सन १९४५ मध्ये मेरठ येथे देवनागरी कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्ग चालला होता. श्रीगुरुजी संघ शिक्षा वर्गांचा प्रवास करत करत बंगालमधून मेरठला आले होते. हा तत्कालीन दिल्ली प्रांताचा वर्ग होता.
मी त्या वर्गात गणशिक्षक होतो. दुपारची वेळ होती. दुपारच्या जेवणाची दुसरी पंगतही जवळ जवळ संपत आली होती. मला श्रीगुरुजींनी बोलावल्याचा निरोप मिळाला. उत्सुकतेने आणि कुतूहलाने मी त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मोठया आपुलकीने आणि स्नेहाने माझी विचारपूस केली आणि मला म्हणाले की, मी बंगालमधील 'वर्धमान'हून तुमच्यासाठी खास मिठाई आणली आहे. अनेकांचा त्याच्यावर डोळा आहे, परंतु मी म्हटले की, पहिल्यांदा रतनला येऊ दे, मग सगळयांना मिळेल. त्यांनी त्या मिठाईची टोपली मागवली आणि मला दिली. देत असताना मला त्यांनी विचारले की, ही कोणती मिठाई आहे हे सांग. माझी जणु त्यांनी परीक्षाच पाहिली. मी थोडासा गोंधळलो, पण सहजपणे म्हणालो की, तो 'वर्धमान'चा 'सीताभोग आणि मिहीदाना' आहे. ते नेहमीप्रमाणे मोकळेपणाने जोराने हसले, मला शाबासकी दिली आणि मिठाईची टोपली मला देऊन म्हटले की, हे घेऊन जा, ज्यांना ज्यांना द्यायचे असेल त्यांना दे आणि स्वत: घे. मी तेथील सर्व अधिका¬यांना ती मिठाई दिली, माझ्या स्वयंसेवक मित्रांना दिली आणि स्वत:ही घेतली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, देशाचे कर्णधार, युगपुरुष आणि कोटयवधी तरुणांचे - बालांचे हृदय सम्राट श्रीगुरुजींना माझ्यासारख्या अत्यंत सामान्य स्वयंसेवकाविषयी किती आपुलकी! केवढे अपार प्रेम! हे आठवले की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणूनच त्यांच्या इच्छेनुसार कोटी - कोटी स्वयंसेवक मातृभूमीच्या चरणी सर्वस्व समर्पण करण्यासाठी सदैव सिध्द राहतात.
- रतन भट्टाचार्य
माझा पदवेष ठीकठाक केला
त्या दिवशी नगरातील स्वयंसेवकांचे पथ-संचलन पूर्ण गणवेषात होते. त्यावेळी पदवेशात लाँग बूट आणि पटीस पुंगळया असत. पटीस नीट गुंडाळणे कौशल्याचे काम असे, स्वयंसेवकाला ते सहजासहजी जमत नसे. मी आपल्या घराच्या व्हरांडयात पदवेश घालत होतो, पण त्या पटीस नीट गुंडाळणे मला काही जमत नव्हते. श्रीगुरुजी वरच्या खोलीतील खिडकीतून माझ्याकडे पहात होते. पटीस नीट गुंडाळलेले नव्हते. वरून मला टोचून बोलण्याऐवजी श्रीगुरुजी वरून खाली आले आणि स्वत: आपल्या हातांनी त्यांनी पटीस माझ्या पायाला नीट गुंडाळले आणि ते नीट कसे गुंडाळायचे हेही सांगितले. श्रीगुरुजींच्या या प्रेमळ वागण्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. किती साधे आणि महान होते ते!
दुपारी श्रीगुरुजींच्या प्रकृतीला मानवेल असे साधेच जेवण होते. जेवण झाल्यावर मला म्हणाले की, जेवण अत्यंत चवदार होते. कुणास ठाऊक, गेल्या जन्मी किती लोकांसाठी मी चवदार जेवण तयार केले होते म्हणून मला आज खूप चवदार जेवण मिळते.
