प. पू. श्रीगुरुजींचा जनसंपर्क व्यापक होता. विविध क्षेत्रातील राजकीय व अन्य नेत्यांशी त्यांच्या चर्चा होत असत. त्यातूनच त्यांनी अनेकांना राष्ट्रीय समस्यांविषयी मार्गदर्शन केले होते.
त्यावेळी श्री. एम. सी. छागला हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते. शाळा-कॉलेजांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांविषयी छागला अत्यंत असमाधानी होते. एकदा मुंबईत त्यांची व श्रीगुरुजींची भेट झाली. त्या वेळी शैक्षणिक सुधारणांची दिशा कोणती असावी याविषयी उभयतांत चर्चा झाली. त्यांना श्रीगुरुजींनी सांगितले, ''आपल्या देशाचा खरा इतिहास शिक्षणसंस्थांतून शिकवला जात नाही. हे आदर्शहीनतेचे केवळ पोटार्थी आणि स्वार्थी प्रवृत्तीचे मूळ कारण आहे. मातृभूमीविषयी गौरवाची भावना इतिहासाच्या योग्य अध्यापनाने निर्माण होऊ शकेल आणि पुनश्च गौरवशाली बनण्यासाठी त्यागपूर्वक परिश्रम करण्याची आकांक्षा तरुणांत निर्माण करता येईल.'' श्रीगुरुजींनी त्याच वेळी असेही बजावून ठेवले की, ''पण, ज्या शासनाचे तुम्ही मंत्री आहात ते शासन, अशा प्रकारचा सत्य इतिहास शिकविण्यास अनुकूलता दर्शविणार नाही.''
राष्ट्रीय शिस्त योजनेचे सूत्रधार श्री. जगन्नाथराव भोसले यांच्याशीही श्रीगुरुजींची अशाच प्रकारची चर्चा झाली होती. आपल्याजवळ साधने आहेत. पैसा आहे, सरकारी पाठबळ आहे, तरीही जीव ओतून सातत्याने काम करणारी माणसे का मिळत नाहीत? असा जगन्नाथरावांना प्रश्न पडला होता. संघाजवळ साधने अपुरी आणि 'सँक्शन' कोणतेही नाही. उलट सत्ताधा¬यांचा विरोध मात्र आहे. असे असताना, स्वार्थत्यागपूर्वक तपानुतपे काम करणा¬या मंडळींचे मोहोळ तो कसा जमवू शकतो, याचा उलगडा त्यांनी श्रीगुरुजींना विचारला होता. त्यांनाही श्रीगुरुजींनी सांगितले होते, ''मातृभूमीवरील विशुध्द भक्तीची भावना जागविल्याविना सद्गुण अंगी बाणविण्याची आणि त्याग करण्याची प्रेरणा तरुणांत निर्माण करता येणार नाही.''