दिनांक ९, १० आणि ११ फेब्रुवारी १९६८! प्रयाग विभागातील स्वयंसेवकांचे प्रयागमध्ये शिबीर होते. शिबीरात विशेष उत्साह, आनंद आणि चैतन्य शिगोशिग भरून राहिले होते. कारण स्वत: श्रीगुरुजींचा शिबीरात दोन दिवस मुक्काम होता. शेवटच्या दिवशी मात्र रंगाचा बेरंग झाला. सकाळी साडे अकरा वाजता बातमी आली की, पं. दीनदयाळजी या जगात राहिले नाहीत. ज्याने जेथे ऐकले तेथेच तो सुन्न झाला. सर्वांना जणु लकवा झाल्यासारखे वाटले. सर्वांची वाणी मूक झाली होती. सर्वांच्या नजरेत एकच प्रश्न होता. काय झाले? कसे झाले?
शिबीराचा समारोप लवकर उरकण्याचे ठरले. श्रीगुरुजींना स्व. दीनदयाळ यांच्या पार्थिव शरीराच्या अंत्यदर्शनासाठी जाता यावे यासाठी हा बदल करण्यात आला. श्रीगुरुजी समारोपप्रसंगी बोलण्यास उभे राहिले. सर्वांना वाटत होते की, ते पं. दीनदयाळजींविषयी बोलतील. पण श्रीगुरुजींनी पं. दीनदयाळांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. 'संघटन' या विषयावर त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. बोलताना त्यांना असह्य वेदना होत होत्या. गळा वारंवार अवरुध्द होत होता. एखादे वाक्य बोलतानाही अनेकदा खोकला येत होता. नाक सतत गळत होते, जणु आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अश्रूंचा मार्ग बदलून टाकला होता. भीषण परिस्थितीतही संघकार्याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या आपल्या आग्रहामुळेच ते संघाला इतके व्यापक आणि प्रभावी स्वरूप देऊ शकले.
- गणेशसिंह
सुख दु:खात समरस
संघावरील बंदी उठल्यानंतर श्रीगुरुजींचा देशव्यापी प्रवास चालू होता. त्या प्रवासाच्या योजनेतूनच ते पुण्यास आले होते. विश्वनाथ रसाळ नावाच्या एका स्वयंसेवकाचा येरवडयाच्या तुरुंगात मृत्यू झाला होता. श्रीगुरुजी त्याच्या कुटुंबातील लोकांचे सांत्वन करण्यासाठी गेले. त्या वेळचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. त्याचे नवजात अपत्य पाहून श्रीगुरुजी अत्यंत दु:खी झाले. श्रीगुरुजी स्वयंसेवकांच्या सुखदु:खात किती समरस होत असत याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. श्रीगुरुजींनी सा¬या हिंदू समाजावरच असे प्रेम केले होते. ते अखिल हिंदू समाजाला जणू एक कुटुंबच मानत होते.