दिनांक १० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने भारतावर अकस्मात आक्रमण केले. चीनी सेना आसामातील तेजपूरपर्यंत आली. आता ती पुढे चालून भारताच्या आतल्या भागात घुसणार अशी बातमी प्रसारित झाली होती. यामुळे भारतात घोर चिंता पसरली. चिंताग्रस्त झालेले लोक, वृत्तपत्रांच्या कार्यालयात सतत फोन करून चीनी आक्रमणाच्या सद्य:स्थितीसंबंधी चौकशी करू लागले.
त्या काळात श्रीगुरुजी मा. बाबासाहेब घटाटे यांच्या बंगल्यात रहात होते. ते नुकतेच तेजपूर व दिल्लीला जाऊन नागपुरात परतले होते. त्यांना या राष्ट्रीय संकटाच्या विषयासंबंधी काही वक्तव्य प्रसिध्द करावयाचे होते. या कामासाठी त्यांनी मला बोलावले. मी लगेच गेलो.
त्यांच्यासमोर जाताच त्यांनी मला सांगतले की, ते राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांना भेटले आहेत. (श्रीगुरुजींना राष्ट्रपती - डॉ. राधाकृष्णन यांना केव्हाही आणि कितीही वेळा भेटण्याची परवानगी मिळालेली होती) आणि त्यांनी राष्ट्रपती महोदयांना आपले तेजपूरचे अनुभव सांगितले आहेत. श्रीगुरुजींनी राष्ट्रपतींना असे निवेदनही दिले की, अशा राष्ट्रीय संकटाच्या काळात सा¬या देशात नवचैतन्य, आत्मविश्वास निर्माण करण्याचीच प्रथम आवश्यकता आहे. त्या हेतूने (तत्कालीन) संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांना आपल्या पदावरून त्वरित दूर केले पाहिजे असा सल्लाही त्यांनी राष्ट्रपती महोदयांना दिला.
यावर डॉ. राधाकृष्णन त्यांना म्हणाले, ''श्री. नेहरू असे काही पाऊल उचलण्यास कधीही तयार व्हायचे नाहीत.''
हे ऐकून श्रीगुरुजींनी ठामपणे असे म्हटले, ''देशासमोर आज भयानक संकट उभे झाले आहे. यामुळे जनतेची मन:स्थिती अशी होऊ लागलेली आहे की, अशा संकटाच्या स्थितीत पं. नेहरूंना देखील पंतप्रधान पदावरून दूर करावे लागले तरी हरकत नाही, उलट त्यामुळे देशहिताचे रक्षणच होईल.''
डॉ. राधाकृष्णनांशी घडलेले संवाद सांगितल्यानंतर श्रीगुरुजी मला म्हणाले, ''मी या महत्त्वपूर्ण विषयावर, वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यासाठी हिंदीत एक निवेदन तयार केले आहे. त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद करून इंग्लीश वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याची व्यवस्था करा.''
मी आपल्या ज्येष्ठ सहका¬यांच्या मदतीने त्या निवेदनाचा इंग्लीशमध्ये अनुवाद केला आणि तो श्रीगुरुजींना दाखवला. श्रीगुरुजींनी तो काळजीपूर्वक वाचला आणि त्याची प्रशंसाही केली. माझ्या आनंदास पारावार राहिला नाही.
त्या इंग्लीश निवेदनाचा एक परिच्छेद श्रीगुरुजींनी स्वत: आपल्या हाताने लिहून त्याला जोडला. त्या परिच्छेदाची भाषा इतकी प्रगल्भ आणि सटीक होती की ती वाचून आमच्या संपादक महोदयाने असे उद्गार काढले की, हा परिच्छेद जणु गोधडीला जोडलेला उंची काश्मीरी शालीचा एक अनुपम तुकडा आहे.
इंग्लीश भाषेवर अलौकिक प्रभुत्व असूनही आमच्या इंग्लीश अनुवादाची प्रशंसा करण्याची श्रीगुरुजींची वैशिष्टयपूर्ण शैली म्हणजे प्रोत्साहनाने कार्यकर्ता तयार करण्याचे विलक्षण मार्गदर्शन!
त्याची अनुभूतीच मला त्या दिवसाच्या प्रसंगाने मिळाली.