२० ऑगस्ट १९४८ ची गोष्ट असावी. श्रीगुरुजी तुरुंगातून सुटून घरी आले होते. बैठकीत विषय चालला होता की, तुरुंगाच्या किंवा पोलीसांच्या अधिका¬यांची आपल्याशी कशी वागणूक होती? श्रीगुरुजींना त्रास देण्याची, सतावण्याची? श्री. बाळशास्त्री हरदासांना नागपुरातच पकडले होते आणि पोलीस अधिका¬यांनी त्यांना खूप मानसिक त्रास दिला होता. म्हणून स्वयंसेवकांनी श्रीगुरुजींना हा प्रश्न विचारला होता.
श्रीगुरुजी म्हणाले, ''डी. आय. जी. पोलीस अधिकारी माझ्याशी संभाषण करण्यासाठी आले होते. सुरुवातीला ते उध्दटपणे बोलले. त्यांनी दोन-चार वाक्ये चुकीच्या पध्दतीने उच्चारली. तुरुंगात सी. आय. डी. च्या वरिष्ठ अधिका¬यांनी भेटीसाठी मला बोलावले आहे असा निरोप मिळाला. मी त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा दोन अधिकारी गणवेषात टेबलावर पाय ठेवून हसत खिदळत होते. मला पाहताच ते म्हणाले की, ओ हो! आर. एस. एस. चे सर्वोच्च नेता सरसंघचालक आपणच आहात का? आपण तर खूप दुबळे पतले दिसता. आम्हाला वाटले होते की, एवढया मोठया संघटनेचे नेते चांगले धट्टेकट्टे असतील. असे म्हणून ते जोरजोराने हसू लागले. हे ऐकून मला वाटले की, यांचे डोके ताळयावर आणले पाहिजे, मी म्हणालो की, संघाच्या निर्मात्याने आपल्यासारखा विचार केला असता, तर कुठल्यातरी रेडयाला किंवा आपल्यासारख्या कुणाला तरी सरसंघचालक केले असते.
''हे ऐकताच टेबलावर ठेवलेले पाय खाली घेऊन ते उभे राहिले. मला नमस्कार करून त्यांनी म्हटले की, आईये, बैठिये इ. आणि नंतर बोलायला सुरुवात केली. नंतरचे बोलणे खूप सांभाळून आणि मर्यादेला धरून होते. त्यांनी नंतर कधीही सतावले नाही.''
- श्री. बापूराव
स्वावलंबनाचा धडा
१९४८ चे वर्ष होते. संघावर बंदी होती. श्रीगुरुजी आणि बाबासाहेब घटाटे तुरुंगात एकाच खोलीत होते. स्नान झाल्यावर आपले ओले कपडे न धुता तिथेच ठेवणे अशी घटाटे यांची श्रीमंती थाटाची घरंदाज प्रवृत्तीची सवय होती. स्नानगृहातून बाहेर आल्यावर त्यांचे नोकर आपल्या मालकांचे (श्री. बाबासाहेब) ओले कपडे धुण्यासाठी नेत असत. श्री. बाबासाहेब तुरुंगातही या प्रथेला अनुसरूनच वागले. दुस¬या दिवशी अंघोळीला जाताना श्री. बाबासाहेब आश्चर्यचकित झाले कारण त्यांचे कपडे कोणीतरी स्वच्छ धुवून, वाळवून व्यवस्थित घडया करून ठेवून दिले होते. हे कोणाचे काम असू शकते? हे जाणण्यासाठी श्री. बाबासाहेबांनी थोडं अवती भवती लक्ष ठेवावयास सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले की, साक्षात श्रीगुरुजीच स्वत: हे काम करत. हे दृष्य पाहून ते अचंबित झाले. त्यांचे अंत:करण गहिवरून आले. त्या दिवसापासून, ते आपली अंघोळ झाल्यानंतर, आपले कपडे स्वत:च धुऊ लागले; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरीदेखील.