व्यथित हृदय
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
व्यवस्थाच करत राहणार?
मथुरादत्त ठरल्याप्रमाणे अल्मोडा येथील श्रीगुरुजींच्या अभिनंदन कार्यक्रमास नैनितालहून आले होते. श्रीगुरुजींसमवेत रात्री गप्पा मारताना सीमेवर सैनिकांची तयारी कुठे आहे, कुठे नाही यासंबंधी चर्चा चालली होती. त्यावेळी आपल्या एका कार्यकर्त्याने प्रसंगानुसार सांगितले की, त्याचे मेव्हणे (बहिणीचे पती) या युध्दात देशाच्या पूर्वसीमेवरील खंदकात मारले गेले आहेत. हे ऐकताच श्रीगुरुजी गंभीर झाले. अंत:करणातील व्यथा चेह¬यावर व्यक्त होऊ लागली. त्या बंधूने पुढे सांगितले, ''कुमायूँ रेजीमेंटची एक पूर्ण बटालियन खंदकात कामास आली.'' या देशात राहणारा प्रत्येक जण माझा आहे या भावनेने प्रेरित असलेले ते देवपुरुष, श्रीगुरुजी, हे ऐकून उद्विग्न झाले. त्यांनी अवरुध्द कंठाने विचारले, ''किती जण मारले गेले असतील?'' त्या तरुणाने म्हटले, ''नेमक्या संख्येचा पत्ता कसा लागणार? पण कुमायूँचे ५०० तरी असतील.'' सन १९६२ च्या युध्दाच्या काळात संघाच्या सायं शाखेत येणा¬या जवळजवळ प्रत्येक स्वयंसेवकाचा कोणी ना कोणी संबंधित या युध्दात मारला गेला होता. या वृत्ताने त्यांचे अंतरंग विदीर्ण झाले. ते उद्गारले, ''अरे इतके लोक! आणि तुमच्या बहिणीचे वय काय असेल?'' मथुरादत्तने त्यांची वेदना ओळखून असे म्हटले, ''आपण त्यांची व्यवस्था करू.....'' काहीशा क्रोधाने व काहीशा आवेशाने तो महामानव उद्गारला, ''व्यवस्थाच करत राहणार?'' सर्व जण चूप होते. गंभीर वातावरण आणखी गंभीर झाले. मथुरादत्तांना वाटले की, आपण काही चुकीची गोष्ट बोललो की काय? एखादा पिता आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने जसा विव्हल होतो तसेच श्रीगुरुजी भाव विव्हल झाले. खूप मोठया प्रयत्त्नाने आपल्या मनावर ताबा ठेवून ते म्हणाले की, आपल्या भूमीचा कोणीही बळाने ताबा घेतो आणि आपल्या बंधूंना तेथून हाकलून देतो. ते आपले सगेसोयरे आपल्याच देशात निर्वासित म्हटले जातात. आणि आपण त्यांची (शरणार्थींची) व्यवस्था करत राहतो. जगातील अनेक लहान-लहान देशात शंभर-सव्वाशे वर्षांपासून हिंदू रहात आले आहेत. त्यांनी आपल्या रक्ताने-घामाने त्या देशांचा विकास केला आहे आणि आता तेथील सरकारे त्यांना हाकलून देत आहेत. ते आपले भाऊ येथे येतात, आपण त्यांची व्यवस्था करतो. असे किती काळ चालत राहणार? (कुमायूँ / लोहाघाट आणि डीडीहाट नगरात त्या काळात १०० कुटुंबे म्यानमार (ब्रह्मदेश) मधून आलेली होती.) मथुरादत्त यांनी दुस¬या दिवशी सांगितले की, श्रीगुरुजींना रात्रभर झोप लागली नाही.
 
