आपण सर्वजण संघटना करावयास निघालो आहोत, फूट पाडायला नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही कधी फूट पडू देणार नाही. संघटनेचेच कार्य सतत सुरू राहील असा आपल्यातील प्रत्येकाने विचार करून आपल्या भोवताली जे आपले बांधव आहेत त्यांच्यातही हाच विचार रूजवावा. छोटया छोटया गोष्टीवरून कार्यकर्त्यांमध्ये आपापसात मतभेद होतात आणि त्यामुळे ते नाराजही असतात. सध्या तर ठीक आहे. आम्ही एकमेकांवर नाराज झालो तरीही एकमेकांची समजूत काढून नाराजी घालवितो, परंतु वारंवार नाराजीचे प्रसंग येत गेले तर समजूत काढणेही कठीण होऊन बसेल. असे प्रसंग वारंवार येणार नाहीत या दृष्टीने आम्हाला विचार केला पाहिजे. लहान लहान बाबी आपल्या मनाला इतक्या का लागाव्यात हेच माझ्या लक्षात येत नाही. वास्तविक असे होऊ देऊ नये. आपसात थोडेदेखील मनोमालिन्य येऊ देता कामा नये. प्रत्येक बाबतीत संघाचाच विचार असला पाहिजे. एखाद्या बाबतीत जर आपल्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आपल्यापुढे आला तर 'हा निर्णय कसा काय घेतला गेला, असा निर्णय घेतला जाणार नाही असे आम्हाला वाटत होते' - असा विचार कदापि मनात येऊ देऊ नये.
एकदा निर्णय घेतला गेला की, मग त्या निर्णयाला पाठिंबा देण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे. या प्रकारे लहान लहान गोष्टींवरून होणारे मतभेद टाळले तर किती चांगले होईल. वास्तविक आम्हाला अनेक प्रकारच्या लोकांना संघटित करावयाचे आहे. संपूर्ण समाज संघटित करावयाचा आहे. सहजीवनाची निष्ठा समाजव्यापी बनवावयाची आहे. हे फार मोठे कार्य आहे. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच कशीही परिस्थिती ओढवली तरी आपल्यात कोणत्याही प्रकारचे मनोमालिन्य येऊ द्यावयास नको.
मधूनमधून असे होते. पूर्वीही असे झाले आहे की, एखादा कार्यकर्ता रागावून कार्यातून निवृत्त होऊ लागतो. हे व्हावयाला नको. आता तर आपल्याला याकडे जास्त सावध होऊन लक्ष द्यावे लागेल. आम्ही संघटनेचे कार्य करीत आहोत आणि ते कार्य आम्हाला संपूर्ण समाजात उभे करावयाचे आहे, हाच आपल्या कार्याचा दृष्टिकोन आपल्या मनात स्थायी झाल्याचे दिसले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा विच्छेद निर्माण न होता एकदिलाने संपूर्ण कार्य केले जात आहे, अशी आपल्या कार्याची अवस्था आपल्याला कायम ठेवावयाची आहे.
संघटनेच्या या अवस्थेचा आम्हाला आता आणखीही विचार करावा लागेल. विद्यार्थी, राजकारण, कामगार आदी निरनिराळया कार्यक्षेत्रांत आपले कार्यकर्ते काम करीत आहेत. या कार्याची रचना, घटना, नियम, व्यवहार वगैरे भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. तरीही आपला स्वयंसेवक तेथे आपल्या संघटनेची जी धारणा आहे त्या धारणेसह जातो आणि ती धारणा तेथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारचा प्रत्यक्ष प्रयत्न तेथे होतो किंवा नाही याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे.
असे करताना जर लोक असे म्हणतील की, ही मंडळी या ठिकाणीसुध्दा आपल्या संघाची हुकुमशाहीच चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत तर त्याकडे आपण लक्ष देऊ नये. जे लोक असे म्हणतात त्यांना हुकुमशाही ही काय चीज असते हे माहीत नाही. आपल्या कार्यात हुकुमशाहीचा लवलेशही नाही. येथे तर जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांच्या सामूहिक इच्छेनेच कार्य होते, यालाच हुकुमशाही समजून लोक वाटेल त्या प्रकारचे आरोप करीत असतील तर ते त्यांना करू द्या. त्याची चिंता न करता राष्ट्रसंघटनेचे सूत्र आपल्या निरनिराळया कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे. जी निरनिराळी कामे चालतात त्याच्याही काही मर्यादा असतात. अडचणी असतात. हे मान्य केले तरीही आपण आपले ध्येय सोडून देण्याचे काहीच कारण नाही.