- सिध्द गोपाल अग्निहोत्री
शिशु स्वयंसेवकाचेही नि:संकोच बोलणे
एखाद्या नव्या माणसाला श्रीगुरुजींच्या बाबतीत असे वाटत असेल की, हे फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे ते 'इन-एक्सेसिबल, अन-ऍप्रोचेबल' (भेट घेण्यास कठीण) असतील. परंतु श्रीगुरुजींच्या एका बैठकीतच त्याची भीती, संकोच संपून जात असे. मला आठवते की, एकदा श्रीगुरुजी नागपूरच्या गोरक्षण उपशाखेत गेले होते. प्रार्थना झाल्यावर परतताना ते मोटारीकडे चालले होते. मोटारीजवळ जाऊन श्रीगुरुजींनी जेव्हा दार उघडले तेव्हा एका शिशु स्वयंसेवकाने विचारले, ''काय रे, तुझी मोटार आहे का?'' मग गमतीशीर प्रश्नोत्तरे सुरू झाली.
''होय, माझी आहे'' - श्रीगुरुजी
''तू चालवतोस का?'' - स्वयंसेवक
''होय, मी चालवतो.'' - श्रीगुरुजी
''तुला मोटार कशी चालवायची हे लक्षात आहे?'' - स्वयंसेवक
''लक्षात आहे.'' - श्रीगुरुजी
''कमाल आहे तुझी'' स्वयंसेवकाने आश्चर्याने म्हटले.
एक शिशु स्वयंसेवक श्रीगुरुजींना प्रशस्तीपत्र देऊन म्हणतोय की, कमाल आहे तुझी. त्याच्या मनात केवढी आपुलकी असेल. श्रीगुरुजींचा स्वभाव, व्यवहार, गप्पागोष्टी हे सारे असेच होते. एकदा संपर्कात आल्यावर दुरावा, तुटकपणा सारे काही संपत असे.
नजरेतूनच गैरसोय जाणली
१९६५-६६ ची गोष्ट असेल. श्रीगुरुजी वाराणसीला आले होते. मी नवीनच नगर प्रचारक होऊन तेथे गेलो होतो. श्रीगुरुजी आलेले असल्यामुळे सगळीकडे मोठा दांडगा उत्साह होता. स्थानिक आदर्श कॉलेजमध्ये विभागीय कार्यकर्त्यांचे शिबीर होते. श्रीगुरुजींच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती. ते येताच पहिले काम होते, चहा देणे. श्रीगुरुजी खूप कढत चहा पीत असत. मी धोतर नेसणे नुकतेच शिकलो होतो. त्यामुळे योग्य त्या वेषातून चहा देण्यासाठी घाईघाईने धोतर नेसून जाण्याने माझी झालेली गैरसोय, श्रीगुरुजींच्या चटकन ध्यानात आली. त्यांनी लगेच मला फर्मावले की, जा चड्डी घालून ये. मनातल्या मनात मी सद़्गदित झालो. मला तर ते जणु वरदानच होते. ते वयच असे होते की, अपरिहार्य नसेल तर धोतराच्या फंदात कोण पडतो?
श्रीगुरुजी कार्यकर्त्यांची गैरसोय पहिल्याच नजरेतून कशी जाणत होते हे पाहून मन मुग्ध झाले. अंतर्ज्ञानी आणखी कोणाला म्हणणार?
- श्याम गुप्त
संपर्काचे अमृत
दिल्लीच्या संघ कार्यालयात श्रीगुरुजींचे वास्तव्य होते. श्री. एकनाथजी रानडे, माझी श्रीगुरुजींशी भेट घालून देण्यासाठी मला आपल्याबरोबर घेऊन गेले. श्रीगुरुजींशी माझी ओळख करून देण्यात आली. मी तेथे बराच काळ बसलो. श्रीगुरुजी, आलेल्या स्वयंसेवकांना त्यांचे स्वत:चे तसेच त्यांच्या घरातील सगळयांचे क्षेम-कुशल विचारत होते. खोलीतील वातावरण विलक्षण आनंदाने भरून गेले होते. मी श्रीगुरुजींची स्मरणशक्ती पाहून अवाक् झालो. ते कितीतरी स्वयंसेवकांची तसेच त्यांच्या घरातील सगळयांची मोठया आपुलकीने आणि प्रसन्नतेने विचारपूस करत होते. ते एकेका स्वयंसेवकाला जणु आपल्या अपार प्रेमाने आपलासा करत होते. तेव्हा मला श्रध्देय महात्मा गांधींची आठवण झाली. महात्माजींचा व्यवहारही असाच रहात असे.
