१९४८ ची संघावरील बंदी उठल्यानंतर कार्यकर्त्यांचे एक संमेलन अमौसी नावाच्या गावी झाले होते. त्यावेळी श्रीगुरुजींनी एक बैठक घेतली होती. बैठक संपल्यावर 'उत्तिष्ठ' तसेच 'दक्ष' दिले गेले. श्रीगुरुजी थोडेसे पुढे जातात न जातात तोच संपत् घेणा¬या कार्यकर्त्याने सूचना दिली की, सर्व संघचालक येथेच थांबतील! ही सूचना ऐकताच श्रीगुरुजी लगेच परत आले. येण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, सर्व संघचालकांना थांबायला सांगितले होते. मी पण संघचालक आहे, म्हणून थांबलो. अशाच प्रकारची एक घटना लखनौच्या संघ शिक्षा वर्गात घडली होती. सायंकाळच्या संघस्थानासाठी सर्व स्वयंसेवकांना पूर्ण गणवेषात येण्यास सांगितले होते. श्रीगुरुजी पण त्या दिवशी पूर्ण गणवेषात आले. वर्गकार्यवाह या नात्याने मी त्यांना प्रणाम दिल्यावर मी त्यांना म्हणालो की, आज आपण पूर्ण गणवेषात आलात! मी तर आपल्याला पहिल्यांदाच गणवेषात पाहतोय. श्रीगुरुजींनी उत्तर दिले की, सर्व स्वयंसेवकांना गणवेषात यायला सांगितले होते, त्यामुळे मीही पूर्ण गणवेषात आलो. मी विचारले तर नाही परंतु माझे अनुमान असे आहे की, अमौसीच्या संमेलनप्रसंगी स्वयंसेवकांना दिलेली सूचना श्रीगुरुजींनी जशी ऐकली तशी इथेही ऐकली असावी. यावरून असे लक्षात येते की, पूजनीय श्रीगुरुजी अत्यंत अनुशासनप्रिय होते, नियमांचे काटेकोर पालन करणारे होते.
- कृष्ण सहाय
अनुशासनाचे पालन
१९५७-५८ चा सुमार असावा. नाशिकमध्ये रुंगठा हायस्कूलच्या मैदानावर वारकरी संप्रदायाचा नामसप्ताह होता. त्या दिवशी पूजनीय मामा दांडेकरांचे कीर्तन होते. श्रीगुरुजीदेखील कीर्तनास आले. त्यांच्याबरोबर दोन स्वयंसेवकही होते. मीही मामासाहेबांच्या मागे सहाय्यक म्हणून उभा होतो. श्रीगुरुजींना पाहताच त्यांना समोर आणून बसवावे या हेतूने गर्दीतून मी त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांना पुढे येण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीगुरुजी म्हणाले, ''नाही, उशीरा येऊन लोकांच्यामधून पुढे जाणे व कीर्तनाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे मला बरोबर वाटत नाही,'' असे म्हणून श्रीगुरुजी व्हरांडयातच बसले. मामासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेतून श्रीगुरुजी सुटले नाहीत. त्यांनी श्रीगुरुजींना पाहून कीर्तनाची दिशा बदलली. त्या दिवशीचे कीर्तन अत्यंत सुंदर झाले. हा प्रसंग आठवला की आजही त्या महान पुरुषांच्या महानतेची जाणीव होते.
- रामदास बुवा मनसुख
अनुशासनाची कठोरता तुटेपर्यंत नको
सन् १९५१ मध्ये संपूर्ण भारताचा संघ शिक्षा वर्ग नागपुरात सुरु झाला होता. या वर्गाचे वैशिष्टय असे होते की, हा वर्ग दर महिन्याने सुरू होत असे. त्यामुळे स्वयंसेवक आपल्या सोयीनुसार बारा महिन्यात कोणत्याही महिन्याच्या वर्गात भाग घेऊ शकत होते. मे आणि जूनच्या वर्गात मी शिक्षक म्हणून होतो. एक दिवस रात्रीच्या जेवणाच्या प्रवेशपत्रिकांची कडक तपासणी केली गेली. ज्यांच्याजवळ प्रवेशपत्रिका नव्हती त्यांना प्रवेश पत्रिका घेऊन येण्यासाठी परत पाठविले गेले. श्रीगुरुजी भोजन मंडपात आल्यावर भोजन मंत्र सुरू झाला. मंत्र संपल्यावर माझी चौकशी झाली. श्रीगुरुजींनी मला सांगितले की, उत्तर प्रदेशचे दोन स्वयंसेवक भोजन पत्रिकेसाठी परत पाठवल्याबद्दल नाराज आहेत आणि ते प्रवेश पत्रिका घेऊन परत भोजनास येणार नाहीत. त्यांची समजूत घालून जेवणाच्या दुस¬या पंक्तीत त्यांना जेवणासाठी बोलवावे असे ठरले. मी त्यांना शोधण्यासाठी जेवण सोडून त्यांच्या निवासाकडे धावलो. श्रीगुरुजी कठोर अनुशासन पाळले पाहिजे याबद्दल आग्रही होते, परंतु कोणत्या मर्यादेपर्यंत आणि ते कसे पाळले जाईल यासंबंधी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, तसेच स्वयंसेवकांवर त्याचा अयोग्य प्रभाव पडणार नाही हेही पाहिले पाहिजे, असे त्यांना वाटत होते.