- ज्योतिस्वरूप
 
जेव्हा युगपुरुषाचे डोळे भरून आले
थोर विचारवंत स्व. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कानपूरमध्ये सुरू होणा¬या विद्यालयाची कोनशिला बसविण्याचा कार्यक्रम श्रीगुरुजींच्या शुभ हस्ते झाला. याचवेळी एक सार्वजनिक समारंभही योजलेला होता. श्रीगुरुजींच्या हस्ते स्व. दीनदयाळजींच्या पूर्ण तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्कालीन कानपूर संभाग प्रचारक श्री. अशोकजी सिंघल यांनी वैयक्तिक गीत म्हटले. सारे वातावरण गांभीर्याने व पावित्र्याने भारले गेले होते. श्रीगुरुजी बोलण्यास उभे राहिले. स्व. पं. दीनदयाळ उपाध्यायांची चतुरस्र प्रतिभा, महानता, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यांचे प्रांजल वर्णन करणारा हिंदी भाषेतील धाराप्रवाह मधूनमधून वेदनांच्या खडकांवर आदळत होता. श्रीगुरुजी पं. दीनदयाळांना श्रध्दांजली अर्पण करत असताना असे वाटत होते की, जणु एखादा पिता आपल्या पुत्राला श्रध्दांजली वाहतोय.
 
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, ''पं. दीनदयाळ यांनी देशात तर नाव कमावलेच पण सा¬या जगातही त्यांचे नाव झाले असते, पण त्या आधीच त्यांना या जगातून निघून जावे लागले.'' जेव्हा ते म्हणाले, ''मी जर त्याला राजकारणात पाठवले नसते तर किती चांगले झाले असते.'' तेव्हा ते तीव्र वेदनांनी व्यथित झाल्याचे जाणवत होते, त्यांचे डोळेही अश्रूंनी डबडबलेले होते. आम्ही पत्रकार कक्षात बसलेलो असल्याने ते दृश्य आम्ही अतिशय जवळून पाहू शकलो.
 
- वीरेश्वर द्विवेदी
 
फाळणीमुळे व्यथित झालेले अंत:करण
नोव्हेंबर १९४६ मध्ये श्रीगुरुजी मुलतानला आले होते. तत्कालीन मुलतान जिल्हा संघचालक डॉ. बलदेव वर्मनांशी संभाषण सुरू होते. डॉ. बलदेव वर्मन यांनी विचारले की, पाकिस्तानचा बोलबाला खूप आहे. पाकिस्तान निर्माण तर नाही ना होणार? श्रीगुरुजी म्हणाले की, माझा महात्मा गांधींवर विश्वास आहे. ते पाकिस्तानची सूचना कधी स्वीकारणार नाहीत. असे होऊ शकते की, देश अखंड ठेवण्यासाठी जिन्नांच्या काही सूचना मुसलमानांच्या अनुनयासाठी कदाचित ते स्वीकारतीलही; परंतु ते देशाची फाळणी होऊ देणार नाहीत.
 
परंतु नंतर पाकिस्तानचा स्वीकार तत्कालीन नेत्यांनी केला आणि श्रीगुरुजींना फार मोठा धक्का बसला. हिंदू समाजाच्या संकटकाळात सप्टेंबर १९४७ मध्ये त्यांनी पंजाबचा प्रवास केला. दैवी संकटही त्यावेळी देशावर कोसळले होते. पुरामुळे मोठमोठे पूल तुटले होते. रस्ते वाहून गेले होते. पाकिस्तानात जात असलेले असंख्य मुसलमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अत्यंत दयनीय स्थितीत पडलेले होते. श्रीगुरुजींना जशी हिंदूंविषयी दया वाटत होती तशीच मुसलमानांविषयीही वाटत होती. जनतेचे दयनीय स्थितीतील करुण दृष्य पाहून श्रीगुरुजी अत्यंत दु:खी झाले. ते म्हणाले, ''ज्या नेत्यांनी पाकिस्तान स्वीकारले, त्यांना येथे आणून जनतेची ही शोचनीय स्थिती त्यांना दाखवली पाहिजे.''
 
- लेखराज शर्मा