- के. एन. वासवानी
पूजनीय श्रीगुरुजी - आईसारखी ममता
सन् १९५४ ची गोष्ट. मी बी. ए. च्या पहिल्या वर्षात शिकत होतो. आग्रा कॉलेजच्या वसतिगृहात मी नुकताच रहायला गेलो होतो. एक दिवस भल्या पहाटे निरोप मिळाला की, अर्ध्या तासात तयार होऊन संघाच्या कार्यालयात जा. दोन दिवसांसाठी दिल्लीला जायचे आहे. कार्यालयात गेल्यावर सर्व काही समजले. आमचे तत्कालीन विभाग प्रचारक श्री. विश्वनाथ लिमये यांना दिल्लीला बोलावले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घोटयाचे हाड एका अपघातात मोडले होते. सगळा पाय प्लॅस्टरमध्ये होता, ते अंथरुणावरच पडून होते. परंतु दिल्लीचे बोलावणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे असे ठरले की, दिल्लीपर्यंत त्यांच्यासोबत एका स्वयंसेवकाला मदतीसाठी पाठवावयाचे. दिल्लीला मोटारने जायचे होते. त्यामुळे कोणतीही गैरसोय न होता आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत लाला हंसराज गुप्तांच्या घरी पोचलो.
तेथे बरीच हालचाल सुरू होती. आतापर्यंत मला श्री. लिमये यांच्या 'मिशन'संबंधी थोडे थोडे समजले होते. पूजनीय प्रभुदत्त ब्रह्मचारी तसेच लाला हरदेव सहाय यांनी गोहत्याबंदीसाठी गोकुळअष्टमी २१ ऑगस्ट १९५४ पासून मथुरेच्या कत्तलखान्यावर सत्याग्रह करण्याची घोषणा केली होती. या विषयामुळे सा¬या हिंदू समाजात खळबळ निर्माण झाली होती. या सत्याग्रहात हिंदूंच्या विविध पंथ आणि मतांच्या प्रतिनिधी-संस्थांनी आपल्या सा¬या शक्तीनिशी सामील व्हावे आणि हा सत्याग्रह हिंदुत्वाचे विराट स्वरूप प्रकट करणारा ठरावा असे सर्वांना वाटत होते. या हेतूने त्या दिवशी (बहुधा १२ ऑगस्ट) सर्व प्रमुख नेत्यांची बैठक लाला हंसराज यांच्या घरी बोलावली गेली होती. सत्याग्रहाचे ठिकाण मथुरा होते. ते श्री. लिमये यांच्या कार्यक्षेत्रात मोडत असल्याने कार्यक्रमाची रूपरेषा आखताना त्यांना सल्ला मसलतीसाठी तेथे बोलावले गेले होते.
बैठक सुरू झाली. बैठकीस आर्यसमाज, सनातन धर्म, नामधारी शीख, जैन पंथ, रामराज्य परिषद, हिंदू महासभा, भारतीय जनसंघ इ. चे प्रमुख नेते तसेच पू. ब्रह्मचारी व लाला हरदयाल आलेले होते. श्रीगुरुजींच्या अध्यक्षतेखाली बैठक चालली होती. शेजारच्या खोलीत मी नुसताच बसलो होतो, कारण श्री. लिमयेही बैठकीत होते. तेथे चाललेला विचार-विनिमय थोडासा कानावर पडत होता. मला काहीसे आश्चर्य वाटत होते की, साधा सरळ वाटणारा विषय वादग्रस्त बनला होता. बैठकीत जबरदस्त विवाद चालला होता की, सत्याग्रह करावा की नको. अनेक तास बैठक चालूनही सर्वांचे एकमत होत नव्हते. नंतर लक्षात आले की, बैठकीत उपस्थित असलेला एक लहानसा गट सत्याग्रहाच्या पूर्ण विरुध्द होता.
