भवितव्याच्या पोटात
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
उर्दू - आंदोलन नव्हे मुस्लिम - आंदोलन
श्रीगुरुजींशी उर्दू - आंदोलनाची चर्चा करताना त्यांनी लगेच सांगितले की, हे 'उर्दू - आंदोलन' नसून 'मुस्लिम - आंदोलन' आहे. क्षणभर थांबून ते म्हणाले की, उर्दू, भाषा थोडीच आहे! जिला स्वत:ची लिपी नाही, व्याकरण नाही, ती कसली भाषा? ह्या आंदोलनामागे अराष्ट्रीय व फुटीर लोकांचे षडयंत्र आहे. या आंदोलनामुळे दुस¬या पाकिस्तानच्या मागणीला बळ मिळाले, असे त्यांना वाटते. जर हे तथाकथित उर्दू - आंदोलन कठोरतेने चिरडले नाही तर देशासमोर भीषण धोका उत्पन्न होईल.
संस्कृतच्या विकासासंबंधी आपले काय मत आहे? या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, संस्कृतच प्रादेशिक भाषांची जननी आहे. तिनेच भारतीय भाषांचे भांडार भरलेले आहे. स्वाभाविकपणे आपण संस्कृतप्रधान हिंदीला प्राधान्य दिले पाहिजे. ह्या हिंदीचा उगम संस्कृतपासून असला पाहिजे. तसेच विज्ञान आणि शिल्पविषयक परिभाषेच्या ज्ञानक्षेत्रात आपल्या भावी विकासासाठी संस्कृतमधूनच तिचे पोषण झाले पाहिजे.
 
श्रीगुरुजींनी म्हटले की, वास्तविक पाहता हिंदीच्या प्रगतीमुळे आपल्या सर्व भारतीय भाषा समृध्द होतील. सर्व भारतीय भाषांच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा केवळ इंग्लीशचा आहे. इंग्लीश हिंदीची तर शत्रु आहेच पण तमिळ आणि बंगालीचीही ती घोर शत्रू आहे. जोपर्यंत इंग्लीश घालवून दिली जात नाही तोपर्यंत कोणतीही भारतीय भाषा बहरणार नाही. श्रीगुरुजींनी ठामपणे सांगितले की, परकीय भाषा इंग्लीश आपल्या देशात रुजू देणे म्हणजे आपली संस्कृती व धर्म यांचे मूळ नाहीसे करणे होय. इंग्लीशचा अंगीकार करण्याचा अर्थ आपल्या शक्तीचे मुख्य स्रोत संपविणे होय. ब्रिटिशांच्या राज्यात इंग्लीशला जे स्थान होते ते या आपल्या शासनातही देणे हे मानसिक दास्याचे लक्षण आहे आणि जगाच्या दृष्टीने आमच्या राष्ट्रीय सन्मानावरील कलंक आहे. त्यांनी खंबीरपणे म्हटले की, काळजी करू नका, आता कितीही कृत्रिम प्राणवायू इंग्लीशला दिला तरी ती फार काळ जिवंत राहू शकत नाही. कारण तिचा मुख्य आधार तुटलेला आहे.
- शिवकुमार गोयल
 
भावी सरसंघचालक
१९४० च्या जुलै महिन्यात पू. डॉक्टर हेडगेवारांचे मासिक श्राध्द होते, त्यासाठी अनेक कार्यकर्ते नागपूरमध्ये आले होते. श्रीगुरुजी, मी आणि एक सद़्गृहस्थ टांग्यात बसून टिळक मार्गाने चाललो होतो. श्री. बाळासाहेब देवरसांना काही कामासाठी पायी जाताना आम्ही पाहिले. त्यांच्याकडे खूण करून श्रीगुरुजी म्हणाले की, दादा! हे बाळासाहेब देवरस आपले भावी सरसंघचालक आहेत.
- दादा गोरवाडकर
 
3. मुत्सद्देगिरीची ओळख
सन १९५१ मध्ये तिबेटवर चीनचे आक्रमण झाले. त्या वेळी श्रीगुरुजी कर्नाटकच्या दौ¬यावर होते. मी पण त्यांच्याबरोबर होतो. याच प्रवासात त्यांनी शिमोग्याहून एक वक्तव्य प्रसारित केले. सर्व वृत्तपत्रात ते प्रसिध्दही झाले.
 
या वक्तव्यात, चीनच्या विस्तारवादी प्रवृत्तीची आठवण करून त्यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना सावध केले होते की, चीन भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. आपल्या वक्तव्यात त्यांनी असेही म्हटले होते की, आज चीन जरी रशियाच्या उपग्रहासारखा वाटत असला, तरी तो रशियाच्या इच्छेविरुध्द अनेक गोष्टी करत असतो. तिबेटवर हल्ला करून भारताकडे सरकणा¬या चीनचा आज जरी रशियाला काही धोका वाटत नसला, तरी चीनची विस्तारवादी प्रवृत्ती पाहता तो उद्या रशियाला संकटात टाकल्याशिवाय राहणार नाही हे रशियाने समजून असावे.
 
जोवर भारत सरकारला सावध करण्याचा प्रश्न होता, श्रीगुरुजींचे वक्तव्य योग्यच होते; परंतु आपल्या वक्तव्यात श्रीगुरुजींनी रशियाला सावध करण्याची गोष्ट, अनेकांना खटकली. परंतु त्या वक्तव्यानंतर १५-२० वर्षांच्या काळात रशिया आणि चीन एकमेकांपासून कसे दूर होत गेले आणि त्यानंतर चीनच्या विस्तारवादी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी रशिया काय काय करतोय, हे पाहिल्यावर १९५१ मध्ये श्रीगुरुजींनी दिलेल्या इशा¬याची आठवण होते आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासू, अनुभवी मुत्सद्देगिरीची ओळख पटते.
- जगन्नाथराव जोशी
 
4. प्रशंसा - असत् लक्षणांपैकी एक
एकदा निवडणुकीची चर्चा चाललेली होती. श्रीगुरुजींनी सांगितले की, माझ्या मते या निवडणूक पध्दतीतील सर्वात वाईट गोष्ट ही की, त्यात आत्मस्तुति आणि परनिंदेचा आधार घेतला जातो.
 
हे ऐकून आम्ही सर्व अचंबित झालो. ते म्हणाले की, खरोखर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, ही लोकशाही, ही निवडणूक, त्यातून तयार झालेले सरकार, शक्तीसाठी जोर लावणारे राजकारण, हात पसरावयास लावणारे शिक्षण, साहित्य, कला इ. सर्व कसे आहे? या देशातच नाही तर सा¬या जगात संत, एकमुखाने सांगतात की, आत्मस्तुती व परनिंदा सर्वात मोठे पाप आहे. 'निज गुण श्रवण सुनत सकुचाही' स्वत:ची स्तुती करणे हे असत् लक्षण आहे. स्वत:ची स्तुती दुस¬याकडून करवून घेणे हा तर राक्षसी स्वभाव आहे. स्वत:ची प्रशंसा ऐकणे म्हणजे खोटी स्तुती आहे, तोंड देखलेपणा आहे. परंतु आधुनिक लोकशाहीतील पहिले पाऊल आहे निवडणूक, आणि निवडणुकीची पहिली आवश्यकता आहे - आत्मस्तुती आणि परनिंदा करणे आणि करवून घेणे. अशा स्थितीत राजकारण दुर्जनांच्या मार्गाने चालले, प्रशासन भ्रष्ट झाले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. या पध्दतीने जो कोणी निवडून येईल तो कसा असेल ही अंतर्मुख करणारी गोष्ट आहे.
- अखिलेश मिश्र