजींपाशी घेऊन गेलो. चहा कपात भरला आणि श्रीगुरुजींना दिला. श्रीगुरुजींनी एका दमात चहा घेतला. गाडी निघता निघता श्रीगुरुजी आम्हाला म्हणाले की, आपले काम दुस¬याच्या भरंवशावर सोडू नका. तुम्ही आपला स्टोव्हही बरोबर आणावयास हवा होता. आज या घटनेची आठवण आम्हाला आमच्या चुकीचे स्मरण करून देते. नंतर समजले की, श्रीगुरुजींना अत्यंत गरम चहा लागत असे. आम्ही किटलीत चहा भरला आणि किटली घेऊन हॉटेलपासून डब्यापर्यंत धावत आलो. डब्यापाशी किटलीतून कपात चहा भरला. एवढे सगळे होईपर्यंत चहा थंड झाला. श्रीगुरुजींना थंड चहा प्यावा लागला याचा आजही आम्हाला पश्चात्ताप होतो.
- आश्चर्यलाल नरुला
 
पाया पडल्याने आयुष्य कमी होते
सन १९५८ ची गोष्ट. लखनौच्या कालीचरण इंटर कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्ग सुरू झालेला होता. मी प्रथम वर्षाला होतो. काही तरी नवीन करून दाखवायचे असे वाटणा¬यांचा आपोआपच एक गट बनतो. असे ऐकले होते की, श्रीगुरुजी कुणाला आपल्या पाया पडू देत नाहीत. बस, ठरले की, श्रीगुरुजींच्या पाया पडायचे. हे मोठे धाडसच होते. मी आणि माझा मित्र अशा दोघांनी हे आव्हान स्वीकारले. असे ठरले की, प्रथम मी पाया पडायचे आणि नंतर मित्राने. संध्याकाळचे शारीरिक झाल्यानंतर आम्ही गणवेषात भुजदंडच्या स्थितीत आपल्या निवासस्थानी जात होतो. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारापाशी श्रीगुरुजी काही अधिका¬यांसमवेत सहज उभे होते. स्वयंसेवकांच्या गर्दीतून आम्ही दोघे बाहेर पडलो. प्रथम मी दंड हातात घेऊन श्रीगुरुजींच्या पाया पडलो आणि लगेच गर्दीत मिसळून गेलो. पण ज्यावेळी माझा मित्र श्रीगुरुजींच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला, त्याचा भुजदंड स्थितीतील दंड श्रीगुरुजींच्या हातात आला. श्रीगुरुजींनी लगेच तो पकडला. श्रीगुरुजी अतिशय रागावले. त्यांचा तो रुद्रावतार आठवताच आजही मनाचा थरकाप होतो. त्या मित्राला वळकटी बांधून लगेच वर्ग सोडून जाण्यास सांगितले गेले. मोठा प्रश्न उभा राहिला. वर्गाच्या अधिका¬यांनी खूप मोठा प्रयत्न केल्यावर श्रीगुरुजींकडून त्यास क्षमा मिळाली. माझ्या मनात विचार आला की, श्रीगुरुजी यासाठी एवढे नाराज का झाले? एक प्रसंग समजला आणि श्रीगुरुजींच्या नाराजीचे कारणही कळले. प्रसंग असा होता की, एका घरी श्रीगुरुजी गेले असता त्या कुटुंबातील एक जण श्रीगुरुजींच्या पाया पडला. श्रीगुरुजींनी त्याला मोठया प्रेमाने पण गंभीरतेने सांगितले की, जो माझ्या पायाला शिवतो तो माझे आयुष्य कमी करतो. तुमचीही हीच इच्छा आहे का? हे ऐकताच आम्ही अवाक् झालो. अध्यात्म क्षेत्रातही पायाला शिवण्यास मनाई नाही. श्रीगुरुजींचा हा आग्रह संघटन शास्त्राच्या अंतर्गत असलेला निर्णय होता. हे आणखी एक उच्च कोटीचे असे अध्यात्म आहे. असे उदाहरण पाहण्याचा योग अजून तरी आलेला नाही.
- श्याम गुप्त
 
सम्यक् विचारांनी समृध्द
श्रीगुरुजी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती नव्हते. ते वर्तमानपत्रांवर फक्त नजर फिरवीत. पण तरीही सर्व राष्ट्रीय समस्यांविषयी त्यांचे विचार मूलगामी असत. भारत संघराज्याऐवजी एकात्म राज्य बनले पाहिजे असे त्यांना वाटत असे. भारतात इंग्रजी ऐवजी भारतीय भाषांना प्रतिष्ठित स्थान मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पंजाबमधील शिखेतर समाज हिंदी भाषेचा समर्थक होता. पण श्रीगुरुजींनी मात्र सा¬या पंजाबी लोकांची मातृभाषा पंजाबी आहे आणि तेथे सर्वांनी ती आत्मसात केली पाहिजे यावर भर दिला. पंजाबी लोकांच्या हिंदीची ते थट्टा करत. ते म्हणत की, पंजाबी माणसाच्या बाबतीत 'पत्र का उत्तर' चे 'पत्तर का उत्र' होऊन जाते.
- केवलराम मलकानी
 