हिंदूंचे प्रतिनिधी असूनही त्यांना हिंदू हितापेक्षा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हिताची काळजी अधिक होती. राज्यकर्त्यांचे हित म्हणजे मुसलमानांचे समर्थन गमवावे लागू नये आणि हिंदूंना भ्रांत ठेवता यावे. या सत्याग्रहाने न्याय-अन्यायाचा रोख ठोक निर्णय करणे त्यांना जड जात होते. परंतु इतर सर्व हिंदुत्वनिष्ठ मंडळी जाणून होती की, जर यावेळी सत्याग्रह टाळला गेला, तर पुढे अनेक वर्षे आजच्यासारखे वातावरण पुन्हा निर्माण करणे शक्य होणार नाही. पूजनीय ब्रह्मचारी व लाला हरदयाल सहाय यांनी स्पष्टपणे घोषणा केली की, कोणी येवो अगर न येवो आम्ही सत्याग्रह करणारच. प्रयत्त्न असा होता की, एकमताने सत्याग्रह व्हावा. हिंदू हितावर हिंदू नेत्यांकडूनच आघात होण्याची ही परिस्थिती धोकादायक होती. विवादातच बैठक संपली आणि बैठकीस आलेले बाहेर पडू लागले. अकस्मात श्रीगुरुजीही बैठकीतून बाहेर आले. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर व दु:खी होता. वेदनेचा सागर त्यांच्या डोळयात तरळताना दिसत होता. सत्याग्रहाचा निर्णय तर झाला होता परंतु राजकीय कपटनीतीचे जाळे विरले नव्हते.
एक तासानंतर मी व्हरांडयात काहीतरी चाळत बसलो होतो. थोडया वेळापूर्वीच व्यवस्थेतून माझी चहाचीही व्यवस्था झाली होती. अचानक आबाजी थत्ते मला शोधत आले आणि म्हणाले की, चला तुम्हाला गुरुजी बोलावताहेत. मी अवाक् झालो. एवढया संघर्षाच्या वातावरणात, निर्णयाच्या कठीण प्रसंगात, भेटणा¬यांच्या सततच्या गर्दीत त्यांना कसा काय पत्ता लागला की कृष्णचंद्र नावाचा एक किशोर येथील सा¬या घडामोडींशी अनभिज्ञ असलेला, येथे बसलेला आहे. असा मी कोण लागून गेलो की, त्यांनी मला आवर्जून बोलवावे. मी आबाजींबरोबर गेलो. एका खोलीत श्रीगुरुजींच्या संध्याकाळच्या चहापाण्याची व्यवस्था होती. श्री. दीनदयाळ उपाध्याय, श्री. भाऊराव देवरस, श्री. अटल बिहारी वाजपेयी, श्री. लिमये इ. सात-आठ जण देखील तेथे होते. पण अजून चहापानास सुरुवात झालेली नव्हती. मी तेथे जाताच श्रीगुरुजींनी हसत हसत म्हटले की, पहा, विश्वनाथ ही तुमची काठी आली. चला चहा घ्या आता.
याचा अर्थ, श्रीगुरुजींना माझ्यासंबंधी पूर्ण कल्पना होती. एवढेच नाही, तर मी येईपर्यंत चहापानही सुरू झाले नव्हते. माझा चहा बाहेरच पिऊन झाला होता. आबाजींनी व्हरांडयात मला नुसते विचारले असते की, चहा घेतला का, तरी तेवढयावरच मी खूष झालो असतो. परंतु एका सामान्य स्वयंसेवकाचीही सरसंघचालक इतकी काळजी घेतील तेही व्यग्रतेच्या काळात ही माझ्या दृष्टीने अभूतपूर्व गोष्ट होती. श्रीगुरुजींनी माझ्याकडे बशी सरकवली आणि म्हणाले की, घ्या मथुरावासी! हे रसगुल्ले खा. त्यांच्या डोळयातून आत्मीयतेचा स्रोत पाझरत होता. या आधी याच डोळयातून मी चिंतेचा, वेदनेचा महासागर पाहिला होता. खरोखरच हा गीतेने वर्णन केलेला स्थितप्रज्ञ पुरुष आपल्या सर्व स्वयंसेवकांसाठी मातेप्रमाणे वात्सल्यसिंधूही होता.
