आपल्या वास्तव आणि भावात्मक हिंदूपणाची ही काही मूलभूत वैशिष्टये आहेत. यांचा आपण विचार केला, ती अंगी बाणविली, आपल्या जीवनव्यवहारात ती प्रगट होऊ लागली आणि अशा प्रकारे या उज्ज्वल धारणांची खरी, जिवंत, चालती-बोलती प्रतीके म्हणून आपण जगासमोर उभे राहिलो, तरच त्या दिव्य हिंदू परंपरेत जन्मल्याचे सार्थक होईल.
असे यथार्थ, भावात्मक हिंदू आपण आहोत असे आत्मविश्वासपूर्वक आपल्याला म्हणता येईल काय ? स्वत:लाच विचारून पाहा. आपण सध्या कशा प्रकारचे जीवन जगत आहोत ? आपल्यासमोर कोणते आदर्श आहेत ? आपल्या भावना कोणत्या आहेत ? केवळ परिस्थितीमुळे वा योगायोगाने हिंदू समाजात जन्माला आलो म्हणूनच आपण हिंदू आहोत का? ख्रिस्ती वा मुसलमान लोकांनी चालविलेले धर्मांतराचे कार्य आपल्यापर्यंत पोचू शकले नाही. कारण त्यांची संख्या फार अल्ल्प व आपली त्या मानाने फार मोठी होती. म्हणूनच केवळ आपण हिंदू आहोत काय ? आपल्या हिंदूपणाचा अर्थ इतकाच आहे काय ? आपल्या हिंदूपणाचा अर्थ इतकाच आहे का ? ''अहो, आमची संस्कृती केवढी थोर आहे'' अशी नुसती पोपटपंची करण्यात काय अर्थ आहे ? आपल्या संस्कृतीची अनुभूती आपल्याला किती आहे ? आपले व्यक्तिगत जीवन हे समाजात समर्पित करण्यासाठी आहे, या दृष्टीने आपण आपल्ल्या जीवनाकडे पाहतो का ? केवळ सत्ता व संपत्ती यांच्याच मागे धावत न सुटता आपण सद्गुणांची जोपासना केली पाहिजे असे खरेच आपल्ल्याला वाटते का ? एखाद्या माणसाला आपल्याकडे नुसते पाहताक्षणीच असे म्हणता आले पाहिजे की, ''पहा, ज्या गोष्टींमुळे मनुष्यप्राणी खऱ्या अर्थाने मनुष्य बनतो, त्या सर्व गोष्टींमध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी धडपडणारा हा मनुष्य पाहा.'' अशा प्रकारचा मनुष्य आपण व्हावे असे आपणास खरोखर वाटते का ? या दृष्टीने आपण आत्मनिरीक्षण करूया आणि ती सर्व व्यवच्छेदक हिंदू लक्षणे हळूहळू अंगी बाणवूया. आपले तत्वज्ञान, आपला धर्म आणि आजवर पिढयान्पिढया आपले जीवन घडविणारे ते थोर सद्गुण आपण आत्मसात करूया. हे आपण केले तरच आपण भावात्मक आणि क्रियाशील हिंदू म्हणून साऱ्या जगासमोर उभे राहू शकू.
हिंदू समाज संघटित करावयाचा ही गोष्ट वरवर पाहता अगदी सोपी वाटेल. परंतु वस्तुत: त्याचा अर्थ असा आहे, की सर्वप्रथम आपल्याला स्वत:च्या दैनंदिन जीवनात, आपण हिंदू आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे. त्या थोर परंपरेशी सुसंगत अशा रीतीने आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूची रचना आपण केली पाहिजे. आपली प्रत्येक कृती, आपला पोषाख, आपली वागणूक यावर थोडक्यात म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर या विधायक श्रेध्देचा ठसा स्पष्टपणे उमटला पाहिजे. आपल्यावरील ही प्रमुख जबाबदारी आहे.