लहानशा गोष्टीतूनही मार्गदर्शन
१९६४ मध्ये उत्तर प्रदेशचा संघ शिक्षा वर्ग लखनौमधील सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाला होता. श्रीगुरुजींना पूर्ण गणवेषात पाहण्याचा योग मला त्यावेळी आला होता. आपल्या स्वभावानुसार श्रीगुरुजी बैठकीत प्रत्येक स्वयंसेवकाचा परिचय करून घेत तसेच दोन-चार प्रश्न विचारीत. एका स्वयंसेवकाने जेव्हा आपल्या परिचयात, मी गण शिक्षक होतो, असे सांगितले तेव्हा श्रीगुरुजी त्याला म्हणाले की, आता तुम्ही शिक्षित झाला, म्हणून तुम्हाला शिक्षकाहून मोठा अधिकारी केले पाहिजे. कमीत कमी मुख्य शिक्षक तरी करावेच लागेल. जर नाही केले तर उपोषण करणार ना? काही काळापूर्वी त्या जिल्ह्याच्या राजकारणात काम करणा¬या एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त केल्याच्या निषेधार्थ उपोषण केले होते. अशा प्रकारे एका लहानशा प्रश्नाच्या माध्यमातूनही श्रीगुरुजींनी योग्य मार्गदर्शन केले, दिशा दाखवली.
- कमलेश कुमार
 
पातंजल सूत्राचे जीवनात अनुसरण
श्रीगुरुजी म्हणत असत की, आपले मन स्वस्थ, समतोल ठेवायचे असेल तर पातंजल सूत्राचा अवलंब केला पाहिजे. सूत्र अशा प्रकारचे आहे -
मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सुखदु:ख पुण्यापुण्यविषयाणां

भावनातश्चित्त प्रसादनम्।
या प्रकारे आपली भावना राहिली तर चित्त प्रसन्न राहते. दुस¬यांना सुख देऊन मनास प्रसन्न ठेवायचे, मैत्री वाढवायची. दुस¬यांचे दु:ख पाहून मन करुणेने भरून गेले पाहिजे. दुस¬यांचे पुण्य पाहून मनास आनंद वाटला पाहिजे. दुस¬यांचे पाप पाहून मनात उपेक्षेचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. अशी मन:स्थिती राहिली तर मन प्रसन्न राहते.
 
असाच श्रीगुरुजींचा व्यवहार होता. यामुळेच लोक कल्पनाही करू शकत नाहीत अशा आश्चर्यकारक गोष्टी आपण त्यांच्या जीवनात पाहतो. आपल्याला माहीत आहे की, लोक चुकीने संघास शिव्या देतात. अशा लोकांविषयी मनात कडवट भावना असणे, स्वाभाविक आहे. एकदा वर्तमानपत्रात आले होते की, पंडित नेहरू परदेशात प्रवासास गेले असता आपल्या मुलीला घेऊन गेले, हे ठीक झाले नाही. त्यावेळी पंडितजींनी संघावर बंदी घातली होती, त्यामुळे स्वयंसेवकांच्या मनात त्यांच्याविषयी राग होता. दुपारी चहाच्या वेळेस कोणी स्वयंसेवकाने म्हटले की, वर्तमानपत्रात हे प्रसिध्द झाले आहे. आणि पंडितजींनी हे चांगले नाही केले. श्रीगुरुजींनी त्या स्वयंसेवकाला म्हटले की, तुम्ही असे कसे म्हणता? तुम्हाला स्वत:ला मानवी हृदय आहे का नाही? वीस बावीस वर्षांपूर्वी त्यांच्या पत्त्नीचा मृत्यू झाला. आज ते ज्याला आपला समजतील असे त्यांना कोणीही नाही. अशा स्थितीत आपली पूर्ण विश्वासू व्यक्ती या नात्याने ते आपल्या मुलीला बरोबर घेऊन गेले. तुम्ही ही भावना समजू शकत नाही का?
- दत्तोपंत ठेंगडी
 