मी बरेचसे ऐकले होते, पाहिले होते की संघ एक परिवार आहे. परंतु इतक्या स्वच्छ नजरेने पहिल्यांदाच पाहिले. संघावर हुकूमशाहीचा आरोप करणा¬यांनी एकदा तरी श्रीगुरुजींच्या चेह¬यावरील ममतेचे ओझरते दर्शन घ्यावे.
- कृष्णचन्द्र
प्रत्येकाविषयी आपुलकी
मला आठवते की, एकदा दुपारी तीन वाजता चहाच्या वेळी आम्ही सगळे बसलो होतो. त्यावेळी जनसंघाचे एक नेते श्रीगुरुजींकडून मार्गदर्शन घेण्यासाठी तेथे आले. जनसंघाच्या आगामी बैठकीत अण्वस्त्र धोरणा (Nuclear policy) संबंधी ठराव यायचा होता. गप्पागोष्टीत, ठरावाची शब्दरचना कशी असावी याची चर्चा सुरू झाली. चर्चा गंभीरतेने चालली होती आणि आम्ही सगळे ती ऐकत होतो. याचवेळी संघ कार्यालयातील वारलू नावाचा एक सेवक तेथे आला आणि जणु काही महत्त्वाची बातमी सांगायची आहे अशा आविर्भावाने म्हणाला की, आपल्या म्हशीला टोणगा झालाय. वारलूसाठी ही महत्त्वाचीच बातमी होती. श्रीगुरुजींनी, वारलूची जी भावना होती त्याच भावनेने ती बातमी ऐकून आनंद प्रकट केला. इकडे अण्वस्त्र धोरणाची चर्चापण चाललेली होती. श्रीगुरुजींनी वारलूला उत्सुकतेने विचारले की, बाळंतपण कसे झाले? काही त्रास झाला का? जशी आस्थेने वारलूची काळजी तशीच जनसंघाच्या नेत्यांच्या विषयांचीही. एकाच वेळी वेगवेगळया 'वेव्ह लेंग्थ'वर क्षमतेने काम करणारे त्यांचे अलौकिक मन होते. हा एक मोठा दुर्लभ (rare), क्वचित् आढळणारा श्रेष्ठ गुण आहे.
- दत्तोपंत ठेंगडी
गुडिया! मला विसरणार तर नाहीस!
एका उन्हाळयात ती महान विभूती आमच्या सद़्भाग्याने आमच्या घरी आली. मला प्रथमच त्या पुण्यात्म्याचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. मनात खूप उत्सुकता होती की, ज्या श्रीगुरुजींविषयी इतके ऐकले आहे ते कसे असतील कुणास ठाऊक! पहिल्यांदाच जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा त्यांचे शांत शांत, तेजस्वी आणि सौम्य मुखमंडल पाहून विलक्षण शांती अनुभवली. श्रीगुरुजींना मुलांविषयी खूप प्रेम! आपल्या इतक्या व्यस्त कार्यक्रमातही ते माझ्याशी मोठया प्रेमाने बोलत होते.
माझे केस कापलेले असल्यामुळे कपाळावर येत होते. जेव्हा श्रीगुरुजींनी हे पाहिले तेव्हा त्यांनी मोठया प्रेमाने मला बोलावले आणि म्हटले की, हे बघ हे जे केस तुझ्या कपाळावर येतात, हे ठीक नाही. यामुळे तुझे डोळे बिघडतील. श्रीगुरुजींच्या सांगण्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की, आता मी नेहमी आपले केस बांधते. जेव्हा आमच्या घरी त्यांचे येणे-जाणे सुरू झाले तेव्हा मला वारंवार असे वाटे की, मीही श्रीगुरुजींना निरोप देऊ शकणार नाही का? आणि जणु त्यांना माझ्या मनाची गोष्ट समजली आणि एकदा ते मला म्हणाले की, काय गुडिया! आम्हाला सोडायला नाही का येणार? मी गालात हसून त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी गाडीत मोठया प्रेमाने मला आपल्यापाशी बसवून घेतले. मग मला कोण अडवू शकत होते? जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा जाताना त्यांनी मला विचारले की, गुडिया! तू मला विसरणार तर नाहीस? माझे नाव माहीत आहे का? माझे नाव आहे - माधव सदाशिव गोळवलकर.
- कु. जयंती अग्रवाल
बंगला निस्तेज, चैतन्यहीन झाला
श्रीगुरुजी नागपुरात असताना केव्हाही आमच्या बंगल्यात वास्तव्यासाठी येत असत. कधी विश्रांती, कधी बैठक, कधी प्रतिष्ठित व्यक्तींशी विचार-विनिमय, तर कधी मंगलकार्यात उपस्थिती. या बंगल्यात जी जी मंगलकार्ये संपन्न झाली त्या प्रत्येक मंगल कार्यास श्रीगुरुजी उपस्थित राहिले आहेत. श्रीगुरुजींच्या सोयीनुसार मंगल कार्याची तिथी निश्चित केली जात असे.
या बंगल्यात जेव्हा श्रीगुरुजींचे वास्तव्य असे, तेव्हा संपूर्ण बंगला चैतन्यमय होत असे. सर्वत्र अत्यंत प्रसन्नतेचे वातावरण रहात असे. याचे मुख्य कारण होते त्यांचे मनमोकळे प्रसन्न हास्य. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांशी तसेच लहान मुलांशी हास्यविनोद, थट्टामस्करी यांना ऊत येत असे. इतरवेळी हा बंगला श्री. बाबासाहेब घटाटे यांच्या धीर गंभीर अनुशासनाच्या पकडीत असे. श्रीगुरुजी या घरातल्यांशी इतके एकरूप होत असत की, सर्वजण आपल्या आवडीच्या विषयाची चर्चा त्यांच्याशी नि:संकोचपणे करत. कोणाबरोबर युध्दशास्त्र, कोणाबरोबर कायदा तसेच राजकारण किंवा धर्मशास्त्र त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाची चर्चा मोकळया मनाने चालत राही. त्यावेळी त्यांचे स्पष्ट आणि तर्काला धरून असलेले मत किंवा विचार सर्व जण एकाग्र मनाने ऐकत असत.
श्रीगुरुजींच्या वास्तव्यामुळे सहजतेने निर्माण झालेली प्रसन्नता एक दिवस अकस्मात लुप्त झाली. सारा बंगला खिन्न झाला. अशी उदासीनता कधी या बंगल्याने अनुभवली नव्हती. मुंबईत कॅन्सरच्या ऑपरेशननंतर श्रीगुरुजी जेव्हा बंगल्यात विश्रांतीसाठी आले तेव्हापासून येणा¬याजाणा¬यांची रीघ लागत असे. आपल्या शरीराच्या डाव्या भागाचे दु:ख उजव्या हाताने रोखण्याचा प्रयत्न करत असलेल्या श्रीगुरुजींच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर विराजमान असलेल्या प्रसन्नचित्त मूर्तीचे स्मरण, बंगल्यात राहणा¬यांना आजही होते.
धीर गंभीर अशा बाबासाहेबांना वाटे की, डॉक्टरांच्या आज्ञेनुसार मी श्रीगुरुजींना द्वितीय सरसंघचालकाच्या नात्याने सर्वप्रथम प्रणाम केला आणि आता त्यांनाच अंतिम प्रणाम करण्याची पाळी माझ्यावर येणार तर नाही ना!
श्रीगुरुजी या जगातून निघून गेले आणि हा बंगला निस्तेज झाला. चैतन्यहीन झाला. एक अपूर्व, अवर्णनीय पर्व संपले.