मी अपराधी आहे ...
सन १९७२ मध्ये आंध्रचा संघ शिक्षा वर्ग तेनाली येथे होता. त्या वर्गाला भेट देण्यासाठी श्रीगुरुजी तेनालीस हैदराबादहून कारने रवाना झाले. तेनालीकडे जाणा¬या रस्त्यावर काही ठिकाणी तेलंगाना-आंदोलनाने उग्र आणि हिंसक रूप धारण केले होते. रस्त्यामध्ये कार, ट्रक थांबवून त्यांना जाळण्याच्या घटना होत होत्या. त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर कार परत हैदराबादला पोहोचवावी असे ठरले. श्रीगुरुजींना ठरलेल्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसल्याने ते गंभीर झाले. ते सरळ माझ्या घरी आले. ते रात्री दोन वाजेपर्यंत बाहेरच्या व्हरांडयात विचारमग्न स्थितीत बसून राहिले. त्यांनी तेनालीच्या वर्गात आलेल्या स्वयंसेवकांच्या नावे एक पत्र पाठविले. त्या पत्रातून त्यांच्या अंत:करणाची व्यथा प्रकट होत होती.
 
संघ शिक्षा वर्ग संपल्यानंतर नागपूरमध्ये, केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील तो प्रसंग, त्या बैठकीस उपस्थित असलेले कायकर्ते कधी विसरणार नाहीत. त्या बैठकीत श्रीगुरुजींनी स्वत: उभे राहून अत्यंत नम्रपणे म्हटले की, ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मी तेनाली-वर्गात जाऊ शकलो नाही, त्यावेळी असेच वाटत होते की, कोणत्याही मार्गाने तेथे जाणे शक्य नाही. पण आता विचार केल्यानंतर ध्यानात येते की, अन्य एका मार्गाने प्रयत्न केला असता, तर कदाचित तेथे पोहोचता आले असते. आपण सोपवलेली जबाबदारी मी निभावू शकलो नाही. मी अपराधी आहे. मी आपल्या सर्वांकडून क्षमेची याचना करतो...... असे वाटते की, आता या शरीराकडून हे कार्य होऊ शकणार नाही.
- पांडुरंग देशमुख
 
अंतकाळीही संघ शिक्षा वर्गाची काळजी
श्रीगुरुजींच्या मृत्यूपूर्वी अर्थात मे १९७३ मध्ये संघ शिक्षा वर्ग नुकताच सुरू झाला होता. मी काही कामानिमित्ताने संघाच्या कार्यालयात गेलो. कार्यालयात श्रीगुरुजींचे वास्तव्य जेथे होते तेथेही मी गेलो. श्रीगुरुजी सोफ्यावर बसलेले होते; मला पाहताच त्यांनी विचारले की, या वेळी घडयाळ काय सांगतंय? मी म्हणालो की, साडे नऊ वाजले आहेत. त्यांनी पुन्हा विचारले की, तुम्ही संघ शिक्षा वर्गातून आला आहात का? मी म्हणालो की, हो.
 
श्रीगुरुजी म्हणाले की, हे पहा, आता साडे नऊ वाजले आहेत. तरीही अजून मला, संघ शिक्षा वर्गातील शिक्षार्थ्यांची संख्या कोणी सांगितली नाही. सकाळी सहा वाजताच स्वत: जाऊन संघ शिक्षा वर्ग पाहण्याची इच्छा होती. परंतु मला जाऊ दिले नाही आणि शिक्षार्थ्यांची संख्याही सांगितली नाही. स्वत:च्या प्रकृतीच्या गंभीर अवस्थेचा किंचितही विचार न करता केवळ संघकार्याचीच त्यांना काळजी होती. हे पाहून मीच काय सर्वच जण चकित झाले. मी लगेच रेशीमबागेत गेलो आणि श्रीगुरुजींना वर्गाची संख्या कळविण्याची व्यवस्था तत्काळ केली.
- श्री. कासखेडीकर.
 
स्वयंसेवकांची भावना
उन्हाळयाचे दिवस होते. एक दिवस दुपारी मी संघकार्यालयात गेलो आणि सरळ प. पू. श्रीगुरुजींच्या खोलीत जाऊन तेथे बसलो. त्यावेळी नगरातील सुप्रसिध्द वकील आणि संघाचे कर्मठ कार्यकर्ते श्री. विठ्ठलदास लोयाही तेथे बसले होते. नेहमीप्रमाणे श्रीगुरुजी पत्र लिहिता लिहिता, तेथे जे होते त्यांच्याशी गप्पागोष्टी करत होते. त्यावेळी श्रीगुरुजींनी म्हटले की, अरे! ऐकलं का? हा विठ्ठल (लोया) मला लघुलिपिक (स्टेनोग्राफर) ठेवण्याचा आणि खोली वातानुकूलित करून घेण्याचाही आग्रह करीत आहे. याचा अर्थ असा झाली की मी कामच करू नये. हे ऐकून सगळेच हसले. संघाच्या स्वयंसेवकांची भावना ही होती की, श्रीगुरुजींसारख्या अविरत कठोर परिश्रम करणा¬या महान व्यक्तीला काही ना काही सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
 
- श्री. कासखेडीकर